हिरवे नाते - 6 - जीवन Madhavi Marathe द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

हिरवे नाते - 6 - जीवन

                                                                                             जीवन

निळ्याभोर आकाशाखाली, झाडाच्या गर्द सावलीत निखिल एकटाच बसला होता. उव्दिग्न मनःस्थितीने त्याला सभोवतालचे सौंदर्यही जाणवत नव्हते. शुन्यात एक केंद्रबिंदू बनवून त्यातच हरवून गेला होता. काय झाले एव्हढे आपल्याला की जीवनातला रसच संपवून निरसता यावी. सगळ्या जाणिवा बोथट व्हाव्या ? कुठेही कशाची कमी नाही. आई वडील अतिशय महत्वाकांक्षी नव्हते. सहज जीवन जगण्याकडे त्यांचा कल होता. त्यामुळे अमूकच झाले पाहिजे. तमुकच केले पाहिजे हा कशाचा धोशा नव्हता. तो ही अभ्यासात तसा व्यवस्थित होता. हवं ते मिळत होतं. एखादी गोष्ट मिळाली नाही तरी समजून घेण्याएव्हढा तो पक्व होता.

   मग आपल्या मनाचा मागोवा घेत निखिल काळाच्या मागे जाऊ लागला. बेचैनी, तगमग, अस्थिरता, हरवलेपण याची सुरवात कुठून झाली ? दहावीचा रिझल्ट लागला आणि आनंदाच्या भरात मोबाईलचे आगमन घरात झाले. वडिलांनी निखिल चांगल्या मार्कने पास झाला म्हणून त्याला मोबाईल घेऊन दिला. निखिलचे मग ते अविभाज्य अंग बनले. वेगवेगळ्या एप्सनी त्याच्यावर जादू करायला सुरवात केली. नवनवीन मित्रांची भर व्हाट्सपमुळे पडू लागली. दिवसभर चॅटिंग, लाईक्स, मेसेजेस वाचताना, पाठवताना त्याचे दिवस कसे भराभर आणि छान जाऊ लागले. कॉलेजातले सप्तरंगी आयुष्य शिक्षण आणि मोबाईल या दोनच रंगात रंगू लागले आणि तिथूनच सुरू झाली निरसतेची कहाणी. आज याचा फोन का नाही आला? मीच सारखा फोन करायचा का ? माझ्या मेसेजला कुणी लाईक्स पाठवत नाही. मग त्यावर होणारी चिडचिड, हुरहूर, राग अशा संमिश्रणाची पुटं चढायची. हळूहळू ते वाढतच गेलं. त्यामुळे जीवनावरचा, माणसांवरचा निखिलचा रागही वाढतच गेला. कुणाला आपण आवडत नाही. आपल्याशी कुणाला बोलावसं वाटत नाही. अश्या भावनांच्या जाळ्यात तो गुरफटून जाऊ लागला. चांगला हसता खेळता मुलगा एका जागी बसून कुढू लागला. आई वडिलांना चिंता वाटू लागली. त्याला किती काही विचारलं तरी उत्तर काही येत नव्हतं. आताशा त्याचं जेवणही कमी झालं होतं. मित्र येऊन गप्पा मारून गेले तरी त्याचं मन रमेनसं झालं. काय झालयं ? काय होतय ? त्यालाही कळेना.

    मग एके दिवशी तो एकटाच बाहेर पडला. लांबवर चालत एका झाडाखाली बसला आणि मागोवा घेता घेता त्याला एकदम जाणिव झाली. अरे! आपण जीवनापासून दूर चाललो आहोत. असं जीवन तर आपलं सगळं सत्वच शोषून घेईल. याला काय अर्थ आहे ? पण यातून बाहेर कसे पडायचे ? कोण आपल्याला समजावून घेईल ? आपले आईबाबा आपल्याला समजून घेतील. काल ते किती समजावून सांगत होते. पण आपल्या आतपर्यंत काही पोहोचतच नव्हते. आज मात्र आपल्या आत जाग आली आहे. जीवन असे वाया घालवण्यासाठी नाही. या वास्तवाचे त्याला एकदम भान आले. आज संध्याकाळी बाबांशी बोलायचे या निश्चयाने त्याला हलकेफुलके वाटले. घरी येऊन व्यवस्थित जेवण करून निखिल शांत झोपी गेला. आईलाही त्याच्यातला हा बदल जाणवला. ती पण सुखावली. आत्ताच काही न विचारता त्याच्या कलानी घेऊ असा विचार करत ती पण शांत झाली.

    संध्याकाळी बाबा आल्यावर निखिलनेच चहा केला. बाबांना ते पाहून आश्चर्य वाटले. त्याला काही बोलायचे आहे हे त्यांच्या लक्षात आले. चहा पिऊन बाबा निखिलला म्हणाले चल आपण जरा फिरून येऊ. आपल्या भावना बाबांपर्यंत पोहोचत आहे हे पाहून निखिलला धीर आला. पायात चपला अडकवून दोघेही टेकडीकडे चालू लागले. सूर्य अस्ताला चालला होता. निळ्या शेंदरी आकाशातल्या पांढऱ्या ढगांनी आणि काळ्या पक्षांच्या कमानींनी वातावरणाला एक प्रकारची मोहिनी घातली होती.

  “ बाबा तुम्हाला जीवनातला रस संपला असं कधी वाटलं होतं ?”

बाबांनी निखिलकडे हळुवारतेने पहिले. तारुण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या या वयातल्यांना नेहमीच या अल्याड पल्याड अवस्थेतून जावं लागतं. कोणती गोष्ट समस्या बनून उभी राहिल सांगताच येत नाही. कारण या वयात इतक्या नवीन गोष्टी सामोऱ्या येतात, इतक्या नवीन भावभावनांशी ओळखी व्हायला लागतात की ते पेलणही कधी कधी अवघड होऊन बसतं. मग त्यातून येणारी निराशा. योग्य वेळी समजावायला कोणी मिळाले नाही तर आयुष्य भरकटत जातं. व्यसनं, कुमार्ग, आत्महत्या अशा टोकाच्या भावनिक गोष्टींकडे ते वळतं.

    बाबा म्हणाले “ निखिल प्रत्येकाला या अवस्थेतून जावेच लागते आणि त्यातून बाहेरही पडावे लागते. नाहीतर आयुष्य तिथेच थांबून रहाते. साचलेल्या आयुष्याला मनाचे रोग जडु लागतात. त्याचे पडसाद शरीरावर उमटून शरीरही आजारी पडते. तुम्ही आजकालची तरुण  मुलं या अवस्थेत जास्त राहता. त्यामुळे तुमच्या मेंदूच्या कितीतरी पेशी त्यांच्या आनंदापासून वंचित रहायला लागतात. सायन्स सुद्धा हे प्रमाणित करतय की गाण्याच्या लहरींनी तुमच्या मेंदूच्या पेशी उत्तेजित होतात. एखादे पेंटिग पहिले की पेंटिंगची रंगसंगती, लयदार रेषा, चित्रकाराचा संदेश असे मेंदूचे वेगवेगळे भाग उत्तेजित करून जातात. ते पाहून तुम्हाला सांगता येत नाही असा आतला आनंद मिळतो. त्यावर तुम्ही एकच वाक्य म्हणू शकता, खूप छान आहे म्हणून. मैदानावर तुम्ही एखादा खेळ खेळता तेव्हा जिंकण्या हरण्याच्या भावना, जल्लोष, धुळीचे लोट, दमवणूक अश्या सगळ्या अंगानी तो खेळ खेळला जातो, म्हणून तो तुम्हाला फार मोठा आनंद व पुढे जीवनात उपयोगी पडणारा अनुभव देऊन जातो. त्यातून खिलाडू वृत्ती निर्माण होते. अश्या माणसांमध्ये निराशा कमी प्रमाणात दिसते. या कॉम्प्युटर आणि व्हॉटसअपच्या युगात तुम्ही पहाता सगळं. ऐकता पण खूप. पण ते सगळं यांत्रिक होतं. तेव्हढे पुर्ण भाव आतपर्यंत उतरत नाही. कॉम्प्युटर वर गेम खेळता पण त्यातून एखाद दोनच गोष्टी तुम्हाला मिळतात. बाकी गोष्टींपासून तुम्ही वंचित राहता. म्हणून माणसात रहा. मैफिली एका. चित्र प्रदर्शन पहा. निसर्गात हिंडा. कोणतीही एक कला आत्मसात करा. मग तुम्हाला जीवन सुंदर वाटेल. आधुनिक तंत्रज्ञानाचा खूप फायदा घ्या, पण जिवंत जीवनाशी, माणसांशी नातं तोडू नका. नाहीतर तुमच्या जीवनात फक्त फरफटच राहिल, आणि तुम्ही स्वतः बरोबर दुसऱ्यांचं जीवनही दुःखी कराल. तुम्ही ठरवू नका की आपल्याला कोण हवे आहे, कोण नको आहे. ते काळच ठरवेल. जेव्हा जे मिळेल तेव्हा ते अवश्य उपभोगा. आजचे मित्र आयुष्यभर बरोबर रहाणार नाही. त्यामुळे त्यांनी थोडं दुर्लक्ष केलं म्हणून जीवन संपत नाही. जे तुमच्या बरोबर असतील त्यांना घेऊन चला. वाटेत कुठेही थांबू नका. कशासाठी अडू नका. जीवनाला वाहतं ठेवा. जवळ एखादं पुस्तक, कला, जरूर बाळगा. मग जीवन तुम्हाला कधीच नीरस भासणार नाही.”

    निखिळला एकदम स्वच्छ मोकळा श्वास घेतल्याची जाणिव झाली. कुठे अडकलो होतो आपण हे ही नीट लक्षात आलं. आपणच बांधलेली बंधनं बाबांच्या बोलण्याने गळून पडली.

 “ बाबा मला अभिमान वाटतो की तुम्ही माझे बाबा आहात. खूप सुंदर पद्धतीने समजावून सांगितलं तुम्ही.”

  “ होय निखिल, मलाही तुझ्या अभिमान वाटतो, कारण किती मुले आईबाबांशी मोकळे बोलतात ? तुम्हालाच वेळ नसतो आमच्याशी बोलायला अशी तक्रार करून पालकांवरच आपल्या चुकांचे खापर फोडतात. पण तुम्ही हात पुढे केला तर कुठलेही आईबाप मुलाला योग्य मार्गदर्शन करायला आनंदाने तयार होतील, कारण ते ही या अवस्थेतून गेलेले असतात. त्यांनाही मदतीचा हात मिळून पुढे सरकलेले असतात. तुला माझ्याशी मोकळं बोलावं वाटलं त्यामुळे आपले भावबंध अजून जुळले गेले.”

    दोघही निश्चिंत मनाने क्षितिजावर चमकत येणाऱ्या चांदण्या पहात राहिले. खूप सुंदर आहे जग. छोट्या ढगांमुळे आपला जीवनाचा चंद्र झाकू देऊ नका असा संदेश देणाऱ्या चांदण्या सर्वत्र लुकलुकत होत्या. निखिलच्या जीवनात पडलेलं आनंदचं चांदणं दोघांच्याही डोळ्यातून हसत होतं.

                                                    ......................................................................................