Attahas books and stories free download online pdf in Marathi

अट्टाहास




नेहमी हसतमुख असणाऱ्या मैत्रिणीचा उदास चेहरा पाहून मला रहावले नाही...

चांद से खुबसुरत चेहरे पर आज ये उदासी क्यूँ ??

काही नाही गं...तुला सांगू का स्वाती, आपण कितीही करा एखाद्याचं... त्याला ना, किंमतच नसते आपली...

मी एवढं मनापासून करते माझ्या कुटुंबातील सर्वांचं, तरीही कौतुकाचे चार शब्दही कोणी बोलत नाहीत..

आताच सासूबाई मोठ्या आजारपणातून बऱ्या झाल्या.. घर, नोकरी सांभाळून त्यांच पथ्यपाणी व्यवस्थित पार पाडलं..पण कधी त्यांनी पाठीवरून मायेचा हात फिरवून "थकली असशील ना! छान पार पाडलस हो सगळ ". साधं एवढं सुद्धा बोलल्या नाहीत...

हा सगळा विचार करून खूप अस्वस्थ झाले गं आज...

मी तिचा हात हातात घेतला...

हे बघ, मी समजू शकते तुला . तू सर्व काही छान करतेस.. तुझी कर्तव्ये प्रामाणिकपणानं पार पाडतेस..

पण तुला त्रास कुठं होतो ...

तर तुझ्या त्यांच्याकडून असणाऱ्या अपेक्षामुळे..

तुझी अपेक्षा असते की त्यांनी आपलं कौतुक करावं, तसं नाही झालं की तुझं मन कुठं तरी दुखावतं...

बरं तेवढ्यापुरतं दुखावलं तर ते साहजिक आहे...

तू तेच अजूनही धरून बसली आहेस आणि आताचा क्षणही तू आनंदाने जगत नाही आहेस...

हा जो "चं "असतो ना...थोडक्यात आपला अट्टाहास... तो सोडता आला तर!!

काल एक सुंदर चारोळी वाचली...

कोणाची आहे माहीत नाही..

'सकाळी अंगणातला पारिजात,
फुलांचा सडा टाकून मोकळा होतो
रिते होण्यातले समृद्धपण,
तो किती सहजपणाने दाखवतो'

जणु ज्या क्षणी ती फुलं फांदीपासून सुटतात,

तत्क्षणी तो त्या फुलांवरचे,

सारे हक्कही सोडतो...

आजची फुललेली सारी फुलं, वर्तमानाच्या त्या क्षणाला वाहून तो मोकळा होतो.

गुंतून नाही पडत तो त्या फुलांमध्ये. ..

ती फक्त बहरण्यातली परिपूर्णता आणि 'देण्या'तलं समाधान.

अगदी तसचं... तुला जे वाटतं ते तू आनंदने करत रहा...

बहरत रहा...

कोणी तुझ्या गुणांचं कौतुक केलचं पाहिजे हा अट्टाहास नको...


आमच्या ओळखीतल्या एक काकू आहेत... वयाच्या साठाव्या वर्षीही अजून स्वतः स्वयंपाक करतात... बाकी सर्व कामाला बाई आहे.. पण स्वयंपाकाला मात्र बाई ठेवणं त्यांच्या तत्वात बसत नाही..
"असं कसं आपलं स्वयंपाकघर आपण बाहेरच्या बाईच्या हवाली करायचं??.. माझ्या अंगात त्राण आहेत तोपर्यंत मीचं करणारं... आमच्या घरात आजपर्यंत कोणी स्वयंपाकीणबाई ठेवली नाही..."

या वयात त्यांची होणारी धावपळ घरातील इतरांना कळते .

पण तेही त्यांच्या बिझी शेड्यूलमुळे हतबल आहेत ..घरात कोणाला वेळ नाही त्यांना मदत करायला..

बरं , घरची आर्थिक परिस्थितीही उत्तम आहे...
तरीही काकू काही त्यांचा अट्टाहास सोडत नाहीयेत..

खरं तर नवीन पिढीतील हा बदल त्यांनी सहज स्वीकारायला हवा....

पण नाही....

मग कधीतरी त्यांची स्वतःचीच चीड चीड होते आणि पर्यायाने त्याचा त्रास घरातल्यांनाही होतो..



माझा एक मित्र आहे... त्याची अशी इच्छा म्हणा किंवा अट्टाहास, त्याच्या मुलाने डॉक्टर व्हावे... (कारण त्याला परिस्थितीमुळे डॉक्टर होता आलं नाही )

मेडिकलला प्रवेश परीक्षा चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होण्यासाठी, त्याची आर्थिक परिस्थिती नसतानाही भरमसाठ फी भरून, त्यानं मुलाला शहरातील नावाजलेल्या क्लास मध्ये घातलं ..

मुलाला मात्र आर्ट्स साईडची आवड...

बाबांना कसं दुखवायचं म्हणून तोही तयार झाला..

पण त्याला काही हवे तसे मार्क्सस् नाही मिळाले..

मग माझ्या मित्राचा तोल ढासळला.. खूप बोलला मुलाला..

शेवटी व्हायचं तेच झालं...मुलाने घाबरून आत्महत्येचा प्रयत्न केला...

नशीब बलवत्तर म्हणून मुलगा वाचला...

मित्राच्या 'अट्टाहासा"ने मुलगा गमावला असता..

आज तो आर्ट्स साईड घेऊन शिकतो आहे आणि त्याची तिथं होणारी प्रगती खूप छान आहे..

अशी कितीतरी उदाहरण आहेत आपल्या आजुबाजूला जिथं आपला अट्टाहास आपल्यालाच त्रासदायक ठरतो..

मला असचं घर हवं..

अशीच गाडी हवी ...

मेसेजला उत्तर मिळालचं पाहिजे...

माझा कॉल घेतलाचं पाहिजे...

माझं कौतुक केलंच पाहिजे..

मित्रांनो... आपल्या आयुष्यात असे कितीतरी " चं "आहेत जे खरे त्रासदायक आहेत ते आपण सोडायला शिकलो तर आयुष्य खरचं खूप सुंदर आहे...

नाही का??












इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED