चुकीचे पाऊल! - ०१ Khushi Dhoke..️️️ द्वारा प्रवास विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

चुकीचे पाऊल! - ०१



"तिचं ते मुलांकडे बघून आकर्षित होणं! आज चक्क ती सोसायटीमधल्या शुभमकडे बघून लाजली! देवा, मला लवकरच हिच्यासोबत याविषयी मोकळेपणाने बोलावं लागेल. नाहीतर! देव न करो!"

विचार करता - करता मी भूतकाळात हरवले पण, लगेच घाबरून, भानावर आले.

"नाही, नाही…. छे!! असं व्हायच्या आतंच तिच्याशी यावर मी बोललं पाहिजे. हो, हेच योग्य. आजंच बोलायला हवं."

बाल्कनीतून खाली रस्त्याकडे बघत उभी असता ट्युशन क्लासला जाते वेळी ईशा लाजून शुभमकडे बघताना मला दिसली. दोघांची नजरानजर कोणत्या उद्देशाने झाली असावी हे समजायला मला एक क्षणही लागला नाही!

ईशाच्या शरीरात होणारे बदल बघून, आज माझ्या मनात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली होती.

शरीरात होणारे बदल आणि त्यांचे चांगले - वाईट परिणाम मला कोणीच सांगीतले नसल्याने जी परिस्थीती माझ्यावर भूतकाळात ओढवली होती! ती आठवून आज माझ्या मुली विषयीची मनातली काळजी वजा भीती अजूनच गोंधळ निर्माण करणारी होती. त्याच गोंधळात असता माझ्यासमोर माझा भूतकाळ पुन्हा एकदा अनउत्तरित प्रश्न बनून उभा राहीला.

साधरण शाळेत शिकत असतानाचे माझे दिवस मला आठवले...

एक दिवस असंच, शाळेतून घरी परतताना…!

"का? का, राहून - राहून त्याचा विचार डोक्यात येतो आहे? का त्याने मला 'त्या' जागी हात लावला? का तो आज माझ्या इतक्या जवळ होता? आधी तो मला बघायचा तेव्हा, काहीच वाटत नव्हते! मग आजंच का? का, तो असा वागला असेल?" मी गोंधळात सर्व मनाशी पुटपुटत चालत होते.

सायंकाळचे ०६:०० वाजले होते. विचारात असताच मी घरी येऊन पोहचले. त्याच मनःस्थितीत दारावर थाप दिली. आतून दार माझ्या लहान बहिणीने उघडले आणि माझा शाळेचा बॅग जोर - जोरात ओढायला तिने सुरुवात केली.

कधी - तरी घरी येताना सोबत मी चॉकलेट्स घेऊन यायचे म्हणून, रोज ऋत्वी याच उद्देशाने माझा बॅग ओरबडून घ्यायची. त्यादिवशी मात्र माझी जास्तच चिडचीड झाली होती. त्यातल्या - त्यात ऋत्वीचं वागणं मला राग आणण्यासाठी पुरेसं होतं. असं बॅग ओढताना बघून मी तिच्यावर सगळा राग एकवटून पूर्ण ताकदीनिशी पहील्यांदाच ओरडले असेल!

"तुला कळतंय का ग काही? मंद! मी आताच आले ना शाळेतून. जरा मला आत येऊ देतेस का?" : मी, वैतागून बोलून गेले.

माझा तो रागात लाल झालेला चेहरा पाहून, ऋत्वी रडवेली आत गेली आणि रडतच माझी तक्रार तिने आईजवळ केली.

"मम्मा, दिशा दी ने मला रागावलं." : ऋत्वी रडतच दोन्ही हातानी डोळे पुसत बोलत होती.

आईने तिला कवटाळले आणि स्वतःच्या कुशीत घेत शांत केले. शांत व्हायला तिला जास्त वेळ लागला नाही. मात्र आता, मी बाहेरच्या खोलीत असल्याची कुजबुज ऐकू येत नसल्यामुळे माझ्या काळजीपोटी, स्वतः आईने बाहेर येऊन बघितले.

बघितले पण, मी कुठेही दिसले नाही. स्वतःच्या खोलीत फ्रेश व्हायला निघून गेले असावे या विचाराने आई परत स्वयंपाक खोलीत निघून गेली. मात्र, मी अजून तिथेच एका कोपऱ्यात बसून विचार करत होते! बहुदा, तिच्या नजरेस हे पडले नसावे!

नंतर मी उठून माझ्या खोलीत आले आणि वेगळ्याच विचारात हरवले. आतून वेगळीच हुरहूर लागून होती. जी कधी मला मी चुकत असल्याचं सांगायची! तर, कधी नकळत सुखद अनुभव ही करवून जायची.

मी साधारण वय वर्षे चौदा, दिसायला सावळ्या रंगाची. मात्र, चेहऱ्यावर असणारा तेजस्वीपणा माझ्याकडे इतरांना खेचून घेण्यात नेहमीच यशस्वी! तेराव्या वर्षी शेवटी - शेवटी मला, माझी पहिली मासिक पाळी आली होती. पण, तेव्हा मला शारीरिक बदलांविषयी कोणी काहीही सांगितले नव्हते. उलट मला खोलीबाहेर न पडता आई तिथेच जेवायला ताट आणून द्यायची. मला त्यातच खूप मज्जा वाटत होती! कारण, माझी त्या दिवसांत सेवा व्हायची. मनात मी राणी असल्याची भावना होती. त्या दिवसात असं का वागलं जातंय हे विचारायला मी आईच्या रागीट स्वभावामुळे कधीच धाडस केले नाही. कदाचित त्यामुळेच मासिक पाळी नंतर होणाऱ्या शारीरिक बदलांविषयी मला काहीच कल्पना नसावी? पण, त्या दिवशी माझ्या मनात वेगळ्याच भावनांनी धिंगाणा घातला होता!

सगळं काही बाजूला ठेऊन मी माझ्याच विचारात बुडाले होते.

"कोणी माझ्याकडे नेहमीच बघत राहावं असं मला का वाटतं? एखादा मुलगा जर मला टाळत असला तर, मला खूप वाईट वाटतं! पण, कधी त्याचे जास्त वेळ माझ्याकडे एकटक बघणे, ते ही किळसवाणे वाटते! ओंकार वयाने माझ्यापेक्षा मोठा! म्हणून, भाऊ समजून त्याला बघून हसायचे फक्त. पण, आज माझ्या पाठीवरून हात फिरवत नको तिथे झालेला त्याचा तो स्पर्श! नक्की काय होते ते? आणि मी त्याला का थांबवले नाही? पण, एक वेळ मला ते चुकीचे ही वाटले नाही? थोड्याच वेळा नंतर मात्र ते मला विचित्र वाटले? कधी बरोबर कधी चूक! असं का वाटत असेल मला? कोणाला सांगावं मी हे? आईला! तिने मलाच चुकीचं ठरवलं म्हणजे!? नाही, नाही! मी हे कोणालाच सांगणार नाही! तसंही मुलांसोबत बोलणं तर दूरंच, बघितलं तरी ती मला फाडून टाकेल असंच वाटतं!" : मी मनाशीच जरा वेळ गप्पा मारल्या.

विचारात असल्याने मला दारावरची थाप ऐकूच आली नाही. थोड्या वेळाने जोर - जोरात दारावर पडणाऱ्या थापांच्या आवाजाने माझी तंद्री तुटली.

"अं! हो, आले." : मी, भारावून....
.
.
.
.

क्रमशः

©खुशाली ढोके.