गाडी हमरस्त्याला लागली होती.
'नया कल चौखट पर है
आज उस पर एतबार कर
कब तक बीते कल में उलझेगा
चल आज एक नई शुरुआत कर..!'
म्युझिक प्लेअर वर लागलेली शायरी ऐकत क्षितीज गाडी चालवत होता. आणि भूमी नेहेमीप्रमाणे त्याच्या बाजूला सीटवर रेलून झोपलेली होती. गाडी शहराकडे भरधाव वेगाने निघाली होती.
तेव्हा भूमीला जाग आली. ''क्षितीज आपण पोहोचलो का?''
''नाही, दहा मिनिटात पोहोचू.''
'' माझं घर तर मागे गेलं ना, तू पुढे कुठे निघाला आहेस?'' भूमी बाहेर रोडकडे बघत म्हणाली. आणि क्षितिजने ब्रेक लावला, गाडी जागीच उभी झाली होती.
''आपण माझ्या घरी आलोय, माझ्या आई-पप्पांच्या घरी. त्यांना भेटायला.'' क्षितीज गाडीतून उतरत म्हणाला.
''का? तुझ्या आईने मला तुझ्यासोबत पाहिलं तर त्या खूप रागावतील.''
''आता तिला काय रागवायचं आहे, एकदाच रागावू दे. नंतर तिला नेहेमीच आपल्या दोघांना सोबत बघायचं आहे.'' क्षितीज तिच्या बाजूचा दरवाजा उघडत म्हणाला.
''म्हणजे?'' भूमी आश्यर्य आणि कुतूहलाने विचारत होती.
''लग्न करतोय आपण. लवकरच... तेच इथे कानावर घालायला आलोय आपण.'' क्षितीज तिचा हात आपल्या हातात घेत म्हणाला.
''आर यु सिरिअस? एवढ्या लवकर डिसिजन घेऊन निकाल पण झालास?'' भूमी अजूनही आ वासून त्याच्याकडे बघत होती.
''होय, का तुला काय प्रॉब्लेम आहे का?'' क्षितीज
''नाही, पण त्यांना म्हणजेच तुझ्या आईला हे मान्य नाही. माहित आहे ना तुला.''
''बघूया, चल आत.'' म्हणत त्याने बेल वाजवली आणि आणि आतून दार उघडले गेले. समोर हॉलमध्ये मिस्टर अँड मिसेस सावंत सोफ्यावर गप्पा मारत बसलेले. समोर क्षितिजला आणि त्याच्या सोबत भूमीला बघून त्यांना आश्चर्य वाटले.
''क्षितीज तू कसा आहेस? आणि आज अचानक इथे?'' मिस्टर सावंत विचारत होते.
''मी मस्त, तुम्ही? आणि आज्जो?'' क्षितीज त्यांच्या शेजारी बसत म्हणाला.
''आम्ही सगळे ठीक, भूमी तू कशी आहेस?'' मिस्टर सावंत भूमीकडे बघून विचारत होते. आणि बाजूला बसलेल्या मिसेस सावंत डोळे मोठे करून त्यांच्याकडे बघत होत्या.
''मी ठीक आहे.'' भूमी क्षितिजच्या शेजारी बसत म्हणाली.
''मी इथे तुम्हाला आमच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला आलोय. लवकरच आम्ही लग्न करतोय.'' क्षितीज त्या दोघांकडे आळीपाळीने बघत म्हणाला.
''लग्न करतोय म्हणजे काय? तू तुझ्या मर्जीने लग्न करणार आहेस? तेही हिच्याशी? तर आम्हाला आमंत्रण कशाला देतोस?'' क्षितिजची आई ताडकन उठून उभी राहत म्हणाली.
''तुला माहित आहे, आमचं एकमेकांवर प्रेम आहे. साखरपुडा झालेला आहे, तिचे काही पर्सनल प्रॉब्लेम होते. म्हणून ती परदेशी गेली होती. आता परत आली आहे, तर आम्ही लग्नाचा निर्णय घेतला आहे.'' क्षितीज एक दमात म्हणाला.
''कर लग्न, एक लग्न झालेल्या मुलीशी लग्न कर. आणि त्यात ती सहा-सात महिने बाहेरगावी जाऊन राहून आलेली आहे. परदेशी असताना ती तुझ्याशी कशी वागली, हे विसरलास का? तेव्हा तिला तुझी आठवण तरी होती का?'' मिसेस सावंतने अजूनच मोठ्याने ओरडत म्हणाल्या.
''आई ती काय आणि कसं वागली हे मला माहित आहे, त्यामागे बरीच कारण होती. त्यामुळे तू त्या विषयच भांडवल करू नकोस.'' क्षितीज त्यांना शांत करत म्हणाला.
''होय का, काय सांगितलं तिने तुला? आणि तू तिच्या बोलण्यावर लगेचच विश्वास ठेवावा असा कोणता पुरावा तिने तुला दिला?'' क्षितिजची आई
''माझ्या आणि भूमीच्या नात्याला पुराव्याची काहीही गरज नव्हती. जिथे विश्वास असतो ना तिथे पुरावे आणि साक्षीदाराची गरज नसते.'' क्षितीज
''अरे या किर्लोस्करांच्या मुली फक्त फसवू शकतात. आणि तू तिच्यावर विश्वास ठेवून हे लग्न दरवुन मोकळा झालास? तर आम्हाला कशाला बोलावतोस?'' मिसेस सुभेदार म्हणजे क्षितिज ची आई
''घराच्या प्रतिष्ठेसाठी, कंपनीच्या हितासाठी आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. तसाही लग्न झालाच पाहिजे असं काही नाही. आमचं लग्न झालं नाही तरीही आम्ही दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. जर तुम्ही दोघे लग्नाला आलात आणि आम्हाला आशीर्वाद दिलेत तर हे लग्न होईल अन्यथा आणि असेच एकत्र राहू. मला त्याचा काही फरक पडत नाही. तेव्हा तू ठराव तू येऊन आम्हाला आशीर्वाद देणार आहेस, कि आम्ही बिनलग्नाचे लिव्ह इन मध्ये राहू. हे तुझ्या हातात आहे.'' क्षितीज सरळ बोलून बाहेर पडला.
''तुम्ही येणार आहेत हे मला माहित आहे, पण दोघे सोबत याला अशी अपेक्षा करतो.'' निघताना तो पप्पांचा पाय पडला. आणि बाहेर आला. भूमीला काय बोलावे सुचेना. तिला हे सगळे अनपेक्षित होते.
''क्षितीज घाई करू नकोस. असं आई-बाबांना तोडून चालत नाही.'' ती त्याला समजावत होती.
''आपण कोणालाही तोडायचं नाही, उलट या लग्नामुळे सगळे एकत्र येतील याची मला खात्री आहे. तू काळजी करू नकोस.'' क्षितीज तिला म्हणाला.
''तू काय म्हणाल होतास आठवतंय, आपलं लग्न होऊदेत अथवा नाही. त्याचा तुला काही फरक पडत नाही.'' भूमी
''म्हणालो होतो, पण आता मी आणि तू दोघेही एका नामांकित कंपनीचे CEO आहोत. सो जबाबदारी आणि प्रतिष्ठा दोन्हीही आहे. त्यात आपण दोघे विना लग्नाचे एकत्र राहणार नाही, एवढी आपल्याला अक्कल आहे. त्यामुळे मी सगळं विचार करून हा निर्णय घेतलाय.'' क्षितीज
''आणि जर तुझी आई आपल्याला लग्नाच्या वेळी उपस्थित राहिली नाही तर? आपण हे लग्न भर मंडपात मोडायचं?'' भूमी
''तेवढी वेळ येणार नाही. म्हणूनच मी तिला सांगितलं कि, आम्ही बिनलग्नाचे लिव्ह इन मध्ये राहू शकतो. त्यावर ती नक्कीच विचार करेल.'' क्षितीज म्हणाला आणि भूमी शांतपणे काहीतरी विचार करू लागली.