भाग 2
भाग १ वरुन पुढे वाचा....
“अनोळखी माणसाला कार मध्ये घ्यायचं?” – नलिनी
“हे बघ इतर वेळी मी थांबलो पण नसतो, पण रात्रीची वेळ आहे, घनदाट जंगला मधे हा माणूस रस्ता शोधत एकटा पायी फिरतो आहे, तू ऐकलसच की याला पण गेस्ट हाऊसलाच जायचं आहे. जंगलात प्राण्यांचा धोका संभवतो , काही वेडं वाकडं झालं तर आपण स्वत:लाच माफ नाही करू शकणार, बरं चांगला सभ्य दिसतो आहे. काय म्हणतेस?” शशांक म्हणाला.
“तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. पटतेय मला. आणि मग मागच्या सीट वर बसलेल्या आपल्या नणदे वळून म्हणाली, शलाका, तुझं काय मत आहे?” – नलिनी.
“घे दादा त्यांना. आपल्याला पण सोबत होईल. वहिनी तू ये मागच्या सीट वर.” – शलाका म्हणाली.
“मी नाही खाली उतरणार. मला वाघाची भीती वाटते.” नलिनी म्हणाली
“अग वाघ कुठे आहे इथे?” – शशांक
“आत्ताच तर ते म्हणाले की डरकाळी ऐकली, म्हणून वाट चुकले.” – नलिनी.
“अग त्याला झाला बराच वेळ. आता इथे वाघ नाहीये. आणि मागच्या सीट वर जायला एक क्षण सुद्धा पुरतो. जा मागे.” शशांक नी वैतागून म्हंटलं.
पण नलिनीने ठाम नकार दिला.
शेवटी संदीप मागच्या सीट वर शलाकाच्या बाजूला बसला.
शशांक नी कार सुरू केली आणि पुढचा प्रवास सुरू झाला. संदीप आता थोडा रीलॅक्स झाला होता. आता तो कार मध्ये होता आणि सेफ होता. पण पाचच मिनिटाने कार थांबली.
“काय झालं ? कार का थांबवली?” नलिनीने विचारलं.
“टायर पंक्चर झालेलं दिसतंय. खाली उतरून बघावं लागेल.” – शशांक.
“तुम्ही खाली उतरू नका.” – नलिनीने ठाम नकार दिला.
“मग कोण उतरणार? तू बघतेस का टायर?” – शशांक जरा चिडूनच बोलला.
नलिनी काही बोलली नाही. पण संदीप समजला. तो म्हणाला की, “मी उतरतो, आणि बघतो.” आणि तो खाली उतरला.
“मागचं चाक बसलं आहे. स्टेपनी आहे नं? डिकी उघडा मी बदलतो टायर, तुम्ही चिंता करू नका.” शशांक कडे बघून संदीप हसून म्हणाला.
शशांक नी किल्ली दिल्यावर, संदीप ने पान्हा काढून चाकांचे नट उघडायला सुरवात केली. शलाका खाली उतरली. आणि थोडी दूर झाडी कडे जाऊ लागली. शशांक नी ते बघितलं आणि ओरडला-
“शलाका कुठे चालली आहेस तू?”
शलाका मागे वळली आणि शशांक ला करंगळी दाखवली.
“ओके. जास्त दूर जाऊ नकोस. धोका आहे.” – शशांक.
शशांक नट उघडतच होता की नलिनीच्या दृष्टीस वाघ पडला. तो संदीप पासून केवळ १५ फुटांवर होता आणि संदीप कडे बघत होता. नलिनीच्या तोंडून एक किंचाळी निघाली. आता शशांक चं पण लक्ष गेलं आणि त्याचा थरकांप उडाला. शलाका बाहेरच होती. आता काय करायचं ? शलाकानी किंचाळी ऐकली आणि ती धावतच झाडीच्या बाहेर आली आणि तिने पण वाघाला बघितलं. तिच्या धावपळी मुळे वाघाचं तिच्याकडे लक्ष गेलं आणि त्यानी तिच्या कडे मोर्चा वळवला. आता मात्र परिस्थिती खरंच बिकट झाली होती, आणि या संकटाचा सामना करायची क्षमता कोणातच नव्हती. शलाका भीतीमुळे गारठली होती, एकाच ठिकाणी स्तब्द, अगदी पुतळ्या सारखी उभी राहिली. वाघ एक एक पाऊल शलाका कडे सरकत होता. त्याला आजिबात घाई दिसत नव्हती. शलाका, वाघ आणि संदीप त्रिकोणाच्या तीन बिंदू वर होते. संदीप काही मारा मारी एक्स्पर्ट नव्हता. खरं तर तो सुद्धा जाम घाबरला होता. घामाने डबडबला होता. पण आता विचार करायला फुरसत नव्हती. एका क्षणात त्याने निर्णय घेतला आणि काठी आणि पान्हा घेऊन तो शलाका आणि वाघाच्या मध्ये जाऊन उभा झाला. शशांक ने ते पाहीलं आणि तो खाली उतरण्यासाठी दार उघडत होता पण नलिनीने त्याचा हात घट्ट पकडून ठेवला होता. म्हणाली, “तुम्ही मला सोडून मुळीच कुठेही जायचं नाही.” आणि घाबरलेला शशांक थांबला.
वाघ संदीपला पाहून एक क्षण थबकला आणि एक गगन भेदी डरकाळी फोडली.
ती डरकाळी ऐकल्यावर शशांक च्या काळजाचं पाणी पाणी झालं. शशांक आणि नलिनी दोघेही घामाने ओले चिंब झाले होते.
संदीप मध्ये आता भीतीचा लवलेश ही दिसत नव्हता. त्याच्या मध्ये आता सँडोकान संचारला होता. सँडोकान हा मलेशीयन राजपुत्र होता आणि त्याच्या अनेक दंतकथा प्रचलित होत्या त्यापैकी त्याची आणि वाघाची झालेली झुंज त्या काळी फार प्रसिद्ध होती. संदीप ती झुंज डोळ्यासमोर आणत होता. संदीप आता संदीप राहिलाच नव्हता. त्याचं आता पूर्णपणे सँडोकान मधे रूपांतर झालं होतं. वाघाच्या डोळ्याला डोळे भिडवून त्यानी पण ब्रूस ली टाइप एक तार स्वरात आरोळी ठोकली. संदीपची ती आरोळी इतकी भयानक होती की, शलाकाचाच थरकांप उडाला. ती सॉलिड घाबरली, वाघ भयंकर, की संदीप हेच तिला कळेना. तिचा इतका गोंधळ उडाला की ती घाबरून दोन चार पावलं मागे सरकली आणि दगडाला ठेचकाळून खाली पडली. ते पाहून शशांक अजूनच घाबरला. त्याला ओरडून शलाकेला सावध करायचं होतं पण तोंडातून शब्दच फुटेनात. नुसतीच वाफ.
आरोळी ऐकून वाघ सुद्धा दचकला एक पाऊल मागे सरकला. पण तेवढ्या पुरताच, लगेचच मागे पुढे होत सावजावर झेप घ्यायच्या पोजिशन मध्ये आला. वाघ दबकत दबकत एक पाऊल पुढे आला. संदीप च्या आरोळीचा त्याच्यावर थोडा का होईना पण परिणाम झाल्यासारखा दिसत होता. वाघ पुढे आल्यावर संदीप आपोआपच एक पाऊल मागे गेला. शलाका मागेच त्याचा आडोसा धरून उभी होती, ती पण एक पाऊल मागे सरकली. पण आता मागे सरकायला जागाच नव्हती. ती हळूच संदीपला म्हणाली की मी झाडाला टेकली आहे. आता मागे सरकता येणार नाही. पण संदीपच्या कानावर काहीच पडलं नाही . त्याचं संपूर्ण लक्ष वाघावर केंद्रित झालं होतं. तो त्याची एकूण एक हालचाल पापणी न हलवता टिपत होता. एकच गोष्ट त्याच्या मनात होती की शलाका च्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर होती. आता तो, जीव गेला तरी बेहत्तर, पण शलाका सुखरूप राहिली पाहिजे, या निर्णयावर आला होता.
अचानक शशांक ला नलिनीने हलवलं. आणि म्हणाली,
“अहो, नुसते काय बसला आहात? जोरजोरात हॉर्न वाजवा. कदाचित हॉर्न च्या कर्कश आवाजाने वाघ पळून जाईल.”
“हो हो. वाजवतो.” – शशांक.
आणि त्यांनी हॉर्न वाजवायला सुरवात केली. पण त्या आवाजाने वाघ पळून तर गेलाच नाही उलट अधिकच बिथरला, आणि संदीप वर त्यांनी झेप घेतली. संदीपचं वाघाच्या एक एक move वर लक्ष होतं. त्यांनी एका हातांनी शलाका ला बाजूला सारलं आणि दोन्ही हातांनी काठी पकडून एक जबरदस्त प्रहार वाघाच्या डोक्यावर केला. वाघावर त्या काठीच्या माराचा फारसा परिणाम झाला नाही, पण त्याच्या उडीची दिशा मात्र बदलली. संदीप आणि शलाका सेफ होते, पण संदीप च्या हाताला सॉलिड झिणझिण्यां आल्या होत्या. आणि काठी पडून गेली होती. तो झिणझिण्यां जाण्या साठी हात झटकत असतांना वाघ परत फिरला.
आता तो संदीप पासून केवळ ४-५ फुटांवर होता, आणि आता त्यांनी गुरगुरायला सुरवात केली होती. वाघ पुन्हा चालून आला पण या वेळेला संदीप च्या हातात काठी नव्हती आणि उचलायला तेवढा वेळ पण नव्हता. त्याच्या हातात चाकांचे नट काढायचा क्रॉस पान्हा होता. तो पान्हा च त्याने सर्व शक्ति निशी वाघाच्या जबड्या वर मारला. आता मात्र घाव वर्मी लागला होता आणि वाघाचा डोळा जायबंदी झाला होता. त्यामुळे वाघांची उडी पण पुन्हा चुकली होती. डोळ्याला लागल्या मुळे तो थोडा अजून समोर गेला होता. आता त्यांच्या मधलं अंतर वाढून १०-१२ फुट झालं होतं. शलाका सेफ होती पण वाघाच्या पंज्या चा फटकारा लागून संदीप चा उजव्या बाजूचा शर्ट आणि बनीयन फाटला, आणि छातीवर ओरखडे उमटून जखम झाली होती. संदीपची ती बाजू बधिर झाली होती त्यामुळे त्याला काही कळलं नाही. तो पान्हा घेऊन पुन्हा तयारीत उभा राहिला.
वाघाने पुन्हा एकदा डरकाळी ठोकली, आणि तो संदीप वर चालून आला. वाघाच्या एका डोळ्यातून रक्त वाहत होतं. अर्धा आंधळा झाला होता तो त्यामुळे भयंकर चिडला होता. या वेळी मात्र त्याने झेप घेण्याच्या भानगडीत न पडता सरळ संदीपवर चाल केली. संदीप चा गळा आपल्या जबड्यात धरण्यासाठी त्यांनी जबडा उघडला पण संदीपनी प्रचंड प्रसंगावधान दाखवून त्याच्या जबड्यात क्रॉस पान्हा कोंबला. पान्हा जबड्यात अडकल्या मुळे वाघाला काहीच करता येईना, पण त्याच्या पंज्याच्या एका फटकाऱ्यांनीशी संदीप, जवळ जवळ सहा सात फुट दूर जाऊन एका झुडपात पडला. संदीप फेकल्या गेल्या मुळे आता वाघ आणि शलाका समोरा समोर आले होते. परिस्थिती अत्यंत गंभीर होती. शलाका अंगभर थरथरत होती, घामाच्या धारा वाहत होत्या. तिने डोळे गच्च मिटून घेतले होते आणि राम नामाचा जप चालू होता.
जबड्यात पान्हा अडकल्यामुळे, अस्वस्थ झालेला वाघ दोन पावलं मागे सरकला आणि आणि डोक्याला जोरजोरात झटके मारून पान्हा काढण्याची खटपट करू लागला.
संदीप ज्या झुडपात पडला होता ते निवडुंगाचं बेट होतं आणि त्याच्या शरीरात काटे घुसले होते. चेहऱ्यावर सुद्धा काटे रूतले होते. पंज्याच्या फटकार्याने संदीपचा चेहरा रक्तबंबाळ झाला होता, पण संदीपला त्या वेळी काहीच जाणवलं नाही आणि ती वेळ काट्यांची पर्वा करत बसण्याची नव्हती. त्यानी आता खाली पडलेली काठी उचलली आणि पुन्हा एक उरल्या सुरल्या शक्तिनिशी जबरदस्त प्रहार वाघाच्या जबड्या वर केला.
वाघ मागे सरकला पण जाता जाता त्याने पंजा मारलाच. संदीप च्या चेहऱ्या वरून आता रक्ताच्या धारा वाहत होत्या. डोळ्यात, नाकात रक्त गेलं होतं त्यामुळे त्याला काही दिसेना. हातानेच त्याने चेहऱ्यावरचे रक्त पुसले. वाघ आता थोडा दूर जाऊन बसला होता. पोजिशन अशी होती की संदीप आणि शलाका एका बाजूला आणि कार दुसऱ्या बाजूला आणि दोन्ही च्या मध्ये वाघ होता त्यामुळे त्यांना जागाही सोडता येईना. दोन्ही पार्ट्या आता एकमेकांच्या मुव्हमेंट कडे लक्ष देवून बघत होत्या.
क्रमश:.......
दिलीप भिडे पुणे
मो :9284623729
dilipbhide@yahoo.com
धन्यवाद.