(आपण मागच्या भागात पाहिलं की, कुसुम आणि सावित्रीमाय राधिकाच्या बाबांना परत आपल्या गावी येऊन राहायला सांगतात. नेहमीप्रमाणेच अजय आणि अर्चनाची मजाकमस्ती चालू असते. शाळेची सहल श्रीरामपूरमध्ये जाणार असल्यामुळे राधिकाची जायची अजिबात इच्छा नसते, म्हणून अजय रागवून निघून जातो. पण अर्चनाच्या बोलण्यावर ती सहलीला जायला तयार होते. आता बघूया पुढे काय होते ते....)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अजयची आई - "अजय, तूला आईची काही काळजी आहे की नाही रे...." किचनमध्ये जेवण करता करताच आई बोलत होती. अजय पटकन आईजवळ गेला.
अजय - "अगं आई, काय झालं? तुझी तब्येत बरी नाही का? ये तू इथे येऊन बस. आराम कर मी करतो सर्व. बस तू इथे..." त्याने आईचा हात पकडून तीला खुर्चीवर आणून बसवलं. आणि आईला पाणी प्यायला दिलं. तेवढ्यात बाबापण आले.
अजयचे बाबा - "अरे अजय आईला काय झालं तुझ्या? सावी तब्येत बरी नाही का गं तुझी? कशाला सारखी दगदग करत असतेस. थोडा आराम पण करत जा ना...."
आई - "अरे देवा... तुम्ही दोघं बापलेकं ना खरंच, माझ्या नशिबालाच भेटलेत दोघं. मी एकदम बरी आहे. मला काहीही झालेलं नाहीये...." दोघं पण तिच्या तोंडालाच बघत होते.
अजय - "अगं आई तू आताच बोललीस ना की मला तुझी काळजीच नाही म्हणून, मला वाटलं तुझी तब्येत बरी नाही म्हणून असं बोलतेस...." हे ऐकून बाबा हसू लागले.
बाबा - "मला पण पटतेय बघ तुझ्या आईचं, अजय खरंच तुला अजिबातच काळजी नाही तुझ्या आईची..." आणि ते हसू लागले.
अजय - "काय बाबा, तुम्ही पण असं बोलता ना मला. अशी कशी काळजी नाही मला आईची. मला माझ्या आईची खूप खूप खूप काळजी आहे बरं का...." त्याने आईचे दोन्ही गाल खेचले. आईने त्याच्या हातावर एक फटकाच मारला.
अजय - "बघा बाबा, आईपण सारखी अशीच मारत असते मला आणि ती माझी बहीण चिमणाबाई ती पण सारखी फटकेच देत असते मला. दोघीही सारख्याच आहेत तुम्ही."
आई - "तुला ना असे फटकेच द्यायला हवेत... अर्चूला म्हणते आता माझ्या वाटणीचे पण रोज तूला फटके देत जा असं..."
अजय - "का गं अशी का बोलतेस? मी काय केलं आता?"
आई - "अजय, आता मी काम करून थकून जाते रे... आता वय झालं माझं. माझे हातपाय दुखतात. अजून किती दिवस अशी एकटीच कामं आवरत बसू, माझ्या जोडीला अजून कोणीतरी हवं ना, मदत करायला..."
अजय - "अगं आई मग हे आधीच नको का बोलायला हवं होतं तूला? इतका त्रास होतो तरी काही बोलत नाहीस.... मी उद्या सकाळी शाळेत जाताना शीला मावशीला निरोप देतो की कामवाली बाई कोणी भेटत असेल तर बघ असं... म्हणजे तूला कामातून आराम भेटेल बघ... आणि आता तू आराम कर. मी करतो जेवण...." आईने डोक्याला हातच लावला.
आई - "अरे देवा, काय बोलावं आता माझ्या पोराला..."
बाबा त्याला खूप हासत होते.
अजय - "आता मी काय केलं?" आईने त्याचा कान पकडला आणि पिरगाळला...
अजय - "आईऽऽऽ अगं सोड ना, दुखतो ना कान माझा..."
आई - "तूला माझं बोलणं खरंच समजत नाही की उगाच न समजण्याचं तू नाटक करत आहेस...?"
अजय - "अगं आई तू काय बोलत आहेस? खरंच मला काहीच समजत नाही... कान दुखतोय माझा... आई सोड ना गं..." आईने त्याचा कान सोडला. तसा अजय पटकन उठला आणि आईपासून थोडं लांब जाऊन उभा राहिला.
अजय - "आई, मला सगळं कळतेय, तूला काय म्हणायचं आहे ते. तू जेव्हा सांगशील तेव्हा आपण राधिकाच्या घरी लग्नाची बोलणी करायला जाऊ, मी तयार आहे लग्नाला..." तो हसतच म्हणाला आणि तिथून निघून गेला.
बाबा दोघांनाही हसत होते.
बाबा - "काहीही म्हणा मायलेक दोघंही खूप नौटंकी आहेत... दोघांनाही सगळं कळतं पण तसं दाखवत नाहीत... नाही का..." ते हसतच म्हणाले. आईलाही हसू आलं.
-------------------------------------------------------------
राधिकाच्या घरी सर्व बाहेर बसले होते. मीरा आणि मेघाची दोघींची बडबड चालूच होती. राधिका, सोनाली, आई तिघीपण भाजी साफ करत होते. राधिका मात्र कोणत्यातरी विचारातच काम करत होती... राधिकाचं कामात लक्षच नव्हतं. ती साफ केलेली भाजी खाली आणि भाजीचा सगळा कचरा ताटात टाकत होती. तीला तसं बघून मीरा, मेघा, सोनाली हसत होत्या... आईने तीला खांद्याला हात लावून हलवलं...
आई - "अगं राधी, लक्ष कुठे आहे तुझं...? एवढा कसला विचार करत आहेस? खाली बघ जरा तू सगळं काय करून ठेवलंस..." तशी राधिका भानावर आली आणि तीने पाहीलं तर कचरा ताटात आणि भाजी सगळी खाली टाकून ठेवली होती. तीने स्वतःच्याच डोक्याला हात लावला. तीला सगळेच हसत होते...
मेघा - "ताई, जिजूचा विचार करत आहेस का गं? आठवण येतेय का जिजूंची....?" हे ऐकून सगळेच खूप हसू लागले.
राधिका - "मेघू, तू खूप बोलायला लागलीस हा आता..." राधिकापण गालातच हसत होती.
मीरा - "नाहीतर काय ताई... बरोबर बोलतेय मेघू... कसला एवढा विचार करतेस? खरं खरं सांग जीजूंची आठवण आली ना तूला..." ती हसतच म्हणाली.
राधिका - "असं काही नाही गं... शाळेची सहल जाणार आहे ना, त्याचाच विचार करत होती..."
आई - "अगं मग एवढा का विचार करतेस? जाऊन ये ना..."
राधिका - "अगं आई, माझी जायची अजिबात इच्छा नाही..."
बाबा - "का गं पोरी, काय झालं? कोणी काही बोललं का तूला?"
राधिका - "नाही ओ बाबा, मला कोण काय बोलणार आहे... खरं तर शाळेची सहल श्रीरामपूरमध्ये जातेय, म्हणून जायची इच्छा नाही माझी..."
बाबा - "अगं त्यांत काय आहे मग? एवढा काय विचार करायचा त्यांत? जाऊन ये ना आपलंच तर गाव आहे... आणि इतक्या वर्षांनी जाशील, आपलं गाव कसं आहे ते तरी बघून येशील ना..."
राधिका - "हो बाबा तुमचं बरोबर आहे पण...." ती गप्पच बसली.
बाबा - "पण काय राधिका? अगं तू हा विचार करतेस का की तूला कुसुम आत्याच्या घरी जावं लागेल असं... तर असा विचार नको करूस कारण मला पण असं वाटते की तू आत्याच्या घरी जाऊ नयेस... त्या नालायक गोविंदमुळे त्या घरात पाय ठेवायची पण इच्छा होत नाही माझी तर... आणि तू पण तिथे जायची अजिबात गरज नाही... सहलीला जाशील तर बाहेरच्या बाहेरच फिरून ये... तसं आपलं गाव छान फिरण्यासारखं आहे..."
आई - "नाही राधिका नको जाऊस तू आणि अजयरावांना पण जाऊ नको देऊस... त्यांना पण समजाव की त्या गावी नका जाऊ म्हणून..."
बाबा - "अगं सरू, एवढं काय घाबरतेस तू त्याला? तो गोविंद काय खाणार आहे का यांना? काही नाही करत तो... इतकं सोपं आहे का ते? कि तो कोणाला काहीही करेल असं... आणि का म्हणून घाबरायचं त्याला? गाव काय त्याच्या मालकीचं आहे का?"
आई - "अहो तसं नाही.... पण काळजी वाटली अजयरावांची म्हणून सांगितलं..."
बाबा - "म्हणजे? कसली काळजी? तुम्ही काही लपवत आहेत का माझ्यापासून?" आई आणि राधिका दोघीही एकमेकींकडे बघू लागल्या.
बाबा - "अगं काय झालं? बोला काहीतरी...."
राधिका - "बाबा, ते... मागे एकदा...." आणि राधिकाने त्यांच्या शाळेजवळ झालेल्या आजीच्या अॅक्सीडंटबद्दल आणि अजयसोबत जे काही घडलं होतं तो सगळा प्रसंग बाबांना सांगितला.... बाबांनी डोक्याला हातच लावला.
बाबा - "एवढे दिवस झाले या गोष्टीला आणि हे आज सांगताय तुम्ही मला?"
राधिका - "बाबा, तूम्हाला तेव्हाच हे सगळं सांगणार होते मी, पण त्यानंतर तो इथे आपल्या घरी येऊन पण धमकी देऊन गेला... म्हणून थोडी भितीच वाटली मला तुम्हाला सांगायला म्हणून नाही सांगितलं..."
बाबा - "खरंच हा गोविंद कधी सुधरणार नाही. पण अजयरावांनी त्याला बरोबर तोंड दीलं. आणि त्याला का म्हणून घाबरायचं...? त्याने तशी धमकी दिली म्हणून तो तसं खरंच काही करणार आहे का? त्याला एवढं घाबरून कसं चालेल? काही करत नाही तो..."
आई - "गुंडमवाल्यांचा काही भरोसा असतो का? त्यांच्या मनात कधी काय येईल आणि ते कधी काय करतील ते सांगता येतं का? ते काही नाही राधिका, तुम्ही दोघांनीही त्या गावात नाही जायचं.... अजयरावांना पण गोविंदबद्दल सगळं सांगून टाक..."
बाबा - "अगं जातात तर जाऊ दे त्यांना. ते गाव काही त्याच्या एकट्याच्या नावावर नाही आणि त्याला एवढं घाबरायचं काही कारण नाही... तो काही करत नाही..."
आई - "तुम्हाला काय करायचं ते करा... मला काही सांगू नका... पण त्या गावात गेल्यावर त्याने अजयरावांना काही केलं तर पुढे पश्चात्ताप करायची वेळ यायला नको, बस एवढंच वाटते मला..." आई रागातच तिथून उठून निघून गेली.
राधिका - "बाबा, आई अगदी बरोबर बोलतेय, तिथे जायलाच नको असं मला पण वाटतेय..."
बाबा - "अगं पोरी, तुझी आई उगाच घाबरते... तो काहीही करत नाही. आणि तुम्हाला त्याच्या घरी जायचं नाही... जिथे तुम्ही फिरायला जाणार आहेत ते ठिकाण त्याच्या घरापासून खूप लांब आहे... तो काही तिथे येणार नाही. आणि जरी तो आला तरी तुम्हाला तो काही करणार नाही... आणि एवढं कोणालाही घाबरून राहू नये पोरी... माणसाने बिनधास्त जगावं, कुणाचीही भिती बाळगून जगू नये... असंच घाबरून राहीलं तर जगायचं तरी कसं? तूच सांग बरं... "
राधिका - "हो बाबा, ते पण खरंच आहे पण काही अघटीत घडायला नको, बस एवढंच वाटते..."
बाबा - "नाही काही घडत, तू जा बिनधास्त आणि असा नकारात्मक विचार मनातून काढून टाक, बरं का...?"
राधिका - "हो बाबा, ठिक आहे, जाऊ आम्ही..."
राधिका जायला तयार तर झाली पण तिच्या मनात येणारे विचार काही थांबेना....
-------------------------------------------------------------
--श्रीरामपूर-- भालेकर वाडा---
रात्रीचे दोन वाजले होते. कुसुम आणि सावित्रीमाय गोविंदची वाट बघत बसले होते. गाडीचा आवाज आला, दोघीही बाहेर निघाल्या... दोन माणसं गोविंदला पकडून आणत होते. त्याने खूप दारू पिली होती, त्याला कसली शुध्द देखील नव्हती.... दोघींनी डोक्याला हातच मारून घेतला... त्या माणसांनी त्याला त्याच्या रूममध्ये नेऊन झोपवलं आणि ते निघून गेले...
कुसुम - "सावित्रीमाय, हे असं किती दिवस चालणार गं... माझं पोरगं अगदी वाया गेलं बघ... आता त्याला कितीही सुधरवण्याचा प्रयत्न केला तरी तो सुधरणार नाही आता... आता काय करू मी तेच कळेनासं झालंय मला..."
सावित्रीमाय - "कुसमे, तुझ्या पोराला सुधरवायचा एक मार्ग आहे बघ माझ्याकडे... जर तू तसं केलंस तर तुझं पोरगं सुधरू शकते बघ..."
कुसुम - "सावित्रीमाय, आता तू जे सांगशील ते मी सगळं ऐकायला तयार आहे, माझं तर आता डोकं चालेनासंच झालंय बघ... आता तूच काहीतरी मार्ग काढ यातून..."
सावित्रीमाय - "बरं.... कुसुमे, मी आता जे काही सांगते ते एकदम लक्ष देऊन ऐक..." सावित्रीमाय तिला सगळं काही समजावू लागली आणि कुसुम पण तिचं लक्ष देऊन ऐकू लागली. कुसुमला तीचं सगळं बोलणं पटलं.
कुसुम - "सावित्रीमाय, तू अगदी बरोबर मार्ग दाखवलास मला... आणि आता तसंच करेन मी... नाहीतर गोविंदवर आता मला अजिबातच विश्वास राहीला नाही... जे तू सांगितलंय तेच करेल मी आता... फार उनाडगीरी केली त्याने, आता त्याला वेसण घालायची वेळ आलेलीच आहे..."
सावित्रीमाय - "कुसमे, किती केलं तरी तूझं लेकरू आहे ते... त्याला काही त्रास झाला तर तूला पण त्रास होणारच पण जर त्याला सुधरवायचं असेल तर काही कठोर पाऊलं तूला उचलावीच लागतील..."
कुसुम - "हो माय, तूझं म्हणणं पटतेय मला... हे वाटते तितकं सोपं तर नाही पण मी माझ्या परीने नक्कीच प्रयत्न करेन..." पुढे कसं... आणि काय पाऊल उचलायचं याचा विचार ती करू लागली...
क्रमशः-
(बघुया पुढच्या भागात काय होते ते...)
[ कथा काल्पनिक आहे, वास्तवतेशी त्याचा काहीही संबंध नाही. तसं काही आढळून आल्यांस तो निव्वळ योगायोग समजावा. कथा आवडल्यांस आपली अनमोल प्रतिक्रिया नक्की कळवा..... ]
🌹💕...Ritika V. Patil... 💕🌹
💕💕 ...प्रेमगंध... 💕💕 - २७
➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️
🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀