येवा कोंकण आपलोच असा.. - भाग २ Dr.Swati More द्वारा प्रवास विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

येवा कोंकण आपलोच असा.. - भाग २

साधारण तासाभरात आम्ही "नक्षत्र होम स्टे' जवळ पोहचलो. रस्त्यावर पाटी बघून रिक्षावाल्याने रिक्षा गल्लीत वळवली.. जसजशी रिक्षा पुढं पुढं जात होती तसतसा लाटांचा आवाज कानावर पडत होता..

अचानक रिक्षा थांबली. रस्ता संपला होता. सामोरं अथांग निळा रत्नाकर!!
अरे! होम स्टे कुठं आहे??
रस्ता तर संपला!!

तेवढ्यात समोरून एक काका आले. आम्ही त्यांना नक्षत्र होम स्टे कुठं आहे विचारलं..

"हंयच उतराचा लागतला तुमका. रिक्षा रेतिसून पुढ जावूची नाय.
डाव्या हाताक चलत जावा . थयच असा तुमचा ठिकाण.."

बॅगा घेऊन आम्ही सगळे तिथंच उतरलो...

बाकीचे पुढे झाले.लाटांचा जोरजोरात येणारा आवाज ऐकून माझे पाय मात्र तिथंच थबकले.तो गुंजारव मला तिथेच थांबायची गळ घालत होता. लाटांच्या संगीतात रत्नाकर माझं स्वागत करत होता..
आपला जुना सोबती दिसल्यावर जसं मन हर्षोल्हासित होतं तसं बहुतेक माझ्या मित्राचं झालं असावं.त्याचा आनंद मला त्याच्या उंचच उंच उसळणाऱ्या लाटांतून जाणवत होता..

मीही थोडा वेळ एका जागी थांबून त्याच्या या स्वागताचा स्वीकार केला .

त्याला नजरेनेच सांगितलं, "भेटू संध्याकाळी निवांत !"...

त्याच्यापर्यंत संवाद पोचला बहुदा ..अचानक तो ही शांत झालेला जाणवला..

किनाऱ्यावरील वाळूतून बॅगा घेऊन चालताना थोडी कसरत करावी लागत होती..
पाच मिनिट चालले आणि समोरच आमचा होम स्टे दिसला..

काय भारी लोकेशन होतं.. एकदम बीचवर!! नजर जाईल तिथपर्यंत फक्त समुद्राच निळशार पाणी आणि उजव्या हाताला समुद्रावर बेलाग सत्ता गाजवणारा जलदुर्ग "शिवलंका" म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा "सिंधुदुर्ग"

हॉटेलच्या दर्शनी भागात दोन रूम्स आहेत तर पाठीमागे एकएक मजली दोन इमारती आहेत.. त्यातही फॅमिली रूम्स आहेत..
मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे इथे बसण्यासाठी टाकलेले बेंच आणि खुर्च्या आणि ऊन लागू नये म्हणून त्यावर रंगीबेरंगी कपड्यांचे छत..

तिथं आरामात तास न् तास बसून आपण समुद्र बघू शकतो, वाचन करू शकतो किंवा मस्त गप्पांचा फड रंगवू शकतो..

प्रथम दर्शनी कोणीही प्रेमात पडेल असा हा नक्षत्र होम स्टे!!

असे होम स्टे मी गोव्याच्या पालोलीम बीचवर बघितले होते..
गोव्याला गेलो होतो तेंव्हा असं राहायला नव्हतं मिळालं पण त्याची उणीव मात्र आपल्या महाराष्ट्रातील मालवण आता भरून काढणार होतं..

आम्हाला बघताच होम स्टेचे मालक श्री.पांडुरंग कुबल यांनी आमचे हसत स्वागत केलं..

"कसो झालो प्रवास?

"काय त्रास नाय ना जावूक तुमका आमच्या हॉटेलवर
येवूक "

"कुडाळसून कसे इलाक तुम्ही "

एकावर एक असा अनेक प्रश्नांचा भडिमार पांडू दादांनी केला..

मी मात्र त्यांना दूर बसून न्याहाळत होते..

त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचा पेहराव, त्यांचं मालवणी भाषेतील प्रेमळ बोलणं..

गळ्यातील जाड जाड सोन्याच्या साखळ्या, हाफ पँट, बिन बाह्याच बनियान... मालवणी कोळी बांधवाचा पोशाख कसा असू शकतो यावरून अंदाज येत होता,त्यांचा उन्हाने रापलेला सावळा चेहरा त्यांनी आयुष्यात केलेल्या कष्टाची साक्ष देत होता..

त्यांनी आमच्या दोन कुटुंबाच्या खोल्या उघडुन दिल्या..
खोल्या अगदी साध्या असल्या तरी स्वच्छ होत्या.

अरे...त्यात टी. व्ही. नाहीये बरं.. पण खर सांगू का, आता हे लिहताना मला हे जाणवलं ,नाहीतर तिथं तीन दिवस असताना आपल्या खोलीत टी व्हीं नाहीये हे लक्षातच आलं नाही..

रात्रभर प्रवास केल्याने थकवा आला होता.. गरम गरम पाण्याने आंघोळ करून आम्ही फ्रेश झालो.. तोपर्यंत पांडू दादांनी जेवण तयार ठेवलं होतं..
कोंकण म्हटलं की मासे खाणाऱ्यांची चंगळ असते.. पापलेट, सुरमई ,बांगडा, कोळंबी, खेकडा तुम्ही म्हणाल तो मासा आपल्याला अगदी ताजा मिळतो..

पोटपूजा तर झकास झाली आता मात्र निद्रादेवीने हळू हळू आमच्यावर गारुड करायला सुरवात केली.. आम्हीही अजिबात विरोध न करता तिच्या अधीन झालो..

संध्याकाळी सिंधुदुर्ग किल्ला बघण्यासाठी जायचं नक्की झालं..
तसं पाहिलं तर रूमच्य अगदी समोर डाव्या बाजूला सिंधूदुर्ग दिमाखात उभा राहून आम्हाला दर्शन देत होता पण त्याच्या जवळ जाण्यासाठी मालवणला जाऊन बोटीने किल्ल्यात जावं लागणारं होतं.