हिरवे नाते - 10 - सुगंधी बाबा Madhavi Marathe द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • रहस्य - 4

    सकाळी हरी आणि सोनू गुजरात ला पोचले आणि पूढे बस ने संध्याकाळ...

  • आर्या... ( भाग १ )

    आर्या ....आर्या ही मुलगी तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी...

  • गया मावशी

    गया मावशी ....    दिवाळी संपत आली की तिची आठवण हमखास येते…. ...

  • वस्तीची गाडी

                                                  वसतीची  गाडी  ...

  • भुलाये न बने

                  भुलाये न बने .......               १९७0/८0 चे...

श्रेणी
शेयर करा

हिरवे नाते - 10 - सुगंधी बाबा

                                                                                                   सुगंधी बाबा - 9

खुप वर्षांनी औरंगाबादला गेले की तिथे जुन्या आठवणींच्या वाटांवरून फेरफटका मारायची माझी जुनी सवय. बालपणाचं बोट धरून बदलत गेलेल्या वाटांवरून चालताना भूतकाळ आणि वर्तमानकाळातल्या सांगड घालणाऱ्या आठवणींची त्रेधातिरपीट उडायची. बालपणातल्या किंवा तारुण्यातल्या त्या सवयींच्या जागेकडे पहाताना समोर दिसणाऱ्या वेगळ्याच नजाऱ्यांनी मनाची घालमेल व्हायची. तिथल्या बदललेल्या रूपानी जुन्या आठवणी बाहेर फेकल्या जायच्या. आपलं असं फेकलेपण सहन करणं किवा बदलला सामोरं जाणं हेच जीवनाचं सुत्र आहे. कारण गेलेला प्रत्येक क्षण तुम्हाला भविष्याच्या ओंजळीत सोपवत असतो.

      स्मृती मध्ये घरासमोरून निघालेली वाट, गल्ली बनून नंतर वळण घेत रस्ता बनते, आणि शाळेला युनिफॉर्म घालून वॉटरबॅग घेऊन निघालेली आमची चौकडी बागडताना दिसू लागते. तेव्हा खूप काही गप्पा मारत, किलबिलत एकमेकांच्या खांद्यावर हात ठेऊन चालताना जगाचं भान नसायचं. किती वेळ झाला हे सांगणारी काही ठिकाणं यायची. रस्त्यात एक हॉटेल लागायचं. तिथे सलमा आगाची निगाह सिनेमातली गाणी त्यावेळेस चालू असायची. त्या गाण्याच्या क्रमावरून कळायचे की आपल्याला उशिर झाला आहे, की आपण वेळेत आहोत. वाट पुढे सरकायची. सुगंधाची लहर स्पर्शून शाळा जवळ आल्याचे सांगायची. सुगंधाचे वेगवेगळे रंगही तिथे उधळलेले असायचे. जसा ऋतु, त्याप्रमाणे त्याचे वेगवेगळे रूप, रंग, गंध, तिथे उधळलेले असायचे. गलांडा, शेवंती, गुलाबाचे असंख्य प्रकार. पावसाळ्यात जाई जुई, कुंदा निशिगंध. उन्हाळ्यात मोगरा, अबोली अश्या फुलांच्या राशी तिथे पसरलेल्या असायच्या. रंगसंगतीच्या नजाऱ्यावरून नजर अलगद फिरून, परत गंधावलेल्या वाटेवरून चालू लागायची. पण पाऊल अडायचंच. त्या सुगंधाच्या खुणा घेतल्याशिवाय त्या पावलांना पुढे जायचं नसायचं. रंगीबिरंगी ढिगाऱ्याच्या मागे सराईत हातांनी कुशलतेने हार विणत असलेले बाबा, ते आमचं बालमन अचूक जाणायचे. हास्याच्या धाग्यांनी आमच्याशी संपर्क जोडून निशिगंधाची चार फुलं आमच्या चिमुकल्या हातावर टेकवायचे. हर्षित झालेली आमची नजर त्या बाबांना आणि आम्हाला दिवसभराचा आनंद देऊन जायची. हळूहळू त्या नव्या ओळखीचं रूपांतर हक्काच्या नात्यात बदलत गेलं. तिथल्या फुलांनी घरातल्या प्रत्येक घटनांना साक्षी ठरवलं. गणपती महालक्षम्यांच्या सजावटी, दसरा दिवाळीच्या झेंडूंच्या माळांच्या महिरपी त्या दुकानातल्या फुलांनीच सजायच्या. नवरात्रीच्या नवदिवसांच्या फुलांच्या माळा, खाली उगवलेल्या धान्यावर अलगद पसरायच्या. कधीतरी बकुळीचे वळेसर यायचे. संक्रांतीच्या हळदी कुंकवाच्या दिवशी गुलाबाच्या पाकळ्यांमध्दे गुंफून केलेले कुंदाचे गजरे आई सवाष्णींना द्यायची, ते सुंदर गजरे सुगंधीबाबांच्या दुकानातलेच असायचे. कुणाच्या वाढदिवसाचे आनंदाच्या क्षणांचे स्वागत इथल्या पुष्पगुच्छानेच साजरे केले जायचे. तारुण्यात गालांवर फुललेले गुलाब. केसांवरही बरोबरीने फुललेले असायचे. आमचे फुलांआड बसलेले बाबा हे बदल टिपत मिश्किलीने हसायचे. त्यांचं नावच आम्ही आता सुगंधीबाबा ठेवलं होतं. घरात फुलांच्या रूपाने अदृश्यपणे वावरणाऱ्या गहिऱ्या नात्यामध्ये फार जवळीकता आली होती. माझं लग्नं ठरल्यावर आनंदाचं आणि घराला, गावाला दुरावण्याचं सुख दुःख आमच्या बरोबर सुगंधीबाबांनीही झेललं होतं. लग्नाच्या हारांमधून अवीट आठवणी जोडल्या गेल्या.

       आता त्या शाळेच्या वाटेवरून चालताना मनात हे सगळं उलगडत गेलं. सलमा आगाची गाणी जशी आता काळाच्या आड गेली होती, तसे ते हॉटेलही काळाआड गेले होते. दर्दभरी सलमा आता तिथल्या कपड्याच्या शोरूममध्ये स्टाईलीश कपडे घालून केविलवाणी उभी आहे असं वाटून गेलं. रस्ता पुढे सरकला. सभोवताली धूळ उडवत गाड्या वेगाने पुढे मागे जात होत्या. पावलांच्या मोजमापीने सुगंधीबाबांचे दुकान धुंडाळायला सुरवात केली. पण ती मापं चुकू लागली. दूर अंतरापर्यंत मोठमोठी शोरूम्स नजरेला पडत होती. गरम धुरळया शिवाय कुठलही दुसरं अस्तित्व जाणवत नव्हतं. रस्त्यावरच्या एका आजोबांकडे त्या दुकानाची चौकशी केली तसे त्यांचे डोळे लकाकले. “ तुम्हाला आठवतंय अजून ते दुकान ? माझा मित्रच होता तो. रस्ता रुंदीकरणात ते दुकान गेलं. त्यालाही आता जवळपास ७ / ८ वर्ष झाली असतील. त्याच्या बरोबर त्या सुगंधी खुणाही गेल्या. त्यानेही मागच्यावर्षी डोळे मिटले.”

    “ पण त्यांची मुलं असतील ना ? त्यांनी काळजी घेतली नाही बाबांची ?” मी विचारले.

    “ थोडीफार घेतली. पण बाबांना आलेल्या पैशावर मुलांनी फुलांचा व्यापार वाढवला. मोठमोठ्या कार्यक्रमांना फुलांच्या सजावटी होतात त्यामुळे त्यांचा धंदा तेजीत आहे. बाबांचं छोटं फुलाच दुकानाचं रोपटं, आता दुसरीकडे वटवृक्ष होऊन नांदत आहे. बाबांनाही त्यातच सुख मिळालं. पण मुलांना त्यांच्या व्यापामुळे वडिलांकडे फारसे लक्ष देता आले नाही. बाबा आपल्या सुगंधी आठवणीत बसलेला असायचा. एके दिवशी त्या आठवणीतच त्याने जगाचा निरोप घेतला. फुलं ज्याप्रमाणे अलगद, झाडांवरून गळून आपल्या जीवनाचा निरोप घेतात, तसंच बाबा अलगद त्या सुगंधी जगात नाहीसा झाला.” आजोबा उसासा टाकून पुढे सरकले.

    सुगंधीबाबाचं भलच झालं या जाणिवेने मन हलकं झालं. पावलं परतीची वाटचाल करू लागली. एका रस्त्याच्या आठवणींचा पुर्ण अंत झाला होता. सलमा आगा मेन्यूटो झाली आणि सुगंधीबाबा फुलांच्या जगात निघून गेले. माझ्या आठवणींचा बकुलीचा वळेसर अलगद मनाच्या कोपऱ्यात सरकवून दिला. तिथे तो नेहमीच दरवळत राहणार होता.

                                                        ......................................................................................