प्रकरण १५
पाणिनी ने अंदाज केल्या प्रमाणे पोलिसांनी ईशा अरोरा ला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि लगेचच वर्तमान पत्रात बातम्या आणि फोटो छापून आले.
खुनात प्रेम प्रकरण असल्याचा संशय.
खून झालेल्या माणसाचा भाचा आणि मोलकरणीची मुलगी यांचा साखरपुडा
मयताच्या विधवा पत्नीचं मृत्यू पत्र खोटे असल्याचा आरोप.
बंदुकीच्या मालका पर्यंत पोलिसांची पोच.
अनावधानाने बोलून गेलेल्या वाक्याच्या आधारे खुनाच्या वेळी हजर असलेल्या वकिलाच्या शोधात पोलीस
.
आतल्या पानात आणखी बातम्या होत्या
पोलीस स्टेशन मधे विधवा पत्नी ला अश्रू अनावर
असा मथळा होता.बातमी वाचता वाचता पाणिनी च्या लक्षात आलं की पोलीस मधुदीप माथूर पर्यंत पोचलेत. परंतू गोळीबार झाल्यानंतर तो गूढ रित्या गायब झालाय.असं असलं तरी गुन्हा घडला त्यावेळी तो दुसरीकडे असल्याचा भक्कम पुरावा त्याच्याकडे आहे.पोलिसांचा अंदाज होतं की त्याने ज्याला बंदूक दिली होती त्याला तो वाचवायचा प्रयत्न करत होता.पेपरात नावे कोणाचीच दिली नव्हती पण पाणिनी चा अंदाज होता की पोलीसांची संशयाची सुई हृषीकेश बक्षी च्या दिशेने सरकत्ये.पाणिनी ला जाणीव झाली की ईशा ने आपले नाव घेतले असणार आणि आपण वेगळ्या नावाने हॉटेलात राहतोय हे पोलीस शोधून काढणार.पेपरात नमूद केलं होत की पुढील दोन-तीन दिवसात खुन्याला अटक केलं जाईल असा पोलिसांचा कयास आहे.
या सगळ्या विचारात पाणिनी असतानाच दार वाजल.पाणिनी ने उघडलं तर सौम्या आत आली आणि तिने दार लाऊन घेतलं.
“ सौम्या तुला मी बोललो होतो, इथे यायचा धोका स्वीकारू नकोस म्हणून.” पाणिनी म्हणाला
तिचे डोळे रडल्यासारखे वाटत होते.डोळ्या खाली काळी वर्तुळं झाली होती.
“ काळजी करू नका ,मी त्या सगळ्यांना चकवून इथे आल्ये. आवश्यकच होतं ते. ती सटवी आपल्या ऑफिसात आली ,तिने पेपर्स वर सह्या केल्या ,त्या नंतर तिला पत्रकारांनी गराडा घातला.त्यांच्या प्रश्नांची सरबत्ती सुरु झाल्यावर तिने तुमच्या नावाचा उल्लेख केला, सर ! दधिची अरोरा वर गोळी झाडल्याचा आवाज आला तेव्हा याच्या खोलीतून येत असलेला आवाज तुमचा होता असं ती म्हणाली चक्क ! कधीतरी ती तुम्हाला गोत्यात आणणारच असं मला पहिल्या दिवसा पासून वाटत होतं आणि तसच झालं, सर, मी तुम्हाला वेळोवेळी बोलून दाखवलं होतं. ” सौम्या कळकळीने म्हणाली.
“ जाऊ दे सौम्या मला कल्पना होतीच ती असं करू शकेल म्हणून.” पाणिनी म्हणाला
“ तुम्हाला माहीत होतं? मला वाटलं फक्त मलाच वाटतं होत तसं ”
“ तुला वाटतं होत त्यामुळे मला ही वाटत होत.” पाणिनी म्हणाला आणि त्याने ओजस ला फोन लावला.
“कनक मी हॉटेल प्रेयसी च्या ५१८ नंबर च्या खोलीत आहे. मला इथे तातडीने डिक्टेशन देण्या साठी दोन तीन नोट बुक आणि पेन्सिली पाठव ”
“ सौम्या तिकडे आहे? ” कनक ने विचारले.
“ हो.अत्ता पावणे नऊ वाजलेत.मला ९ वाजे पर्यंत सर्व संपवायचं आहे.” पाणिनी म्हणाला आणि फोन ठेवला.
“ काय भानगड आहे ही सर?” सौम्या ने विचारले
“ ईशा अरोरा मला इथे नऊ वाजता अपेक्षित आहे.” पाणिनी म्हणाला
“ ती येईल तेव्हा मला नाही थांबायचं इथे.पहिल्या पासूनच तिने तुम्हाला धोका दिलाय.मला तर इच्छा होते सारखी की तिचा गळा आवळावा.” –सौम्या
“ शांत हो सौम्या.तिच्या समोर मी सूर्य जयद्रथ करणारे. मोठा समारंभ करणारे ! ” पाणिनी म्हणाला
दार वाजल आणि ईशा अरोरा आत आली.तिने सौम्या कडे पाहिलं.
“ ओह ! तुम्ही दोघेही इथे आहात तर.” ईशा उद्गारली.
“ पत्रकारांसमोर बरीच बडबड केल्येस तू.” पाणिनी म्हणाला
पाणिनी च्या बोलण्याकडे आणि सौम्या कडे पूर्ण दुर्लक्ष करून ती पाणिनी जवळ गेली.निर्लज्ज पणे त्याचे हात आपल्या हातात घेऊन ती म्हणाली, “ पाणिनी, कसं झालं मला कळलंच नाही.माझ्या आयुष्यात एवढी वाईट गोष्ट मी केली नाही.त्यांनी माझ्यावर एवढी सरबत्ती केली की माझ्या मनाविरुध्द मला तुमचं नाव घ्यावंच लागलं.मी ते सांगितलं नसतं तर त्यांनी मला पुरावा दडवलयाच्या आरोपाखाली आत टाकलं असतं. ” ईशा म्हणाली
“ त्यांना नेमकं काय सांगितलं आहेस तू?” पाणिनी म्हणाला
अचानक तिला उन्मळून आलं. हमसून हमसून ती रडायला लागली.
सौम्या चिडून हाताच्या मुठी घट्ट करत तिच्या दिशेने सरसावली. पाणिनी ने तिला हाताला धरून थांबवलं. “ मी हाताळणार आहे हे प्रकरण.” तो ठाम पणे म्हणाला.
ती अजूनही रडत होती.
“ तुझं रडणं बघायला आता कोणी प्रेक्षक नाहीयेत इथे. नाटकं बंद कर आणि मला नेमक्या शब्दात सांग.” पाणिनी म्हणाला
“ मी... मी.. सां .. सां...गीतलं की...की... मी तुमचा आवाज ऐकला. ” मुसमुसत ईशा म्हणाली.
“ माझा आवाज होता असं म्हणालीस की माझ्या आवाजा सारखा आवाज असं म्हणालीस? ” पाणिनी म्हणाला .
“ मी त्यांना सगळं सांगितलं. तुमचा आवाज आहे असं सांगितलं.”
“ मूर्ख बये ! तुला पक्क माहिती होत आणि आहे की तो माझा आवाज असू शकत नाही.”
दार वाजलं आणि कनक ओजस आला.
“ हाय पाणिनी ! ” उत्साहाने तो म्हणाला. “ मी जमवलं बरोबर. मी कुठे होतो आणि काय करतोय हे कोणालाही कळलं नाही.”
“ या हॉटेल च्या समोर कोणी रेंगाळताना, संशयास्पद पणे, दिसलं नाही? मला वाटतंय सौम्या आली त्यावेळी तरी कोणीतरी असावं. ” पाणिनी म्हणाला
“ मला तरी नाही कोणी दिसलं.” –कनक म्हणाला.
“ ही ईशा अरोरा आहे.” पाणिनी ईशा कडे बघून ओजस ला म्हणाला.
“ मी पेपरात फोटो पाहिलेत हिचे ” –कनक ओजस म्हणाला.
मुसमुसतच ईशा ने त्याचे कडे हसून पाहिलं.
“तुझे अश्रू सुध्दा तुझ्या सारखेच खोटे आहेत. ” सौम्या चिडून म्हणाली.
पाणिनी ने सौम्या ला हातानेच शांत होण्याचा सल्ला दिला.
“ तुला सांगितलेल्या वस्तू आणल्यास कनक?”
कनक ने मान हलवून होकार दिला.त्याने आणलेल्या वस्तू सौम्या ला दिल्या.
“ सौम्या, टेबला जवळ बस आणि इथे जे काही बोललं जाईल ते लिहून घे.” पाणिनी म्हणाला
“ काय चाललंय हे? काय करताय तुम्ही?” ईशा ने विचारलं.
“ मला आता सगळंच चव्हाटयावर आणायचंय.” पाणिनी म्हणाला
“ मी इथे थांबू के जाऊ?” कनक ने विचारलं.
“ थांब. तू साक्षीदार आहेस.” पाणिनी म्हणाला
“ साक्षीदार? कशाचा साक्षीदार होणारे हा माणूस? मला टेन्शन यायला लागलंय. काल त्यांनी मला असंच केलं. मला पोलिसांनी गराडा घातला. माझ्या बाजूला पेन्सिली आणि वह्या घेतलेले बरेच जण उभे होते.मला फार नैराश्य येत जेव्हा मी काय बोलते ते कोणीतरी लिहून घेत ”—ईशा
“ स्वाभाविक आहे,तसं होणं ” पाणिनी म्हणाला, “ त्यांनी तुला बंदुकी बद्दल विचारलं?”
“ म्हणजे काय नक्की?” आपला चेहेरा निष्पाप ठेवत ईशा ने विचारलं
“ तुला माहित्ये मला काय अभिप्रेत आहे ते.” पाणिनी म्हणाला “ तुझ्याकडे बंदूक कशी आली या बद्दल त्यांनी विचारलं का तुला?”
“ माझ्याकडे कशी येईल बंदूक?” –ईशा
“ तुला माहित्ये,हृषिकेश बक्षी ने तुला बंदूक दिली होती. हेच कारण आहे तू त्याला फोन करून सांगण्याचं की त्याने दिलेल्या बंदुकीतून गोळी लागल्ये दधिची ला.”
सौम्या सोहोनी आपल्या वहीत भरभर नोटस् घेत होती.
“ तुम्ही काय बोलताय मला समजत नाहीसं झालंय.”
“ तुला सगळ समजतंय बरोबर. तुला माहित्ये, मधुदीप माथूर नावाच्या माणसाने हृषिकेश ला बंदूक दिली होती, तीच तुझ्याकडे होती आणि त्याचाच वापर खुनासाठी झालाय.हे तू हृषिकेश ला फोन वर सांगितलंस, त्या नंतर तो तातडीने मधुदीप माथूर ला भेटायला गेला. आणि आता दोघेही गायब आहेत.”
“ मला यातली काहीच कल्पना नाही.” –ईशा
“ या सबबी सांगून काही फायदा नाही होणार तुला.कारण मी हृषिकेश ला भेटलोय आणि त्याचा लेखी जबाब माझ्याकडे आहे.” पाणिनी म्हणाला
“ त्याच्या सहीचा जबाब?” ईशा ने आश्चर्याने विचारलं.
“ हो.”
“ माझी समजूत होती की तुम्ही माझे वकील आहात.”
“ तुझी वकीली करणे आणि हृषिकेश कडून लेखी जबाब घेणे याचा परस्पर संबंध काय? त्यात चूक काय? ” पाणिनी म्हणाला.
“ चूक नाही पण तो जे म्हणतोय त्याने मला बंदूक दिली हे धादांत खोटे आहे.”—ईशा
“ मी कधीही बंदूक पाहिली नाही.”
“ आता हे सोपे झालय मग.” पाणिनी म्हणाला
“ काय सोपं झालं?”
“ बघशीलच तू. त्या आधी अजून काही मुद्दे स्पष्ट करून घेतो तुझ्याकडून.” पाणिनी म्हणाला “ तुला जेव्हा पर्स मिळाली तेव्हा ती तुझ्या नवऱ्याच्या टेबल च्या खणात होती, आहे लक्षात?”
“ म्हणजे काय नेमकं म्हणायचंय तुम्हाला?” तिने हळू आवाजात पण सावध पणे विचारलं.
“ मी तुझ्या सोबत होतो तेव्हाच तुला पर्स मिळाली.”
“ अरे हो! मला आठवलं अत्ता, मीच ठेवली होती संध्याकाळी तिथे.”—ईशा म्हणाली
“ आता आपल्या चौघातच विषय राहील पण खरं सांग, जेव्हा गोळी मारली गेली तेव्हा त्या खोलीत कोण होतं असं तुला वाटतंय?” पाणिनी म्हणाला.
“ तुम्ही.”—ईशा म्हणाली
“ छान ! गोळी मारली जाण्यापूर्वी थोडाच वेळ आधी तुझा नवरा अंघोळ करत होता?” पाणिनी म्हणाला.
प्रथमच ती अस्वस्थ झाली. “ मला माहीत नाही.मी तिथे नव्हते तेव्हा.तुम्ही होतात.”
“ तुला पक्क माहिती आहे, तो अंघोळ करत होता आणि तो तसाच बाहेर आला, अंग न पुसताच, अंगा भोवती टर्किश गाऊन लपेटून.” पाणिनी म्हणाला
“ खरं की काय?” ईशा ने विचारलं.
“ तुला माहित्ये ते आणि पुरावा पण तसेच सांगतो.आता मला सांग की तो जर अंघोळ करत होता तर मला आत कोणी घेतलं असं तुला वाटतं?” पाणिनी म्हणाला.
“ का बरं? नोकराने घेतलं असेल.”—ईशा
“ नोकर तसं म्हणत नाहीये. म्हणतोय?”
“ मला नाही माहीत तो काय म्हणतोय.मला एवढंच माहित्ये की मी तुमचं आवाज ऐकला.”—ईशा
“हृषिकेश ला त्याच्या बरोबर फिरताना पर्स बाळगणे का आवडत नसे? ” पाणिनी ने अचानक विचारलं.
“ सहज.बायकांचं लक्ष पर्स सांभाळण्यात असतं, गप्पा मारण्यात नसतं असं त्याला वाटत.” –ईशा
“तू हृषिकेश बरोबर बाहेर गेली होतीस ईशा. संध्याकाळ पासून. आणि तुझी पर्स तेव्हा तुझ्या सोबत नव्हती.”
“ नव्हतीच घेतली.” ईशा एकदम बोलून गेली आणि आपला ओठ चावला.
पाणिनी हसला. “ तर मग ईशा, तुझी ती पर्स त्याच्या टेबलाच्या कप्प्यात कशी काय ठेऊ शकलीस?” पाणिनी म्हणाला. ईशा निरुत्तर झाली.
“ तू मला दिलेल्या फी ची पावती मी दिली होती,आठवतंय?” पाणिनी म्हणाला.
“ हो नक्कीच.”
“ कुठाय ती अत्ता?” पाणिनी म्हणाला.
“ मला नाही आठवत.बहुतेक हरवली असेल ती,” –ईशा
“ आता खात्रीच पटली तुझ्या उत्तराने.” पाणिनी म्हणाला
“ कसली?”
“ तूच खून केलास याची.” पाणिनी म्हणाला “ तू मला स्पष्ट पणे सांगायला तयार नाहीस पण मीच तुला सांगतो सविस्तर. ”
“ तू हृषिकेश बरोबर बाहेर गेलीस संध्याकाळी.पुन्हा जेव्हा तुम्ही परत आलात तेव्हा हृषिकेश ने तुला दारा पर्यंत सोडलं.तू वरच्या मजल्यावर गेलीस. तुझ्या नवऱ्याने तू येत असल्याचं ऐकलं.तो तेव्हा अंघोळ करत होता.तो तुझ्यावर प्रचंड चिडला होता.त्याने अंगावर टर्किश गाऊन लपेटला आणि तुला त्याच्या खोलीत जा म्हणून सांगितलं.तू गेलीस. त्याने तुला तुझ्या पर्स मधे सापडलेल्या माझ्या फी च्या पावत्या दाखवल्या.त्यापूर्वी मी त्याला भेटून दम दिला होताच की मिर्च मसालामधे ती बातमी येत कामा नये म्हणून. त्याने या दोन्ही गोष्टींचा संबंध लावला आणि त्याला कळून चुकलं की तू माझा सल्ला घेतला आहेस वकील म्हणून. तुला कळून चुकलं की आता आपल्याला काहीच दडवता येणार नाही नवऱ्या पासून.तो आपल्याला संपवेल.म्हणून तूच त्याला त्यापूर्वी संपवलंस.त्याला गोळी मारल्यावर तो पडला.तू तिथून काढता पाय घेतलास पण जाताना फार हुशारी दाखवलीस.जाताना बंदूक तिथेच टाकून गेलीस.तुला माहीत होत की बंदुकीचा तपास हृषिकेश पर्यंत जाईल आणि थांबेल.तुला हृषिकेश ला त्यात अडकवायचं होतं जाणून बुजून. कारण तो अडकला की स्वतः बरोबर तो तुलाही आपोआपच सोडवेल.आणि अगदी याच कारणासाठी तू मलाही त्यात ओढलंस.
तू बाहेर जाऊन हृषिकेश ला फोन केलास आणि सांगितलंस की भयंकर काहीतरी घडलंय आणि त्याची बंदूक सापडू शकते खुनाच्या जागी.याचा विचार करून त्याने तिथून निघून जावं आणि गायब व्हावं काही काळ.तू त्याला हे ही सांगितलंस की केस पुढे चालवण्याच्या दृष्टीने मला पैसे पाठवावे लागतील.त्या नंतर तू मला फोन केलास आणि तिकडे बोलावून घेतलंस.तुला वाटलं की पाणिनी पटवर्धन ला सुध्दा यात अडकवलं तर तो स्वतः ला वाचवताना आपोआपच तुला ही वाचवेल,म्हणून तू माझा आवाज ऐकल्याचे पोलिसांना खोटं सांगितलंस.कारण तुला पक्क माहिती होत की मी तुझ्या नवऱ्याजवळ नव्हतो,माझ्या स्वतःच्या घरी होतो हे सिध्द करायची जबाबदारी माझ्यावर पडली असती आणि मला ते करणं फार अवघड होतं.हृषिकेश ला यात ओढलंस ते त्याचे पैसे वापरण्यासाठी आणि मला ओढलंस ते माझ्या बुद्धीचा वापर करण्यासाठी. ” पाणिनी म्हणाला
“ तुम्हाला असं धादांत खोटं बोलायचा काहीही अधिकार नाही.” ती किंचाळून म्हणाली.तिचा चेहेरा पांढरा फटक पडला होता.
“ पुराव्या शिवाय मी बोलत नाही.” पाणिनी म्हणाला
“ काय पुरावा आहे?”—ईशा
“ काल तुला पोलिसांनी चौकशी साठी नेलं तेव्हा मी माशा मारत बसलो होतो असं तुला वाटलं की काय?” पाणिनी म्हणाला. “ मी हृषिकेश ला भेटलो.मग आम्ही दोघेही तुझ्या मोलकरणीला भेटलो. ती आधी तुला सांभाळून घ्यायचा प्रयत्न करत होती पण तिने कबूल केलं की तू आणि हृषिकेश एकत्र आल्याचं तिने पाहिलं आणि तुझ्या नवऱ्याने तुला वर बोलावल्याचं ही तिने ऐकलं.नंतर तू वर गेल्याच तिला दिसलंय.तिने हे ही सांगितलं की संध्याकाळ पासूनच तुझा नवरा तुला शोधत होता, त्याच्याकडे तुझी पर्स होती आणि त्यात ठेवलेल्या माझ्या सह्या असलेल्या दोन पावत्या त्याच्या हातात होत्या.” पाणिनी म्हणाला
“ मंगल वायकर ने हे सगळ सांगितलं? ”—ईशा ने विचारलं.
तिच्या बोलण्याकडे पाणिनी ने लक्ष सुध्दा दिलं नाही.तो पुढे बोलायला लागला,
“ त्या पावत्यावर तुझं नाव नव्हतं कारण तू मुद्दामच त्या निनावी द्यायला सांगितल्या होत्यास. पण माझ्या सह्या त्यावर होत्या आणि त्या बघून दधिची अरोरा ने काय ते बरोबर ओळखलं. म्हणजे त्या तुझ्या पर्स मधे आहेत म्हंटल्यावर मिर्च मसाला जी बातमी छापायचा प्रयत्न करत्ये त्यात तू आहेस हे त्याला बरोबर समजलं.”
“ तुम्ही माझे वकील आहात, मी तुम्हाला दिलेली माहिती माझ्याच विरुध्द वापरताय. तुम्ही माझ्या हिताचा विचार केला पाहिजे. तुम्ही जे सगळ सांगितलं ते म्हणजे खोटारडे पणाचा कळस आहे. आणि त्यातलं काहीही सिध्द करू शकणार नाही तुम्ही.”-ईशा म्हणाली.
“ पोलिसांसमोर तू पुराव्याशिवाय वाटेल ते जबाब दिलेस.आता मी जाऊन त्यांना माझे म्हणणे लेखी देणारे.ते दिलं की पोलिसांना तुझ्या विरुध्द सबळ पुरावे मिळतील.हृषिकेश ला बंदुकीबद्दल सांगून बोलावून घेणे, तुझं हृषिकेश बरोबर चे संबंध नवऱ्याला कळू न देणे.या दोन्ही गोष्टी खुनाचा हेतू सिध्द करायला पुरेशा आहेत.” पाणिनी म्हणाला
“ पण त्याच्या मृत्यूमुळे मला काहीच फायदा होणार नव्हता.” ईशा म्हणाली
“ ते नुसत दाखवायला,इतरांना. त्या मृत्युपत्रातील हेराफेरी हा चांगला खरंच चांगला फ्रॉड होता ईशा ” पाणिनी म्हणाला
“ काय म्हणायचंय तुम्हाला पटवर्धन? ”
“ मी जे बोललो तेच.एकतर तुझ्या नवऱ्याने तुला सांगितलं असेल की त्याने मृत्युपत्रात तुला काहीही ठेवलेलं नाही किंवा तू त्याच्या तिजोरीतून ते बाहेर काढून वाचलेस. काहीही असले तरी तुला त्यातला मजकूर समजाला हे नक्की.तुला हे माहिती होत की कुणाल गरवारे आणि त्याचा वकील अथर्व ने ते मृत्युपत्र पाहिले असल्यामुळे तू ते नष्ट केले असतेस तरी त्याचा तुला फायदा झाला नसता.उलट त्या दोघांना संशय आला असता.म्हणून तू असा विचार केलास की कुणाल गरवारे ला त्या मृत्युपत्रा अंतर्गत मागणी करायला लावली आणि त्याचं वेळी मृत्युपत्र खोटे असल्याचे तू सिध्द केलेस तर गरवारे ला तू अडचणीत आणू शकशील.म्हणून तू नवऱ्याने केलेले मृत्युपत्र फोर्ज केलस अगदी शब्द न शब्द. पण त्यातही अशी काळजी घेतलीस की कोणालाही तो फ्रॉड सहज कळेल.मग ते मृत्युपत्र तू अशा जागी ठेवलंस की कधी हवं तेव्हा तुला ते मिळेल. ”
“ तू मला जेव्हा घरात बोलावून घेतलंस आणि मी प्रेताची तपासणी आणि इतर काही गोष्टी पाहण्यात गुंतलो होतो तेव्हा तू संधी साधून मूळ मृत्युपत्र काढून नष्ट केलंस , त्या जागी डुप्लीकेट ठेवलंस.साहजिकच गरवारे आणि त्याचा वकील तुझ्या जाळ्यात अडकले. त्यांना मूळ मृत्युपत्रा मधला मजकूर माहीत होता आणि तुझ्या फोर्ज केलेल्या मृत्युपत्रा मधे तो तसा च्या तसा उतरला होता त्यामुळे त्या दोघांना तुझे फोर्ज केलेले मृत्युपत्र हेच मूळ वाटले आणि त्यांनी ते मूळ असल्याबाबत अॅफिडेव्हिट सुध्दा सादर केलं.आता त्यांची स्थिती एवढी विचित्र झाल्ये की आ बैल मुझे मार. ”
“ या सगळ्याला पुरावा आहे का ?” ईशा ने विचारलं पण तिचा आवाज बारिक होता आणि थरथरत होता.
“ कनक, आतल्या खोलीत जा.आत मंगल वायकर बाई आहे. तिला बाहेर घेऊन ये.मी काय बोललो त्याला ती दुजोरा देईल.” पाणिनी ओजस ला म्हणाला.
ओजस ने आत जाऊन मंगल वायकर ला बाहेर आणलं.
“ नमस्कार ईशा मॅडम,” ती ईशा कडे पाहून म्हणाली.
“ मंगल वायकर, एक मिनिट, थांबा.” पाणिनी म्हणाला “ तुम्ही ईशा समोर काही सांगायला सुरुवात करण्यापूर्वी मला एक विषय तुमच्याशी आधीच बोलून घेऊ दे. जरा पुन्हा त्या खोलीत जा, मी येतो आत.”
कनक ओजस ने पाणिनी पटवर्धन कडे मिस्कील पणे कटाक्ष टाकला आणि मंगल वायकर आत गेल्या नंतर दार पुन्हा लावून घेतलं.
ईशा उठून बाहेर जायला निघाली पण दोन पावलं टाकताच कोसळून पडली. पाणिनी आणि कनक ओजस ने पुढे होऊन तिला उचलले आणि अंथरुणावर ठेवले.
टॉवेल ओला गच्च करून तिच्या चेहेऱ्यावर ठेवला.तिचा ड्रेस जरा सैल केला आणि टॉवेल ची घडी छातीवर ठेवली.थोडया वेळाने तिने मोठा श्वास घेतला आणि शुद्धीवर आली.
“ मला मदत कर पाणिनी. प्लीज.” ती बारिक आवाजात उद्गारली.
पाणिनी ने मानेनेच नकार दिला. “ तू खरं सांगत नाहीस तो पर्यंत नाही.” तो म्हणाला.
“ मी सांगते. विश्वास ठेवा.”
“ सांग तर मग.” पाणिनी म्हणाला
“ तुम्ही म्हणता तसंच. फक्त मला हे माहीत नव्हतं की मंगल वायकर ला हे समजलंय.मला हे माहीत नव्हतं की दधिची ने मला वर बोलावल्याचं कोणी ऐकलं किंवा गोळीचा आवाज कोणी ऐकला असेल. ”
“ तू त्याला किती जवळून गोळी घातलीस?” पाणिनी म्हणाला.
“ मी खोलीतच पण अगदी टोकाला होते.मला त्याला मारायचं नव्हतं, मी अचानकच त्याच्यावर गोळी झाडली.त्याने माझ्यावर हल्ला केला तर जवळ बंदूक असलेली बरी या विचाराने मी ती घेतली होती .तो एकदम तिरसट स्वभावाचा होता.हृषिकेश बद्दल कळलं तर नक्कीच तो मला मारेल याची मला खात्रीच होती.त्याच्याशी बोलता बोलता माझ्या लक्षात आलं की त्याला ते कळलंय,तेव्हा मी लगेच हातात बंदूक घेतली.ती बघताच त्यानं माझ्याकडे चमकून पाहिलं.मी किंचाळले आणि ट्रिगर दाबला.मला वाटतंय तेव्हाच बंदूक माझ्या हातातून पडली खाली.त्यावेळी माझ्या लक्षात ते आलं नाही.त्यावेळी हृषिकेश ला यात गुंतवायचं माझ्या डोक्यातही आलं नाही.मी सगळ्यात पहिल्यांदा काय केलं ,तर तिथून बाहेर पळाले,तशीच,पावसात.जाता जाता पॅसेज मधला हाताला आला तो कोट मी खेचला.तो रेनकोट आहे की नाही हे सुध्दा बघण्याची मनस्थिती माझी नव्हती.नंतर पाहिलं तर ते कुणाल पूर्वी घालत असलेलं जर्किन होतं.मी फक्त पळत सुटले. थोडया वेळा नंतर मी जरा सावरले आणि मनात विचार आला ,तुम्हाला फोन करावा.माझा नवरा मेलाय की नाही मला नक्की माहीत नव्हतं,पण तो जीवंत असला तर मला तुम्ही माझ्या जवळ हवे होतात.”
“ तो माझ्या मागून पाठलाग करत आला नाही तेव्हा मी अंदाज केला की तो मेला असावा.पण मी ते मुद्दाम नव्हतं केलं.माझ्या हातून ते घडलं अचानकच.मी आले तेव्हा तो टबात पहुडला होता.अंघोळ करत.मी आल्याचं त्यानं ऐकलं,तो गाऊन गुंडाळून बाहेर आला.त्याच्या हातात तुमच्या सहीच्या पावत्या होत्या.त्याने माझ्यावर नाही नाही ते आरोप केले. होल्ड अप च्या वेळी हृषिकेश बरोबर असलेली स्त्री म्हणजे मी होते असाही आरोप केला.तुला मी दमडाही ठेवलेला नाही माझ्या मालमत्ते मधला,असा दम त्याने मला दिला.मी एकदम सैरभैर झाले आणि त्या आवेशात गोळी मारली त्याला.आणि तिथून प ळत सुटले , नंतर तुम्हाला बोलावून घेतलं.माझ्याकडे काहीही पैसे नव्हते.पूर्वी सुध्दा मला हवे तेव्हा दधिची कडून घ्यावे लागायचे.आता ती ही शक्यता मावळली होती.मग मला सुचलं की हृषिकेश ला बोलावून घ्यावं.मी त्याला फोन करून सांगितलं की भयानक घडलंय.कोणी तरी दधिची ला मारलंय तुझ्या बंदुकीचा वापर करून.हृषिकेश एकदम घाबल्याचं मला जाणवलं.मी त्याला म्हणाले की त्याने आता कुठेतरी गायब व्हावं म्हणजे त्याचा , त्याच्या बंदुकीशी कोणी संदर्भ जोडू शकणार नाही.पण त्याच वेळी माझ्या आणि तुमच्या पैशांची सोय ही मी केली.तुम्हाला अडकवलं तर मी ही सुटेन कारण तुम्ही स्वतः ला तुमच्या बुध्दी कौशल्यानं सोडवणारच या विचाराने तुमचा आवाज मी ऐकलं असं सांगून तुम्हाला अडकवलं. ”
पाणिनी काही बोलायला जाणार तोच दार वाजलं आणि प्रेरक पांडे दारात उभा होता..
“ पाणिनी, तुला शोधण्यात जीव गेला माझा. सौम्या चा पाठलाग करत आम्ही आलो इथे पण तू नेमक्या काय नावाने इथे उतरलायस हे शोधणं कठीणच गेलं मला.बरं ते जाऊ दे. पाणिनी तुला माझ्या सोबत यायला पाहिजे,सरकारी वकीलाना तुझ्याशी बोलायचंय.” पांडे दारातूनच म्हणाला.
“ आत ये प्रेरक.” पाणिनी म्हणाला
“ पाणिनी, मी तुला जे काही आहे ते खरं सांगीतलय, तू मला वाचवायला पाहिजेस.”
पाणिनी ने प्रेरक कडे बघितले. आणि ईशा कडे निर्देश करून तो प्रेरक पांडे ला म्हणाला, “ ही ईशा अरोरा आहे, प्रेरक.आत ये आणि हिला अटक कर तिने अत्ताच कबूल केलंय की तिने तिच्या नवऱ्याचा म्हणजे दधिची अरोरा चा खून केलाय.”
ईशा ने जोरात किंकाळी फोडली. उभी राहिली पण तिची भेलकांडी गेली.पांडे ने दोघांकडे आलटून पालटून पाहिलं.
“ ही वस्तुस्थिती आहे.” कनक ओजस म्हणाला.
“ तिचा कबुली जबाब सौम्या ने उतरवून घेतलाय. साक्षीदारा समोर.” पाणिनी म्हणाला
“ तुझ्या साठी हा मोठा ब्रेक आहे पाणिनी. अन्यथा तुला खुनाच्या आरोपा वरून अटक होणार होती.” प्रेरक पांडे म्हणाला.
“ ती खरं बोलली असती तर मी तिला वाचवायचा प्रयत्न तरी केला असता,मी पेपरात वाचल तेव्हा समजलं की ती मला अडकवण्याचा प्रयत्न करत्ये,तेव्हाच मी ठरवलं आता सगळं समोरा समोर करायचं. सूर्य जयद्रथ. ” पाणिनी म्हणाला
“ हृषिकेश बक्षी कुठे आहे तुला माहित्ये तर.” कनक उद्गारला.
“ छे: छे: बिलकुल नाही.मी काल रात्री पासून या खोलीच्या बाहेर ही नाही गेलो.मी फक्त मंगल वायकर बाईला फोन करून इथे या हॉटेल मधे ये म्हणून सांगितलं आणि तिच्यासाठी टॅक्सी पाठवली.”
“ पण ती आली कशी एवढी सहज?” कनक ने शंका व्यक्त केली.
“ मी तिला सांगितलं की ईशा पत्रकारां समोर एक निवेदन देणार आहे.तिच्या म्हणल्याला दुजोरा देण्यासाठी तुला यायला लागेल.” पाणिनी म्हणाला
“ पण ती तुझ्या बाजूने बोलेल असा तुला विश्वास होता?” –कनक
“ अजिबात नव्हता विश्वास. आमचं पहिल्या भेटी पासूनच जमत नव्हतं.म्हणून मी तिला काही बोलायला सांगणारच नव्हतो.फक्त ईशा वर दबाव आणण्यासाठी मी तिला खोलीत आणायला लावलं तुला, आणि ती काही बोलायला लागण्यापूर्वीच काहीतरी कारण सांगून पुन्हा आत जायला सांगितलं.” पाणिनी म्हणाला
ईशा चा चेहेरा पांढरा पडला. “ हराम खोरा, माझा वकील म्हणवतोस आणि मलाच अडकवतोस?, पाठीमागून सुरा मारणाऱ्यांची जात आहे तुझी.” ती किंचाळली.
“ पाणिनी, आता मी ही तुला काही सांगतो. खरं म्हणजे, तू इथे ,या हॉटेलात ,नाव बदलून राहिला आहेस हे ईशा नेच आम्हाला सांगितलं.ती म्हणाली की तू तिला आज इथे बोलावलं आहेस.तिनं सांगितलं की आम्ही आधीच हॉटेलात येऊन बसावं आणि तुझ्या कडे कोणी तरी आलं की वर तुझ्या खोलीत यावं आणि असं भासवावं की त्याचा पाठलाग करत आम्ही हे हॉटेल शोधलं. आमच्या सुदैवाने सौम्या इथे आली आणि थोडया वेळाने आम्ही आत आलो.आमच्या प्लॅन प्रमाणे आम्ही असं भासवलं की सौम्या च्या मागावर राहून आम्ही तुला या हॉटेलात शोधून काढलं प्रत्यक्षात आम्ही सौम्या च्या मागावर नव्हतोच. म्हणजे ती येणार आहे इथे ते आम्हालाही माहीत नव्हतं.” प्रेरक म्हणाला.
पाणिनी यावर काहीही बोलला नाही. तो खूप थकला होता.
( प्रकरण १५ समाप्त)