हिरवे नाते - 1 Madhavi Marathe द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • रहस्य - 4

    सकाळी हरी आणि सोनू गुजरात ला पोचले आणि पूढे बस ने संध्याकाळ...

  • आर्या... ( भाग १ )

    आर्या ....आर्या ही मुलगी तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी...

  • गया मावशी

    गया मावशी ....    दिवाळी संपत आली की तिची आठवण हमखास येते…. ...

  • वस्तीची गाडी

                                                  वसतीची  गाडी  ...

  • भुलाये न बने

                  भुलाये न बने .......               १९७0/८0 चे...

श्रेणी
शेयर करा

हिरवे नाते - 1

गणेशा समोर कंदी पेढे ठेऊन मनोभावे नमस्कार करत अपर्णाने श्रद्धेने डोळे मिटले. आज पायलचा बारावीचा रिझल्ट लागला होता. बोर्डातून पहिली येण्याचा मान तिला मिळाला होता. गोल्ड मेडलची ती मानकरी ठरली होती . डोळे उघडून निरांजनाच्या प्रकाशाने भारलेल्या आणि जाईच्या सुवासाने तृप्त झालेल्या गणेशाकडे तिने नजर टाकली, चांदीच्या वाटीत एक पेढा ठेवून बाकी पेढे वाटण्यासाठी हॉलमध्ये आली. तिथे उत्साहाला उधाण आले होते. क्षणभर तिला आपण पिक्चर पहातोय असच वाटू लागलं . सासू सासरे, कौतुकाने निथळत्या नजरेने पायलकडे बघत होते. वडील अभिमानाने लेकीला न्याहाळत होते. आरव आपल्या मोठ्या बहिणीच्या यशाने फुलून आला होता. मित्र मैत्रिणींंच्या गराड्यात बसलेल्या पायलशी सगळेच एकदम बोलत होते . ती ही सगळ्यांना पुरे पडत होती . क्षणभर अपर्णाला हसू आलं . नील तिला नेहमी किती फिल्मी आहेस म्हणून चिडवायचा. आई पेढे घेऊन उभी आहे पहाताच आरव धावतच तिच्याकडे गेला. बॉक्स आपल्या हातात घेऊन पहिला पेढा पायलच्या तोंडात कोंबला. दोघांच्या नजरेतले जाणवणारे प्रेम , अभिमान अशी नात्याची घट्ट वीण बघून सगळेच सुखावले. सगळ्यांना पेढा देत आरव आईपाशी आला. खांद्यावर हात टाकून तिला एक खुर्चीवर बसवत म्हणाला " आता हे सगळे पेढे तुझे. कारण यामागची कितीतरी मेहनत तूझी आहे.' पायलही तिच्याजवळ येऊन तिचा हात हातात घेऊन बसली. "होय आई यात तू रुजवलेले स्वप्न आहे. बाबांनी ते पुर्ण करण्यासाठी केलेली धडपड आहे . आरवची साथ आहे. आजी आजोबांचे आशिर्वाद आहेत. " क्षणभर सगळेच भारावले. नंतर सगळेच हसून ओरडले "किती फिल्मी डायलॉग . पण ते खरे आहे . हसून गोंधळात सामील होत पायल म्हणाली .

             आता हिचे सगळे मित्र मेैत्रिण इथेच जेवणार हे अध्यारुत होते . पायलला मित्र मेैत्रिणींचे फार वेड . अर्थात फक्त त्यांचेच नाही, घरातलेही प्रत्येकजण तिला हवे असायचे. कुणी गावाला गेलेले पण हिला चालायचे नाही . जगनमित्र अशा प्रकारचा तिचा स्वभाव होता. घरातल्यांना जपणं , काळजी घेणं , लोकांच्या ओळखी करून घेणं हे सगळं तिला सहज जमायचं . 

              स्वेैपाकघराकडे वळलेल्या अपर्णाला पाहून नीलही उठला. " अगं बाहेरच जाऊया जेवायला ." 

               "नाही हं  बाबा . इथल्या सारखं बाहेर काही गप्पा मारत , मज्जा करत जेवता येत नाही. आम्ही पण मदत करू आईला ." पायल म्हणाली . 

               हे अपर्णाला माहितच होतं . नील, अपर्णा एकमेकांकडे बघून हसले आणि स्वैपाकघराकडे वळले . आपल्यावरच गेलेली पोरं वेगळी काय असणार ? नीलला वेगवेगळे पदार्थ करायची फार हौस . यामध्ये तो मुलांनाही सामील करून घ्यायचा . त्यामुळे मुलेही पदार्थ करण्यात आणि खाण्यात तरबेज झाली होती . 

              " चल मी तुला मदत करतो . काय करूया जेवायला ?" नील म्हणाला 

              " किश्ते घेताव गो ?" बाहेरून रावण्णाची हाळी ऐकू आली . लगेचच बाहेरचा गल्लाही ऐकू आला . " काकू माश्टांची शाक बनव गं ." अपर्णाने बाहेर येऊन भरपूर माश्ट { शिंपले }

घेतले . आता हे साफ कोण करणार ? या प्रश्नावर तेवढेच जोरात, आम्ही म्हणून उत्तर आले . या तरुणाईची झिंगच वेगळी . सासुबाईंनी माष्ट धुवायला घेतली स्वच्छ धुवून एका रोळीत निथळायला

ठेवले . चार ताटं मुलांसमोर ठेऊन ,निवडलेले यात टाका गं म्हणत त्या दुरडी घेऊन शेवग्याच्या पसाऱ्याकडे गेल्या . अपर्णा बारीक कांदा चिरायला बसली. नील ओल्या नारळाचा खव करायच्या मागे

लागला . कांदा चिरून एकीकडे कुकर गॅसवर चढवत अपर्णा नीलला म्हणाली " पायल पुढे काय करायचं म्हणतीये काही बोलली का तुझ्याशी ? "

" मी तिला एकदा म्हणालो होतो , पण तिने काही रिस्पॉन्स दिला नाही . पुर्ण विचार करून सांगेन म्हणाली ."  मऊशार पांढऱ्या नारळाचा खव एका पातेल्यात भरून ठेवत नील म्हणाला . 

आजकालची मुलं आहेत आणि त्यातून आपणच त्यांना पुर्ण स्वातंत्र दिले आहे . योग्य तेच करतील बघूया . माश्ट पुरतील का रे एवढी ? "

"अगं रस्सा जरा जास्त कर . " सासूबाई दुरडी घेऊन आत येत म्हणाल्या . शेवग्याच्या फुलांची माश्ट घालून केलेली भाजी सगळ्यांना फार आवडायची . तेवढ्यात स्वैपाकीणकाकू आल्या . त्यांना तांदळाच्या भाकरी करायला सांगून आरवला हाक मारली . दुकानातून काही गोड घेऊन यायला सांगितलं . सासुबाईंनी कोशिंबीरीची तयारी केली . स्वैपाक होत आला, तसा एका मोठ्या कढईत रसरशीत माश्ट उकळायला लागली . घरभर खमंग वास सुटला . प्रत्येकालाच त्या वासाने हुळहुळल्या सारखं झालं . पायल व मैत्रिणींनी मिळून शेजारच्या खोलीत पानं मांडली . सगळे पदार्थ मध्ये ठेवले गेले आणि भोवताली मंडळी जेवायला बसली . अपर्णा नोकरी करणारी आणि घरचे वातावरण मोकळे असल्यामुळे सगळे एकदम जेवायला बसले . जोरजोरात गप्पा ,हसणे ,खिदळणे या नादात मनसोक्त जेवून तृप्त झाले . आम्हा मत्साहारींना तृप्त व्हायला फक्त सागरी जीव पुरेसा असतो . भराभर मागचे सगळे आवरून ,सगळे आपापल्या खोल्यांकडे वळले . मित्र मंडळींनी निरोप घेतला . सकाळच्या उत्साहाच्या वातावरणावर आता गुंगीचे सावट आले होते . दुपारच्या तापलेल्या उन्हाच्या झळांनी जडपणा आणला होता . सगळेच झोप घेण्यासाठी गेले ,आणि उरलेला दिवसही रेंगाळत संपून गेला. 

           पायल खोलीत येऊन , कपडे बदलून कॉटवर पडली . डोळे जडावले होते. पण मन वेगळ्याच जगात डोकावू पहात होतं. आजच्या दिवसाला कारणीभूत असलेल्या बालपणातल्या गोष्टी, व्यक्ती, प्रसंग तिच्या समोर उभे राहून जणू कौतुक करत होत्या. मग पायल रात्रीच्या संवेदनशीलतेतून अलगद भूतकाळाच्या डोहात उतरली. तिला उलगडत गेला तो प्रसंग, जेव्हा ती ६/७ वर्षांची असताना आई बरोबर आजोळी जात होती. 

           सहा वर्षांची फ्रॉक घातलेली मुलगी , मोठ्या मोठ्या डोळ्यांनी ट्रेन मधून बाहेरचे जग बघत होती. पळत्या झाडाचे कुतूहल तिच्या डोळ्यात मावत नव्हते. आई  शेजारी बसलेल्या बाईशी  गप्पा मारत बसली  होती . उलट्या पळत जाणाऱ्या झाडांना मागे टाकत लवकरच भातशेतीची खाचर, आंब्याची झाडं ,नारळाचे माड दिसू लागले. पायल तो हिरवेपणा पाहून हरखून गेली. आलं बर का मामाचं गाव जवळ . आई हसून म्हणाली. माहेर जवळ आल्यामुळे तिच्या मनात एक प्रकारचा अनाहूत आनंद दाटून आला होता. कोकणातलं गुहागर हे तिचं माहेर होतं. लवकरच मानवी खुणा दिसू लागल्या . आपल्या इथल्या सारखेच दिसणारे लोकं पाहून आधी पायल गोंधळली. तिला वाटत होतं इथे वेगळेच दिसणारे लोकं रहात असतील. चिपळूण जवळ यायला लागलं तसं आईनी सामानाची आवराआवर सुरू केली. पायलच्या पायात सँडल चढवून, शेजारणीचा निरोप घेऊन गाडीच्या दाराशी उभ्या असलेल्या प्रवाश्यांमध्ये सामील झाली. अज्ञातापलिकडचे कुतूहल असल्यासारखे, बावरून इकडेतिकडे बघत आईचे बोट गच्च धरून पायल उभी राहिली. 

            गाडी थांबली तशी उतरणाऱ्यांची एकच घाई सुरू झाली. गर्दीत आपोआपच पुढे सरकत दाराशी आल्यावर आईने तिला कडेवर घेतले आणि बॅग सांभाळत ती खाली उतरली. तेव्हढ्यात तिला पाहून मामा धावतच आला. दोघांच्या चेहेऱ्यावरचा आनंद एकमेकांपासून लपत नव्हता. नात्याच्या उबेने मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. जेव्हढे तुम्हाला आपली म्हणणारी माणसे जास्त , तेव्हढे तुमचे जग प्रफुल्लित असते. निराशा कमी वाट्याला येते. मामाने हसतच आईच्या मागे लपलेल्या पायलला उचलून घेतले. 

   "ताई , किती मोठी झाली ग ही . किती वर्षानी येत आहेस तू पण ."  एक हातात बॅग घेवून तो चालू लागला. आईपण पर्स आणि छोटी बॅग घेऊन चालू लागली. 

   " अरे हो रे , दोन वर्ष झाली असतील. आईंच्या आजारपणामुळे आणि कॉलेज मुळे मध्ये यायला जमलच नाही. "

    " ताई तू मात्र जिद्दीची हं. लग्न झाल्यावर शिकून ग्रॅजूएट झालीस. आता कशी आहे काकूंची तब्बेत ? "

    " बरी आहे आता. त्यामुळे तर येता आलं . तू कसा आहेस ? कॉलेज काय म्हणतय ?" 

    "मस्त " स्वतःविषयी कमी बोलणाऱ्या भावाकडे पाहून तिला उगीचच दाटून आलं. अतिशय हुशार आणि मेहनती , मातीवर उत्कट प्रेम असलेला , सगळ्या जगाची दुःखं सोडवायला यालाच

पाठवलं असल्यासारखा सगळ्यांच्या संकटाच्या वेळी धाऊन जायचा. जगनमित्र . शेतामध्ये नवीन नवीन प्रयोग करायची त्याला फार आवड होती. अग्रीकल्चर घेवून ग्रॅज्युएशन करत होता.

           स्टेशन बाहेर कारच्या डिक्कीत जीवनने सामान आत ठेवले. पायल आता थोडी सावरली होती. अनोळखीपणाचे बंध थोडे गळून पडत होते. घारा गोरा मामा तिला फारच आवडला होता. मी

 पुढे बसणार म्हणत लगेचच पुढच्या सीटवर तिने हक्क दाखवला होता.  " अरे वा ,पायल मोठी झाली. एकटी बसायला लागली.'  मामा म्हणाला. बालपणात मोठे  झाल्याचे क्षण फार कमी

मिळतात. त्यामुळे तिला एकदमच छान वाटू लागले. आजी कशी चालते ते आठवून  चालायला लागली. तसे दोघे बहिणभावंड खो खो हसत तिला चिडवायला लागले. अगं तू मोठी झालीस म्हणजे 

म्हातारी नाही झालीस. ही मोठी माणसं म्हणजे ना कशाचीच मजा उपभोगू देत नाही. फुरंगटून पायल सीटवर जाऊन बसली. आई मागच्या सीटवर आरामात बसली. चिपळूण ते गुहागर साधारण एक

दीड तासाचा  रस्ता होता. गुहागरला ट्रेन जात नाही. बहिणभावांच्या गप्पा चालू होत्या. गावं मागे पडू लागली. अधून मधून वळणदार, काळ्याशार रस्त्यावरून गाडी पुढे जात होती. दुतर्फी गच्च झाडी

असलेले जंगल, डोंगर मागे पडत होते. निसर्गातल्या वातावरणाचा माणसावर फार लवकर परिणाम होतो. मामा हळूहळू अबोल व्हायला लागला. आईने पण थकून डोळे मिटले होते. 

          पायलवरही ती हिरवी गुंगी चढू लागली. अधूनमधून मामा, हे बघ निलगिरीचे झाड याला शंकुच्या आकाराच्या टोप्या येतात,  हा बघ कोकिळ, असे दाखवत होता. पण नेमके काय ते

कळायचं तिचं वय नव्हतं अजून सगळं एकत्रित पहाण्याचं तिचं वय होतं. लालसर मातीवर उभी असलेली हिरवीगार दाट झाडी, उन्हाच्या अधून मधून दिसणाऱ्या तिरिपी, मधूनच भारा घेऊन जाणारी

माणसं, आंब्याच्या झाडावर चढलेली मुलं, रस्त्याच्या कडेला जंगलातला मेवा घेऊन बसलेली मुले अशा विविध गोष्टींची तिच्यावर भुरळ पडली होती. एका ठिकाणी गाडी थांबवत मामाने करवंदे घेतली

व पायलला दिली. तिला हे नवीनच होते. कसे खायचे ते न कळून त्या काळ्या गोटयांकडे ती बघतच बसली. मग मामाने तिला एक करवंद खाऊन दाखवले. काळ्या रंगातून बाहेर पडणारी दुधी

आमसुली रंगाची आंबट गोड चव पायलला फारच आवडली. पण बियांशी काही सख्य जमेना. मग नंतर खा म्हणून मामाने ते ठेऊन दिले. परत खिडकीतून बाहेर नजर लावून ती गंमतीजंमती बघू 

लागली. हळूहळू जंगल मागे पडू लागलं. शेतीभाती करत गाव टप्प्यात येऊ लागलं. आईपण आता जागी झाली होती. आपल्या बालपणातल्या खुणांचा मागोवा घेत ती परत ते जग जगू पहात होती. 

छोट्या गावाच्या छोट्या बाजारातून गाडी पुढे जाऊ लागली. व्याडेश्वराच्या मंदिराशी आल्यावर आईने श्रद्धेने हात जोडले. वरचा पाट, खालचा पाट असे दोन भाग तिथे होते. त्यापेैकी वरच्या

पाटात आजी आजोबांचे घर होते. नारळ पोफळींची कुळागरं ओलंडत गाडी एका मोठ्या घरापाशी थांबली, आणि तिथून सुरू झालं पायलच एक वेगळं विश्व.

         कारमधून उतरेपर्यंत घरामधून आनंदाचा धबधबा बाहेर आला. ताई आली, मावशी आली करत त्यांच्याभोवती गराडा पडला. आईने सांगितले होते ,तिथे तूुझी मावशी येणार आहे. तुझ्या दीदी

आणि एक भेैय्या तिथे असणार आहे. पण पायलच्या अनोळखी मनाला अजून नात्यांचा आकार आला नव्हता. आईच्या पदराला गच्च धरून ठेवता ठेवता खूपच धांदल उडाली होती. तेव्हढ्यात वेणु 

मावशीची खट्याळ नजर पायल कडे वळली. " अरे ,ही बघा कोण छोटी पाहुणी आली आपल्याकडे ? या इकडे वीणा ,स्वराली " असे म्हणत तिने पायलला उचलून घेतले. अनपेक्षित स्वागताने 

पायल आनंदली. पण तेव्हढ्यात आई नजरेच्या टप्प्यात आहे ना ते बघून ,मगच मावशीकडे बघू लागली. " अगं ओळखलं की नाही तुझ्या मावशीला ?"  तसं तिच्याकडे बघून गोड हसत तिनी

मावशीच्या  लांब केसांच्या शेपटीला अलगद हात लावला. तिला केस फारच आवडले होते. तेव्हढ्यात तिच्यापेक्षा ४-५  वर्षांनी मोठ्या असलेल्या वीणा, स्वराली धावत आल्या पायल म्हणत तिला 

जवळ घ्यायचा प्रयत्न करू लागल्या. पण आता तिला आई न दिसल्यामुळे रडू यायला लागलं होतं. तिचा आवाज ऐकताच आईनी बाहेर येऊन तिला कडेवर घेतले. मग सगळेच आत गेले. दुधावरच्या 

सायीसारखी सुरकुतलेली गोरीपान आजी समोर आली. सायीचा मऊपणा तिच्या डोळ्यातूनही जाणवत होता. दुसरीकडून आजोबाही समोर आले. झुबकेदार मिशांमधुन " आलीस गं बयो " शब्द 

बाहेर पडले तेव्हा फिस्करलेल्या त्या मिशा पाहून पायल हसू लागली. मग तिला सगळेच ओळखीचे, आपले वाटू लागले ह्याच्या त्याच्या कडेवरून झेपावत ती लाड करून घेऊ लागली. तेव्हढ्यात

आजीला ते प्रवासावरून आल्याची जाणिव झाली ,ती म्हणाली " अगं अप्पे ,चला हातपाय धुवा. चहा घ्या . खाऊन घ्या. वेणा चल माझ्याबरोबर स्वैपाकघरात जरा. " तशी मावशी ,आई उठली.

मामाने बॅग आतल्या खोलीत ठेऊन दिल्या. आजोबा बागेकडे वळले. स्वराली, वीणा आपली मावशी आली हे सांगायला शेजारच्या मेैत्रिणीकडे पळाल्या. हॉलमध्ये पायल एकटीच उरली. क्षणभर 

ती घाबरलीच. पण आईचा आवाज आतून येत होता त्यामुळे निवांत इकडेतिकडे फिरू लागली. फिरत फिरत मागच्या दारी आली ,आणि समोर पहाते तर हिरवा समुद्रच अंगावर आल्यासारखा तिला 

वाटू लागला. समोरच्या अंगणात लख्ख उजेड आणि इथे मात्र ऊन सावल्यांच्या जाळीने विणलेली जमिन पाहून तिला नवलच वाटू लागलं. इथे असलेल्या सर्व झाडांशी तिची ओळख झाली नव्हती . 

एव्हढी मोकळी जागा पाहून तिथे खेळण्यासाठी आपल्या मित्र मेैत्रिणींची आठवण येऊ लागली. तेव्हढ्यात तिला शोधत आई आली. " अगं किती शोधलं तुला . काय करते इकडे एकटी , चल दूध

प्यायला. 

        स्वैपाकघरात सगळेच जमले होते. खमंग वासाने ते भरले होते. मावशी पोह्यांच्या ताटल्या भरत होती. वीणा त्यावर हिरवीगार चिरलेली कोथिंबीर पसरून ती प्लेट स्वरालीकडे देत होती. त्यावर 

पांढरशुभ्र मऊ नारळाचा कीस पसरवून प्रत्येकाला नेऊन देत होती. आईनी पायलला आपल्या शेजारी बसवले. सगळे पोहे खायला लागले. अतिशय चवदार पोह्यांच्या चवीत बुडून गेले. नंतर कंठ 

फुटल्यासारखे  एकदम बोलू लागले. हसू लागले. वीणा, स्वराली ,पायलची आता छानच गट्टी जमली. नात्यांची दाट वीण सगळ्यांनाच सुखवत होती. आपापली विश्व खुली करण्याची कुटुंब

हिच एक जागा असते. नाते हेच माध्यम असते. आपली नाळ कुटुंबाशी घट्ट ठेवणाऱ्यांना कधीच एकटेपणा जाणवत नाही. नेैराश्य येत नाही. सुखदुःखाच्या चक्रात येणारे वेैफल्य, कमी करण्याची

ताकत या कुटुंब रचनेत असते. अर्थात असेही नाही की त्यात हेवेदावे नसतील. पण ते धागे जरा कच्चेच असतात. बाकीच्या धाग्यांपूढे त्यात पक्केपणा येऊ न देण्याची काळजी माणसांनी घ्यायची

असते . नसता आयुष्य एकरंगी व्हायला वेळ लागत नाही आणि एकरंगी आयुष्य हे एकसूरी झाल्यामुळे आयुष्यातली मजा निघून जाते. म्हणून हे धागे कच्चे ठेऊन रंगीबेरंगी आयुष्य तयार

करण्याचा प्रयत्न केला पाहिजे , आणि सुंदर आयुष्य जगलं पाहिजे.

            हळूहळू पायलच्या मनात मग सगळच उलगडत जायला लागलं. अश्या कित्येक सुट्ट्या, आजोळी सगळ्यांनी मिळून घालवलेल्या तिला डोळ्यासमोर दिसू लागल्या. आपल्या हिरव्या

नाळेशी  जुळलेलं विश्व तिला खुणावू लागलं. मग  मनाशी अग्रीकल्चर मध्ये करिअर करण्याचा विचार पक्का करून, उद्या त्यावर आई बाबांशी बोलण्याचा निश्चय केला. मग तृप्त मनाने ती झोपेची 

आराधना करू लागली.