लग्नामध्ये विशेष कोणी ओळखीचे नसल्याने क्षितिजला भूमीची सोबत मिळाली. भूमीला मात्र इथे बहुतांशी लोक ओळखतात हे क्षितिजच्या लक्षात आले होते. नवरीची ती बेस्ट फ्रेंड होती त्यामुळे वधूपक्षातील इतरही घराचे लोक तिला ओळखत होते. तिची निधी ही एक महाराष्ट्रीयन फ्रेंड लग्नासाठी आली होती. त्यामुळे क्षितिजच्या तिच्याशी देखील गप्पा रंगल्या. बऱ्याच गोष्टी ज्या माहित नव्हत्या त्या माहित झाल्या. आपण का एवढे उत्सुक असतो तिच्या बद्दल जाणून घायला? हेच त्याला समजत नव्हते. तिच्या नकळत तो तिला जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता. लग्नाच्या गडबडीत वेदांतचा फोन येऊन गेला होता. त्याने भूमीला कंपनीत साइन करण्यासाठी प्रपोजल पाठवले होते. त्यावर काय रिप्लाय द्यावा या विचारात क्षितिज रूममध्ये आला, कारण भूमीशी या बाबतीत काहीही डिस्कशन झालेले नव्हते. आणि ती आता जॉब करण्यात इंटरेस्टेड नाही, हे देखील क्षितिजला माहित होते. आज तिच्याशी बोलून काय ते फायनल करावे, असे त्याने ठरवले.
*****
वेदांत आणि मुखर्जींचे फोन संभाषण चालू होते. आपल्या कंपनीसाठी भूमी ही अगदी योग्य legal counsellor आहे. खरंतर ती केस कंपनीच्या आगेन्स होती. आणि कंपनीच्या काही कामगारांची त्यामध्ये चुक होती. अश्याही परिस्थितीत अर्ध्या तासात ती केस मीटिंगमध्ये क्लिअर झाली. आधीची काहीही पार्श्वभूमी माहित नसताना हे भूमीने कसे काय शक्य करुण दाखवले याचेच मुखर्जींना नवल वाटत होते.
'' सर, भूमी यांना आपण काहीही करून साइन करूया. आपल्याला अश्या सल्लागाराची खरोखर गरज आहे आणि क्षितीजवर थोडं प्रेशर टाकलं तर हे अशक्य नाही.'' पलीकडून वेदांत बोलत होता.
''येस वेदांत. तपासणीमध्ये जर आपल्या कंपनीचा तो घोटाळा उघडकीस आला तर आपण दोघे आधी पकडले जाऊ. डू समथिंग.'' मुखर्जी काळजीच्या स्वरात बोलत होते.
''सर तो तर केव्हाच उघडकीस आला असता. मैथिली मॅडम counsellor होत्या तेव्हाच, पण आपण तसे होऊ दिले नाही. यावेळी देखील काहीतरी करू.'' वेदांत
''मैथिली कूछ अलगही अटीट्युड वाली लाडकी थी. अगर उसको इस बात का पता नहीं चलता, तो आज मैं इस कंपनीका हेड होता.'' मुखर्जी रागारागात बोलत होते.
''जाऊदे ना सर. आपण वेळेत तिला बाजूला केलं, त्यामुळे ती तो घोटाळा उघडकीस आणू शकली नाही. पण आता क्षितिजचे हात तिथपर्यंत पोहोचले आहेत. सो बी अलर्ट.''
''येस, म्हणूनच सांगतोय. आपली खोटी केस जर खरी होऊ शकते, वर निर्दोष सुटून एक नवीन टेंडर आपल्याला मिळत आहे. उसको कंपनी की कोई हिस्ट्री मालूम नही हैं. उपरासे इस मामलेने एकदम न्यू है. तो उस भूमी मॅडम को कंपनीमें लाना पडेगा.'' मुखर्जी एकदम शुअर होऊन बोलत होते.
''आपला कंपनीचा घोटाळा लक्षात आल्यावर आपले आधीचे आर्थिक सल्लागार सुध्या राजीनामा देऊन निघून जाता आहेत, वर नवीन माणूस टाकताना मुश्किल, त्यामुळे खूप दिवस हे टेंडर अडकून पडले आहे. अश्या परिस्थितीत आपल्याला भूमी मॅडम तारक ठरतील. सर अजून एक, क्षितिज सुध्या भूमींना जास्त ओळखत नाही. त्यांची ओळख वाढण्याआधी आपण भूमींना इकडे अडकून घेऊ. एकदा का तो बॉण्ड साइन झाला की, त्यांना आपल्या म्हणण्याप्रमाणे काम करावे लागेल.'' वेदांत बोलत होता.
''दिल कि बात बोली तुने. इस बार कोई गलती नही. पहेले वो बॉण्ड साइन कर के लेंगे.'' आपले मोडकेतोडके मराठी आणि इंग्लिश-हिंदीला एकत्र करत मुखर्जी खुश होऊन टाळी वाजवत खुर्चीवरून उठले.
''येस सर. एकदा का सगळे लीगल मामले मिटले, की मग पाहिजे ते टेंडर खिशात घालू. S. K. ग्रुप ऑफ कंपनीज ची दाणादाण करूनच इथून निघायचं.''
''दिल की बात... कॅरी ऑन बॉय. काही लागले तर मी आहेच.''
नेहमीप्रमाणे खुश होत मुखर्जींनी फोन ठेवला आणि वेदांतने किर्लोस्करांना फोन लावण्यासाठी नंबर डायल केला. क्षितिजच्या तोंडावर स्तुती करणारा वेदांत मागे मात्र त्याच्या आणि कंपनीच्या विरोधी कारस्थानात माहीर होता. साथीला मुखर्जी साहेब होतेच. कंपनीचे अधिकारी असली तरीही कंपनीच्या वाईटात त्यांचा सिहांचा वाटा. चार-पाच वर्षांपासून अडकलेली टेंडर आणि मोठमोठी बिसनेस डील आतल्या आत गायब करून नफा कमवायचा, हा त्यांचा वर्षानुवर्षे चालत आलेला कारभार होता. बुडत्याला काठीचा आधार तसे भूमीचा आधार घेऊन त्यांनी आपापले लीगलचे घोटाळे क्लीअर करण्याचे ठरविले. पण भूमीला दुर्बल समजण्याची चूक किती महागात जाणार हे त्यांना माहित नव्हते.
*********
सावंतांच्या घरी साठे काका आले होते. मेघाताई आणि आज्जो क्षितिजची पत्रिका पाहून झाल्यावर चिंताग्रस्त झाल्या. 'काळयोगाची शांती करण्याची गरज आहे, एक पूजा करून घ्या.'असे सांगून काका निघून गेले. आज्जोला हे काळयोग, पत्रिका आणि ज्योतिषचे प्रकार काही मान्य नसले तरीही एवढ्या दिवसांनी घरात कार्यक्रम होणार या गोष्टीचा मात्र त्यांना आनंद झाला होता. तेवढीच नटण्याची संधी म्हणून त्या तयारीला लागल्या. मेघाताईंनी क्षितिजच्या पप्पांना फोन करून कळवले. क्षितीज आल्यावर काळयोग शांती आणि पूजा करून घेऊ, असा विचार करून त्या देखील तयारीला लागल्या.
'सकाळी भूमीला भेटण्याचे ठरवून क्षितीज ऑफिसच्या कामाची तयारी करू लागला. खरंतर अर्धवट लग्न सोडून आल्याने त्याला वाईट वाटत होते. पण त्या लग्नात त्याचे मन लागेना, आपल्याला मैथिलीच्या सुद्धा विसर पडला होता आणि भूमीकडे वाढणारी ओढ या पेचात अडकल्याने, लग्न अर्धवट सोडून तो रूममध्ये जाऊन ऑफिसच्या कामाला लागला. रुग्णालयात फोन लावून चोकशी करून झाल्यावर तो थोडा निर्धास्त झाला. एवढे दिवस मैथिलीची विचारपूस नाही. किंबहुना आपल्याला तिची आठवण सुद्धा कशी झाली नाही? याचेच त्याला नवल वाटत होते.
निधी आणि भूमी लग्नानंतर रुमवरती परतल्या. क्षितीजवरून त्यांच्यात चांगल्या गप्पा रंगल्या होत्या. एकंदरीत लग्नामध्ये क्षितिजचे वागणे बोलणे आणि नकळत भूमीला शोधणारी त्याची नजर, हे पाहून निधीने त्याच्या मनातील भूमीविषयीचे भाव ओळखले होते. भूमीच्या आधीच्या खोट्या लग्नाचे सत्य माहित असूनही क्षितिज सारखा कोणी आपल्या मैत्रिणीच्या आयुष्यात यावा असे तिला वाटत होते. शेवटी न राहवून तिने भूमीला विचारले.
''भूमी जर तुझ्या मनातल्या राजकुमाराप्रमाणे एखादा प्रेमळ मुलगा तुझ्याशी लग्न करायला तयार असेल तर?''
'' मस्करी पुरे, आणि खर प्रेम वगैरे काही नसत ग. मुळात आता लग्न आणि संसार या गोष्टीची चीड येते मला. प्रेम वगैरे तर स्वप्नातही नको. झाली तेवढी फसवणूक पुरे.'' म्हणत निधीचे वाक्य अर्धवट तोडत भूमी तिच्यावरती रागावली.
''एखादा विश्वासघात झाला म्हणून तू संपूर्ण आयुष्य एकटीने जगायच असं ठरवलं आहेस का?'' निधी तिला समजावत होती. पण ऐकेल ती भूमी कुठली.
''या पुढे हा विषय नको. तू फ्रेश हो, मग बाहेर जेवायला जाऊया.'' असं सांगून ती फ्रेश व्हायला निघून गेली.
कस होणार आपल्या जिवलग मैत्रिणीचं, या विचारात निधी देखील आवरायला लागली.
क्रमश