प्रेमगंध... (भाग - २३) Ritu Patil द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • आर्या... ( भाग ५ )

         श्वेता पहाटे सहा ला उठते . आर्या आणि अनुराग छान गाढ झोप...

  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

श्रेणी
शेयर करा

प्रेमगंध... (भाग - २३)

आपण मागच्या भागात पाहीलं की मेघा मीराची खूप मजाकमस्ती चालू असते आणि आई त्यांना खूप ओरडत असते. अजय, अर्चना शाळेत येत असतात तेव्हा रस्त्याने एका भरधाव येणाऱ्या गाडीने एका आजीला धक्का देऊन ती गाडी पुढे निघून जाते. पण अजय ओरडूनच त्यां गाडीवाल्याला सुनावतो. आणि त्याचं ते बोलणं ऐकून तो गाडीवाला येऊन अजयला पुढे बघून घेईन तूला अशी धमकी देऊन जातो.... पण त्याच्या धमकीला अजय काय भीक घालत नाही. तो पण त्याच्यासमोर हिंमतीने उभा राहतो. पण अर्चना त्याला कसं तरी आवरते. ती खूप घाबरते. आणि हे सर्व राधिका गर्दीत उभी राहून बघत असते. तिने शांत आणि समजदार अशा अजयचं हे रूप पहिल्यांदा पाहीलेलं असते. ती ते सगळं त्याचं वागणं बघून विचारातच पडलेली असते.... आता बघूया पुढील भागात काय होते ते......

➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗

आज राधिकाचं मुलांना शिकवण्यांत पण मन लागत नव्हतं. तीच्या डोळ्यासमोर सारखा तोच प्रसंग येत होता. इथे अजयपण राधिकाशी कसं आणि काय बोलावं हाच विचार करत होता. शाळा सुटल्यावर राधिका वर्गातून बाहेर पडली. समोरच अजय आणि अर्चना तीची वाट बघत उभे होते. राधिका त्यांच्या जवळ गेली. आणि ती अर्चनाकडे बघतच म्हणाली.

"अर्चू, चल मी येते गं...." आणि राधिका जायला निघाली.
तिच्या अशा वागण्याने दोघांनाही कळून चुकलं की राधिकाला अजयचा राग आलाय असं.

अजय -: "राधिका थांब ना थोडा वेळ. मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे."

राधिका -: "अजय, प्लीज आज नको, आपण उद्या बोलूयात का...? आज मला जरा काम आहे महत्वाचं आपण नंतर बोलूया... मी निघते..."

अजय -: "राधिका, मला माहिती आहे तूला काही काम नाही. तू मला अव्हाॅईड करत आहेस. पण असं किती दिवस मला अव्हाॅईड करणार आहेस. एक ना एक दिवस बोलावंच लागणार ना. आणि मला आताच बोलायचं आहे तुझ्याशी. तू अशीच न बोलताच निघून गेलीस तर रात्रभर झोप नाही लागणार मला.... म्हणून काय ते सगळं आताच बोलायचं आहे मला."

अर्चना - "हो राधिका, प्लीज आताच काय ते सगळं बोलून घ्या तुम्ही. उगाच गैरसमज नको वाढायला तुमच्यांत."

राधिका - "बरं ठीक आहे... बोल तू... तूला काय बोलायचं आहे ते."

अजय - "राधिका, मघाशी जो प्रसंग घडला तो तूला माहीती पडलाच असेल ना... साॅरी मी जरा त्यावेळी जास्तच नियंत्रणाच्या बाहेर जाऊन वागलो. तूला कधी वाटलं पण नसेल ना की मी असं काही वागेन असं... त्याच गोष्टीचा तूला राग आलाय ना माझा. पण राधिका त्यावेळी प्रसंगच असा होता की मला तसं वागावं लागलं. साॅरी राधिका. मी पुन्हा असं नाही वागणार."

राधिका - "मी त्यावेळी तिथेच होते अजय. मी सर्व ते माझ्या डोळ्यांनी पाहीलंय. अजय खरं तर मला राग नाही आला तुझा.... बस मला तूझी काळजी वाटत होती... कारण अशा गुंडमवालीच्या नादाला न लागलेलंच चांगलं असते, कारण ती माणसं कधी काय करतील, काहीच सांगता येत नाही, म्हणून मला तूझी काळजी वाटत होती बस्स... पण यापुढे प्लीज तसं काही वागू नकोस जेणेकरून तूला आणि घरच्यांना त्रास होईल असं..."

अर्चना - अगदी बरोबर बोललीस तू राधिका आणि माझं पण हेच म्हणणं आहे..."

अजय - "हो गं माझी बहिणाबाई चुकलं माझं बोललो ना मी... साॅरी." त्याने अर्चना समोर आपले हातच जोडले.
दोघी त्याला हसू लागल्या.

"राधिका, खरंच यापुढे असं काही नाही वागणार मी... थँक्स मला समजून घेतल्याबद्दल." अजय राधिकाला म्हणाला.

राधिका - "बरं ठिक आहे, मी निघते आता... काळजी घ्या दोघांनी पण..." ती जायला निघाली पण अजयने तिला थांबवलं.

अजय - "राधिका, आज तुला घरी मी सोडतो बाईकवरून, म्हणजे तूला काही हरकत नसेल तर...." तो जरा हळूवार आवाजातच म्हणाला. दोघीही त्याच्याकडे बघू लागल्या.

"अहो भाऊराया तूम्ही वहीनीला सोडायला जातील, मग मी कशी जाऊ घरी...?" ती बारीक डोळे करतच कमरेवर हात ठेवतच म्हणाली. राधिकाला तीचं ऐकून हसूच आलं.

अजय - "तू आहेसच का आमच्यात कबाब में हड्डी. तू आज बसने जा, नाहीतर मी राधिकाला सोडून येईपर्यंत इथेच बस... मग मी आलो की आपण जाऊ घरी ..." अर्चनाने त्याच्या हातावरच फटका मारला.

अर्चना - "म्हणजे मी आता तुमच्यांत कबाब में हड्डी झाली काय? घरी चल तूला चांगलीच बघतेच मी."

अजय - "धमकीऽऽऽ.... अरे बापरे आज घरी गेल्यावर माझं काही खरं नाही दिसत..."

राधिका दोघांची ती प्रेमळ नोकझोक बघून तोंडावर हात देऊन हसत होती.

राधिका - "बरं, तुमचं दोघांचं झालं का भांडून? भांडून झालं असेल तर चला, घरी जायला उशीर होतोय. नाहीतर माझी बस पण सुटेल आणि तूम्ही पण निघा पटकन... लाडू घरी वाट बघत असेल अर्चूची..."

"बरं चल येतो राधिका, काळजी घे..." अजय, अर्चना दोघेही बाईकवर बसून निघून गेले आणि राधिका पण बसस्टॉप वर आली. थोड्या वेळाने बस आली. आज बसमध्ये अजयचे बाबा होते. ते राधिकाच्या बाजूला जाऊन बसले.

अजयचे बाबा - "राधिका, कशी आहेस बेटा? खूप दिवस झाले आपली भेटच झाली नाही ना...."

राधिका - "हो बाबा, मी एकदम बरी आहे... पण तुम्ही कसे आहात ते आधी सांगा..."

अजयचे बाबा - "अगं मला काय होतेय? मी एकदम मस्त टकाटक..." ते हसतच म्हणाले. ती पण हसू लागली.

अजयचे बाबा - "बरं.... तू घरी कधी येणार आहेस... बरेच दिवस झाले घरी पण आली नाहीस तू... येऊन जा मध्येच भेटायला... अजयची आई पण तूझी आठवण काढत असते."

राधिका - "हो बाबा, यायचं आहे मला पण भेटायला तुम्हा सगळ्यांनाच... बरेच दिवस झाले लाडूला पण पाहीलं नाही.... यायचं आहे त्याला पण बघायला..."

अजयचे बाबा - "हो नक्की ये... खूप छान झालाय तो आता... छान खेळतो आता.... आणि तुझ्या बाबांची तब्येत कशी आहे आता? बरे आहेत ना ते?"

राधिका - "हो आता बरे आहेत ते.... बाबा तुम्ही आणि आई, या ना एखाद्या दिवशी घरी... आईबाबांना पण छान वाटेल तुम्हाला भेटून...."

अजयचे बाबा - "अगं हो आता यावंच लागेल ना... लग्नाची बोलणी पण करायची आहे तुमची..." ते हसतच म्हणाले. ते ऐकून राधिकाला खूप लाजायला झालं.

अजयचे बाबा - "काय मग आमचे चिरंजीव आणि त्याची चिवचिव करणारी बहीण दोघेही शाळेत अगदी व्यवस्थित वागतात ना.... की शाळेत पण दोघं भांडतच असतात..." यावर राधिकाला हसूच आलं.

राधिका - "काही ना काही तरी कारणावरून नोकझोक चालूच असते दोघांची...." बाबा हसू लागले.

अजयचे बाबा - "वाटलंच होतं मला... दोघेही एकाच माळेचे मणी आहेत.... तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना! असं आहे दोघांचंही... लहानपासूनच दोघेही तसेच आहेत... सतत त्यांचं काही ना काही चालूच असते... पण दोघांचं प्रेमही तेवढंच आहे एकमेकांवर. खूप जीव लावतात एकमेकांना दोघेही."

राधिका - "हो बाबा अगदी बरोबर बोललात तुम्ही... खरंय तुमचं..." बोलता बोलता राधिकाचं स्टाॅप आलं.

"बाबा, चला येते मी. काळजी घ्या." राधिका.

"हो, तू पण काळजी घे पोरी...." अजयचे बाबा.

"हो बाबा...." आणि राधिका बसमधून उतरून घरी निघून गेली.

राधिका घरी आली. आज राधिका आल्यापासून थोडी शांत शांतच वाटत होती. काहीतरी नक्कीच झालं असावं असं आईला वाटलं.

आई - "राधी, काय गं काय झालंय तूला? शाळेतून आल्यापासून नुसती शांत शांत आहेस. काही झालंय का? अजयराव आणि त्यांच्या घरचे सगळे ठिक आहेत ना?"

राधिका - "अगं असं काही नाही गं... बस आज थोडं डोकं दुखत होतं माझं..."

आई - "राधी, तूला मी चांगलं ओळखते पोरी... नक्कीच काहीतरी झालंय. तुझ्या चेहर्‍यावरूनच दिसतेय ते. उदास उदास वाटतेस आज.... सांग मला नक्की काय झालंय ते..."

राधिका - "आई तू पण ना खरंच... तूला ना माझा चेहरा बरोबर वाचता येतो...."

आई - "अगं माझ्या काळजाचा तुकडा आहेस तू... आणि माझ्या पोरींना काय त्रास होतो, काय नाही ते सगळं कळतेय मला बरं का.... बोल आता मुकाट्याने चल पटकन...."

राधिकाने अजयसोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला. आईने स्वतःच्या डोक्याला हातच लावला आणि ती पण थोडी विचारातच पडली.

राधिका - "आई मला तर खरंच खूप भिती वाटतेय गं... तो काही करणार नाही ना अजयला..."

आई - "नाही गं खरं तर मलाही आता काहीच सुचत नाही... तो पुढे काय करेल त्याचा काही नेम नसतो... मला असं वाटते की तू अजयरावांना समजाव आणि त्या राक्षसापासून त्यांना जरा दूरच राहायला सांग...."

"अगं आई त्याला समजावलंय तसं मी.. पण त्या माणसाचा काहीच भरोसा वाटत नाही ना गं... अजय जरी शांत राहीला आणि त्या माणसाने स्वतःहून कुरापती केली, मग काय करायचं आपण... तूच सांग...." --राधिका.

"तुझं पण बरोबरच आहे गं.... तरी थोडं लांबच राहा म्हणावं त्या माणसापासून...." --आई.

"बरं.... तरी उद्या बोलते त्याच्याशी मी...." --राधिका.

राधिकाने सांगितल्यापासून आईला पण थोडंसं टेन्शनच आलं होतं.

संध्याकाळी सगळेच आपापल्या कामात होते. राधिकाचे बाबा निवांत बाहेर बसले होते. एक फोर व्हीलर गाडी त्यांच्या घरासमोर येऊन उभी राहिली. कोण आलं ते बघण्यासाठी राधिकाचे बाबा उठून उभे राहिले आणि गाडीचा आवाज ऐकून घरातले सगळेच कोण आलं ते बघण्यासाठी बाहेर आले. त्या गाडीतून दोन माणसं उतरली. दोघेही गुंडामवाली सारखे दिसत होते. आणि नंतर त्यांच्या पाठोपाठ काळे कपडे घातलेला एकजण उतरला.... पण त्याला आपल्या दारात बघताच राधिकाच्या बाबांची तळपायाची आग मस्तकातच गेली. त्याला बघूनच त्यांना खूप राग आला होता.... ते तसेच पुढे आले आणि त्याला ओरडले.

राधिकाचे बाबा - "तुझी इथे येण्याची हिम्मत कशी झाली रे? माझ्या घराची पायरी चढायची नाही तू आधीच सांगतो तूला... चल आत्ताच्या आत्ता चालता हो इथून...."

तरीपण त्यांचं काहीच न ऐकता तो पुढे आला आणि राधिकाच्या बाबांच्या पाया पडला, पण त्यांनी झटकन त्यांचा पाय मागेच घेतला आणि त्याला ते रागाने बघू लागले. तसं तो त्यांच्यासमोर हात जोडून उभा राहिला.

तो - "काय मामा, तुम्ही पण... आज तुमचा जावई इतक्या वर्षांनी तुमच्या घरी आलाय आणि त्याचं स्वागत करायचं टाकून तुम्ही अपमान करताय माझा..." तो तोंडावर एक आसूरी हास्य ठेवतच म्हणाला. त्याचं हे बोलणं ऐकूनच सगळ्यांचा एकदम रागाचा पाराच चढला.

राधिकाचे बाबा - "काय म्हणालास तू? जावई? कोण कोणाचा जावई रे? इथून चुपचाप चालतं व्हायचं... समजलं का...?"

तो - "काय हो मामा, विसरलात का तुम्ही? तुमच्या मुलीला राधिकाला तुमच्या लाडक्या मोठ्या बहीणीने लहानपणीच सून म्हणून मानलेलं आहे... तिची खूप इच्छा आहे तशी की आमचं दोघांचं लग्न व्हावं असं... तशी माझी पण खूप इच्छा आहे...." तो त्याच्या मिशीला पिळ देतच हसतच म्हणाला.

राधिकाचे बाबा - "लग्न म्हणजे काय भातूकलीचा खेळ वाटला का रे तूला? ते लहानपण होतं. फक्त गमतीजमतीत तसं बोलणं व्हायचं... पण आता तुम्ही लहान नाहीत... त्या सगळ्या लहानपणाच्या गोष्टी विसरून जायच्या.... आणि तुझ्याशी लग्न करून काय माझ्या पोरीचं आयुष्य खराब करायचं आहे का मला? तू एक दारू पिणारा बेवडा गुंडमवाली आणि तुझ्याशी लग्न लावून देऊन वाटोळं करू का तिचं? मुकाट्याने निघायचं इथून...." ते चिडूनच म्हणाले.

तो राधिकाच्या बाबांचं शांतपणे ऐकून घेत होता. तो त्यांच्याकडे दुर्लक्ष करून एक नजर त्याने राधिकाकडे फिरवली. राधिकाने मात्र तोंड फिरवून घेतले. तो हसतच आरामात एक पाय मांडीवर ठेवून रूबाबात पाळण्यावर जाऊन बसला....

क्रमशः-

(बघुया पुढच्या भागात काय होते ते...)

[ कथा काल्पनिक आहे, वास्तवतेशी त्याचा काहीही संबंध नाही. तसं काही आढळून आल्यांस तो निव्वळ योगायोग समजावा. कथा आवडल्यांस आपली अनमोल प्रतिक्रिया नक्की कळवा..... ]

🌹💕...Ritika V. Patil... 💕🌹

💕💕 ...प्रेमगंध... 💕💕 - २३

➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️
🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀