नाचं ग घुमा ( पुस्तक परीक्षण) Dr.Swati More द्वारा पुस्तक पुनरावलोकने मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नाचं ग घुमा ( पुस्तक परीक्षण)

पुस्तकाचं नाव : नाच गं घुमा
लेखिका : माधवी देसाई
प्रकाशन : इंद्रायणी साहित्य
पुस्तक परिचय : डॉ. स्वाती अनिल मोरे

आता गळ्यात सौभाग्य अलंकार नसतो, पण कपाळावर लालभडक कुंकू असतं....
ती निशाणी असते माझ्या प्रिय हिंदू धर्माची!
अनेक रूपांत बदलत गेलेल्या
भारतीय स्त्री जीवनाची!
ती कपाळावरची रक्तरंजीत खूण असते!
मी भोगलेल्या वेदनेची, शोकाची, सुखाची आणि मोहाचीही!
मोहाच्या फुलांचा रंग लालच असावा...
बहुधा....
.................. माधवी देसाई...
श्री. भालजी पेंढारकर यांची कन्या आणि श्री. नरेंद्र काटकर यांची पहिली आणि श्री.रणजीत देसाई यांची दुसरी पत्नी!!

तिचं बालपण कोल्हापुरातील तपोवनात एकदम शिस्तीत आणि साधेपणात गेलं...

चांगलं स्थळ आलं म्हणून लग्नही जरा लवकरच झालं...

लग्न करून सुखी संसाराची स्वप्न तिनेही बघितली...

कोल्हापुरात वाढलेली ती... तिला गोव्याच्या लोकांशी जमवून घेणं सुरवातीला थोडं अवघड गेलं.. पण रुळली हळू हळू..

चारचौघी सारखं तीनही संसारात हालअपेष्टा सोसल्या... सोशिकता तिच्या रक्तातच होती बहुतेक...

बघता बघता संसाराच्या वेलीवर तीन फुलं उमलली...

नरेंद्र आणि दोघांचा संसार छान चालू असतानाच नियातीला ते बघवलं नाही... शुल्लक आजाराचे निमीत्त झालं काय आणि तो आजार एवढा वाढला की नरेंद्र हे जग सोडून गेले काय!!


पदरात तीन मुली... एक वयात आलेली, एक अजाण वयात आणि एक चार वर्षाची...

ज्याच्या आधारावर डाव मांडला होता...तो असा अचानक निघून चालला होता.. दिसेनासा होई पर्यंत मी बघत होते...

भातुकलीच्या खेळाचा एक भाग संपला होता...

माझ्या अमूर्त सख्यांनी मला वेढा घातला होता...

मी गोल रिंगणात उभी होते...

कशी मी नाचू? माझा आवाज उमटत नव्हता पण त्यांचा टिपेचा आवाज मला ऐकू येत होता..

नाच ग घुमा, नाच ग घुमा!!

माझे बिल्वर, तोडे , साखळ्या, मंगळसूत्र सारे काढून घेऊन त्या मला नाचायला सांगत होत्या...



२४ एप्रिल १९७५ साली माधवी यांचं लग्न वैदिक पद्धतीने श्री. रणजीत देसाई यांच्याशी झालं..

सीतेने लक्ष्मण रेषा ओलांडली आणि रामायण घडलं...

असचं काहीसं येणाऱ्या तिच्या आयुष्यात घडणार होतं...

तिनं स्वतःचा भूतकाळ विसरून नवीन आयुष्याला सुरवात केली...

त्यांच्या मुलींना आपलं मानलंच , त्याबरोबरच त्यांच्या पहिल्या पत्नी यांनाही जमेल तेवढं प्रेम दिलं..

संसाराच्या रिंगणात सगळे म्हणेल तशी घुमा नाचत होती... सर्वांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होती...

त्यात रणजीतही तिला मनापासून साथ देत होते...

"माधवी, या वाड्याला घरपण देणारी कोणीतरी येईल हे मला माहीत होतं..."

पण कधी कधी त्यांचं वागणं तिला समजायचं नाही...
वयात आलेल्या मुली आणि नवरा यात तिची रस्सीखेच सुरू होती...

मुली आणि नवरा या दोन्ही मध्ये समतोल साधण्यासाठी झटत होती.. त्यांच्या मुलींना नवीन आई स्वीकारणं जड जात होत तर तिच्या मुलींना नवीन बाबा..

तरीही न डगमगता सगळ्या जगाला तोंड देत तिनं कोवडच्या वाड्याला तिथल्या माणसांना आपलं केलं... प्रेम दिलं..

पण कुठं आणि काय चुकल, तिला समजलंच नाही ...

त्यांच्या सुखी संसारात कधी घरातील तर कधी बाहेरच्या लोकांनी मिठाचा खडा टाकला... सगळ यंत्र चांगलं चालत असत आणि एकच स्क्रू अडकतो... चालत्या गाडीला खीळ बसते.. तो बिघाड शोधायला तंत्रविशारद हवा...
पण मानवी मन असं की त्याचं शल्य कोणतं तेच त्याला समजत नाही... कारण मनाची गुंतवणुक फार नाजूक असते... कुठं स्वार्थ, कटुता, वैमनस्य, असूया किंवा प्रेम सारं सर मि सळ असतं.. म्हणूनच हा मनाचा गुंता उकलताना अवघड!!

रंगभूमीवर दृश्य जरी दोनचं पात्रे असली तरी अदृश्य अनेक पात्रे पडद्यामागं काम करत असतात..
लोकं नाना प्रकारे तिच्या वागण्या विषयी चर्चा करायचे त्यावेळी तिला वाटायचं नवऱ्याने त्यांना गप्प बसवाव .. अशा वेळी मात्र रणजीत गप्प राहिले .. त्यांचं गप्प राहणं तिच्यासाठी खूप त्रासदायक व्हायचं...

दिवसा मागून दिवस चालले होते.... ऋतुचक्र बदलत होतं...

आणि एक दिवस अचानक.....
१४ वर्षाच्या संसारानंतर नवऱ्याने घटस्फोट मागितला..तिच्या मनाची काय अवस्था झाली असेल त्यावेळी...

दुसऱ्यांदा, संसाराचा मांडलेला डाव उधळला जात होता... ती हताश , हतबल !!

जो खंबीरपणे पाठीशी उभा असायला हवा होता.. त्यालाच मी नकोशी झालिये..

घटस्फोट तोही त्याच्या सुखासाठी....

" तुझ्यापासून दूर झाल्यानंतर मी सुखी होईन..." कानात कोणीतरी तप्त लाव्हा ओतावा असे हे शब्द..

गाव मागे सरला,
पायतळीचा पथ तिमिरी बुडाला,
ही घटकेची सुटे सराई,
मिटले दरवाजे,
जिवलगा... राहिले दूर घर माझे...

आता कोणत्या जिवलगाला साद घालायची...

ते तर कठोर, मख्ख झालेत..

चौदा वर्षे...

जीवन भरभरून उधळल..

भरपूर राबवून घेतलं...

आता गरज संपली..

माधवी मी फार एकटा आहे ग..

एकटे होतात ना तुम्ही.. मग आता हे सभोवताली आहेत ते कोण??

आणि मी कोण??

चौदा वर्षांचे ते मीलन हे स्वप्न की सत्य की फसवणूक??

मी मालकीण ! मी दासी !! की मी परित्यक्ता!!

मी कोण??

मी आतून ओहोटलेला किनाऱ्याकडे झेपावणारा - सागर...

पराभवाचं शल्य जपणारा...

तरीही मर्यादेनं वागणारा...

मनाचं विशालपण न गमावणारा...

ज्याच्यावर प्रेम केलं त्याचं भलं चिंतणारा...

भरती संपली की ओहोटी स्विकारणारा सागर.... अशी मी
माधवी देसाई , सई, रमा की पुतळा.. कोण मी???

एका स्त्रीची प्रत्येकास विचार करण्यास भाग पाडणारी व्यथा!!

डॉ. स्वाती अनिल मोरे
कांदिवली पूर्व