आंस मज बाळाची भाग ७
मागील भागावरून पुढे…
रात्री सगळ्यांची जेवणी आटोपल्यावर ताई मुलांना म्हणाली
"थोडं थांबा मला तुमच्याशी काही बोलायचं."
आनंद आणि निनादला आश्चर्य वाटलं आई कधीच अशी प्रस्तावना करून बोलत नाही. जे बोलायचं आहे ते धड-धड बोलून मोकळी होते आज काय एवढं महत्वाचं आहे. दोघांनी मुकुंदरावांकडे बघून मानेनीच काय असं विचारलं. त्यांनी मानेनीच माहित नाही असं उत्तर दिलं. तिघही समोरच्या खोलीत येऊन बसले. स्वयंपाकघरातील मागचं आवरून ताईही समोरच्या खोलीत आली.तिघही ताईकडे उत्सुकतेनी बघत होते. ताईनी बोलायला सुरवात केली.
"अनघा बाळासाठी उपचार घेते आहे हे तुम्हाला माहिती आहेच."
तिघांनी होकारार्थी माना डोलावल्या. आता तिला जो उपचार सांगितला आहे तो जरा जास्त खर्चिक आहे. तिला पूर्ण बोलू न देताच मुकुंदराव म्हणाले
"अग, हे सगळं आम्हाला माहितीच आहे. तू आणखीन वेगळं काही सांगणार आहेस का?"
"हो. तिला दुस-या बाईकडून बीजांड विकत घ्यावं लागणार आहे."
"विकत? "आनंदाच्या या प्रश्नाला उत्तर मुकुंदरावांनी दिलं.
"अरे फुकटात या जगात काही मिळत नाही. ती दुसरी बाई जर आपल्या शरीरातला एखादा अवयव कोणाला तरी देतेय तर ती त्याचे पैसे घेणारच. किडनी दिली कोणाला तर देणारा पैसे घेतो न तस."
थोड्यावेळ सगळेच गप्प होते. यात आईला नेमकं काय सांगायचं आहे हे दोघांनाही कळत नव्हतं.शेवटी निनादनी विचारलच आई तुला नेमकं काय सांगायचं आहे आम्हाला? ताई धीर करून बोलली ,
"मला माझ्या शरीरातील एक बीजांड अनघाला द्यायची इच्छा आहे. इतकी वर्ष ती दोघं बाळ व्हावं म्हणून उपचार घेता आहेत. यावेळी तपासणीमधून कळलं की अनघाची दोन्ही बीजांड खराब झाली आहे म्हणून त्यात बीज निर्माण होत नाही. जर दुस-या बाईचं चांगलं बीजांड मिळालं तर तिला दिवस राहू शकतात. याची शंभर टक्के खात्री डॉ. नी दिली आहे."
एवढ बोलून ताई गप्प झाली.सगळेच विचारात पडले. आनंद म्हणाला
"दुसरी बाई शोधू .तूच का देते आहेस? "
"दुसरी बाई शोधणं कठीण आहे. तिला पैसेही द्यावे लागतील. माझी पाळी बंद झाली आहे त्यामुळे माझ्या शरीरातलं एक बीजांड काढल्यानी काही धोका होणार नाही."
" हे तुला कसं माहिती?" निनाद्नी विचारला.
"डॉ.नी वैभव आणि अनघाला सांगितलं."
बराच वेळानी मुकुंद राव बोलले
"यात त्रास किती आहे. तुझ्या भावाची बायको आहे आणि ती तुझी लाडकी आहे म्हणून भावनेच्या भरात निर्णय घेऊ नको. तू अनघा एवढी नाहीस तेव्हा आपण सगळी विचारपूस केल्याशिवाय आपण निर्णय घेऊ शकत नाही. त्याच प्रमाणे या ऑपरेशन नंतर तुला काही व्याधी जाडायाला नको."
"वैभव म्हणाला तुम्ही डॉ. मेहतांशी भेटून बोलून घ्या."
"म्हणजे यावर तुमची चर्चा झाली आहे. मग आम्हाला कशाला विचारतेस? नाही सांगतेयस?"
मुकुंदरावांच्या चेहे-यावर आणि आवाजात जरा राग दिसत होता. ताई लगेच म्हणाली
"नाही हो तसं नाही. मी माझी इच्छा वैभवजवळ बोलून दाखवल्यावर दोघही म्हणाले एवढा मोठा निर्णय पटकन आणि एकटीनं घेऊ नको. घरी तिघांशी बोल. काही शंका असतील तर डॉ. मेहतांना भेटून त्या शंकांचं निरसन करून घ्या मग निर्णय घे. म्हणून आज मी हा विषय तुमच्याजवळ बोलले."
एवढ बोलून ताईला दम लागला. आता ती त्या तिघांच्या बोलण्याची वाट बघत होती.तिघही बराच वेळ गप्प होते. अचानक निनाद म्हणाला.
"आई तुला त्या बीजांडचा काही उपयोग नाही का?"
"नाही. त्याचं काम पाळी चालू असतानाच असतं. आता मला पाळी येत नाही त्यामुळे दोन्ही बीजांड माझ्या शरीरात तशीच पडून राहणार. अशी ती प्रत्येक स्त्रीच्या शरीरात पाळी बंद झाल्यावर पडूनच असतात.मग आपण दुस-या बाईचं घेऊ शकतो."
"तुच का ?" आनंदनी विचारलं.
"माझी अनघा मध्ये भावनिक गुंतवणूक आहे. वैभव माझा सख्खा भाऊ आहे. त्याची मला काळजी वाटणारच. इतरांना पैसे देण्यापेक्षा जर माझंच बीजांड दिलं तर मला आनंद होईल. म्हणून मला द्यायचं आहे."
" विचार करून सांगतो." मुकूंदराव एवढंच बोलले.
ताईला आता त्या तिघांचा निर्णय ऐकायची घाई झाली होती. पण ती निर्णय सांगा असं म्हणू शकत नव्हती. कारण हा काही छोटा निर्णय नव्हता. मनात तिच्या घालमेल चालू होती.
ती सारखी देवाजवळ प्रार्थना करीत होती. देवा या तिघांना हो म्हणायची बुद्धी दे. ही शांतता ताईला जीवघेणी वाटू लागली. तिघं विचार करायला लागून खूप वेळ झाला नव्हता पण तिला अख्खा दिवस यात संपतोय असं वाटत होता.
कशाची तरी माणूस जेव्हा वाट बघत असो तेव्हा तो काळ युगं लोटल्यासारखे वाटतात.ताईचही तसच होत होतं
"मुलांनो मला वाटत आपण तुमच्या मामीला मदत करूया. डॉ. ना सगळं विचारू. आईच्या ऑपरेशन नंतर काय काळजी घ्यायची ते विचारू. मी तिची काळजी घेणारच. पण तुम्हा दोघांनी आपल्या व्यस्ततेतून जर वेळ काढलात तर आईला पूर्ण विश्रांती मिळू शकते. माझ्याकडून हो आहे. तुमचं मत सांगा."
मुकुंदरावांच बोलण ऐकून ताईच्या कानावर विश्वासच बसला नाही. आता मुलं काय म्हणतात याची ती वाट बघत होती.
"बाबा तुमचा होकार आहे तर आमचाही आहे. या गोष्टीवर तुम्ही चांगला विचार केला असेल. आम्हा दोघांना त्यातील एवढ्या खाचाखोचा काळात नाही. आम्हालापण अनघा मामी खूप आवडते. आईनी जर तिचं बीजांड दान केल्यावर जर मामा-मामीच्या घरी बाळ येणार असेल तरही गोष्ट खूपच महवाची आहे आणि आनंदाची आहे.आमची परवानगी आहे. आम्ही तुम्हाला सगळी मदत करू." निनाद बोलला.
"आई मामी आहे ती आमची तेव्हा तिची काळजी घेणं हे आमच महत्वाचं कर्तव्य आहे. ते आम्ही करणार. आई तू काळजी करू नकोस सगळं ठीक होईल."आनंद बोलला.
आतातर ताईच्या डोळ्यातून घळा-घळा पाणी वाहू लागलं.
तिघांच्या समजूतदारपणाचं कौतुक वाटलं आणि इतका वेळ मनावर असलेला ताण गेल्यामुळे ती स्वत:ला थांबवू शकली नाही. तिघही आश्चर्यचकीत झाले तिला रडतांना बघून.
"अग तुला रडायला काय झालं?" मुकुंदरावांनी विचारलं.
"मला तुम्ही काय निर्णय घ्याल याचा ताण आला होता."
आणि पुन्हा हुंदके देऊ लागली. निनाद हळूच तिच्याजवळ जाऊन बसला.तिला बिलगून म्हणाला.
"आई आम्ही तुला ओळखतो. तू वेडावाकडा निर्णय कधीच घेणार नाही हे आम्हाला माहिती आहे. कोणत्या परिस्थितीत कसा निर्णय घ्यायचा ही सारासार विवेक बुद्धी तूच आम्हाला शिकवली. अनाघा मामी तुला किती जवळची आहे हे आम्हाला माहिती आहे. आई एखादी दुसरी स्त्री असती तर तिनी असं घरातल्यांना विचारलं असतं का माहित नाही. कारण बीजांड काढायचं की नाही हा निर्णय घेणं तिला तिचा अधिकार आहे असं वाटलं असतं. शिवाय आमच्या वयाच्या मुलांचं मत घेतलं असतं का माहिती नाही. आई तू खूप धीट आणि छान आहेस. तुझा निर्णय आम्हाला मान्य आहे."
एवढ बोलुन आनंद थांबला.ताईनी आनंदला जवळ बोलावलं आणि दोन्ही मुलांना आपल्या मिठीत घेतलं. मुकुंदरावसुद्धा आपले वाहणारे अश्रू थांबवू शकले नाही.
"अग वैभवाला कळव आम्ही तयार आहोत. उद्या संध्याकाळी आपण दोघं जाऊ डॉ. कडे."मुकूंदराव म्हणाले.
"हो." आनंदानी ताईचा आवाज गदगदला होता.
"चला आता झोपायला. रात्र फार झाली."
ताई वैभवला फोन करणार तर मुकुंदराव म्हणाले
" अग एवढ्या रात्री नको करूस फोन. उद्या उठल्यावर कर. मला तुझी घाई समजतेय. उद्या कर."
"ठीक आहे उद्या करते."
दोघही झोपायला आपल्या खोलीत गेले आनंद आणि निनाद तर आधीच झोपायला गेले होते.ताईला रात्रभर आनंदाने झोप लागली नाही. कधी सकाळ होते आणि वैभवला सांगते असं तिला झालं होतं.
आज ताईला सकाळी नेहमीपेक्षा लवकरच जागा आली. आणि तिला खूप प्रसन्न वाटत होता. कारण तिनी जो अवघड निर्णय घेतला होता त्यावर घरच्यांनी तिला समजून घेऊन होकार दिला होता.याचा तिला आनंद झाला होता. आज चहा करतांनाही ती आवडतं गाणं गुण-गुणत होती.
ताईनी वैभवाला फोन लावला.
"ताई आज खूष दिसते आहेस आवाजावरून."
हो आज मी खूप खूष आहे कारण माझ्या निर्णयाला घरच्यांनी परवानगी दिली."
अरेवा ही खूप छान बातमी दिलीस तू सकाळी-सकाळी."
" आता तू लवकर मला डॉ. मेहतांचा पत्ता आणि नंबर दे. आज संध्याकाळीच आम्ही दोघं जाऊन येतो डॉ. कडे." ताई म्हणाली.
हो लगेच पाठवतो." वैभव म्हणाला.त्याच्या आवाजात आनंद भरला होता.
-----------------------------------------------------------------------------
क्रमशः 'आंस मज बाळाची'भाग ७
पुढे काय झालं? वाचा पुढील भागात
लेखिका... मीनाक्षी वैद्य.