मंगळसूत्र Pradeep Dhayalkar द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मंगळसूत्र

माझी मोठी मुलगी तिसरीच्या वर्गात शिकत होती.. माझी पत्नी पुजा.. प्रणाली व प्रियांका लहान असतांनाच ती देवाघरी गेली..! हे दुःख पचवून मी पुर्ववत माझ्या कामाला लागलो.. पुर्ण जबाबदारी माझ्या एकट्यावर पडली होती.. दोन मुलींचे संगोपन.. त्यांचे शिक्षण.. आणि माझी नोकरी.. या विचारात असतांनाच.. खुप एकटे पणा जाणवायचा.. !
खरं तर मला व माझ्या मुलींना माझ्या वयस्कर आईनेच सावरलं.. मुलींचा सांभाळ केला.. आई मुळेच निदान मुलींच संगोपन व्यवस्थित झालं.!
माझ्या पत्नीच्या निधनानंतर मी माझ्या मुलींना सोडायला शाळेत जायचो.., त्याच शाळेच्या गेटसमोर रोज एक स्त्री दिसायची.. असेल बत्तीस - वर्षांची... ती तिच्या दोन मुलींना सोडायला यायची...मोठी पाच अणि छोटी तीन वर्षाची... तिघीही माय लेकी खूपच गोड...! सोज्वल..! तिची छोटी मुलगी खुप बडबडी... चौकसबुध्दी व चंचल त्यामुळे आमची लवकरच ओळख झाली... एक दिवस जरी नाही भेट झाली तरी रुख रुख वाटायची...! शाळेच्या गेटसमोर आम्ही भेटलो की चार पाच मिनिटं एकमेकांची विचारपुस करायचो.. आणि तिथुन निघायचो.. पण रोजच मी न विसरता तिच्या गळ्यातील मंगळसुत्रा कडे पाहायचो.. मला तीचं मंगळसुत्र खूप आवडायचं. तिचं ते छोटंसं मंगळसूत्र... त्यात ठळक नक्षिदार दोन वाट्या.. तिच्या त्या गोर्‍यापान चेहर्‍यावर ते खूप सुंदर व तिला शोभून दिसायचं.! आम्ही एकमेकांची ओळख झाल्यापासून सुट्टीचे दिवस सोडले तर रोजच भेटत असंत..!

दिवाळीच्या सुट्टीनंतर अचानक तिच्या मुलींना दुसरंच कुणीतरी शाळेत सोडायला येऊ लागलं. एक आठवडा मी विचार करत होतो..की, असतील काही घरातील महत्वाची कामं.. त्या दिवशी मी तिच्या छोट्या बड-बडया मुलीला विचारलं.. बाळा काय गं.... तुझी आई नाही येत तुम्हाला सोडायला...?? तीने लाडीकपणे उत्तर दिलं.. "आमचे बाबा देवाघरी गेले ना...म्हणुन..!" तेव्हापासून आई सतत रडत असते..! मला धक्काच बसला... पायाखालची जमिनच सरकल्यासारखे झाले.. आता पुढे कसं छोटयाशा बालकांचं आणि त्या माऊलीचं... कसं काय होणार.. या आपुलकीच्या नात्याने विचारातच पडलो.. त्यांच्या आईचं जेमतेम बत्तीस वर्षाचं वय.. छोट्या छोट्या दोन मुली... छोटीला तर देवाचे घर म्हणजे काय असतं हे देखील कळत नाही... किती कौतुकाने सांगत होती.., की आमचे बाबा देवाघरी गेले म्हणून..!

दोन महिन्यांनी ती परत मुलींना सोडायला यायला लागली. आता तिचा चेहरा निस्तेज वाटु लागला होता.. आता गंभीर व उदास असायची... पण तीचं ते मंगळसूत्र आताही माझ लक्ष्य वेधत होतं. ते नक्षिदार वाट्यांच मंगलसूत्र तिला आजही शोभून दिसत होतं..

काही दिवस उलटून गेले.. ! ती आपली व मुलींची जबाबदारीचे हल एकटीच ओढु लागली..ती या दुःखातुन स्वतःला सावरु लागली होती... पण नियति आणि समाज एखाद्याच्या जीवनात काय घोळ घातलील याचा अंदाजही आपण करू शकत नाही..! अचानक एक दिवस तिच्या गळ्यातील मंगळसूत्रामध्ये त्या नक्षिदार वाट्यांच्या जागी लॉकेट दिसले आणि काळया मण्यांच्या जागी लाल - पिवळे मणी दिसले.. माझ्या पटकन ते लक्षात आलं... क्षणातच राहाववलं नाही म्हणून तिला विचारलं का गं.. काय झालं.. हे दुसरे मंगळसूत्र केलंस...?? तिने आजु-बाजुला पाहिलं आणि म्हणाली... ते तुटलं होतं ना म्हणुन..! मी म्हटलं.... खरंच.... की- मंगळसूत्रामध्ये वाट्या आणि काळे मणी होते म्हणुन..? आणि मी पुढचं बोलणं थांबवलं.. कारण मला अणि तिला.. आम्हा दोघींनाही काय म्हणायचं ते कळलं होतं..!

ती निघून गेली...! मी मनात विचार करू लागलो कोणत्या विश्वात आणि समाजात राहतो आपण...! एका बत्तीस वर्षाच्या स्त्रीचं सर्वस्व गेल्यावर... तिच्या गळ्यातील मंगळसूत्र पण समाजाच्या नजरेत खुपतं...! तिनं मंगळसुत्र वाटया व काळ्या मण्यांचं घालावं किंवा लॉकेट व लाल- पिवळ्या मण्यांचा भाग नाही... प्रश्न मंगळसूत्राचा नाही... प्रश्न आहे तो समाजातील मानसिकतेचा... एकतर नियतिने तिच्या जीवनातील आनंद हिरावून घेतलेला असतो... अणि अशा या छोट्या -छोट्या गोष्टीतून उरलेला आनंद ही समाज हिरावून घेतो...! नवरा मरण पावला तर यात त्या स्त्रीचा काय दोष..?? ती विधवा झाली आहे म्हणुन तिला आनंदी राहण्याचा अधिकार नाही का...?? तिने हिरवा रंग वापरु नये... का?? तिने हिरव्या बांगड्या घालू नये... का ?? तिने हळदी कुंकू करू नये का..?? म्हणजेच समाजही तिला तिच्या मनासारखं जगू ही देत नाही.. ती स्वतःवर पडलेल्या दुःखातुन बाहेर पडण्याचा केविळवाणा प्रयत्न करत असते.. दु:ख विसरण्याचा प्रयत्न करत असते.. पण समाज तिला सतत आठवण करून देत असतो... की, तू विधवा आहेस..! तिला तिच्या आवडी-निवडींची जबरदस्तीचे नियम लावून गलचेपी करतो..! तिच्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार नाही का तिला..?? तिचा आत्मबळ वाढविण्यामधे तिच्या कुटुंबियांचा खुप मोठा वाटा असतो... पण घरच्यांनी जर तिला आधार आणि ठाम पाठींबा दिला तर ती समाजाला खंबीरपणे तोंड देऊ शकते अणि या सगळ्यातून स्वतःला सावरु शकते अणि घरच्यांनी जर समाजाचा विचार करून काढून टाकायला लावला.. तर तिनं आधाराची अपेक्षा कुणाकडून करावी... आपली माणसं आपल्याच कुटुंबातील दुःखी स्त्रीचा विचार करत नसतील या समाजाच्या भितीने.. तिच्यावर बंधनं लादत असतील तर तिनं जगावं कसं..??
आहे का समाजाकडे उत्तर..???

-प्रदीप धयाळकर✍️✍️✍️

नोट- ही कौटुंबीक कथा पुर्ण पणे माझ्या अनुभवावर आधारीत सध्याच्या स्त्री जीवनावर लिहीली आहे..!
या कथेमध्ये- पात्र, स्थळ, नावं व कथेचा विषयात काही साम्य आढळून आल्यास तो केवळ एक योगायोग समजावा..!
ही स्वलिखित कथा आहे..! धन्यवाद🙏
कॉपी राईट कायदेशीर प्रतिबंध-
हक्क -लेखकाधिन !