प्रेमगंध... (भाग - ३४) Ritu Patil द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रेमगंध... (भाग - ३४)

(आपण मागच्या भागात पाहीलं की राधिकाची बालमैत्रीण सुमी आणि तीचा मुलगा कृष्णा येतो... दोघीही एकमेकींना ओळखतात... सुमी खूप बडबडया स्वभावाची असते, त्यामुळे तिची बडबड ऐकून सगळे तिला हसत असतात... थोड्या वेळाने भीमा तिथे येऊन पोहोचतो आणि सगळ्यांची माफी मागतो... अजयची आई रागाने त्याच्या कानाखाली मारते... भीमा सगळ्या वाईट गोष्टी सोडून देण्याचं वचन सुमीला आणि सावित्रीमायला देतो... आता पुढे...)

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सगळं आनंदाचं वातावरण झालं होतं... आपल्या माणसांनी सगळं घर भरलेलं होतं म्हणून कुसुमला मनाला खूपच समाधान वाटत होतं... किचनमध्ये राधिका, सुमी, काही नोकर सगळे जेवणाची तयारी करत होते... सुमीची बडबड चालूच होती...

राधिका - "सुमी... गौरी, केसर आणि कोमल आता कुठे असतात गं...?"

"लग्न झाली त्यांची, सासरी असतात तिघीपण... येतात कधीकधी माहेरी तेव्हा भेट होते आमची..." -- सुमी.

"आणि काय गं सुमे, लहानपणी भातुकलीच्या खेळामध्ये तू आणि भीम्या दादा नवरा बायको व्हायचे... आणि आता खरोखरंच त्याच्याशीच लग्न केलंस तू...?" -- राधिका.
सुमी खूप हसू लागली...

"अगं अशी वेड्यासारखी हसतेस काय? विचारलं त्याचं उत्तर दे आधी..." -- राधिका.

"आता हसू नको तर काय करू, गंमतच तशी आहे तर..." आणि ती अजूनच हसू लागली.

"काय झाली होती गंमत मला पण सांग ना..." -- राधिका.

"अगं लहानपणी भातुकलीच्या खेळापासूनच भीम्या मला सांगायचा की सुमे एक लक्षात ठेव... तू फक्त माझीच बायको आहेस हा, मोठे झाल्यावर आपण दोघांनी लग्न करायचं... दुसर्‍या कोणासोबत लग्न करायला मांडवात उभी राहिलीस ना तर मग बघच तू. मांडवातून उचलून घरीच घेऊन येईन तूला आणि तूझ्यासोबत लग्न करेल मी... आणि मग मलापण आवडायचा तो... आमच्या दोघांच्या घरून मान्यता मिळाली आणि झालं लग्न..." सुमी हसतच आणि गोड लाजतच राधिकाला सगळं सांगत होती. राधिका तीला खूप हसत होती...

"मग आता तू माझी वहीनी झालीस ना... आजपासून तूला वहीनीच आवाज देते..." -- राधिका.

"नाही हा राधी, मी आधी तुझी मैत्रीण होती आणि मैत्रीणच राहणार... मला सुमीच बोलायचं..." -- सुमी.

"बरं ठिक आहे... पण मग भीम्या दादा गोविंदसोबत काम का करतो...? शेतीवाडी आहे ना घरची, मग तरीपण...?" -- राधिका... सुमीचा चेहरा मात्र पडला...

"हेच तर माझं मोठं दुर्भाग्य..." सुमीने डोक्याला हातच लावला...

"म्हणजे? नक्की काय झालं होतं?" -- राधिका.

"अगं लग्नाअगोदर भीम्या खूप चांगला... न दारूचं व्यसन, ना कसलंच व्यसन होतं त्याला... आम्ही शेती कसून खायचो... दोन वर्ष खूप छान संसार केला आम्ही... कृष्णाचा जन्म झाला... सगळे खूप आनंदात होते... आणि भीम्याची आई खूप आजारी पडली... तिच्यावर जमा केलेला होतानव्हता तेवढा सगळा पैसा पाण्यासारखा खर्च केला... तिच्या तब्येतीत थोडी सुधारणा होत आली होती... पण यांतच परत अवकाळी पावसामुळे शेतीचं खूपच नुकसान झालं... घरात खायला काहीच नसायचं... पण घरात एक बाळंतीण आणि आई आजारी... भीम्याचा जीव नुसता तुटायचा... आणि माझा सासरा तर काय रात्रंदिवस दारूत बुडालेला.

गावातल्या बर्‍याच लोकांचं नुकसान झालं होतं म्हणून काही लोकांनी गोविंदकडे आपल्या काही शेतजमीनीचे तुकडे गहाण ठेवले... मग भीम्याला पण वाटलं की गोविंद माझा बालपणीचा मित्र आहे तर काहीतरी मदत करेल मला म्हणून हा गेला गोविंदकडे... याने पण शेतजमीनीचा तुकडा गहाण ठेवायचं ठरवलं... पण भीम्या कसा एकदम अंगाने हट्टाकट्टा म्हणून गोविंदने त्याच्याकडून शेतजमीन न घेता त्याला आपल्या धंद्यात सामील केला... आणि मग याला दारूची फार सवय लागली. जेव्हा हे आम्हाला समजलं तेव्हा मी, आई, सावित्रीमायने याला खूप समजावलं, पण याने काही ऐकलं नाही...

भीम्या तीकडे गेला पण एकदम राक्षस झाला... कोणाच्या जीवाची पण पर्वा नाही राहीली त्याला... अजयरावांवर पण हात उचलला त्याने, राधी त्याच्यावतीने मी माफी मागते तुझी..." सुमीने राधिकासमोर हात जोडले.

"अगं तू कशाला माफी मागतेस...? जाऊ दे झालं ते झालं आणि आता होऊन गेलं ते आपण बदलू तर नाही शकत ना... पण मग नंतर पुढे काय झालं...?" -- राधिका.

"असा वाईट धंद्यातून आलेला बेईमानीचा पैसा आम्हाला नको पाहीजे होता म्हणून आम्ही ते पैसे घेत नव्हते आणि त्या पैशाचे औषधपाणी आईने घेण्यांस नकार दिला म्हणून रोज दारू पिऊन येऊन आम्हाला शिवीगाळ करायचा आणि याचच टेन्शन घेऊन भीम्याच्या आईने जीव गमावला... मी हळूहळू जमेल तेवढी शेती कसून खाते... पण सावित्रीमायचा खूप आधार आहे मला..." तीने डोळे पुसतच राधिकाला सगळं सांगितलं... राधिकाला खूप वाईट वाटत होतं... तीने तीच्या खांद्यावर हात ठेवून तिचं सांत्वन केलं.

"झालं गेलं विसरुन जा सुमे... आता सगळं ठीक होईल बघ... आता भीम्या दादाने ते कामपण सोडुन दिलं... आता चांगलेच दिवस येतील तुझे..." -- राधिका.

"हो आता अपेक्षा तर हिच आहे..." -- सुमी.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

"आई, तुझी तब्येत बरी आहे ना गं... अशी शांत शांत का आहेस? आपला अजयपण आता बरा आहे गं... असं किती दिवस टेन्शन घेऊन बसणार आहेस...? अशाने आजारी पडशील..." -- अमृता.

"हो ताई, आता सगळं काही ठिक होईल... तू कशाला एवढी काळजी करतेस...? झालं गेलं विसरुन जा सगळं..." -- अर्चनाची आई.

"आई आहे त्याची मी, काळजी तर वाटणारच मला. बस मला अजून इथे राहायचं नाही, उद्याच्या उद्या आपण इथून सगळ्यांनी निघून जायचं..." - अजयची आई.

"हो आई उद्या निघू आपण..." - अमृता.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

"नाम्या, तू काय विचार केलाय आता... कायमचं इथेच राहशील ना आता आमच्यासोबत...? - सावित्रीमाय.

"माय, नाही राहता येणार गं मला आता इथे... माझं घरदार संसार सगळं तिथे आहे... लहान तर लहान पण ते माझं स्वतःचं कष्टाचं घर आहे आणि त्या घरात मी माझ्या बायकोपोरींसोबत खूश आहे..." राधिकाचे बाबा.

"मग हे कोणाचं घर आहे नाम्या? हे पण तर तुझंच घर आहे ना... आम्ही कोणी परके आहोत का तुझ्यासाठी?" - कुसुम.

"अगं ताई तसं नाही, पण मी तर इथून गेलो घर सोडून... इतकी वर्षे तर हे सगळंच तू सांभाळलंय, आपलं हे घर, शेतीवाडी सगळं किती व्यवस्थित आणि छान ठेवलंस सगळं... आणि या सगळ्यां गोष्टींवर फक्त आणि फक्त तुझाच हक्क आहे, मला यातलं काहीच नको... मी माझ्या छोट्याशा दुनियेत खूश आहे..." - राधिकाचे बाबा.

"केलंस ना एका क्षणात परकं तुझ्या या बहीणीला... मी एकटीने सांभाळलं सगळं ठीक आहे पण तू स्वतःहून तर घर सोडून गेला नव्हतास ना... मीच कारणीभूत होती तुझ्या घर सोडून जाण्याला, पण माझी चूक मला कळलंय आणि आता हे सगळं तुझंच आहे... मी सगळी संपत्ती तुझ्या नावावर करून दिलंय. मला आता काहीच नको यातलं. तू सांगशील घरात रहा तर राहीन आणि मला घर सोडून जायला सांगितलं तर निघून जाईन... " -कुसुम.

"ताई हे काय बोलतेस तू? मला नकोय काही माझ्या नावावर... आणि मी का घरातून निघून जायला सांगू तूला... अगं हे सगळं तुझंच आहे आणि तुझंच राहणार... तू इथेच राहायचं कुठेही जायचं नाही..." राधिकाचे बाबा.

"तुम्ही सगळे इथे येऊन राहणार असतील तर मी पण इथे राहीन, नाहीतर कायमची निघून जाईन तीर्थयात्रेला... मग माझं तोंडही बघायला भेटणार नाही तुम्हाला..." - कुसूम.

"ताई, असं नको बोलू गं... आईबाबांनंतर तूच तर आहेस माझ्या जवळची... बरं तू इतकं सांगतेस तर येईन मी इथे राहायला...." - राधिकाचे बाबा.

"आपल्या याच घरात राधीचं लग्न करायचं... आपल्या घरातलं पहीलं शुभ कार्य असणार... खूप हौस करायची आहे मला माझ्या राधीच्या लग्नात... अजयराव एकदम बरे झाले की लग्नाचं काय ते ठरवून टाकू आणि खूप थाटामाटात राधीचं लग्न करू..." कुसुम..."

"हो ताई जसं तू सांगशील तसं..." - राधिकाचे बाबा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

आज सकाळीच सगळे शेतात फिरायला निघाले होते. सुमी सगळ्यांत पुढे आणि सर्व तिच्या मागे चालत होते. चारी बाजूंनी सर्व हिरवळ, शेतं पिकांनी बहरली होती.
सकाळचं वातावरण मन प्रसन्न करणारं होतं.

"मेघा मीरा, तुम्ही दोघींनी शांत राहण्याचा संकल्प केलाय का? इथे आल्यापासून दोघीही एकदम शांत झालेत..." - अजय.

"हो ना खरंच, तोंडाला कुलूपच लावलंय दोघींनी..." - अर्चना.

"का गं काय झालं तुम्हाला? गप्प गप्प का अशा? कोणी परके नाहीत तुम्ही, तुमचंच तर घर आहे हे... राधी, या दोघी घरी पण अशाच शांत शांत असतात का गं...?" - सुमी. यांवर अर्चना, अजय खूप हसू लागले.

"विचार ना या दोघींनाच किती शांत असतात या दोघी ते..." - राधिका.

अजय आणि अर्चनाने त्यांच्यासोबत दोघींनी केलेली गंमत सगळ्यांना सांगितली... सगळे खूप हसू लागले आणि दोघीही तोंडावर हात ठेवून हसत होत्या...

"बापरे, एवढ्या अवली आहेत का दोघीपण ह्या...? - अमृता.

"दाजी, जरा सांभाळून, तुमच्या दोघी साल्या तुम्हाला कधी टोपी लावतील सांगता येत नाही...." - सुमी हसतच म्हणाली.

"अगं नाही सुमी, आम्ही एकाच टीममध्ये आहेत सगळे, म्हणून मला काही टेन्शन नाही, हवं तर तू पण आमच्या टीममध्ये जाॅईन होऊ शकतेस..." अजय हसतच म्हणाला.

"हो का ठिक आहे, मग मी पण तुमच्या टीममध्ये जाॅईन होतेय आजपासून..." सुमी.

सगळे फिरून झाल्यावर गप्पा करतच घरी येत होते पण समोरच गोविंद येऊन उभा होता आणि तो भीम्याला रागातच बघत होता.... भीम्या गोविंदकडे धावतच गेला...

"मालक, तुम्ही..., मी येतच होतो तुम्हाला भेटायला..." - भीम्या.

"वाह, तू काय म्हणाला होतास मला? खाल्ल्या मिठाला जागणारा माणूस आहेस ना तू? मग कुठे गेली ती इमानदारी? गद्दारी करतोस तू माझ्याशी? या गोविंदसोबत? महागात पडेल तूला लक्षात ठेव..."- गोविंद रागातच बोलत होता.

"नाही मालक मी काहीच गद्दारी केली नाही तुमच्याशी... मी अजूनही तुमच्याशी इमानदारच आहे. विश्वास ठेवा माझ्यावर..." - भीम्या.

"मग इथे माझ्या दुश्मनांसोबत येऊन काय करतोस तू? का यांची चाकरी करायची ठरवलंस तू?" - गोविंद.

"मालक, इथे सगळी आपलीच माणसं आहेत, इथे आपलं दुश्मन कोणीच नाही. आपल्याच माणसांशी वैर कसलं मालक...? मी सगळे वाईट धंदे सोडून द्यायचा विचार केलाय आता... मी काम सोडतोय तुमच्याकडचं... माफ करा मला " - भीम्याने गोविंदसमोर हात जोडले...

हे ऐकून गोविंदला खूप राग आला... त्याने सरळ भीम्याच्या कानाखाली लगावली आणि त्याच्या काॅलरला पकडून त्याला घेऊन जाऊ लागला. सगळे त्याच्या मागेच धावत गेले. पण अजयच्या आईने मात्र अजयला तिथेच अडवलं आणि त्याला आतमध्ये घेऊन जाऊ लागली.

"अगं आई थांब, कुठे घेऊन जातेस मला?" अजय.

"त्यांचं काय आहे ते त्यांना निस्तरू दे, तू त्यांच्यामध्ये पडायचं नाही... आणि तू एक पाऊल जरी पुढे टाकलंस तर यापुढे मला आई म्हणून हाक सुद्धा मारायची नाही लक्षात ठेव तू..." अजयची आई.

"हो अजयराव, तुम्ही नका पडू यांत... ताई तुम्ही त्यांना आतमध्ये घेऊन जावा..." राधिकाची आई.

अजयची आई त्याला आतमध्ये घेऊन जाऊ लागली. तिने अजयला रुममध्ये नेलं आणि बाहेरून कडी लावून घेतली. तो आईला दरवाजा उघडायला सांगत होता, पण आईने काहीच ऐकलं नाही... गोविंद काय करतो ते अजय खिडकीतून उभा राहून बघू लागला.

क्रमशः-

(बघुया पुढच्या भागात काय होते ते...)

[ कथा काल्पनिक आहे, वास्तवतेशी त्याचा काहीही संबंध नाही. तसं काही आढळून आल्यांस तो निव्वळ योगायोग समजावा. कथा आवडल्यांस आपली अनमोल प्रतिक्रिया नक्की कळवा..... ]

🌹💕...Ritika V. Patil... 💕🌹

💕💕 ...प्रेमगंध... 💕💕 - ३४

➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️➖❇️
🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀