‘आज मीटिंगमध्ये समजलेली माहिती गंभीर होती. पाहिलं म्हणजे मैथिलीने त्याला शेवटच्या क्षणापर्यंत त्या फ्रॉड बद्दल काहीही कळू दिल नाही. याच त्याला वाईट वाटल. आणि त्यावेळी त्या दोघांचा खून करण्याचा प्रयत्न झाला होता. हे ऐकून त्याला आता भीती वाटू लागली. भूमी या केस बद्दल शोधाशोध करत आहे, जर मैथिली सारखंच तिच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न झाला तर? तिला काही होता काम नये, मी तस होऊ देणार नाही. पप्पा म्हणतात त्या प्रमाणे, तिला थोडं पडद्याआड काम करू दे. ऑफिसमध्ये आणि बाहेर वावरताना तिला काळजी घ्यावी लागेल. हे तिला सांगितलं पाहिजे.'
असा क्षितिजने विचार केला आणि तो तिच्या केबिनच्या दिशेने निघाला.
*****
'मैथिली आणि त्याचं नातं काय? ऑफिस कलिग्ज कि अजून काही? पण तो असं का वागला? ऑफिस मिटिंग मध्ये त्याने प्रोफेशनल वागण्याची अपेक्षा होती. एवढं ओरडून बोलण्याची काहीच गरज नव्हती खरंतर. कि मी त्याचा फारच विचार करतेय. असो यापुढे आपण प्रोफेशनल वागायचं. आपल्याला आपलं करिअर नव्याने सुरु करण्याची एक संधी मिळाली आहे, त्यामुळे यापुढे बाकीच्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही.'
भूमी स्वतःशीच बडबड करत घरी जायला निघाली. आपली पर्स उचलून ती निघणार एवढ्यात दारावर 'टकटक' करून क्षितीज आतमध्ये आला होता.
''हाय'' क्षितीज
''हाय. काही काम होत का?'' जणू काही झालेच नाही अश्या अविर्भावात तिने विचारले.
''काम असं काही नाही.'' क्षितीज
''ओके, माझी निघण्याची वेळ झाली आहे ना म्हणून विचारलं.'' भूमी
''मिटिंग मध्ये जे झालं त्यासाठी सॉरी.'' क्षितीज
भूमीसाठी हे अनपेक्षित होतं. ''इट्स ओके, यापुढे प्रोफेशनल वागू. बाय.'' म्हणून ती दाराकडे वळली.
''ओके, मी निघालोच होतो, सोडतो.'' क्षितीज
''नाही, निधी आलेय, मी तिच्यासोबत जाणार आहे.'' भूमी
''ओह, बाय.'' क्षितीज
''बाय.'' म्हणत ती बाहेर पडली. आणि तोही...
खरंतर निधी येणार नव्हती, तिला माहीतही नव्हतं. पण रोज क्षितीजच्या गाडीतून जाणे तिला आवडले नाही, मनाला पटतही नव्हते. त्यामुळे तिने निधीचे कारण पुढे केले होते. आपण खोट बोललॊ हे क्षितिजला कळायला नको म्हणून लगेचच मेसेज करून भूमीने निधीला संगितले कि, 'न्यायला ये.'
क्षितीज आणि निधीची चंदीगढला लग्नामध्ये ओळख झालेली होती, त्यामुळे क्षितीज निधीच्या कॉन्टॅक्टमध्ये होता. गडबड होण्याआधीच भूमीने परिस्थिती सावरली.
'भूमीला वाईट वाटलं आहे, हि गोष्ट क्षितिजच्या लक्षात आली होती. आत्ता सारखं सॉरी म्हणून काही फायदा नाही, हे त्याने ओळखलं. त्यामुळे त्याने विषय वाढवला नाही. आपण आपल्या मनात असलेली तिच्याबद्दलची भावना आणि आपला भूतकाळ म्हणजेच मैथिली बद्दल तिला सांगितले पाहिजे. घाईघाईमध्ये ऑफिस किंवा असं कुठेही बोलता येणार नाही. त्यासाठी एखादी भेट प्लॅनींग करतो.'
असे मनाशी ठरवून क्षितिजने गाडी स्टार्ट केली. तो घरी निघाला.
*****
'' संजनाच्या लग्नाचं रिसेप्शन आहे. माहित आहे ना? जायचं आहे आपल्याला.'' निधी भूमीला विचारात होती.
''माझा मूड नाही ग. तू जा ना प्लिज. नाहीतर तिला वाईट वाटेल.'' भूमी
''मला पण झोप येतेय, आता मी मस्त ताणून देणार आहे.'' निधी
''तिने खूपवेळा फोन केलाय, आपल्यापैकी कोणीतरी जायला हवं.'' भूमी
''गेलो तर दोघी, नाहीतर कोणी नाही.'' निधी
''त्यापेक्षा नकोच जाऊया. राहूदे.'' नाराज होत भूमी म्हणाली.
''ओके, तुझी खास फ्रेंड आहे ती, मला काही प्रॉब्लेम नाही.'' निधी मोबाइलवर आलेलं मेसेज वाचत म्हणाली.
''आज मला काही बरं वाटत नाही. समजावेन संजनाला.'' भूमी
''का ग? ऑफिसमध्ये काही झालं का आज? नाहीतर एरवी उडया मारत गेली असतीस.'' निधी
''काही नाही.'' भूमी
''बाय द वे, काय योगायोग. ऑफिस वरून आठवलं, तो संजनाच्या लग्नात भेटलेला क्षितीज सावंत आणि तू एकाच ऑफिसमध्ये काम करता ना... त्याने सांगितलं मला. '' निधी
''हो का? तुझा फ्रेंड आहे ना तो. सांगणारच. अजून काय काय सांगतो?'' भूमी
''काही नाही, विशेष काही असेल तेव्हा सांगेन हो. गुड नाइट.'' म्हणत उठून निधी झोपायला गेली.
''गुड नाईट.'' भूमी
*****
''क्षितीज तयारी झाली का?'' मेघाताई आपला वेलवेट ब्ल्यू नेटचा गाऊन सावरत खाली उतरल्या. त्या खूपच छान दिसत होत्या. त्या गाऊनवर शोभतील असे हेवी व्हाइट मोत्याचे कानातले त्यांनी घातले होते, पायामध्ये घातलेले व्हाइट हाय हिल्स तर अजून शोभा वाढवत होते.
''क्या बात है. मेघे आता शोभतेस संजयची बायको.'' आज्जोसुद्धा तयार होऊन हॉलमध्ये आल्या होत्या. त्यांनी सुद्धा ब्लू व्हाईट ड्रेसअप केला होता. पार्टीची तशी थीम होती.
''तुझं बर आहे ग, कधी तो मला शोभत नाही असं बोलतेस, तर कधी मी त्याला शोभत नाही, असं वाटत तुला.'' मेघाताई आज्जोकडे बघत बोलल्या.
''आई मी नाही येत, नॉट फिलिंग वेल. ड्रॉयव्हला सांगतो. तो येईल.'' क्षितीज तिथे आला होता.
''तरी मी म्हणालच होते, पण तुझ्या आज्जोला विश्वास होता, कि तू येणार.'' मेघाताई
''ते मला काही माहित नाही, तू येणार आहेस. नाहीतर मी संजयला सांगते. '' आज्जो हट्ट करत म्हणाली.
''निल वर्गमित्र होता ना तुझा. तुझे अजून काही मित्र भेटतील रे. चल…'' आज्जोने अप्रत्यक्षपणे हिंट दिली होती. त्यामुळे भूमी संजनाची फ्रेंड आहे, तर ती येणारच, आपणही जावं, असा विचार त्याच्या डोक्यात आला.
''ओके आलोच.'' म्हणत तो तयार होण्यासाठी निघून गेला.
हा एवढ्या लवकर का तयार झाला ते मेघाताईंच्या लक्षात आलं होतं.
*****
निघत-निघत त्याने निधीला मेसेज करून विचारले कि 'भूमी येणार आहे का?' पण त्याला काहीही रिप्लाय मिळाला नव्हता.
इकडे क्षितिजने पाठवलेल्या मेसेजला काय रिप्लाय करू ते निधीला कळेना.
'नाही.' तिने रिप्लाय केला.
पलीकडून 'प्लिज ट्राय कर.' असा क्षितिजचा मेसेज आला होता.
मघाशी नाही जायचं असं ठरलं...भूमीला कस तयार करायचं? असा तिला प्रश्न पडला. पण या मेसेज वरून क्षितीजच्या मनात भूमीबद्दल काहीतरी आहे, हे तिला समजलेलं होत. आणि आपल्या मत्रिणीच्या भल्यासाठी ती काहीतरी शक्कल लढवायला लागली. शेवटी तिने संजनाला फोन केला आणि भूमी येत नसल्याचं कळवलं. संजनाने भूमीला फोन करून येण्यासाठी आग्रह केला. ती काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हती, त्यामुळे नाइलाजाने भूमी तयार होऊ लागली.
क्रमश
https://siddhic.blogspot.com/