Manachya vaatevarti Avyakt to an mi - 17 books and stories free download online pdf in Marathi

मनाच्या वाटेवरती... अव्यक्त तो अन मी... - 17

पुढे...


"सब्र की आंच पर थोडा तपने दो इसे,
इश्क है या वहम, सारे पर्दे हट जायेंगे।"


मी बोलली होती ना...संयम ही प्रेमाची सगळ्यात कठीण पायरी आहे, आणि तीच पार करणं होतं नाही...पण कदाचित मी आणि अतुलने केली होती, कमीतकमी आम्हाला तरी असं वाटत होतं...खूप वेळा असं वाटतं की बोलून मोकळं व्हावं, मनात दाबून ठेवलेल्या भावनांना वाट मोकळी करून द्यावी, पण ते शक्य होत नाही; कारण त्यावेळी आपणच जाणत नसतो की नक्की ह्या भावना आहेत कोणत्या...आणि जोपर्यंत त्या भावनांना काय नाव द्यावं हे कळते तोपर्यंत खूप उशीर होऊन जातो, पण आता उशीर करायचा नव्हता मला....

मनाच्या गाभाऱ्यातून दिलेली साद त्या व्यक्तीपर्यंत पोहचावी, असं नेहमीच वाटत राहतं. आणि हा निरागस प्रयत्न आपण यासाठी करतो की आपलं त्या व्यक्तीशी मनाचं नातं असतं आणि आपण त्यासाठीच संधीचा शोध घेत राहतो; आणि ती वेळ आल्यावर मात्र आपण कधीकधी नि:शब्द होतो....असं बरेच वेळा माझ्या अन अतुलच्या बाबतीत घडलंय, नाहीच व्यक्त करू शकलो आम्ही आमच्या भावना...पण आता असं काही घडू द्यायचं नव्हतं, आजपर्यंत जे अबोल्याचे क्षण आमच्या आयुष्यात आले त्यांना आम्ही बदलू शकत नव्हतो पण येणारा क्षण कसा स्मरणीय राहील हे नक्कीच आमच्या हातात होतं आणि त्यामुळेच दुराव्याचे हे तीन दिवस गपगुमान सहन करायचे होते....

...आकर्षण हाच प्रेमाचा पाया असतो हे खरं आहे, पण दोन लोकं एकमेकांपासून दोन दिवसही लांब राहिले तर ते आकर्षण संपून जातं आणि प्रेमाचा जन्मचं होतं नाही...जेंव्हा हे आकर्षण एकमेकांबद्दल ओढ निर्माण करतं तेंव्हा प्रेम नावाचं बीज अंकुरतं आणि त्यातून तयार होतं रोपटं 'प्रेमाचं'...आता या रोपट्याला भावनांच्या ओलाव्याने आणि विश्वासाच्या खतपाण्याने मोहरू द्यावं लागतं...इतक्या वर्षात दुराव्याचे बरेच प्रसंग आले तरीही आमच्यातली ओढ संपली नव्हती त्यामुळे मला तरी हे कळलं होतं की आमच्यातल्या आकर्षणाने आता प्रेमाची जागा घेतली आहे...आमच्या प्रेमाला बहर चढत होता, संयमाची पायरी चढून आता फक्त कबुली द्यायची होती, पण या दोन्ही गोष्टींसाठी एकमेकांना जोडण्यासाठी 'विश्वासाचा' पूल हवा हे मात्र मी विसरली होती...पण काहीही असो, मला मात्र आता राहवल्या जात नव्हतं, मला तरी अतुलसमोर माझ्या मनातलं बोलून टाकायचं होतं, हं मात्र, त्याच्या उत्तराची अपेक्षा केलीच नव्हती मी....

त्यादिवशी अतुलला भेटून आल्यापासून माझ्या चेहऱ्यावरचं हसू कमी होत नव्हतं...सतत त्याच्याच सावल्या दिसत होत्या आजूबाजूला, आमचे ते खास क्षण डोळ्यांसमोर तरळत होते...नव्या नव्या प्रेमात कसं सगळं आनंदी आनंद गडे वाटते, नाही?? मी त्याला अपवाद कशी ठरणार होती...आज बऱ्याच दिवसांनी चेतनशी बोलणं झालं...जरा चिंतेत वाटला तो,आणि मला हसवणारा स्वतः असा नाराज असेल हे मला पटणारं नव्हतं... शेवटी मैत्री हे नातचं असं आहे...चेतनला बोलल्यावर कळालं की साक्षीसाठी तिच्या घरचे मुलं शोधत आहेत आणि आमच्या चेतनने अजून घरी याबद्दल काही वाचाही फोडली नव्हती...प्रत्येकाला आपलं प्रेम भेटायलाच हवं हा विचार करून मी ताईला चेतन आणि साक्षी बद्दल सगळं सांगितलं... मला माहीत होतं की चेतन फक्त 'गरजनेवाला' आहे 'बरसनेवाला' नाही, घरी त्याच्या तोंडातून शब्दही निघणार नाही...पण ताईने नुसतंच माझं ऐकून घेतलं, त्यावर काही प्रतिक्रिया दिली नाही किंवा ती घरी बोलेल की नाही हे सुद्धा सांगितलं नाही...

चेतन आणि साक्षी जूनमध्ये इंटर्नशिप साठी पुण्यालाच येणार होते आणि त्यासाठीच माझा हा खटाटोप होता की दोघांच्याही घरी त्यांच्याबद्दल माहीत व्हावं, जेणेकरून त्यादोघांना काही अडचण होणार नाही...पण मनात धाकधूक ही होती की जर याचे परिणाम उलटे झाले तर माझ्यामुळे चेतनचं मन ही दुखू शकते...

शेवटी तो दिवस उगवलाच ज्याची प्रतीक्षा मी किती वर्षांपासून करत होती, ज्या दिवसासाठी मागचे तीन दिवस मला तीन वर्षांप्रमाने भासत होते...विचार करून करून नुसतं पोटात गुदगुल्या होत होत्या आणि याच विचाराने रात्रभर झोपही आली नाही, त्यामुळे माझी सकाळ खूप लवकर झाली...पूर्ण हॉस्टेल सकाळच्या साखर झोपेत स्वप्न पाहत होतं पण मी सोनेरी सकाळ पाहून संध्याकाळी माझं स्वप्न कधी पूर्ण होईल याची वाट बघत होती... इतक्यात सकाळी सकाळी सहा वाजताच माझा फोन वाजला...इतक्या सकाळी कोण फोन करतंय म्हणून पाहिलं तर अतुल होता...ह्याने अचानक इतक्या सकाळी का फोन केला असेल म्हणून घाईघाईने फोन रिसिव्ह केला,

"हॅलो...काय झालं?? तू ठीक आहेस ना? इतक्या सकाळी सकाळी फोन...काही झालंय का तुला?? येऊ का मी??"
आणि काळजीने माझ्या प्रश्नांचा भडिमार सुरू झाला...

"एक मिनिट....श्वास घेशील तू थोडासा...?हम्मम...आता बोलू मी..?...."

"हं... हो...बोल...काय झालं?"

"काही नाही, बोलावं वाटलं असंच...आज असं वाटत आहे,
कितने मौसम बदले इस शहर ने लेकीन,
आज लगता है सच मे बहार आयी है। "

अतुलचे शब्द ऐकून माझा चेहरा खुलला, त्याचीही रात्र माझ्यासारखीच गेली असावी हे त्याच्या बोलण्यातून कळत होतं... मी मुद्दाम त्याची मज्जा घेत बोलली,

"हो का...मला तर काही विशेष नाही वाटत आहे आज, रोजच्या सारखीच सकाळ आहे...."

"अस्सं... ठीक आहे मग, सकाळ रोजच्या सारखी आहे, तर तुझी संध्याकाळ ही रोजच्या सारखीच असणार मग आजची...तुला काहीतरी सांगायचं होतं आज पण राहूदे, नको भेटायला आपण..." तो पण नाटकी बोलला,

"अरे अरे...सॉरी सॉरी... मी मजाक करत होती..."

"माहीत आहे...बरं ऐक ना...." आणि असं बोलून त्याने मोठा पॉज घेतला...आणि मी वाट बघत होती की तो काय बोलतो....

"बोल ना...."

"काही नाही...असंच...भेटू संध्याकाळी मग सांगतो, पण त्याआधी दहा वाजता ऑडीटोरिअम मध्ये पोहोच...मी वाट पाहतोय.."

अतुलच्या फोनने माझी 'मॉर्निंग' खरंच 'गुड गुड' केली होती, बस आज बाप्पाने या दिवसाचा शेवटही तसाच करावा म्हणजे दिवस सफल होईल माझा...

आज फेस्ट चा शेवटचा दिवस होता, आजचा शेवटचा इव्हेंट आणि स्पॉन्सरशीप आमच्याकडे असल्याने मी अन अतुल त्यातच बिझी होतो...मी तयार होऊन कॉलेजला निघणार इतक्यात चेतनाचा फोन आला की तो पुण्यात आहे आणि माझ्या कॉलेजमध्ये येतोय मला अन अतुलला भेटायला... जरा घाईच होती मला पण चेतनने असं अचानक भयानक येऊन मला विचारात टाकलं होतं त्यामुळे मी त्याला टाळू शकत नव्हती....तो दहा वाजता कॅन्टीनच्या बाहेर माझी वाट पाहत उभा होता आणि मी पण घाईघाईत तिथे पोहोचली...

"बोल...कसा काय अचानक टपकलास तू??? यायच्या आधी सांगायचं तरी ना..."
मी धापा टाकत त्याला बोलली, पण त्याच्या कपाळावर मात्र आठ्या चढल्या होत्या...

"वहिनीला तू सांगितलंस ना??? "
तो गंभीर चेहरा करत बोलला, त्याला असे सिरीयस हावभाव मी पहिल्यांदा पाहत होती...मला वाटलं मी काहीतरी चूक केली.... आणि या भीतीने की दबक्या आवाजात त्याला बोलली,

"हो....पण का रे??? काही झालंय का???"

"मग नाही तर काय....आता मला साक्षिच्या भावाला भेटायला जायचं आहे...तिच्याकडेही मंजूर आहे सगळ्यांना..."
तो वरच्या आवाजात बोलला आणि माझी चिंतेने जीव द्यायची वेळ आली... पण एक मिनिट..काय बोलला हा?? मंजूर आहे...म्हणजे साक्षिच्या घरी काही अडचण नाही... ह्याची तर ना...!! जीव घेतला असता माझा,

"नालायक, पागल, मूर्ख....माझा हार्ट फेल झाला असता ना....सरळ सरळ काही बोलताच येत नाही ना तुम्हाला, दोघे भाऊ सारखेच आहात तुम्ही..."
आणि मी चेतनला मारता मारता नकळत बोलून गेली...

"दोघं भाऊ??? म्हणजे...."
आणि मी जीभ हळूच चावली...मी पण ना, काय ह्या शैताना समोर बोलून गेली...पण चेतन मात्र त्याच्याच आनंदात होता, तो बोलला,

"तू ना, कम्माल आहेस यार...जर तू वहिनीला बोलली नसती ना तर मी सांगूच शकलो नसतो घरी..." आणि त्याने आनंदाने मला मिठीच मारली, पण तो इतक्या आनंदात होता की मी त्याला रोखू शकली नाही, आणि त्याला बघून माझं ही मन प्रफुल्लित झालं होतं...

"बस बस सोड मला...किती स्तुती करशील माझी..आता मी आहेच तशी, काय करू... विचार केला, ह्या भैताडाचं एमबीबीएस पूर्ण होत आलं तरी हा काही करणार नाही, साक्षिच्या होणाऱ्या मुलांनी तुला मामा मामा करत हाक मारू नये म्हणून हा जुगाड करावा लागला मला..." मी बोलली,

चेतन माझे गाल ओढत बोलला,
"तू तर सगळ्यात बेस्ट पार्टनर आहे जानेमन..."

"हो... खरच... बेस्ट तर आहेच ती...आणि स्मार्ट ही..."
आणि आम्ही वळून पाहिलं तर अतुल होता...

"इतकं अचानक आलास तू, आधी काही कळवलं ही नाहीस... काही विशेष कारण..?? म्हणजे ही सोडून अजून काही विशेष कारण...?" माझ्याकडे बघत अतुलने चेतनला विचारलं....

"हो...ह्यावेळी खूप विशेष आहे...पण ते मी तुला वेळ आल्यावर सांगेन...माझं सोड...तुझ्यासाठी आजचा दिवस खूप विशेष आहे ना...'बेस्ट आऊटगोईंग स्टुडंन्ट' होणार आहेस तू...आज आपल्या दोघांसाठी ही खूप मोठा दिवस आहे...."
कॅन्टीनमध्ये थोडा वेळ आम्ही तिघांनी गप्पा मारल्यावर अतुल बोलला,

"हम्म...बरं ऐक ना भावा... मला जावं लागेल, माझा इव्हेंट आहे आणि सगळे वाट बघत असतील...."
आणि अतुल जायला निघाला, जाता जाता त्याने एक नजर माझ्यावर टाकली आणि बोलला,

"आपलंही काम पेंडिंग आहे...अम्म्म ते, स्पॉन्सरशिपचं..."

... तो असं बोलल्यावर मी उठून उभी राहिली आणि त्याला काही उत्तर देणार इतक्यात चेतन बोलला,

"ती येईल रे दहा मिनिटात...तू जा... "
आणि चेतनचं बोलणं लगेच मान्य करून अतुल निघून गेला.. आज पहिल्यांदा असं झालं होतं की मी, चेतन आणि अतुलने इतका चांगला वेळ सोबत घालवला होता, मला खूप छान वाटत होतं...इतक्यात माझं चेतनकडे लक्ष गेलं, तो माझ्याकडेच पाहत होता...

"काय झालं?? पहिल्यांदा बघतोएस का मला...? बरं सोड ते, तू साक्षीला भेटायला आला आहेस ना..आणि तिला न सांगता सरळ इकडे आला, तिला वाईट वाटेल रे...तू आधी तिला भेटायला हवं होतं...मित्रांपेक्षा जास्त आता ती महत्त्वाची आहे ना...."

"असं कोण बोललं तुला?? प्रेम आणि मैत्री यांच्यात तुलनाच होऊ शकत नाही बेटा... हे दोन्हीही महत्त्वाचे आहेत आयुष्यात...आणि ही गोष्ट साक्षिला खूप चांगल्याने माहीत आहे...तसही आम्ही प्रेम करतो म्हणून बंधनं नाही लादत एकमेकांवर... तिला माहीत आहे, मैत्री ची जागा प्रेम नाही घेऊ शकत आणि प्रेमाची जागा मैत्री नाही घेऊ शकत...आणि या दोन्ही नात्यांसाठी भक्कम विश्वास लागतो, जो आहे आमच्यात...."

खरंच किती समजूतदार नातं होतं चेतन आणि साक्षीचं... खूप अप्रूप वाटत होतं मला त्यांचं प्रेम पाहून... त्यांचे किस्से ऐकून मला वाटत होतं, कधी एकदाची संध्याकाळ होते आणि कधी मी अतुलला बोलते, पण त्याआधी इव्हेंटचे कामं होते, ते करायचे बाकी होते, त्यामुळे मला जाणं गरजेचं होतं आता...मी आणि चेतन कॅन्टीनच्या बाहेर पडलो...मी चेतनला बाय करून ऑडीटोरिअम कडे जाणार होती, इतक्यात चेतनने जाण्यासाठी उचललेले त्याचे पाऊलं थांबविले आणि मला बोलला,

"अच्छा मी काय म्हणतो, त्याला आज बोलून टाक मनातलं..."

"हो...हं??? ककाय?? कोणाला???"
आणि हो बोलल्यावर मात्र ततपप झाली....

"कोणाला काय कोणाला?? अतुलला...तुमचे आँखो आँखो चे इशारे सगळं कळतं मला...तुला काय वाटलं की इतक्या दिवसांपासून तू मला उल्लू बनवलं आणि मी बनलो...खरं तर मी वाट बघत होतो की तुमच्यापैकी कोण येऊन बोलतं मला...पण इथे मला सांगायचं तर दूर, तुम्ही तर एकमेकांना ही अजून सांगितलं नाही...कोणत्या दुनियेत जगता यार तुम्ही... पाण्यात गेल्यावर न भिजता बाहेर कसं येता येईल..?? आणि तुम्ही दोघं तर प्रेमाच्या समुद्रात बुडाले आहात..."

आज तर माझी अवस्था पोलिसांनी पकडलेल्या चोरपेक्षाही लाजिरवाणी वाटत होती मला...चेतनला काय उत्तर द्यावं काही कळत नव्हतं मला, माझी उडालेली तारांबळ पाहून तो हसत हसत पुन्हा बोलला,

"चेहरा बघ स्वतःचा... किती लाल झालाय...?"

"काय बोलू आता मी??? सगळ्यांना माहीत आहे का रे??" मी चिंतेने विचारलं,

"सध्या मला तरी माहीत आहे कारण तुमच्या दोघांवर बहुत कडी नजर थी मेरी..हाहाहा... आणि राहिला प्रश्न घरच्यांचा तर तू फक्त आजची सेटिंग बघून घे अतुल सोबत, बाकी सगळं करायला मी आहे.. आता मी पण दोस्ती केली आहे, निभानी तो पडेगी...."

"बरं ऐक ना, तू अतुलला तुझ्या आणि साक्षीबद्दल का नाही सांगितलं... त्याला नंतर कळलं दुसरी कडून तर वाईट वाटेल ना....."

"वा वा वा... एवढी काळजी अतुलची...त्याने सांगितलं का मला तुमच्या बद्दल...आली मोठी त्याची वकिली करणारी...पण सांगेन ग त्यालाही मी, तू सध्या माझं सोड, तुमच्या दोघांवर लक्ष दे...बाकी सगळं मी संभाळतो..."

मला इतका आनंद आयुष्यात कधीही झाला नव्हता, असं वाटत होतं की देवाने आजचा दिवस फक्त अन फक्त माझ्या नावाने लिहून पाठवलाय...चेतनच्या बोलण्यावर मला आनंद ही झाला आणि भरूनही आलं, आणि मी त्याला त्याच आत्मीयतेने मिठी मारत बोलली,

"तुला माहीत आहे, तू बेस्ट बेस्ट बेस्ट आहेस...तू ना..."
आणि बोलता बोलता माझे डोळे भरून आले...चेतन माझा चेहरा हातात घेत बोलला,

"वेडी कुठली...ह्या गंगा जमुना संभाळून ठेव...संध्याकाळी जेंव्हा तू त्याच्यासमोर जाशील तेंव्हा हे 'खुशी के आंसू' असायला हवे ना...निघ आता...त्याला जास्त वाट बघायला नको लावू...."

....आजची सकाळचं खूप चांगली झाली होती, शंभर दिवसातुन एक दिवस आजच्या सारखा उगवतो, आणि माझ्या साठी तो 'सोनेरी दिवस' आज होता...आजच्या दिवशी मी काहीही मागितलं असतं तरी देवाने ते मंजूर केलं असतं.. पण मला आज अतुलशिवाय दुसरं काहीही नको होतं...मी धावत पळत ऑडिटोरिअम मध्ये पोहोचली, अतुल बॅक स्टेज ला कामं करत होता... त्याला बघून पुन्हा माझ्या स्पंदनांनी जोर धरला होता, मी उरलेली कामं घेतली हातात करायला पण माझ्या नजरा अतुलवरून हटत नव्हत्या...स्वतःच्या पसंतीवर, स्वतःच्या नशीबावर आज खूपच अभिमान वाटत होता...

बॅक स्टेज चे कामं आवरल्यावर, संध्याकाळच्या इव्हेंट साठी आम्ही सगळे तयार होण्यासाठी होस्टेलवर जाणार होतो... सगळे जात असतांना अतुल मात्र तिथेच लॅपटॉप मध्ये काही तरी बघत बसलेला होता, मी त्याच्याजवळ जाऊन विचारलं,

"काय झालं??? काही बाकी आहे का ?? तू गेला नाहीस चेंज करायला...."
मी बोलल्यावर त्याने मान वर करून माझ्याकडे पाहिलं अन बोलला,

"नाही...काहीच बाकी नाही....ते काय झालं ना,

जो इजहार ही ना हुआ उसे इकरार समझ बैठे।
हम परदेसी बादल को बरसात समझ बैठे।

"म्हणजे?? मला कळलं नाही...."

"काही नाही... तू जा लवकर आवरून ये, आज खुप काही आहे जे सांगायचं आहे...."
अतुल मला आग्रह करत बोलला... तशी मलाही घाईच होती, त्यामुळे मी जायला निघाली तर इतक्यात अतुलने माझ्या हाताला धरून पुन्हा थांबवलं आणि बोलला, मी त्याला डोळ्यानेच विचारलं काय झालं, तर बोलला,

"लवकर येशील...वाट पाहतोय...."

आपण कोणाची वाट पाहणं हे नक्कीच पिडादायी असतं पण कोणीतरी मनापासून आपली वाट पाहतेय, आपल्या वाटेवर त्याचा नजरा टक लावून बसल्यात यापेक्षा मोठं सुखही नाही...नुसतंच 'प्रेम झालं' ही कथा नसते, अश्या छोट्या छोट्या गोष्टी त्या प्रेमाला नवीन वळणं देतात, आणि असं प्रेम आयुष्याची दिशा बदलून टाकतं, आज कदाचित आमच्या आयुष्याच्या दिशाही बदलणार होत्या.

मी होस्टेलवर जाऊन तयार होऊन आली, अतुलला निळा रंग किती आवडायचा...मला आठवतं मीनल ताईच्या लग्नात हा पठ्ठ्या एकटा जाऊन माझे सगळे ड्रेसेस चे रंग मला न सांगता चेंज करून आला होता... तेंव्हापासून माझाही आवडीचा रंग तोच झाला होता...किती अजब असतं ना हे प्रेम...!! म्हणजे ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याची किती साधीशी गोष्ट ही आपल्याला स्पेशल वाटून जाते ना...

संध्याकाळचा इव्हेंट सुरू झाला.. जसा जसा एक एक क्षण जवळ येत होता, माझी बैचेनी वाढत होती... मी बॅक स्टेजला होती पण माझे डोळे फक्त अतुलला शोधत होते, आणि तो कुठेच दिसत नव्हता... इतक्यात 'बेस्ट आऊटगोईंग स्टुडंन्ट' ची घोषणा झाली आणि अतुल स्टेज वर आला...आणि त्याला बघून माझ्या जीवात जीव आला...इतक्या टाळ्यांचा गडगडाट होत होता पण माझं मन मात्र वेगळंच गाणं गुणगुणत होतं... तो बक्षिस घेऊन सरळ बॅक स्टेज ला माझ्या जवळ आला आणि हळूच बोलला,

"वर्कशॉपच्या पार्कींग मध्ये ये लगेच... आज डीजे नाईट आहे, तिथे कोणीच नसेल...मी वाट पाहतोय..."

"अरे पण..." ....
माझं उत्तर न ऐकता निघूनही गेला तो.. अजून इव्हेंट संपला नव्हता आणि मला इथून निघणं अवघड होतं, पण मी थांबणारी नव्हती आता...मी माझ्या टीममेट्स ला काम आहे असं सांगून ऑडिटोरिअम च्या बाहेर आली तर समोर ऋता, निखिल, अनिमिष उभे होते...आता ह्यांना काय उत्तर द्यायचं काही सुचत नव्हतं...

"तू कुठे निघालीस?? अजून इव्हेंट कुठे संपला??"
अनिमिष बोलला

"अरे ती लायब्ररीत निघाली असेल ...हो ना...???"
आणि अनिमिष ला टाळ्या देत ऋता बोलली,

"हो, पण यावेळेस लायब्ररीचं लोकेशन कुठे आहे?? कॉम्प्युटर डिपार्टमेंट, कॅन्टीन की वर्कशॉपची पार्किंग... हाहाहा...." आता त्यांच्या मध्ये निखिल ही शामिल झाला आणि ते सगळे हसायला लागले, मला मात्र ओशाळल्यागत झालं...ते बरोबरचं म्हणतात शायर लोकं 'इश्क और मुश्क छुपाये नही छुपते'...

"पण सिरीयसली... तुला तो खडूसच भेटला होता का पूर्ण जगात?? जरा आजूबाजूला नजर टाकली असतीस तर बरेच लोकं होते....हाहाहा.."
आता निखिल माझी खेचत होता...

"मी जाऊ का प्लिज?? तुम्ही मला उद्या त्रास द्या ना...आता जाऊ द्या...." जायच्या घाईत मी त्यांना बोलली,

"ही अशीच जाशील का??? आम्ही नसलो तर कसं व्हायचं रे देवा तुझं....?"
निखिल कपाळावर हात मारत बोलला, आणि त्याने गुलाबाचा एक बुके माझ्या हातात दिला अतुलला द्यायला...खरंच, चेतन बरोबर बोलतो...मैत्री किंवा प्रेम यादोन्ही मध्ये तुलना नाहीच, त्यामुळे या दोघांपैकी काहीतरी एक निवडणं म्हणजे यक्षप्रश्न आहे...किती समजून घेतलं या सगळ्यांनी मला, किती संभाळून घेतलं मला... अश्या मित्रांशिवाय आयुष्य पूर्ण होईल का?? नाही अजिबात नाही...आयुष्य तर अतुलशिवाय ही अपूर्णच आहे ना...?? पण आता माझं वर्तुळ पूर्ण होणार आहे, जीवभावाचे मित्र पदोपदी साथ द्यायला होतेच पण आयुष्याच्या प्रत्येक चढउतारात हात पकडून माझी साथ देणारा असा साथी ही मिळणार होता मला... फक्त काही क्षण उरले होते दुराव्याचे, आणि हाच विचार करून माझे पाऊलं अतुलच्या दिशेने लगबगीने चालत होते....
************************

क्रमशः


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED