साधारण १९४६ चा काळ होता. पुण्याला वाड्यामध्ये बिऱ्हाड करून रहायची त्याकाळी मोठ्या प्रमाणावर सोय होती. नवीन लग्न झालेले, शिक्षणासाठी आलेले कुटुंब, मुलं गावी ठेवून बदलीवर आलेले असे बरेच लोकं वाड्यांमधून दोन खोल्या घेऊन रहात असायचे.
आम्ही पण असेच बाबांची बदली झाली त्या निमित्ताने पुण्याला आलो होतो. आम्हा मुलांना चांगल्या शाळेत घालता येईल म्हणून बाबांनी गुहागरहून सगळ्यांनाच इकडे आणले होते. त्यांच्या मित्राच्या ओळखीने वाड्यातल्या तीन खोल्या मिळाल्या होत्या. सामान सुमान घेऊन आम्ही त्या वाड्यावर आलो. परांजपे वाडा होता तो. तेव्हा पुणं एव्हढं गजबजलेलं नव्हतं. झाडांनी वेढलेल्या वाडयाचं दर्शन फार छान वाटलं. सगळ्या प्रकारच्या फळझाडांनी आणि फुलझाडांनी आवार बहरलं होतं. आमची गाडी थांबली आहे हे पाहताच एक गोरेपान गृहस्थ धोतर सावरत बाहेर आले. “ आलास रे बाबू.” म्हणत त्यांनी आमचे सामान उतरवायला मदतही सुरू केली. वाड्यातल्या पोरांना हाका मारून गोळा केलं. सगळ्यांनी मिळून काही मिनिटातच गाडीवाल्याला मोकळं केलं. बाबा तर काकांनी केलेल्या मदतीने कसनुसे झाले होते. “ अरे बाबू, इतकं काही वाईट वाटून घेऊ नको हो. अरे एकत्र रहायचं तर एकमेकांना मदत केलीच पाहिजे.” बाबांनीही संतोषानी मान डोलावली.
“अरे मुलांनो काकांना नमस्कार केला नाही अजून.” म्हणत बाबा स्वतःही त्यांच्या पाया पडले, आणि आई आम्हीही त्यांच्या पाया पडलो. आनंदाने हसून त्यांनी पुणं तुम्हाला उत्तम प्रगतीकारक ठरो. असा भरघोस आशिर्वाद दिला. तेव्हढ्यात मुख्य दारातून “चहा झालाय हो, बोलवा त्यांना आत.” असा आवाज ऐकू आला. “ बाबू सामान तर सगळं खोल्यांमधुन ठेवून झालं आहे. तुम्ही हातपाय धुवून माझ्या घरी या. चहाखाणं करून आवराआवरीला सुरवात करा.”
बाबा आजिजीने म्हणाले “ काका कशाला ? आम्ही करून घेऊ.” तसं काकांनी प्रेमळ धाकाने म्हटले “ बाबू वाड्यात माझा शब्द चालतो. येतो की नाही लवकर आता.”
बरं म्हणत बाबा आणि आम्ही, आमच्या नवीन बिऱ्हाडाकडे गेलो.
मोठ्या तीन खोल्या त्यापैकी एक स्वैपाकघर, त्यात बरेच खण होते. कोपऱ्यात मोरी आणि पाणी ठेवायला उभा कठडा होता. स्वैपाकघराचं एक दार, ते मागच्या अंगणात उघडायचं. जवळपास सगळ्याच बिऱ्हाडांची दारं मागच्या अंगणात उघडत असावी. दुसरी खोली झोपायची. तिथेही बरीच फडताळं दिसत होती, आणि बाहेर हॉल. आमच्या चौकोनी कुटुंबाला ही जागा फारच छान वाटली. कोकणातलं आमचं घरही चांगलं चौसोपी होतं. पण माणसंही तेव्हढीच असल्यामुळे ते कधी मोठं भासायचं नाही. बाबा आईला घाई करत होते. “आटप लवकर. आधी तात्याकाकांकडे जाऊन येऊ, मग निवांत देव मांडू. आम्हालाही पटापट आवरायला लावून आम्ही तात्याकाकांकडे निघालो. आईने सामानातून एक मोठा फणस काढून बरोबर घेतला. काकुना द्यायला म्हणून.
तात्याकाकांच्या घरासमोर मोठं तुळशी वृंदावन होतं. त्यातली तुळस कितीतरी मोठी होती. त्याच्या समोर सुबक ठिपक्यांची रांगोळी काढली होती. आम्ही आलेलो आहे हे पहाताच काका बाहेर आले. येता येता एकीकडे काकूंनाही आम्ही आल्याचे सांगितले. मग काकूही हसतमुखाने बाहेर आल्या. “ या रे ” म्हणत अगत्यापूर्वक दोघांनी आमचे स्वागत केले. आईने काकूंच्या हाती फणस ठेवला तसा काकूंचा चेहेरा आनंदाने फुलून आला.
“ अगं किती दिवसात असा पिकलेला फणस खाला नव्हता.” आईला घेऊन त्या आत गेल्या. तात्याकाकांनी मग माझी व बहिणीची चौकशी आरंभली. कितवीत आहे? नाव काय ? श्लोक कुठले कुठले येतात ? सगळं एकून दोघही हुशार असल्याची पावती त्यांनी बाबांना दिली. बाबांचा चेहेरा आनंदला. नवीन गाव, नवीन माणसं, नवीन जागा याचं त्यांना आलेलं टेंशन हळूहळू कमी होत गेलं. काकांच्या आपलेपणाने त्यांना मोकळं वाटू लागलं. आतमध्ये आई आणि काकू जन्मजन्मान्तरीची ओळख असल्यासारख्या गप्पा मारत होत्या. आम्ही दोघं तिथल्या मोठ्या चौसोपी झोपाळ्यावर बसून झोके घेत होतो. काकूंनी बाबा आणि काकांना पोह्याच्या बशा आणून दिल्या आणि आम्हाला आत घेऊन गेल्या. पोहे आणि नारळाच्या वड्या खूपच छान लागत होत्या. चहा पिऊन झाल्यावर आम्ही घरी जायला निघालो. काकूंनी आईला कुंकू लावत पूजेच सामान दिलं, आणि रात्री इकडे जेवायला यायचं आमंत्रणही दिलं. त्यांचं दोघींच आतच ठरलं असावं. बाबा परत कशाला ? असं गुळमुळ बोलले. तसे तात्याकाका हसून म्हणाले “ अहो आज तुम्ही या, नंतर तुम्ही आम्हाला बोलवा.” त्यावर बाबाही हसतहसत हो म्हणाले.
त्यांचा निरोप घेऊन आम्ही घरी आलो. आम्हाला पिशव्या, पोते उघडायला लावून आईने सगळं घर साफसूफ केलं. उघडलेलं सामान एका बाजूला ठेवून आधी घरचे देव देवघरात ठेवले. काकूंनी पाच आंब्याची पानं, नारळ, हळदकुंकू, तुपाच्या दिव्याचं निरांजन असं ठेऊन तबक आधीच आमच्या बरोबर दिलं होतं. सापडण्यात वेळ जायला नको. अंधार पडण्याच्या आत घरात दिवा लागावा हा त्यांचा उद्देश होता. सामानातला तांब्या चकचकीत धुवून बाबांनी कलश मांडला. देव मांडले. दिवा उदबत्ती लावून घरच्या नारळाच्या वड्यांचा नैवेद्य दाखवला आणि आम्हा सर्वाना घरात शांती, सुख समृध्दी लाभू दे म्हणून प्रार्थना केली. मग शशी आईच्या हाताखाली मदत करू लागली, आणि मी बाबांना मदत करू लागलो. सगळ्यांच्या कामाला वेग होता. बाबा तात्याकाकां बद्दल माहिती सांगत होते.
तहसीलदार म्हणून ते नुकतेच निवृत्त झालेले. त्यांना दोन मुले. एक मुलगा मुंबईला नोकरीला होता आणि मुलगी हुबळीला लग्न होऊन गेली होती. गावाकडे त्यांची पिढीजात शेती होती, पण त्यांनी आपला हिस्सा, शेती कसणाऱ्या दोन भावांना देऊन टाकला होता. जेव्हढं आहे तेव्हढं मला पुरे आहे. असा त्यांचा बाणा होता.
संध्याकाळपर्यन्त सगळं घर व्यवस्थित लावून झालं. माझं आणि शशीचं फडताळ ठरून तिथे आमचे कपडे, वह्या, पुस्तकं ठेवून झाले. बाबांच्या शिस्तीमुळे आमच्या दोघांमध्येही व्यवस्थितपणा आला होता. घरात सगळ्यांनाच सगळं जिथल्या तिथे लागायचं. आई काकूंना मदत करायला म्हणून त्यांच्याकडे गेली. बाबांनी आम्हाला श्लोक म्हणायला बसवलं. थोड्या वेळात तात्याकाकांचा आवाज ऐकू आला. “ अरे बाबू, श्रीकांत आणि शशीला बाहेर घेऊन ये.” त्यांची हाक ऐकताच आम्ही तिघेही बाहेर आलो. अंगणातल्या एका पारावर काका बसले होते. खाली १०/१२ पोरं त्यांच्या समोर बसले होते.
“ ये रे. ही बघ आमची वानरसेना. माझी आणि शशीची सगळ्यांना ओळख करून दिली. ज्यांनी विशेष ममत्व दाखवलं त्यांच्या जवळ आम्ही जाऊन बसलो. काकांनी सगळे श्लोक म्हणून घेतले. पाढे, पावकी, निमकी, वेगवेगळ्या कविता म्हणून घेतल्या. इथेच आम्ही रविंद्रनाथ टागोरांची गाणी, गांधीजींची भजनं, स्वातंत्रपुर्व काळातील चळवळींविषयी देशभक्ती जागवली. शेवटी एक छान गोष्ट सांगून, हातावर बेसनाच्या वड्या ठेवल्या. आता तात्याकाकांचा तास संपला असे त्यांनी म्हणताच पोरानी गिल्ला करत खेळायला धूम ठोकली. मला आणि शशीला उद्देशून त्यांनी म्हटले “ सकाळी सहा वाजता इथे व्यायामाला रोज यायचं आणि संध्याकाळी श्लोकवर्गालाही यायचं. जेव्हा घर भाड्याने देतो तेव्हा माझी ही अट मान्य करावी लागते.” ते हसून बोलत होते. आम्ही माना डोलवून आमच्या नवीन मित्र मंडळीत सामील झालो. बाबांशीही तिथला पुरुषवर्ग ओळख करून घेत होता. काकूंच्या स्वैपाकघरातून समस्त वाड्यातल्या महिला मंडळाचा आवाज निनादत होता.
हळूहळू तात्याकाका कळू लागले. ते म्हणायचे पोरांच्या रूपाने त्यांच्या हाती ओल्या मातीचा गोळा लागतो आणि त्यांना मूर्त रूप द्यायला आई वडील, शिक्षक, यांच्या बरोबर मी पण थोडा हातभार लावतो. त्यांची शिस्त कडक होती. पण प्रेमाने ती शिस्त पोरांच्या अंगी बाणवायचे. कुठलेही पोर काकांना दुखवायला नको म्हणून ते म्हणतील ते करायला एका पायावर तयार असायचे. परोपकार हा गुण तात्याकाका आवर्जून पोरांमध्ये बिंबवायचे. त्यातला आनंद उलगडून दाखवायचे. वाड्यात नवीन भाडेकरू आला किंवा जुना भाडेकरू गेला, की जातानाचा किंवा येतानाचा चहानाष्टा व ज्यावेळेप्रमाणे एक जेवण त्यांच्याकडे ठरलेले असायचे. गाडीमध्ये सामान भरायला किंवा उतरवायला आमची वानरसेना सज्ज असायची. या सगळ्यांमुळे आलेला माणूस अशा स्वागताने भारावून जाऊन, इथे आपले कसे होईल या चिंतेतून मुक्त होऊन जायचा. इथून चाललेला माणूस आपल्या इतक्या वर्षांमध्ये गोकुळासारख्या घरात नांदलेल्या आठवणींनी भारावून जाऊन तात्याकाकांपाशी ढसढसा रडायचा. बायका आतमध्ये मुसमुसू रडत असायच्या. पोरं बावरून आपल्या मित्रांचे निरोप घ्यायचे. काकांच्या इथलं वातावरण फार छान सांघिक होतं.
सकाळी त्यांच्या बागेतली फुलं, काकांबरोबर मुली तोडू लागायच्या आणि त्यांनी वाटे केले की मुलं प्रत्येकाच्या घरी घेऊन जायचे किंवा नेऊन द्यायचे. फळं तोडायच्या दिवशी तर नुसती धूम असायची. हा कार्यक्रम रविवारी ठरलेला असायचा. सगळे बापे अंगणात आणि भोवताली आम्हा पोरांचा धुमाकूळ असायचा. केळी काढताना त्याचा मोठा दांडा कापून पारावर ठेवला की बायका त्या कच्चा केळी पटापट तोडून मोकळ्या करायच्या. मग त्या केळी पोरांनी मोजायच्या. समप्रमाणात त्याचे वाटे केले जायचे आणि प्रत्येकाच्या घरी त्या कच्चा केळी पोहोचवायच्या. जास्ती उरलेल्या केळी तात्याकाकांकडे जायच्या. पुरुष तोपर्यंत ते केळीचे झाड कापायच्या, उपटायच्या उद्योगात असायचे, कारण एकदा त्या झाडाला फळ येऊन गेले की परत त्याला केळी लागत नाही. ते काढून टाकावं लागतं. खालून दुसरे कोंब आलेले असतात ते नंतर मोठे होत जातात. उपटलेल्या झाडाची पानं कापली जायची. त्या मोठल्या पानांचे अर्धे तुकडे करून त्याचे गठ्ठे व्हायचे, ते झाले की परत आमची मोजणी आणि समविभागणी सुरू व्हायची. प्रत्येकाला सारखा वाटा मिळाला पाहिजे याकडे तात्याकाकांचा कटाक्ष होता. त्या दिवशी सगळ्यांकडे केळीचे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ जेवणात असायचे. कच्चा केळीची भाजी, कोशिंबीर, भजे. एक आजी तर ते किसून त्याच्या छान वड्या करायच्या. मग जेवणाच्या वेळी प्रत्येकाच्या घरी आपल्या पदार्थांच्या वाट्या चवीला म्हणून पाठवल्या जायच्या. त्या दिवशीची जेवणं केळीच्या पानावर व्हायची. जेवणानंतर तात्याकाकांकडे एक गाय होती तिला ती पानं खायला घातली जायची. किती सुव्यवस्था. कुठेही कचरा नाही. वाया जाणं नाही. तोडलेल्या केळीची झाडंही तुकडे करून गाईसाठी ठेवले जायचे. घरातला ओला कचरा गाई पुढे असायचा किवा फुलझाडां मधे टाकला जायचा. त्यामुळे आपोआप झाडांनाही खत मिळायचं. प्रत्येक घरातून गोग्रास दुपारी गाईपुढे असायचा. सकाळचा व्यायाम झाला की काका प्रत्येक मुलाला थोडं थोडं धारोष्ण दुध प्यायला लावायचे. मुलांच्या निकोप वाढीवर त्यांचा भर असायचा. हळूहळू केळीपूराण संपत येई. एकदा का केळी पिकायला लागल्या की मग मात्र आमच्यावर नको नको म्हणेपर्यन्त मारा व्हायचा, कारण त्या लगेच खराबही व्हायला लागायच्या.
नारळ काढताना तर अजूनच वेगळी मजा. आम्हा मुलांना घराच्या बाहेर जायची परवानगी त्यावेळी नसायची. पाडेली झाडावर कसे चढतात हे आम्ही खिडक्यांमध्ये पहात असू आणि तिथूनच त्यांना आरडाओरड करून प्रोत्साहन देत असू. त्याची पाडेलींना गरज नसायची पण आमच्या मजेमध्ये ते ही सामील व्हायचे. लंगोटी कसून जाड दोर पायात अडकवून चपळतेने माडावर चढताना पाहून आमच्या मुलांमध्ये चर्चा चालत. मी पण मोठा झाल्यावर पाडेली होणार असं अभिमानाने सांगितलं जायचं, कारण आमच्या लेखी तो कुणीतरी फार मोठा पुरुष होता. सरसर झाडावर चढला की तो कमरेत खोचलेला कोयता काढून सपासप नारळं तोडायचा. ते नारळं खाली पडताना सगळे बापे एका कोपऱ्यात असायचे. कारण नारळ डोक्यावर पडला तर काय होईल सांगता यायचं नाही. एकदा त्याचे झाडावरचे सगळे नारळं पाडून झाले की हुर्यो करत आम्ही अंगणात पळायचो. ते असोले नारळं एका ठिकाणी जमा केले जायचे. या नारळांची मात्र विभागणी केली जायची नाही, तर प्रत्येकाला शहाळं प्यायला दिलं जायचं आणि काकू प्रत्येक सवाष्णीची ओटी नारळानी भरायच्या. बाकी नारळ विकले जायचे. काकांचा तो साइड बिझनेस होता.
आंबे काढताना तर सगळ्यात मजा यायची. तो एक सोहळाच चालायचा. आमच्यातले काही मुलं झाडावर चढायला काकांनी तयार करून ठेवली होती. ते आकडे घेऊन वर चढायचे. खाली बापे त्यांच्या वर लक्ष ठेऊन असायचे. एखादं पोर सटकलच तर त्याला जमिन दिसायची नाही. अलगद झेलून घेतला जायचा. मग हसणं, ओरडणं गोंधळ चालायचा. फळं तोडणी म्हणजे केळीसारखं झटपट नसायचं वेळखाऊ होतं. त्या दिवशी पुर्ण वाड्याची अंगतपंगत ठरलेली असे. बायका झटपट होणारे चार चवीढवीचे चार वेगळे पदार्थ मोठ्या प्रमाणात करून ठेऊन आमच्यात सामील व्हायच्या. पुरुष्यांनी आदल्या दिवशीच आपापल्या घरी आढीची तयारी करून ठेवलेली असायची. पोरं खाली पडलेल्या कैर्या गोळा करून मोठ्या करंडीत ठेवायचे. बायका काकांच्या विकायला पाठवायच्या ठराविक कैर्या बाजूला काढून, बाकी समविभागणी करायच्या. पोरं प्रत्येकाच्या घरी आंबे पोहोचते करायचे. खास आजच्या दिवसासाठी म्हणून काही आंबे आठ दहा दिवसांपूर्वीच उतरवलेले असायचे. मग ते आठवडयाभरात पिकून अंगतीपंगतीच्या दिवशी पहिला रस केला जायचा. पुरुषवर्गाकडे रस काढायचं काम असायचं. यात तात्याकाकांचा उत्साह नुसता उतू चाललेला असायचा. काकू निरांजनातल्या ज्योती सारख्या तृप्त नजरेने न्याहाळत हातातले काम करत असायच्या. बायकांच्या गप्पांना ऊत आलेला असायचा. काकांसारखा शुध्द झरा सगळ्यांना स्वछ ठेवत होता. तिथेही रूसवे फुगवे चालायचे. पण काही काळात एकोपाही नांदायचा.
बायकांचं मागचं अंगण तर आजीबाईचा बटवाच होता. तुळस, हळद, आल्याचे वाफे, गवतीचहा, लिंबू, कढीपत्ता, पेरू, पुदिना, पपई अशा प्रकारच्या झाडांनी अंगण भरलेलं होतं कुणीही काहीही तोडू शकत होतं.
वाड्यात सत्यनारायण, गणपती, दिवाळी कुठलेही सण असोत, घरच्या दारच्या सगळ्या पाहुण्यांसकट धुमधडाक्यात साजरे व्हायचे. कुणाची कुठलीही कचेरीची कामं अडली किंवा नोकरी लाऊन द्यायची असली की काका झटक्या सरशी करून द्यायचे. बायकांचे विविध प्रश्न काकू मार्गी लाऊन द्यायच्या. त्यांचा मुलगा आल्यावर तर आम्हाला अजून एक खेळगडी मिळायचा. त्याला आपलं बालपण परत जगायचं असायचं. क्रिकेट, लगोरी, गोट्या, विटीदांडू, पत्ते, कॅरम, बुध्दीबळ हे सगळे खेळ चालायचे. गरमीचे दिवस असले की रात्री अंगणातच सगळ्या पोरांच्या सतरंज्या पडायच्या. एकत्र गप्पा मारत झोपायचो, तेव्हा दादा आम्हाला भुतखेतांच्या गोष्टी सांगायचा. ते भीतीचं अद्भुत जग त्यांनीच पहिल्यांदा दाखवलं. ते ऐकून एकदोन पोरं तापही काढायचे. तात्याकाका मग दादाला रागवले की त्याच्या डोळ्यात पाणी यायचं. त्याच्या डोळ्यातलं पाणी बघून आम्हालाही वाईट वाटायचं.
असं एकोप्याचं सुंदर विश्व अनुभवत बाबांचे तीन वर्ष कधी पुर्ण झाले कळालेच नाही. हातात बदलीची ऑर्डर आल्यावर बाबा तिथेच खुर्चीत बसून राहिले. खरं तर बदली प्रोमोशनची होती. आनंदच व्हायला हवा होता. पण इतक्या सुंदर, निकोप माणसां पासून दूर व्हायचा विचार त्यांनाही सहन होत नव्हता. घरी जेव्हा ही बातमी सांगितली तेव्हा आनंदाबरोबर आईच्या डोळ्यात दुःखाचे अश्रु बाहेर आले. शशी आणि मी बावरून गेलो. तात्याकाकांना ही बातमी कळाली, तसे ते ही गंभीर झाले. पण मग स्वतःला सावरून घेत बाबांची समजूत काढू लागले.
“ अरे, बढती तर पेढे वगेरे काही आणायचे की नाही? इतका काय सुतकी चेहेरा करून बसलाय? पाच तासावर तर आहे तुझं रत्नागिरी. तू इथे कधीही ये. आम्हीही हवापालटाला तुझ्याकडे येऊ. वाटलं तर ट्रीपच काढू आपल्या वाड्याची.” हे ऐकून बाबांना हसूच फुटलं. मग दोघही हसू लागले. शेवटी भावना आपल्या जागी होत्या आणि कर्तव्य आपल्या जागी. बदली झाली त्या ठिकाणी जाणं तर भागच होतं. बाबा आधी जाऊन रत्नागिरीला घर आणि शाळा बघून आले. मग वाडाभर आम्हाला निरोपाची जेवणं सुरू झाली. आपापल्या ऐपती प्रमाणे भेटवस्तू दिल्या घेतल्या गेल्या. वानरसेनेने गाडीत सामान भरायला मदत केली. तात्याकाका आणि काकूंचा आशिर्वाद घ्यायला गेलो तेव्हा सगळेच गलबलून आले. येत जा अधून मधून असं म्हणत एकमेकांचा निरोप घेतला. आता कळतय आमचा बालपणातला सगळ्यात समृध्दकाळ तो होता. काही वर्षे पत्रापत्री चालली. कधी एखादी भेटही झाली, पण नंतर काळाच्या ओघात ते ही कमी कमी होत गेलं.
शिक्षणाच्या निमित्ताने मी जेव्हा पुण्याला आलो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तात्याकाकांकडे जायचं ठरवलं. पत्ता शोधत गेलो. पुर्ण पुण्याचाच इतक्या वर्षात कायापालट झाला होता. मग आठवणीतल्या खणाखुणांचा ठाव कसा लागायचा? कसंबसं ते घर सापडलं. दुरून दिसलं आणि त्या जीर्ण वाड्याकडे पहातच राहिलो. एकेकाळचं ते नांदतं गोकुळ, त्याच्या थोड्याफार खुणा ठेवून पार लयाला गेलं होतं. झाडं अजून उभी होती. कुणीतरी त्यांची मशागत करत असावं. तात्याकाकांच्या घराचं दार उघडच होतं. त्यांच्याकडे कुणीतरी आलय हे पाहून बिऱ्हाडातलं एकजण डोकवून गेलं. कडी वाजवली. उत्तर आलं नाही म्हणून तसाच हाका मारत आत शिरलो. समोरच हॉलमधे काकूंचा आणि दादाचा भिंतीवर हार घातलेला फोटो पाहून मनात चर्र झालं. तसाच आतल्या खोलीत गेलो. त्या खोल्यांमधून हिंडताना बालपण दुडुदुडू धावत गेलं. कितीही धुडगूस घातला काकांकडे तरी ते रागवायचे नाही.
एका खोलीत, पलंगावर काका झोपलेले दिसले. त्यांच्याजवळ जाऊन हाक मारली. तशी अत्यंत जडपणे त्यांनी मान फिरवली. मन हेलावून गेले. काकांना अर्धांगवायू झाला होता. त्यांच्या अनोळखी नजरेला उत्तर देत मी माझी ओळख सांगितली. ओळख पटल्यावर त्यांच्या सुरकुतलेल्या चेहेऱ्यावर आनंद पसरला. त्यांचा हात हातात घेऊन तसाच बसून राहिलो. आमचे मुक स्पर्श खूप काही त्यावेळच्या गोष्टी बोलत होते. तेव्हढ्यात माझ्या वयाचाच एक मुलगा आतमध्ये आला. त्याच्या हातात जेवणाचं ताट होतं. मला पहाताच आनंदून म्हणाला “ अरे श्रीकांत, किती दिवसांनी भेटत आहेस ?” मग माझीही ट्यूब लागली. “ अरे माधवा, तू इथेच आहेस अजून?” “ हो, नंतर सांगतो तुला सगळं. आपण काकांचं जेवण करूया आधी.” आम्ही दोघांनी मिळून त्यांना उठून बसवलं. माधव त्यांना भरवू लागला. काकांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. “ हं हं काका भरल्या ताटावर रडायचं नाही हे तुम्हीच शिकवलं ना आम्हाला.” तिथला नॅपकिन घेऊन मी त्यांचे डोळे पुसले. त्यांचं सांडत मांडत जेवण आम्हा दोघांनाही खटकत नव्हतं कारण याच काकांनी आम्हाला परोपकाराची घडण घालून दिली होती. जेवण झाल्यावर त्यांना औषधं देऊन, स्वच्छ करून परत झोपवलं. तेव्हढे श्रमही त्या दुर्बल जीवाला भारी पडत होते.
“ श्रीकांत चल घरी.” माधव म्हणाला. मीही त्याच्या बरोबर गेलो. दोघांनाही कुठेही काही वावगे वाटत नव्हते. घरी जाताच कमला काकींनी लगेच ओळखले. प्रेमाने सगळ्यांची विचारपूस केली. आग्रहानी जेवायला बसवलं. जेवताना माधव सांगत होता “ आज दहा वर्ष झाली तात्याकाकांना असे अंथरुणावर पडून. मुंबईत दादाचा लोकल मधून पडल्यामुळे मृत्यू झाला. त्या धक्क्याने काकूही गेल्या. हे दोन्ही धक्के काकांना सहन झाले नाही. त्यांना अर्धांगवायुचा झटका आला. सुरवातीला त्यांची मुलगी येऊन राहिली. पण ती ही सासुरवाशीण, किती दिवस येऊन रहाणार? शेवटी आम्ही सगळ्या बिऱ्हाडांनी मिळून त्यांची देखभाल करायचं ठरवलं. काकांच्या घडणीतच आपण वाढलेले सगळे, त्यांचेच खाऊन मोठे झालो. त्यांचेच संस्कार अंगात भिनलेले असल्यामुळे सगळे तयार झाले. एकेक दिवस प्रत्येकानी वाटून घेतला. खर्चाचं मुलगी पहाते. आम्ही सेवा करतो. काकांची देहसेवा मी करतो. आमच्या मधल्या पडत्या काळात काकांनी खूप मदत केली. त्याची परतफेड तर होणार नाही. पण थोडी सेवा करून उतराई होऊ शकू.”
हे सगळं ऐकून खूप वाईट वाटलं. त्यांनी पेरलेले संस्कार किती सुंदर रूपात फळ देत आहेत हे बघून आनंदही वाटला. आज आपलेच पोरं आपल्याला विचारतील की नाही हे सांगता येत नाही. पण काकांना मात्र अनेक संसार मिळून सांभाळत होते. “ मी पण येत जाईन दर रविवारी संध्याकाळी, काकांना गीता वाचून दाखवायला. त्यांनीच शिकवली आपल्याला गीता.” दोघेही मिळून पाणावलेल्या नजरेने पाहून हसलो. कमला काकींनी डोळ्याला पदर लावला.
यथावकाश काकाही गेले. अजूनही तो वाडा नाना बिऱ्हाडांना घेऊन नांदत आहे. मुन्सिपाल्टीची नोटीस येत नाही तोपर्यंत त्यांच्या मुलीने वाडा पाडायचा नाही असे ठरवले होते. काकांना प्रेमाने सांभाळणाऱ्या लोकांना बाहेर काढणं तिला जमणार नव्हतं. काकांप्रमाणे तीही तिची माहेरची पुंजी होती. थोडी डागडुजी करून काकांची वास्तु आजही उभी आहे त्यांच्या संस्कारासकट.
.................................................