प्रेमगंध... (भाग - २६) Ritu Patil द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

प्रेमगंध... (भाग - २६)

(आपण मागच्या भागात पाहिलं की गोविंद कुसुमला रागारागात बोलत असतो. मला काहीही करावं लागलं तरी चालेल पण मी राधिकासोबतच लग्न करणार असं तो तिला सांगत असतो. कुसुम त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असते. पण तो काही तिचं ऐकत नाही. कुसुमला त्याच्या बोलण्याचं खूप वाईट वाटते आणि ती पश्चात्तापाने रडू लागते. सावित्रीमाय तीला समजावते आणि तीला स्वतःच्या चुकीची जाणीव होते. ती सावित्रीमायला घेऊन राधिकाच्या घरी जाते आणि तीच्या आईबाबांची माफी मागते...)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कुसुम राधिकाच्या बाबांसमोर जाऊन उभी राहिली. आणि तीने खाली वाकून राधिकाच्या बाबांचे पायच पकडले आणि माफी मागू लागली. राधिकाच्या बाबांनी आपले पाय एकदमच मागे घेतले.

राधिकाचे बाबा - "ताई, लहान भावाचे पाय पकडून का मला पापाचा भागिदार बनवतेस का तू? मी कोण तूला माफ करणारा?"

सावित्रीमाय - "नाम्या, एवढा राग नको धरुस पोरा. आज ती तुझी मनापासून माफी मागतेय. तिची चुक कळलंय तीला. आज इतक्या वर्षांनी तुझी बहीण तुला परत मिळतेय, तीला अशीच डोळ्यात अश्रू घेऊनच घरी पाठवू नकोस पोरा. आज एक बहीण भावाच्या घरी आलंय, तिच्या चेहर्‍यावर तू आनंद देऊ शकला नाहीस तर तूझ्यांत आणि कुसुममध्ये काय फरक राहणार. तिने जी चुकी केली, परत तीच चुकी तू नको करूस..."

सावित्रीमायचं बोलणं राधिकाच्या बाबांना पटलं. त्यांनी कुसुमला दोन्ही हातांना पकडून उठवलं आणि खुर्चीवर बसवलं. त्यांनी तिला नमस्कार केला आणि तीच्या पायाशी बसले. त्यांचे पण डोळे भरून आले.

राधिकाचे बाबा - "ताई, मला तूझा कधीच राग नव्हता गं. तू मला कसंही वागवलं असतं चाललं असतं मला, कारण तू मोठी ताई आहेस माझी. मी चुकल्यावर माझे कान धरून माझ्यावर ओरडणे हा तूझा हक्क आजही तेवढाच आहे जेवढा आधी होता. पण तू सरूसोबत, माझ्या मुलींसोबत जे काही वागलीस ते मला अजिबात आवडलं नाही. तूला जे काही वाईट वागायचं होतं ते फक्त तू माझ्याशीच वागली असती तर मला काहीच वाटलं नसतं पण माझ्या बायको पोरींना पण तू तसंच तुच्छतेने वाईट वागवलंस....
त्यांची अशी अवस्था बघून माझं काळीज अगदी पेटायचं गं ताई. अक्षरशः रडायचो मी. पण त्यावेळी तूला अजिबातच आमची दया आली नाही. एवढं काय वाईट केलं होतं गं ताई आम्ही तुझं? मला धनसंपत्ती कधीच पाहीजे नव्हती गं. आईबाबा लहानपणीच वारले, त्यावेळी तूच माझी आई बनलीस, मला आईबाबांची माया दिलीस... नाही विसरलो गं मी त्या गोष्टी. आणि आपल्या दोघांना सांभाळून घेतलं, माया दिली ती आपल्या सावित्रीमायने... सगळं सगळं लक्षात आहे माझ्या... काहीच विसरलो नाही गं मी... पण तुझ्या अशा परक्याप्रमाणे वागण्याने खूप दुखावलो गेलो गं मी आणि मग घर सोडायचा निर्णय घेतला मी..."

कुसुम - "माफ कर रे नाम्या मला. त्यावेळी खूप चुकले मी. पण आता डोळे उघडलेत माझे. आता नकोय मला ती धनसंपत्ती आणि काहीच नको. मी पाणी सोडते त्या संपत्तीवर... बस माझा लाखमोलाचा भाऊ मला भेटला. बस आणखी काय पाहीजे मला.... बस या मोठ्या बहिणीची माया कधी विसरू नकोस, मोठ्या मनाने माफ कर मला...."

राधिकाचे बाबा - "अगं ताई माझ्यासमोर असे सारखे हात नको जोडूस. लहान आहोत आम्ही तुझ्यापेक्षा... फक्त तुझा आशिर्वाद कायम आमच्या डोक्यावर असू दे बस बाकी काही नको आम्हांला." त्यांनी कुसुमचा हात घेऊन आपल्या डोक्यावर ठेवला. कुसुमने प्रेमाने त्यांच्या डोक्यावर हात फिरवला.

कुसुम - "माझा आशिर्वाद कायम तुमच्या पाठीशी असेल. बस तू तोंड नको फिरवूस या बहिणीपासून..."

राधिकाचे बाबा - "नाही गं ताई असं कसं तोंड फिरवू तुझ्यापासून. इतकी वर्ष माझ्या बहीणीच्या मायेपासून पोरका झालो होतो मी. आज तर खूप आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी. आज माझी बहीण मला परत भेटलंय. आज मी खूप खूश आहे बघ...."

राधिकाची आई - "हो ताई, खरंच आज खूप आनंदाचा दिवस आहे आपल्यासाठी. किती वर्षांनी आज तुम्ही भाऊबहीण असे एकत्र आलेत."

राधिकाच्या घरी आज सर्वच खूप खुश होते. कुसुमने राधिकाच्या लग्नाचा विषय काढला. राधिकाच्या बाबांनी कुसुमला अजयबद्दल सगळं सांगितलं.

कुसुम - "नशिब काढलं पोरीने... खुप चांगलं झालं बघ नाम्या. आता लवकरात लवकर लग्नाची बोलणी करून टाकू आणि लग्न उरकून टाकू दोघांचं. आता ही बहीण पण माझ्या भाऊच्या पाठीशी उभी आहे.."

राधिकाचे बाबा - "हो ताई, अजयरावांच्या घरचे लग्नाची बोलणी करायला येतीलच थोड्या दिवसांत... सांगेन तूला."

कुसुम - "बरं ठीक आहे आणि नाम्या इथे येऊन गोविंद तुझ्याशी जे काही वागला त्याबद्दल त्याच्या वतीने मी माफी मागते तुमच्या सगळ्यांची. खूप चुकीचं वागला तो तुझ्यासोबत... माफ कर त्याला." कुसुमने राधिकाच्या बाबांसमोर हात जोडले.

राधिकाचे बाबा - "अगं ताई, तू कशाला त्या गोष्टीचा त्रास करून घेतेस उगाच.... जाऊ दे ते झालं ते झालं... राग नाही मला त्या गोष्टीचा.... तू नको माफी मागूस..."

कुसुम - "नाम्या चल आम्ही निघतो आता, खूप उशीर झालाय... सावित्रीमाय चल निघायचं ना, घरी जायचा विचार आहे की आज तूझ्या लाडक्या पोराकडेच मुक्काम करायचा विचार करत आहेस?" ती हसतच म्हणाली.

सावित्रीमाय - "हो मग माझा लाडका पोरगा आहे तो. या सावित्रीमायला नाही बोलणार आहे का तो?"

राधिकाचे बाबा - "हो गं माय, हे घर तुझंच आहे, तू इथे कधीही येऊन राहू शकतेस... आणि कायमचीच आमच्यासोबत येऊन राहीलीस तर आम्हाला जास्तच आनंद होईल...."

सावित्रीमाय - "नाय रे पोरा, आता मी नाही, तर तुम्ही सगळ्यांनी आपल्या गावी येऊन राहायचं, कळलं का...."

राधिकाचे बाबा -"नाही सावित्रीमाय, आता त्या गावात येण्याची इच्छा नाही उरली... बस तुम्ही दोघी इथे आपल्या घरी येत रहा. बाकी मला काही नको..."

सावित्रीमाय - "असं कसं बोलतोस नाम्या तू? किती केलं तरी त्या गावाशी आपली जन्माची नाळ जोडली गेली आहे, हे विसरून कसं चालेल? झालं गेलं ते सगळं विसरून जा आणि ये परत आपल्या गावी. तुझ्या पोरींना पण बघू दे की त्यांचं गाव, आपल्या गावाचा थाटमाट...."

कुसुम - "हो नाम्या, सावित्रीमाय अगदी बरोबर बोलतेय, मला पण असंच वाटतेय आता... तुम्ही सगळे आपल्या घरी परतून या.... आपलं घर, आपलं गाव, आपली माणसं सगळे वाट बघत आहेत तुमच्या सगळ्यांची आणि मी पण आतूरतेने वाट बघतेय तुमची. तुम्ही सगळे ज्या दिवशी कायमचे आपल्या घरी परतून येतील, तो दिवस माझ्या आयुष्यातला खूप आनंदाचा दिवस असेल बघ आणि तो दिवस लवकरच यावा, त्या दिवसाची वाट बघेन मी...."

राधिकाचे बाबा यावर काहीच बोलले नाहीत. कुसुम आणि सावित्रीमाय दोघीही आपल्या घरी निघून गेल्या.

-------------------------------------------------------------

शाळेमध्ये सहलीचे वारे सुटले होते. राधिकाच्या शाळेमधून श्रीरामपूर या गावी शाळेची सहल नेण्यांत येणार होती. श्रीरामपूर हे गाव चारी बाजूंनी सुंदर डोंगरांनी वेढलेले होते. गावाच्या बाजूने सुंदर बारमाही खळखळून वाहणारी नदी होती. सुंदर हिरवीगार शेतं, आणि हिरवळीने सजलेले असे सुंदर गाव होते ते. आणि मुलांना सुंदर रम्य अशा निसर्ग वातावरणात फिरायला मिळावं म्हणून श्रीरामपूरमध्ये सहल घेऊन जाण्याचं ठरलं होतं...

अर्चना - "अजय, तूला कधी असं वाटत नाही का रे? की राधिकाला कुठे फिरायला घेऊन जावं, पुर्ण दिवस एकमेकांसोबत घालवावा असं वाटत नाही का रे तूला?"
हे ऐकून अजयच्या चेहर्‍यावर छानशी स्माईल आली.

अजय - "अगं वाटते ना मला पण तसं. पण तीला विचारलं आणि तिने फिरायला जायला नाही सांगितलं म्हणजे...?"
अर्चनाने डोक्याला हातच लावला.

अर्चना - "अरे देवा, कसं होणार आहे तुझं कोण जाणे? तिला विचारण्याअगोदरच स्वतःचं स्वतःच ठरवून मोकळा झालास. अरे आधी विचार तर तिला... कदाचित तिची पण इच्छा होत असेल तुझ्यासोबत फिरायला जायची. पण ती सांगायला लाजत असेल..."

अजय - "बरं, विचारेन नंतर, पण सध्या आपल्या शाळेची सहल होऊन जाऊ दे, नंतर विचारेन.... पण तिला माझ्यासोबत फिरायला यायला आवडेल का गं? आणि मी तिला फिरायला जायला विचारलं आणि तीला राग आला तर? उगाच प्राॅब्लेम होईल परत...."

अर्चना - "अरे आधी विचारून तर बघ... नंतर काय ते तुझे अंदाज लावत बस... खरंच किती घाबरतोस तू तिला नुसतं विचारायला पण आणि रागावली तर काय झालं? मनवता नाही येणार का तुला? पुढे कसं होणार आहे तुझं? देवा माझ्या भावाला अक्कल दे थोडी आणि सोबत थोडी हिम्मत पण.... माझा भाऊ अगदी फट्टू आहे फट्टू..." आणि ती टाळी वाजवूनच हसू लागली.

अजय - "हम्म तू भावाची फक्त खेचत बस... बाकी काही करू नकोस..." तो लटक्या रागातच म्हणाला. दोघं भाऊबहीणीची मजाकमस्ती चालली होती. राधिकाने दोघांना दुरूनच पाहीलं. अर्चू त्याला काहीतरी चिडवून हसत आहे हे तिच्या लक्षात आलं. तिला पण हसू आलं आणि ती पण त्यांच्यासोबत येऊन बसली.

राधिका - "काय गं काय झालं? एवढी का हसतेस? काही गम्मत झाली का मला पण सांग ना..."

अर्चना - "अजय सांगू का खरंच राधिकाला?" ती डोळ्यांनी इशारे करतच त्याला बोलली.

अजय - "अगं राधिका अर्चूला वेड लागलंय... ती काहीही बडबड करत असते, आणि हसत असते. तिच्याकडे तू लक्ष नको देऊस." राधिका हसू लागली.

अर्चना - "वेड लागलंय काय मला? थांब आता सांगतेच मी. राधिका तूला माहीती आहे का अजय काय सांगतो ते? सांगू का?" तसं अजय तिथून पटकन उठला आणि जाऊ लागला. अर्चनाने त्याचा हात पकडला आणि त्याला जबरदस्तीने खालीच बसवलं. दोघीपण त्याला खूप हसत होत्या.

अर्चना - "राधिका, अजय सांगत होता की...."

अजय - "तुम्ही दोघी बोला, मला काम आहे मी निघतो..." तो हसतच म्हणाला. पण अर्चनाने त्याचा हात घट्ट पकडून ठेवला होता. ती त्याला उठूच देत नव्हती.

अर्चना - "अजय म्हणत होता की राधिकाची, यावर्षीची शाळेतली पहीली सहल... राधिकापण येईल आपल्या सोबत असं म्हणत होता....जाशील ना तू... मला तर नाही जमणार बघ ना. नाहीतर आपण दोघींनीपण सगळ्या मुलांसोबत खूप मज्जा केली असती...." ती अजयकडे बघतच बोलली आणि हसू लागली. पण सहलीचं नाव काढताच राधिकाचं तोंड पडलं.

राधिका - "नाही गं मला पण नाही जमणार सहलीला जायला.... मी पण नाही जाणार."

अजय - "का? काय झालं राधिका काही प्रॉब्लेम आहे का? मुलांसोबत जावं तर लागेलच ना...."

अर्चना - "हो ना, अगं मी आली असती पण लाडू अजून लहान आहे, म्हणून जमणार नाही मला यायला... तू जा ना राधिका, अजय पण असेल सोबत..."

राधिका - "माझी जायची इच्छा नाहीये पण विचार करून सांगेन नंतर..."

अजय - "अगं त्यांत कसला विचार करायचा? एक दिवसाची तर सहल आहे. सकाळी जाऊन संध्याकाळी परत घरी येणार. त्यांत विचार करण्यासारखी गोष्ट काय आहे?"

अर्चना - "हो ना, अजय अगदी बरोबरच बोलतोय."

राधिका - "हो गं कळतेय मला. पण माझी जायची इच्छा नाहीये. मला नाही जायचंय." हे ऐकून अजयला तिचा थोडा रागच आला. तरीपण तो तिला अगदी शांतपणाने म्हणाला.

अजय - "राधिका घरी काही प्रॉब्लेम झालाय का? असेल तर सांग आपण साॅल्व्ह करू."

राधिका - "नाही अजय असं काही नाहीये... घरी सर्व ठीक आहे. पण मलाच यायचं नाहीये..."

अजय - "राधिका, नक्की काय झालंय मला सांगशील का? कि अर्चू नसेल आणि फक्त मी सोबत असेन म्हणून नाही म्हणत आहेस का तू? तूला माझी सोबत नकोय का? इतरही शिक्षक असतीलच ना आपल्यासोबत..." तो थोडा रागातच म्हणाला.

राधिका - "नाही अजय असं नाहीये, तुझा गैरसमज होतोय. माझी त्यामागे काही वैयक्तिक कारणं आहेत... म्हणून मला नाही जमणार यायला... तू जाऊन ये ना..."

अजय - "आता अशी काय वैयक्तिक कारणं आहेत तुझी? कि तू ती कारणं मला नाही सांगू शकत... काय झालंय नक्की...? तूला मला काहीच सांगायचं नाहीये का?" राधिकाला काय बोलावं कळत नव्हतं. ती गप्पच बसली.

अजय - "अगं राधिका अशी गप्प नको राहूस. काहीतरी बोल."

राधिका - "अजय मी तूला नाही काही सांगू शकत. प्लीज थोडं समजून घे मला. मी नाही येऊ शकत..."

अजय - "बरं ठिक आहे... तूला नाही यायचंय तर नको येऊस... जास्त फोर्स नाही करणार तूला." आणि तो रागातच उठून निघून गेला. अजय तिच्यावर रागावलाय हे तिच्या लक्षात आले.

अर्चना - "राधिका, तूझा प्रॉब्लेम काय आहे ते मला नाही माहीती... तूला सांगायचं नसेल तर नको सांगूस... पण राधिका अजयचं खूप प्रेम आहे तूझ्यावर. त्यालाही असं वाटत असते की तू त्याच्या सोबत असावी. तूला फिरायला घेऊन जाण्याची पण खूप इच्छा असते त्याची, पण तू त्याच्यासोबत फिरायला जायला कदाचित नकार देशील... किंवा लग्न होण्याअगोदर जर तूला फिरायला जाण्याविषयी तूला विचारलं तर तू त्याच्यावर रागावशील का? या भितीने तो तूला काही विचारत पण नाही. शाळेच्या सहलीच्या निमित्ताने तरी तुम्ही दोघं सोबत असतील... म्हणून तो तूला सांगतोय की सहलीला चल असं...." राधिकाला काय बोलावं समजत नव्हतं.

राधिका - "बरं जाईन मी सहलीला..." राधिकाने श्रीरामपूरमध्ये सहलीला जाण्याचा निर्णय तर घेतला पण तिच्या मनामध्ये एक अनामिक भिती लागून राहिली होती... तिथे गेल्यावर काही अघटित असं घडणार तर नाही ना या गोष्टीची तिला भिती वाटत होती...



क्रमशः-

(बघुया पुढच्या भागात काय होते ते...)

[ कथा काल्पनिक आहे, वास्तवतेशी त्याचा काहीही संबंध नाही. तसं काही आढळून आल्यांस तो निव्वळ योगायोग समजावा. कथा आवडल्यांस आपली अनमोल प्रतिक्रिया नक्की कळवा..... ]

🌹💕...Ritika V. Patil... 💕🌹

💕💕 ...प्रेमगंध... 💕💕 - २६

➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️
🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀