TRIP TO FOREST - 1 books and stories free download online pdf in Marathi

अभयारण्याची सहल - भाग १

भाग 1

रात्रीचे किती वाजले हे कळत नव्हतं. हाताला घडयाळ असूनही इतका गडद अंधार होता की काटे दिसणं तर दूर, घडयाळ पण दिसत नव्हतं. आपल्याला पंचांग कळत नसल्या मुळे अमावस्या आहे का, हे समजत नव्हतं. अर्थात आता ते समजूनही काही उपयोग झालाच नसता. संदीप नुसता वैतागलाच नव्हता तर सॉलिड घाबरला पण होता. कारण प्रसंगच तसा होता.

संदीप च्या मित्राचा वाढदिवस होता. त्याच्या ऑफिस मधले काही मित्र मिळून त्याचा बर्थ डे साजरा करण्यासाठी ताडोबा च्या सफरीवर आले होते. तलावाकाठी असलेल्या गेस्ट हाऊस मधे थांबले होते. वाढ दिवस आणि जेवण खाण झाल्यावर, सर्व जणं थोडं जंगल फिरू म्हणत फेर फटका मारण्यासाठी निघाले. गेस्ट हाऊस च्या वाचमनने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला पण सर्व तरुण, आणि त्यात दोन तीन पेग पोटात गेलेले, सगळेच एकदम शूर वीर झाले होते. मग काय कोणीच ऐकलं नाही. आणि सर्व सात जणं जंगलात शिरले.

त्या वेळेला म्हणजे १९८५ साली, मोबाइल चं नाव सुद्धा कोणी ऐकलं नव्हतं. आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट चे नियम सुद्धा फार कडक होते. गेस्ट हाऊस मध्ये सुद्धा विजेचे दिवे नव्हते. जंगलात फिरतांना फॉरेस्ट गार्डस कंदील आणि काठी घेऊन फिरायचे. या पोरांजवळ टॉर्च पण नव्हता. तसेच अंधारात, एकमेकांचा हात पकडून जंगलात शिरले. सुरवातीला विरळ जंगलात काही वाटलं नाही पण जस जसं जंगल दाट होऊ लागलं तशी सर्वांची चाल मंदावली. पण दारूचा अंमल कायम होता म्हणून कोणी मागे फिरायला तयार नव्हतं. एकमेकांचे हात घट्ट धरून सर्व चालले होते. आणि, अचानक जंगलात कलकलाट सुरू झाला. ही पोरं विचारच करत होते की असं अचानक काय झालं असावं म्हणून, पण त्याचं उत्तर लगेच मिळालं. जीवाचा थरकांप उडवणारी वाघाची डरकाळी कानावर पडली. मग काय, हात सुटले आणि पळा पळ सुरू झाली.

अरे पळू नका वाट चुकाल. कोणी तरी ओरडून म्हणालं. आणि मग एकमेकांना आवाज देत सर्व जण एकत्र आले. आता मात्र सर्वांना माघारीच, जायचं होतं. जंगलाच्या बाहेर आल्यावर थोडया अंधुक प्रकाशात सर्वांना एकदम जाणवलं की संदीप त्यांच्या बरोबर नाहीये. काय करायचं ? सगळेच घाबरले, पण त्याला शोधायला पुन्हा जंगलात कोण जाणार? आता दारूचा अंमल सगळा उतरला होता, मग काय, सगळे गेस्ट हाऊस वर आले आणि त्यांनी गार्ड ला सांगितलं.

गार्ड ने कपाळा ला हात लावला. म्हणाला,

“तरी मी तुम्हाला सांगत होतो की जाऊ नका. पण तुम्ही ऐकलं नाही. आता बघा काय होऊन बसलं ते.”

“वॉचमन दादा, चुकलं आमचं. पण आता त्याला शोधायला आम्हाला मदत करा ना. अहो तो जंगलात एकटा काय करत असेल, कुठे जाईल? वाटा पण सापडत नाहीत एवढ्या दाट झाडी मध्ये आणि अंधार सुद्धा इतका आहे, की डोळ्यात बोट घातलं तरी दिसत नाही. प्लीज चला ना शोधायला. प्लीssज.” कोणी तरी म्हंटलं.

“ठीक आहे. शोधावं तर लागणारच आहे. तुम्ही इथेच थांबा. कुठेही जाऊ नका. मी जाऊन दोन तीन लोकांना घेऊन येतो मग दोन तीन टीम करून आपण जाऊ.” – गार्ड म्हणाला.

आणि गार्ड निघून गेला. आता गेस्ट हाऊस मधे फक्त सहा पोरं. सगळेच घाबरलेले. इथे पण वाघ आला तर ? हाच विचार सर्वांच्या मनात होता. तसे ते ताडोबा अभयारण्यात वाघालाच पाहायला आले होते, पण आता वाघच त्यांना पाहायला येतोय म्हंटल्यांवर संगळ्यांचीच बोबडी वळली होती. मारुती स्तोत्र सुरू झालं होत.

थोड्या वेळाने गार्ड अजून दोघा गार्ड ना घेऊन आला आणि तीन टीम बनवून ते तीन दिशांना पांगले. प्रत्येक गार्ड च्या जवळ एक एक कंदील आणि काठी होती. किर्र जंगलात जोर जोरात संदीप च्या नावाने हाका मारत सगळे तीन दिशांना पांगले.

इकडे संदीपला कळतच नव्हतं की, कोणच्या दिशेने जायचं आहे म्हणून. दाट झाडी मध्ये आणि किर्र अंधारात दिशा कळणं शक्यच नव्हतं. कळूनही उपयोग नव्हता कारण गेस्ट हाऊस कोणच्या दिशेला आहे हे पण माहीत नव्हतं. वाघांची डरकाळी पुन्हा ऐकू आली नव्हती एवढीच काय ती समाधानाची गोष्ट होती. पण संदीप चं मन काही थाऱ्यावर नव्हतं . वाघ दबा धरून तर बसला नसेल ना, आणि अचानक ध्यानी मनी नसतांना, आपल्यावर झडप घातली तर कसं? असे वेडे वाकडे विचार त्यांच्या मनात घोळत होते. मघाच्या पळापळीत तो केंव्हा पायवाट सोडून झुडपात शिरला होता ते त्यालाच कळलं नव्हतं आणि आता फांद्या, वेली वगैरे बाजूला सारत कसा बसा वाट काढत समोर जात होता. त्यानी त्याच्या मित्रांना बराच आवाज दिला पण कुठलाच प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यांनी एक झाडांची फांदी तोडून हातात घेतली. तेवढं तरी शस्त्र हातात असावं म्हणून. कुठल्याही जंगली प्राण्यांसमोर काठीचा किती उपयोग तो करू शकला असता या बद्दल त्यालाच शंका होती. पण हातात काठी घेतल्या मुळे थोडा धीर आला हे खरं.

तो समोर समोर जात होता आणि जंगल अधिकच दाट होत होतं. तो विचार करत होता की पळापळी मधे तो उजव्या बाजूला पळाला की डाव्या ? त्यांनी मनात ठरवलं की तो नक्कीच डाव्या बाजूला वळला असावा. म्हणजे आता जर पुन्हा पायवाट शोधायची असेल तर उजव्या बाजूला जावं लागेल असा विचार करून तो उजवीकडे वळला, आणि नशीबानी त्याला साथ दिली. १५-२० मिनिटं चालल्यावर त्याला पायवाट दिसली. आता पुन्हा प्रश्न समोर जायचं का मागे. कुठल्या दिशेने तो गेस्ट हाऊस ला पोचेल आणि कुठल्या दिशेने अधिकच दाट जंगलात ? नो आयडिया.

बारीकसा का होईना पण रस्ता होता झाडी कमी होती, त्यामुळे चांदण्यांचा अंधुक प्रकाश होता. तेवढ्याने सुद्धा संदीपला धीर आला. आता कमीत कमी समोर आलेलं संकट दिसलं तरी असतं. त्यानी खिशातून एक नाणं काढलं आणि टॉस करून त्या दिशेला चालू पडला. काही इलाज नव्हता. आता बहुधा त्याच्या नशीबानी त्याला साथ द्यायचं ठरवलं होतं. थोडं दूर गेल्यावर मोठा रस्ता लागला. साधा मुरूम आणि खडी टाकलेलाच रस्ता होता पण बस जाण्या इतका मोठा रस्ता पाहिल्यावर संदीपला हर्ष वायु झाला. Now I am safe. आता नक्की कुठे तरी आपण पोहोचू. असं मनाशीच म्हणून त्यांनी चालायला सुरवात केली. आता नक्कीच त्याचं नशीब जोरावर होतं. दुरून एका कार चे लाइट्स दिसले.

कार त्याच्या जवळ येऊन थांबली. अंधार असल्याने आत कोण बसले आहेत ते काही कळलं नाही. ड्रायव्हिंग सीट वर बसलेल्याने कांच खाली करून त्याच्या कडे पाहिलं आणि विचारलं.

“अहो हा रास्ता गेस्ट हाऊस कडे जातो का? नाही, म्हणजे आम्ही या जंगलात वाट चुकलोय, म्हणून विचारतो आहोत.”

संदीप ने कपाळाला हात लावला. म्हणाला,

“तुम्ही पण वाट चुकलेलेच आहात?”

“म्हणजे काय?” - ड्रायव्हर

“मी पण चुकलो. तुमच्याकडे निदान गाडी तरी आहे, मी तर पायीच फिरतो आहे या किर्र जंगलात रस्ता शोधत.” संदीप ने उत्तर दिलं.

“अरे देवा, तुम्हाला कुठे जायचं आहे?” ड्रायव्हर नी विचारलं.

“गेस्ट हाऊस ला. आम्ही सहा सात मित्र आलो आहोत, जंगलात फिरतांना वाघांची डरकाळी ऐकली आणि पळा पळीत मी वाट चुकलो. बाकीच्या लोकांचं काय झालं असेल ते माहीत नाही.” संदीपने सांगितलं.

“आई ग, अहो, आता काय करायचं. रस्ता कसा सापडेल?” कार मधून एक बायकी आवाज आला.

“मी येऊ का तुमच्या बरोबर? जागा आहे का?” संदीप ने विचारले.

“एक मिनिट हं.” शशांक म्हणजे ड्रायव्हिंग सीट वरचा माणूस संदीपला बोलला, आणि त्यानी मान वळवून आपल्या बायकोला, नलिनीला विचारलं की “घ्यायचं का यांना आपल्या बरोबर? बिचारे एकटेच जंगलात रस्ता शोधत फिरताहेत.”

“अनोळखी माणसाला कार मध्ये घ्यायचं?” – नलिनी, शशांकची बायको.

“हे बघ इतर वेळी मी थांबलो पण नसतो, पण रात्रीची वेळ आहे, घनदाट जंगला मधे हा माणूस रस्ता शोधत एकटा पायी फिरतो आहे, तू ऐकलसच की याला पण गेस्ट हाऊसलाच जायचं आहे. जंगलात प्राण्यांचा धोका संभवतो, काही वेडं वाकडं झालं तर आपण स्वत:लाच माफ नाही करू शकणार, बरं चांगला सभ्य दिसतो आहे. काय म्हणतेस?” शशांक म्हणाला.

“तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पटतेय मला. आणि मग मागच्या सीट वर बसलेल्या आपल्या नणदे वळून म्हणाली, शलाका, तुझं काय मत आहे?” – नलिनी

“घे दादा त्यांना. आपल्याला पण सोबत होईल. वहिनी तू ये मागच्या सीट वर.” – शलाका.

“मी नाही खाली उतरणार. मला वाघाची भीती वाटते.” नलिनी म्हणाली

 

क्रमश:.......

 

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com

धन्यवाद.

 

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED