साक्षीदार
प्रकरण १४
फिरोज लोकवाला त्याच्या ऑफिस मधे बसला होता.पाणिनी पटवर्धन त्याच्या समोर होता
“ ते तुला शोधताहेत.” फिरोज म्हणाला.
पाणिनी चा चेहेरा बिनधास्त होता. “ ते म्हणजे कोण?”
“ बरेच जण., पत्रकार, पोलीस, वगैरे.”
“ सगळ्यांना भेटलोय मी.” पाणिनी म्हणाला
“ आज दुपारी?” फिरोजने विचारलं
“ नाही काल रात्री.” पाणिनी म्हणाला. “ का बरं?”
“ नाही सहजच. मला वाटतंय आता तू त्यांना वेगळ्या भूमिकेतून हवा आहेस. असो. तू कशाला आलायस इथे?” -- फिरोज
“ एवढंच सांगायला आलो होतो की ईशा अरोरा ने तिच्या नवऱ्याच्या मालमत्तेचा प्रशासक म्हणून तिला नेमले जावे यासाठी कोर्टात अर्ज केलाय.” पाणिनी म्हणाला
“ असेल.मला काय त्याचं?” –फिरोज
“ याचा अर्थ असा आहे की ती आता सगळ्याचा ताबा घेणार आहे.तुला तिच्या हाताखाली काम करावं लागेल आता. त्यामुळे प्रथम तुला त्या हॉटेल मधल्या होल्ड अप आणि गोळीबाराचा विषय पूर्ण पणे बंद करावाच लागेल.” पाणिनी म्हणाला
“ खरं की काय ! ” फिरोजने किरकोळीत विषय घेतल्या सारखं विचारलं.
“ ईशा ला जरा फोन कर.”
“ मी नाही तिला फोन वगैरे करणार. मिर्च मसाला मी चालवतोय.”
“ अच्छा, तू असंच करायचं ठरवलंयस का?” पाणिनी म्हणाला .
“ यस्. असंच.”
“ इतर कोणी ऐकणार नाहीत अशा जागी जाऊन बोलूया का? मागच्या प्रमाणे?” पाणिनी म्हणाला .
“ या वेळी बोलायचं काम मी करणार.हे मान्य असेल तर जाऊ.अन्यथा मला रस नाही.” --फिरोज
“ आपण एक फेरफटका मारून येऊ आणि आपल्यात काही समझोता करण्याजोगी परिस्थिती आहे का याचा विचार करू.” पाणिनी म्हणाला
“ इथेच बोलू की ! ही जागा काय वाईट आहे?”
“ इथे मला अस्वस्थ वाटतं, त्यामुळे मला नीट बोलता येणार नाही.” पाणिनी म्हणाला
“ ठीक आहे, पंधरा मिनिटात काय ते उरक , फाफट पसारा नको.”
“ फाफट पसारा नको म्हणूनच म्हणतोय बाहेर फिरायला जाता जाता बोलू.” पाणिनी म्हणाला
“ आपण बाहेर पडून टॅक्सी करू आणि बोलू. ” फिरोजने सुचवलं.
“ नको. त्यात आपलं बोलणं रेकॉर्ड करायची वगैरे सोय असेल तर? ”
“ कम ऑन ,पटवर्धन. माझ्या ऑफिस मधे अशी सोय असल्याचा संशय तुम्हाला असेल तर तो योग्य आहे, मी समजू शकतो.पण बाहेर च्या प्रत्येक टॅक्सीत मी अशी छुपी रेकॉर्डिंग ची सोय कशी करू शकेन? जरा मॅच्युरिटी ने बोला !” –फिरोज
“ नाही, फिरोज, मी जेव्हा एखादा सौदा करतो तेव्हा माझ्याच अटी नुसार करतो.” पाणिनी म्हणाला
“ मग मला बाहेर येण्यात रस नाही. तुमच्या अटी माझ्यावर लादू नका.”-फिरोज
“ ठीक आहे. नको येऊ. नंतर मला मोठी संधी गेली म्हणून नावं ठेऊ नको.” पाणिनी म्हणाला आणि बाहेर पडायला निघाला.त्याचा चेहेरा असा होता की गरज पाणिनी ला नव्हती फिरोजला होती. फिरोजच्या हे लक्षात आल्यावर तो लगेच म्हणाला, “ बर,चला पण लौकर आटपा.”
दोघे बाहेर पडले.पाणिनी ने त्याला सुदाम च्या ऑफिस पाशी नेलं.
“ मी इथे काही सांगणार नाही.” अचानक फिरोज संशयाने म्हणाला.
“ तुला इथे काहीच बोलायचं नाहीये. माझं एक छोट काम आहे आत ते मी अर्ध्या मिनिटात उरकून येतो मग आपण इथून बाहेर पडल्यावर बोलू.” पाणिनी म्हणाला
पाणिनी आणि फिरोज दुकानाच्या काउंटर उभे असतांना सुदाम आतून बाहेर आला. आणि पाणिनी कडे बघून म्हणाला, “ येस ? काय हवंय?” तेवढ्यात त्याचं लक्ष पाणिनी शेजारी उभ्या असलेल्या फिरोज कडे गेलं, आणि त्याला उद्देशून तो म्हणाला, “ तू परत इथे? पुन्हा काय काम आहे?”
“म्हणजे?” पाणिनी ने आश्चर्य वाटल्याचा अभिनय करत विचारलं. “ याला ओळखतोस तू?”
“ हाच माणूस आहे तो.” सुदाम फिरोजकडे बोट दाखवत म्हणाला.
“ ए... ! काय चाललंय हे? मला कशात अडकवयाचा डाव आहे तुमचा पटवर्धन? तुम्ही दोघे मिळून...” फिरोज दचकून म्हणाला.
“ सुदाम, नीट बघ याला आधी, कोणतेही विधानं करताना ते जबाबदारीने कर. तुला कोर्टात पुन्हा सांगायची वेळ आली तर तू नाकारणार नाहीस ना? पाहिली खात्री कर या माणसाला ओळखण्यापूर्वी ” पाणिनी म्हणाला
“ शंभर टक्के खात्री आहे.” सुदाम म्हणाला.
“ वकिलांनी उलट तपासणी घेतली तरी टिकशील?” पाणिनी म्हणाला .
“ अहो, पटवर्धन एक काय वकिलांची फौज उभी केली तरी मी हेच सांगेन ,की हाच माणूस आहे तो.” सुदाम ठाम पणे म्हणाला.
“ पटवर्धन मला तुम्ही कशात लटकवताय? मी या माणसाला कधी पाहिलेलं नाही. तुम्हाला पश्चात्ताप करायची वेळ येईल.” फिरोज आळीपाळीने दोघांकडे पहात म्हणाला.
“ माझ्या खटल्याचा एक भाग होता हा, आणि आता सगळ बरोबर स्पष्ट झालं !” पाणिनी म्हणाला
“ काय स्पष्ट झालं?” घाबरून फिरोजने विचारलं
“ हेच की, तूच रिव्हॉल्वर खरेदी केलस याच्याकडून. पण घाबरू नको हा माणूस सरकार मान्य बंदूक विक्रेता आहे. ” पाणिनी म्हणाला
“ मूर्खपणा चाललाय हा. मी कधीच इथे आलो नाही, या माणसाला भेटलो नाही, या आधी पाहिलं सुध्दा नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी बंदूक वापरतच नाही.”
“ जरा तुझं रजिस्टर बघू.” पाणिनी सुदाम ला म्हणाला. “ आणि तू तुझ्या कामाला आत गेलास तरी चालेल.”
पाणिनी ने रजिस्टर उघडून .३२ कोल्ट असा विभाग काढला.आणि ते फिरोजसमोर धरले.सहजपणे बंदुकीच्या नंबर लिहिलेल्या रकान्यावर असा हात ठेवला की फिरोजला एका वेळी संपूर्ण नंबरदिसणार नाही. नावाच्या रकान्याकडे बोट दाखवून त्याने अत्यंत थंड पणे फिरोजला विचारलं, “ खरेदी करणाऱ्या व्यक्तीचे नाव तू लिहिले आहेस हे तू नाकारणारच असशील ना?”
मोठया मुश्किलीने फिरोज लोकवाला ने डोळ्यात येणारे अश्रू टाळायचा प्रयत्न केला.तरीही उत्सुकतेने त्याने पाणिनी पटवर्धन ने दाखवलेल्या नावाच्या रकान्यावर नजर टाकली. “ छे ! हे माझं नाव नाहीये ,आणि मी ते लिहिलेले पण नाही. अक्षर ही माझं नाहीये आणि सही पण माझी नाही.” तो ओरडून म्हणाला.
पाणिनी तेवढंच थंड होता. “ अर्थात मला माहित्ये की ही सही तुझी नाहीये ते पण तू हे नाकारणार आहेस का? आणि काळजीपूर्वक उत्तर दे कारण त्याचा भविष्यात फार मोठा परिणाम होणार आहे.” पाणिनी म्हणाला
“ अर्थातच मी लिहिलेलं नाही ते आणि सही पण मी केलेली नाही. काय भानगड आहे ही?” फिरोजने चिडून आणि ओरडून विचारलं.
“ पोलिसांना अजून माहिती नाहीये,पण याच बंदुकीतून गोळी झाडून अरोरा ला मारण्यात आलंय.”
“ आय् सी ! तर असा डाव आहे तर तुझा ! ” एकेरीवर येत फिरोजउद्गारला.
“ एकदम अनुमान काढू नकोस फिरोज.” पाणिनी म्हणाला “ तुला यात अडकवायचं असतं तर मी तुला हे सर्व न दाखवता पोलिसांना सांगू शकलो असतो,पण मी तुला संधी देऊ इच्छितो.”
“ आग लाव तुझ्या संधी द्यायच्या उदार पणाला. तुला आणि त्या पिस्तूल विक्रेत्याला दहा जन्म घ्यायला लागतील मला असल्या लफड्यात अडकवायला.”
“ आपण शांत पणे बोलूया का? जिथे कोणी ऐकणार नाही आपलं बोलणं अशा जागी जाऊन?” पाणिनी म्हणाला .
“ तुझ्या भूल थापांना बळी पडूनच इथे आलो मी, आणि फसलो.आता मसणात जा.” --फिरोज
“सुदाम ला वाटत होत की बंदूक खरेदी करणाऱ्या माणसाला पुन्हा पाहिलं तर तो ओळखू शकेल म्हणून.मला त्यांची खात्री करून घ्यायची होती फक्त.” पाणिनी म्हणाला
“ तू पोलिसांना कळवल असतंस तर त्यांनी एका रांगेत माझ्या बरोबर अनेकांना उभे केले असते आणि सुदाम ला ओळख पटवायला लावली असती. साहजिकच त्याने मला ओळखले नसते कारण मी बंदूक खरेदी करायला आलोच नव्हतो, हे तुला चांगले कळतं होतं म्हणून तू पोलिसांना न सांगता या माणसाला पैसे चारून माझी खोटी ओळख पटवायला लावलंस. ”
पाणिनी हसला. “ तुला पोलिसांकडे जाऊन रांगे मधून तुला ओळखायला लावायचा प्रयत्न करायचा असेल तर तसं करू.तुझी हौस पुरी होवूदे.” पाणिनी म्हणाला
“ आता सुदाम मला ओळखेलच. मला त्याच्या समोर आधीच आणून तू बरोबर तशीच व्यवस्था केल्येस.” फिरोज लोकवाला म्हणाला. “ आता तू इथून सरळ निघून जा आणि मी माझ्या मार्गाने जातो.”
“ अशी चिडचिड करून नाही उपयोग फिरोज! तुझ्या कडे खुनासाठी हेतू,संधी आणि सगळंच होतं हे माझ्या लक्षात आलंय. ”
“ अरे वा ! छान ! ” फिरोज एकदम निवांत होत म्हणाला. “ काय हेतू असू शकतो माझा अरोरा चा खून करण्यासाठी? कळू दे तरी तुझ्या तोंडून तुझ्या कल्पना शक्तीच विलास ऐकू दे तरी.”
“ दुसऱ्यांची लफडी बाहेर काढण्यासाठी तुला जी माहिती खबऱ्यांकडून मिळवावी लागते त्यासाठी खबऱ्याना पैसे चारावे लागतात. आणि त्यासाठी मिर्च मसाला चे एका बँकेत एक खास खाते उघडलेले आहे. ही रक्कम खर्च करायचे तुला अधिकार आहेत पण तू ही रक्कम त्यासाठी खर्च न करता एका पोरीवर उधळतोस. दर पंधरा दिवसांनी तू तिला या खात्यातले चेक देतोस. अरोरा ला या घोटाळ्याची माहिती होती पण त्याला विरोध करायची किंवा ही हकिगत खोटी आहे हे अरोरा ला पटवण्याची तुझी हिंमत नव्हती कारण त्याला तुझा चेन्नई मधला भूतकाळ माहिती होता. तुझा जुन्या नावाने असलेला वावर ,तू केलेला खून, सगळ्याची कल्पना होती त्याला. तू त्या पोरीसाठी बँकेतल्या खात्याचा करत असलेला वापर गेली अनेक वर्षं करत होतास ,त्यात मोठी रक्कम अडकली होती.ती भरपाई करणे तुला शक्य नव्हते , अरोरा ने तुला रंगे हाथ पकडला होता, त्यावरूनच तुझं आणि त्याचं वाजलं आणि तू त्याला मारलंस ” पाणिनी म्हणाला
आपल्या पोटात अनपेक्षित पणे मोठा गुद्दा बसावा असं फिरोज लोकवाला ला झालं.
त्याने बोलायचं प्रयत्न केलं पण त्याच्या तोंडाला कोरड पडली. पाणिनी अत्यंत शांतपणे पुढे म्हणाला, “ तुला हा मी केलेला बनाव वाटला तर तसं सिध्द कर म्हणजे तुला कोणताही न्यायाधीश शिक्षा देऊ शकणार नाही.”
“ माझी एवढी माहिती कुठून काढलीस तू?” –फिरोज लोकवाला
“ मी ईशा अरोरा चा वकील आहे.” पाणिनी म्हणाला
“ मी तुझ्या पेक्षा पोचलेला आहे.मला ब्लॅक मेल करायचा तुझा डाव असेल पाणिनी तर लक्षात ठेव, खून झाला त्या वेळी मी तिथे नव्हतो हे सिध्द करणारा सबळ पुरावा –अॅलिबी आहे माझ्याकडे. तुला मी अत्ताच तो दाखवतो. टॅक्सी बोलव” फिरोजम्हणाला.
पाणिनी ने टॅक्सी ला हात केला. दोघेही आत बसले. फिरोज लोकवाला चे हात थरथरत होते. “ हे बघ पटवर्धन, तुला मी अत्ता एका मुलीच्या खोलीत घेऊन जाणार आहे.तिला याच्यात गोवण्याचा प्रयत्न करू नकोस पण तिला भेटल्यावर सिद्धच होईल की खुनाच्या वेळी मी तिथे नव्हतोच.” –फिरोज
“ तुला सिध्द वगैरे करायला लागणार नाही काहीच. कायद्या नुसार तू न्यायाधिशांच्या मनात थोडा जरी संशय निर्माण करण्यात यशस्वी ठरलास की तू खुनाच्या वेळी तिथे होतास की नाही तरी ते तुला अडकवू शकणार नाहीत. कारण शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण एका निरपराध्याला शिक्षा होतं कामा नये असे कायदा सांगतो आणि अपराध हा नि:संशय पणे सिध्द व्हावा लागतो.”
“ फालतू गिरी बंद कर पटवर्धन. ताकाला जाऊन भांड लपवू नकोस. कायद्याचा किचकट अर्थ ही सांगू नकोस. तुला माझ्याकडून काय हवय हे मला माहिती झालंय.पण मी तुझा हेतू साध्य होवून देणार नाही.”
“ मी जर खोटा कांगावा करतोय असं तुझं म्हणणं आहे तर एवढा भितोस का?” पाणिनी म्हणाला .
“ मला वाटतंय तू कुठलं तरी लचांड माझ्या मागे लावून देणार आहेस.”
“ चेन्नई मधलं?” पाणिनी म्हणाला .
फिरोजने काही उत्तर दिलं नाही.तो गाडीच्या खिडकी बाहेर बघत बसला.
टॅक्सी चक्रवर्ती हॉटेल समोर उभी राहिली. फिरोज गडबडीने खाली उतरला. टॅक्सी चे पैसे देण्यासाठी त्याने पाणिनी ला खुणावले.
“ सॉरी फिरोज, टॅक्सी तू बोलावालीस, तुला हवी होती म्हणून. ” पाणिनी ठाम पणे म्हणाला. फिरोजने नाईलाजाने आपल्या खिशातून पैसे काढून दिले आणि पाणिनी ला घेऊन तो नवव्या मजल्यावर लिफ्ट ने उतरून जिज्ञासा च्या खोलीकडे जायला निघाला.पाणिनी पटवर्धन आपल्या मागे येतोय की नाही हे बघायची सुध्दा त्याने तसदी घेतली नाही.जिज्ञासा च्या खोलीची बेल वाजवली. आतून आवाज आला, तेव्हा तो म्हणाला, “ मी आहे डार्लिंग.”
तिने दरवाजा उघडला.अंगावर अस्ताव्यस्त झालेले कपडे होते.फिरोजच्या मागे पाणिनी ला पाहून तिने ते नीट केले.त्या दोघांकडे आळीपाळीने पाहून ती म्हणाली,
“ याचा अर्थ काय फिरोज?”
“ हे बघ मला सगळ सांगत बसायला वेळ नाही. तू याला एवढंच सांग की रात्री मी कुठे होतो.”
तिने आपली नजर खाली केली. “ तुला काय म्हणायचंय?” ती लाजल्या सारखं म्हणाली.
“ ए ! ती नाटकं नकोत. पटकन सांग.मी अडकलोय एका लफड्यात.तूच मला बाहेर काढ यातून.”—फिरोज
“ सगळंचं सांगायचे का?” जिज्ञासा ने विचारलं
“ सांग.”
“ आपण बाहेर गेलो फिरायला , मग तू इथेच आलास.तुझ्या घरी न जाता.” ती म्हणाली.
“ पुढे सांग , नंतर काय झालं? बोल..बोल..” फिरोजम्हणाला.
“ नंतर मी कपडे....” ती अडखळली.
“ न लाजता सांग...बोल..” तो तिला घाई करत म्हणाला.
“ नंतर मी ड्रिंक घेत बसले.माझ्या अंथरुणात.”
“ तेव्हा किती वाजले होते?” पाणिनी म्हणाला .
“ साधारण साडे अकरा असतील ”
“ नंतर आपण काय केलं ते सांग.” फिरोज लोकवाला ओरडला.
तिने मान हलवली. “ मला एकदम सकाळीच जाग आली. माझं डोक जाम ठणकत होतं.अर्थात मी झोपायला गेले होते तेव्हा तू इथेच होतास माझ्या बरोबर.पण नंतर तू कधी बाहेर गेलास आणि काय केलंस काहीही सांगता नाही येणार मला. गाढ झोपले मी ” जिज्ञासा म्हणाली.
फिरोज जोरात ओरडला. एखाद्या श्वापदा सारखा. तिच्या वर हल्ला करायच्याच तयारीत होता.
“ हरामी ! मला डबल क्रॉस करत्येस तू ! सोडणार नाही तुला.”
“ एक मिनिट फिरोज. स्त्री बरोबर अशा भाषेत बोलणं बरोबर नाही.” पाणिनी म्हणाला
“ फिरोज, तुला अलिबी हवी होती तर तू मला तशी टिप का नाही दिलीस? तू म्हणाला असतास तर तू म्हणशील ते खोटं बोलले असते मी तुला वाचवण्यासाठी. पण तू सतत म्हणत आलास की खरं काय ते सांग म्हणून. ” जिज्ञासा म्हणाली.
लोकवाला ने तिच्याकडे पुन्हा खाऊ की गिळू अशा नजरेने बघितलं.
“ फिरोजमला वाटतं मला जे जाणून घ्यायचंय ते कळलंय मला.मी आता निघतो. तू थांबणार आहेस की माझ्या बरोबर निघणार आहेस? ” पाणिनी म्हणाला .
“ मी थांबणार आहे इथे तिच्याशी बोलायचं आहे मला.” फिरोज जिज्ञासा कडे बघून म्हणाला.
“ ठीक तर मी निघतो.” पाणिनी म्हणाला निघण्यापूर्वी त्याने पोलीस स्टेशन ला फोन लावला. “ मला प्रेरक पांडेशी बोलायचंय, सी आय डी विभाग.” तो म्हणाला.
“ थांब ! पटवर्धन ! फोन बंद कर. मानलं तुला मी पटवर्धन. मला त्या बंदूक खरेदीच्या प्रकरणात तू गोवलस.अर्थात मला त्यांची भीती मुळीच वाटत नाही कारण तुझे आरोप निराधार आहेत.पण त्यातून सुटताना माझं चेन्नई मधील प्रकरण चव्हाट्यावर येण्याची काळजी वाटत्ये.”
“अब आया उंट पहाड के नीचे.” पाणिनी म्हणाला
“तुला काय हवंय?” फिरोज लोकवाला ने हताश होऊन विचारलं
“ तुला माहिती आहे मला काय हवंय ते.” पाणिनी म्हणाला
“ कळलं मला. मिसेस ईशा अरोरा बद्दल बातमी छापायची नाही.” फिरोजने शरणागती पत्करली.
“ एक गोष्ट समजून घे.ईशा आता मिर्च मसाला ची मालकीण झाल्ये.इथून पुढे तुम्ही लोक जे,जे छापाल, ते तिला मान्य आहे ना याचा विचार करूनच छापा.तुमची नवी आवृत्ती कधी निघणारे ?” पाणिनी म्हणाला .
“ पुढच्या गुरुवारी.”—लोकवाला
“ तो पर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून जाईल.” पाणिनी म्हणाला आणि त्याने जिज्ञासा कडे पाहिलं. “ सॉरी, तुम्हाला त्रास दिला.”
“ ठीक आहे ,पटवर्धन, तुमची चूक नाही. या माणसाने मला आधी सांगायला हवं होत ना की मी त्याला वाचवायला बोलायचं आहे की खरं सांगणे अपेक्षित आहे ते. ”
“ बिनडोक पोरी, तुला कळत कसं नाही याचा काय परिणाम होणारे ते?”-लोकवाला
“ ए ! माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही.”
“ कम ऑन, जिज्ञासा , शांत व्हा दोघेही आता, आमची दोघांची तडजोड झाल्ये आता. फिरोजआता तू माझ्या बरोबर बाहेर चल,इथे बसून पुन्हा भांडत बसाल तुम्ही दोघं.” पाणिनी म्हणाला आणि त्याला घेऊन बाहेर पडला.
“ पटवर्धन, माझ्या त्या चेन्नई मधल्या प्रकरणाला बरीच वर्षं झाल्येत. खरं म्हणजे तू किंवा कोणीच ते प्रकरण पुन्हा उकरून काढू शकणार नाही. ”
“ फौजदारी गुन्ह्याला मुदतीचं बंधन नसतं फिरोज.”
“ चेन्नईतील एका खुनाचं प्रकरण मी दाबून टाकू शकलो असतो. पण आता तू मला अरोरा च्या खुनात मला गोवलं गेलं तर दोन खुनाचा एकत्रित खटला मला पेलवणार नाही पटवर्धन! ” त्याचे ओठ थरथरायला लागले.
“ जिज्ञासा ला पैसे चारून तू पहिल्या खुनाचं प्रकरण पुन्हा उपटू नये म्हणून काळजी घेतलीस पण त्यासाठी बँकेच्या खात्यात फ्रॉड केलास ”
“ या बाबतीत तू मला पकडू नाही शकणार पाणिनी पटवर्धन ! कारण त्या खात्याचे सर्वाधिकार दधिची अरोरा ने मला दिले होते.म्हणजे आमच्यात तोंडी ठराव झाला होता. तोंडी असला तरी पूर्ण सामंजस्याने झाला होता.”
“ आता सगळ बदललं आहे ईशा मालकीण झाल्यामुळे.बँकेतले खाते व्यवहार आता ऑडीट केले जातील.त्यातून तुझा फ्रॉड सिध्द होईल. ” पाणिनी म्हणाला
“ एकंदरित हे सगळं असं आहे तर ! ” –लोकवाला
“ असं आहे. म्हणूनच आता मी गेल्यावर पुन्हा त्या मुलीला मारू नकोस.कारण आता ती काय बोलेल याला फारसं महत्व नाही.सुदाम ने तुझी बंदूक खरेदी व्यवहारात ओळख पटवली ती बरोबर की चूक मला माहिती नाही, धरून चल की तो चुकलाय तुला ओळखण्यात तरी सुध्दा आम्हाला जास्तीत जास्त काय करायला लागेल माहित्ये? फक्त चेन्नई च्या ”
पोलिसांना तुझ्या बद्दल टिप द्यायची , ज्या क्षणी आम्ही ते करू त्या क्षणी तुझं इथलं अस्तित्व संपेल लक्षात ठेव ” पाणिनी ने दम भरला.
“ पटवर्धन माझ्याशी फार मोठा गेम खेळताय तुम्ही. काय आहे ?”
“ कसला गेम? तसं काही नाही.मी माझ्या अशिलाच्या हितासाठी जे काय करता येईल ते करतोय इतकंच.माझ्या माणसांकडून मी बंदुकीचा नंबर शोधून काढला आणि मालका पर्यंत पोचलो. मी फक्त हे पोलिसांच्या आधी केलं बस्स.” पाणिनी म्हणाला
फिरोज विषादाने हसला. “ दुसऱ्या कुणाला तरी या थापा मार पटवर्धन. ”
“ काय समजायचं ते समज.” पाणिनी आपले खांदे उडवत म्हणाला. “ इथून पुढे मी मिसेस ईशा अरोरा किंवा माझ्या प्लान बद्दल बोलताना काळजी पूर्वक बोलणार आहे हे नक्की. हृषीकेश बक्षी आणि त्या हॉटेल मधल्या होल्ड अप च्या बातमीचे लक्षात ठेव.”
“ मला आता तू एवढं अडकवल्यावर मी काय लिहिणार त्या बद्दल! ” फिरोजम्हणाला. “ त्या बदल्यात तू माझ्या चेन्नई मधल्या लफड्यात मला वाचवायचं. ”
“ फिरोज, मी वकील आहे. पोलीस नाही किंवा न्यायाधीश पण नाही.” पाणिनी म्हणाला आणि टॅक्सी ला हात केला.
पाणिनी गेल्यावर फिरोज आधारासाठी इमारतीच्या भिंतीला टेकला.त्याचे ओठ कोरडे पडले.डोळे निस्तेज झाले होते.
( प्रकरण १४ समाप्त)