आता पर्यंत आपण बघीतले.
प्रियांका गावडे आणि माझ्यात झालेल्या संवादाने मला सुरक्षितता वाटली. आमच्यातील संभाषण संपवून वर्गाच्या दिशेने जायला निघताच पोटात कळ उठली आणि मी जागीच कोसळले!
आता पुढे..!
मला असे धाडकन जमिनीवर कोसळलेले बघून प्रियांका गावडे घाबरल्या! त्यांनी तात्काळ सोबत आलेला चिकित्सक गट आत बोलावून घेतला. मला उचलून आत एका बाकावर आडवे झोपवण्यात आले.
बाकीचे सर्व काळजीत पडले. शाळेच्या परिसरात कुठल्याही विद्यार्थ्याला काहीही दुखापत होणं, शाळेची जबाबदारी त्यामुळे अर्धी मंडळी त्याच काळजीत! बाकीच्यांना खरंच माझी काळजी वाटत होती आणि त्यातीलंच एक होत्या, प्रियांका गावडे मॅडम.
डॉक्टरांनी माझी तपासणी केली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले! त्यात कमालीची अस्वस्थता मला जाणवली. त्यांनी लगेच प्रियांका गावडे यांना जवळ बोलावून घेतले. दोघांनी कोपऱ्यात काही चर्चा केली आणि माझ्यावर एक चिंताजनक नजर टाकली.
माझ्या मनात नको ते विचार येत होते पण, नेमके काय झाले हे माझ्या समजण्या पलीकडचे होते!
प्रियांका गावडे यांनी लगेच फोन वर काही बटणा दाबल्या आणि फोन कानाला लावला. पाच मिनिटे बोलून त्यांनी फोन ठेवून दिला. डॉक्टरांना काहीतरी सांगत त्यांनी सर्वांना बाहेर थांबायला सांगितले!
माझ्या जवळ येत त्यांनी मायेने माझ्या डोक्यावरून हात फिरवला. मला खूप सुरक्षित वाटले.
"बेटा, तुला कधी पासून हा त्रास आहे?" : प्रियांका गावडे यांनी शांतपणे विचारले.
"खूप दिवसांपासून!" : मी पोटावर हात ठेवत घाबरतंच सांगीतले!
"तू माझ्याशी खोटं का बोललीस? ओंकार सोबत तुझे संबंध होते ना?" : त्यांनी एका संशयीत नजरेने मला प्रश्न केला.
"नाही मॅडम!" : धक्का बसल्यासारखी मी त्यांच्याकडे बघत राहिले.
"मग, हा गर्भ?" : त्यांनी माझ्यावर एक गंभीर कटाक्ष टाकत विचारले!
"काय? गर्भ! म्हणजे?" : जागेवरून उठत मी गोंधळून विचारले.
"बाळा, इकडे ये. इथे बस. हे बघ शांतपणे माझं ऐक. तुझ्यासोबत नक्कीच काहीतरी चुकीचं घडलंय जे तू माझ्यापासून लपवत आहेस. तुला कल्पना ही नाही तुझ्या बाबतीत काय घडले!" : त्यांनी मला जवळ घेत समजावले.
"म्हणजे मॅडम?" : मी आश्चर्यचकित होऊन विचारले.
"बाळा, तुला आता मी जे काही सांगेल, नीट ऐकशील! स्त्री पुरुषात होणाऱ्या लैंगिक संबंधांना आपण शारीरिक संबंध म्हणतो. ज्याची माहिती आपण मघाशी सेमिनार मधून बघितली आहेच. तुझ्या बाबतीत असं काही घडलं असल्यास मोकळेपणाने सांग. कारण, वैद्यकीय तपासणीत हे पुढे आले आहेच. आता लपवून काहीच फायदा होणार नाही." : त्यांनी माझ्याकडे निराश होत बघितले.
त्यांच्या या बोलण्यावर मी मान खाली घातली आणि मोठ्याने रडायला सुरुवात केली. हे बघून त्यांनी मला छातीशी घट्ट कवटाळले आणि डोक्यावरून मायेने हात फिरवत शांत केले. मी शांत व्हायला थोडा वेळ घेतला. शांत होताच त्यांनी मला प्यायला पाणी दिले. पाणी पिऊन मी शांत झाले आणि पुढे बोलायला सुरुवात केली.
"मॅडम….! त्या शामल सोबत मी…..!" : पुढे काहीही सांगण्या आतंच तीन महिन्यांपूर्वी, तीन तासात घडलेला संपूर्ण प्रकार माझ्या डोळ्यांसमोरून एखाद्या तीन तासांच्या सिनेमासारखा भरभर निघून गेला आणि मी स्तब्ध होऊन बसून राहिले.
"बाळा, शांत हो! घाबरु नकोस. मी आहे ना." : मिठीत घेत त्यांनी मला कवटाळले.
त्यांच्या मिठीत शिरत मी परत हंबरडा फोडला. माझी अवस्था बघून त्यांनी माझ्या डोक्यावरुन मायेने हात फिरवला.
"नको बाळा, तू रडू नकोस. घडलेलं सर्व काही मला सांग." : असं म्हणत त्यांनी माझी समजूत काढली.
त्यांच्या मिठीत मी स्वतःला सुरक्षित समजत होते. मी पुढे शामल आणि माझ्यात जे काही घडले ते त्यांना सांगायला सुरुवात केली. डोळ्यात अश्रू अनावर झाले.
.
.
.
.
क्रमशः
© खुशाली ढोके.