TRIP TO FOREST - PART 4 books and stories free download online pdf in Marathi

अभयारण्याची सहल - भाग ४

अभयारण्याची सहल

भाग ४  

भाग ३  वरुन पुढे वाचा....

BP, पल्स, मोजून झाल्यावर मेट्रन, आराम करो असं सांगून चालली गेली. आता खोलीत फक्त संदीप आणि शलाका.

“खूप कोरड पडली आहे जरा पाणी देता का?” – संदीप

“हो  देते ना. अरे बापरे थांबा, विचारून येते.” – शलाका  

“कोणाला?” – संदीप

“मेट्रन ला.” आणि असं म्हणून ती पळाली. पांच मिनिटांनी वापस आली. म्हणाली, “चालेल म्हणताहेत. चहा, दूध सुद्धा द्यायला हरकत नाही असं मेट्रन म्हणाली.”

मग शलाका ने  त्याला चमच्याने थोडं पाणी पाजलं.

“अहो असं चमच्याने का देता आहात ? भांडं द्या नं.” संदीप कुरकुरला.  

“अहो तुम्हाला उठता येणार नाही. आणि झोपून भांड्याने पाणी पिता येणार नाही. ठसका लागला तर प्रॉब्लेम होईल.” शलाकाने समजावलं.

संदीप ने थोडी हालचाल केली पण तेवढ्याने सुद्धा त्याला वेदना झाल्या.

“मला काय झालय?” संदीपने विचारलं.

“अहो तुम्हाला काही आठवत नाहीये का?” – शलाका.  

“आठवतंय. वाघाशी लढाई झाल्याचं आठवतंय. पण मला काही लागल्याचं आठवत नाहीये. मग या वेदना कसल्या?” – संदीप उद्गारला.

“अहो वाघाच्या एका फटकार्‍याने तुम्हाला छातीला आणि दुसऱ्या फटकार्‍याने चेहऱ्याला जखमा झाल्या आहेत.” शलाकाने माहिती दिली.  

“हं, आता आठवलं. अरे पण सिस्टर, माझ्या मागे एक मुलगी होती तिला कुठलीही इजा होऊ नये म्हणून मी वाघाशी पंगा घेतला. ती कशी आहे? सुखरूप आहे न?” – संदीप ने विचारलं.

“म्हणजे तुम्ही तिला ओळखत नाही?” – शलाका

“नाही. मला तिचं नाव पण माहीत नाही. नावाचं सोडा, मी तिला पाहीलं सुद्धा नाही.” -संदीप

“अहो पण ज्या मुलीला तुम्ही ओळखत नाही, तिला पाहीलं सुद्धा नाही, तिच्या साठी प्राणांची बाजी लावली तुम्ही ? कमाल आहे. नशीब तुमचं, वाचला तुम्ही.” – शलाका

“पण त्याचा काय संबंध आहे? तिच्यावर वाघ चालून जात होता आणि मी तिथे जवळच होतो, मग माझं ते कर्तव्यच होतं. तिला काय वाघाच्या तोंडी द्यायला पाहिजे होतं का? मग माझ्या पुरुष असण्याला काय अर्थ होता?” – संदीप

“अहो पण तुम्ही पळून जाऊ शकला असता, झाडावर पण चढू शकला असता. आपला जीव वाचवू शकला असता, तसं न करता एका अनोळखी मुली साठी आपला जीव धोक्यात घातला तुम्ही?” शलाकाने आश्चर्याने विचारले.

“कसं आहे ना सिस्टर, माझी सैन्यात जाण्याची खूप इच्छा होती. आपला जवान जेंव्हा प्राणांची बाजी लावतो तेंव्हा तो खास असं, कोणा साठी लढत नसतो. ती एक वृत्ती आहे. ज्याला क्षात्र वृत्ती म्हणतात, ती माझ्यात आहे. मी सैन्यात नाही जाऊ शकलो पण mindset तर तोच आहे ना.” – संदीप. 

“धन्य आहे तुमची.” शलाका म्हणाली आणि तिने हात जोडले.

“सिस्टर पण हे सांगा न, की ती मुलगी कशी आहे? सुखरूप आहे नं? तुम्हाला काही माहीत आहे का?” संदीपचे प्रश्नावर प्रश्न.

“नुसतं माहितीच नाहीये, मी चांगली ओळखते तिला.”

“अहो मी तुमच्या ओळखी बद्दल नाही, तिच्या प्रकृती बद्दल विचारतो आहे. कशी आहे ती? माझी शुद्ध हरपली, तो पर्यन्त ती माझ्या मागेच उभी होती त्यामुळे मला काही कळलंच नाही.” संदीपने आपली अडचण सांगितली.  

“पण आता तर ती मुलगी, तुमच्या समोर उभी आहे नं. हे बघा अगदी सुखरूप आहे ती. तुम्ही आला होता न, टारझन बनून, माझ्या रक्षणासाठी, साधं खरचटलं सुद्धा नाहीये, बघा,” तिने एक गोल गिरकी घेतली. आणि  शलाका गोड हसली.

संदीप शलाका कडे बघतच राहिला. मग भानावर येत तो म्हणाला “टारझन?”

“मग? कसली जबरदस्त आरोळी ठोकली तुम्ही, कुठल्याशा सिनेमात मी पाहिलं होतं की टारझन असाच आरोळी ठोकतो ते. मी तर तुम्हालाच घाबरले. मीच काय तो वाघ पण घाबरला आणि दोन पावलं मागे हटला.” शलाकाच्या स्वरात कौतुक ओसंडत होतं.

“मी आरोळी ठोकली? मला कसं आठवत नाही?” संदीप आश्चर्याने म्हणाला. 

“जाऊ द्या. सध्या डोक्याला जास्त ताण देऊ नका. थोडं बरं वाटल्यावर, मी नंतर सांगेन तुम्हाला की कशी गर्जना केली होती तुम्ही.” – शलाका.  

“तुम्ही तिथे कश्या होत्या?” – संदीप.

“आम्ही पण वाघ बघायलाच आलो होतो.” - शलाका.  

“तुम्ही इथल्या सिस्टर आहात नं?” – संदीप आता गोंधळला होता.

“मी कुठे म्हंटलं असं? मला तरी आठवत नाही.” – शलाकाने आपली बाजू स्पष्ट केली.  

“म्हणजे तुम्ही नर्स नाही आहात?” – संदीप.

“नाही.” – शलाका.  

संदीप चा गोंधळ उडाला. ही मुलगी जर नर्स नाहीये, तर इथे आपल्या रूम मध्ये कशी, आणि काय करते आहे?

“मग तुम्ही माझ्या रूम मध्ये काय करता आहात?” – संदीप.

“अहो असं काय करता, हॉस्पिटल मधे  पेशंट च्या जवळ जर कोणी असेल तर तो काय करतो? पेशंट ची देखभाल, अजून काय?” – शलाका.

आता मात्र संदीपचं आधीच, थकलेलं डोक गरगरायला लागलं. त्यांनी डोळे मिटले. त्याला काही संगती लावता येईना. ही मुलगी इथे कशी ? आणि आई कुठे आहे ? मित्र कुठे आहेत ? विचार करता करता त्याला केंव्हा झोप लागली हे कळलंच नाही. केंव्हा तरी  पहाटे त्याला पुन्हा जाग आली. खोलीत शांतता होती. मान वाळवून पाहिलं तर बाकावर शलाका. तिला झोप लागली होती. तिला पाहिल्यावर याचं विचार चक्र पुन्हा सुरू झालं. ही मुलगी इथे आणि ते ही रात्रीच्या वेळेस का थांबली आहे ? थोड्या वेळाने त्याला पुन्हा झोप लागली. नंतर जेंव्हा जाग आली तेंव्हा शलाका उठली होती. झोप झाल्या मुळे एकदम फ्रेश दिसत होती. संदीप उठला असं बघून त्यांच्या कडे आले आणि म्हणाली

“कसं वाटतंय आता ? चहा आलाय, देवू का?”

संदीप ने मान हलवून होकार दिला. त्याला भूक पण लागली होती.

“थांबा जरा एक मिनिट,” आणि तिने एक टर्किश टॉवेल पाण्यात भिजवून आणला, आणि बँडेज मधून शिल्लक असलेला संदीपचा चेहरा नीट पुसला. मग थोडा बेड वर उचलला. पाणी दिलं आणि चूळ  भरायला सांगितली. चमच्याने चहा पिता पिता संदीप म्हणाला- “आता मी ग्लास ने चहा पीवू शकतो. द्या माझ्या हातात ग्लास.”

“ग्लास देते पण हळू हळू, एक एक घोट प्या. ठसका लागायला नको नाही तर वेदना होतील.” – शलाका.  

चहा प्यायल्यावर संदीप ला थोडी तरतरी आली. म्हणाला,

“तुमचं नाव काय आहे?”

“शलाका”

“माझ्या घरच्यांना काही माहीत नाहीये का, मी इथे आहे म्हणून?” – संदीप.

“सगळ्यांना माहीत आहे. आता हळू हळू येतीलच सगळे तुमची तब्येत पाहायला.” – शलाकाने सांगितलं.  

“आई, बाबा पण येतील?” – संदीप. 

“हो. रोजच येतात. आता ते आले की मी घरी जाईन आणि तुमच्यासाठी थोडा नाश्ता घेऊन चार पांच वाजे पर्यन्त येईन.” – शलाका म्हणाली.

“किती दिवस झालेत मला इथे?” – संदीप.

“पांच दिवस.” – शलाका.  

“बापरे इतके दिवस मला शुद्ध नव्हती?” – संदीप.

“पण आता आली आहे न, मग आता त्या बद्दल फार विचार नका करू. बरं, आता नाश्ता करणार का?” शलाकाने विचारलं.

“हो.” – संदीप.  

दहा वाजे पर्यन्त संदीपचे आई, बाबा आले. आणि शलाका घरी गेली.

संदीप ला शुद्ध आलेली बघून त्यांना आनंद झाला. त्याच्याशी किती बोलू आणि किती नाही असं आईला झालं पण बाबांनी समजावलं. गेले पांच दिवस सगळेच टेंशन मध्ये होते. पण आता ते दूर झालं होतं.

“काय ग आई, ही मुलगी इथे का थांबतेय?” – संदीप.

“अरे तू जिवाची पर्वा न करता तिला वाचवलं ना म्हणून येतेय तुझी काळजी घ्यायला.” – संदीची आई.  

“अग पण आपली ओळख नाही, पाळख नाही, अशी कशी येतेय? तिच्या घरचे सुद्धा काही म्हणत नाहीत? अग ती काल रात्री पण इथेच होती.” – संदीप.  

क्रमश:.......

 

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद. 

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED