अंकिलेश - एक प्रेमकथा - 14 Nitin More द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अंकिलेश - एक प्रेमकथा - 14

१४

@ अखिलेश

अंकिताला दर आठवड्यात भेटण्याचा मस्त प्लॅन तयार झाला म्हणून मी खूश झालो. कैलास त्या दिवशी कँटिनमध्ये माझी वाट पाहातच होता. म्हणजे तो शादी किसीकी भी हो.. अपना दिल गाता है म्हणायचा.

"तो क्या? उनसे मुलाकात हुई? बादमें जाने क्या हुवा? न जाने क्या बात हुई?"

"नाटक चांगले होते.."

"डोन्ट टेल मी, तू नाटक बघायला गेलेलास! उगाच ताकाला जाऊन भांडं लपवतोय.. चेहऱ्यावर स्पष्ट दिसते सारे.. चेहरा एक आइना होता है.. और हम उसका मुआइना करते हैं. तुरंत अंत.."

"गप रे.."

"या चार लाइन्स ऐक.. मग गपतो..

नाटक देखने के बहाने  मैं चुपकेसे आया दरपर तेरे

वापस तो आया मैं हँसके, झाडू लेकर वाट देख रहे घरपर मेरे.."

"तुला ना काय म्हणू ते कळत नाही. गप बस म्हणावे तरी अडल्या हरीला या गाढवाचे पाय धरावेच लागतात..'

"तू आणि हरी? हरी नव्हे, आय थिंक यू आर अ मॅन इन अ हरी! उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग! पण आता नवीन काय?

 

वो पड गये धपकन किसीके प्यारमें

अब ढूंढते हे तिनके का सहारा अपने यारमें?

 

यारों मत पूछो उसका क्या है हाल

अब चुप बैठूं मै.. रंगवेगा ये मेरा गाल..

 

तर बालका.. व्हाॅट्स द अपडेट आॅफ द लेटेस्ट गोंधळ?"

"गोंधळबिंधळ नथिंग. पण मला उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत दुचाकी हवी.."

"हॅतिच्या. दिली! माझ्याकडे आहे दुचाकी.."

"वा! ग्रेट! म्हटलेच.. गाढव विल ओन्ली हेल्प! शेवटी काय ओझे वाहायला तोच उपयुक्त! बोल कुठेय ती सायकल?"

"त्या आधी.. व्हाॅट हॅज सायकल गाॅट टू डू इन द लव्ह स्टोरी? तिला डबल सीट? हाऊ रोमँटिक!"

"ते सगळं नंतर.. आधी ती दुचाकी.."

"आहे.. फक्त ती तुला जमेल की नाही.. हाच प्रश्न आहे. म्हणजे काय ना.. माझ्या बहिणीच्याकडे आहे. तिच्या मुलाची.."

"चालेल. उद्यापुरती चालेल. नंतर पुढचे पुढे.."

"चालेल खरी.. पण मला वाटतं तुला ती लग्नानंतर पोरंबाळं झाल्यावर उपयोगी पडेल.. लहान मुलांची सायकल आहे ती.."

"गधड्या.. तुला मी ओरडूही शकत नाही नि मारूही शकत नाही.. कारण तूच मला यातून मदत करशील.. तुझ्या कोमल हृदयात मदतीसाठी उठणारे तरंग का मला दिसत नाहीत? त्यासाठी तुझी थोडी नादानी सहन करावी लागली तरी बेहत्तर!"

"लगाओ. अमूल बटर लाव. तिला सांगताना विचार नाही केलास? तेव्हा कळले नाही की आपल्याकडे सायकल नाही."

"नाही. तू म्हणालेलास तसा मी मौका ए वारदातवर मुआइना केला. तिकडे मला एक मैदान दिसले.."

"आणि तू मैदान मारलेस?"

"एकाएकी माझ्या डोक्यात एक रिंग वर्म आला.. म्हणजे कीडा बरे.. कीड्याने डोक्यात केली क्रीडा.. इट वळवळड.. मी झटक्यात बोलून गेलो.. सायकल चलाओ मेरी जान मेरी जान संडे के संडे.."

"मग तुला दंडे मारायला हवेत.."

"का? ती मौका ए वारदात ची आयडिया तुझीच होती! पचास टक्का दंडा.. तुम्हारा! पण ते सगळं सोड. मोबिलाइझ अ सायकल. मी अंकिताला सांगितलेय.. उद्या आणि दर रविवारी.. मैदान ए जंग.."

"जंग की प्यार? मैदान ए प्यार! पण सायकलीचे काय यार?"

"तोच प्रश्न आहे. आता पाच वाजलेत. पुढच्या पाच सहा तासात सायकलीचा शोध घ्यावा लागेल.. कुणी सायकल देता का सायकल.."

"ह्या मायकलला सायकल हवीय.."

"तू काहीही म्हण. पण माझे मन मला सांगतेय.. ती सायकल तूच मिळवून देशील. शेवटी फ्रेंडीन्नीड इजे फ्रेंडींडीड!"

"लावा अजून अटर्ली बटर्ली विजया बट्टर.. आणि का कोणास ठाऊक सगळे अपमान या चहाच्या घोटासारखे गिळून मदत करायचे मी सोडत नाही.."

तो समोरच्या कटिंग चहाचा घोट घेत म्हणाला.

पुढे सायकल कुठे मिळेल याच्याबद्दल साद्यंत विचार झाला. मागे सायकली भाड्याने मिळत. एक तासासाठी वगैरे. पण ती दुकाने बंद पडली.

आमच्या बाजूला एक काका होते त्यांच्याकडे दोन सायकली होत्या. विचारले तर दिली असती एक. पण कशासाठी हवी नि दर रविवार काय असते तुझे असे विचारले तर काय सांगावे? गर्लफ्रेंडला भेटायचेय म्हणून? कितीही सत्यवादी असला तरी असे काही सांगेल? इथे थोडा डिस्टंट कोणी पाहिजे.. कैलासचा एक मित्र.. मोठ्या आशेने त्याच्याकडे गेलो. तर तोच तसा काही प्लॅन बनवत होता! म्हणजे एक छतरी और हम दोनों सारखे एक सायकल और हम दोनों असे काहीतरी.

कैलासच्या मित्राकडून बाहेर पडता पडता कैलास म्हणाला,

"आयडिया! तू एक कर.. इथून पुढे गेलास ना की एक चौक लागेल. तिकडून डावीकडे वळ. मग एक रस्ता लागेल. त्याच्या दुसऱ्या सिग्नलच्या गल्लीत जा. तिसरे दुकान.. तिथे विचार.."

"काय?"

"सिंपल.. विचार की बुवा यह सायकल कितने को दी? कारण ते सायकलीचे दुकान आहे.."

"आणि त्याला तुझे दात पाडून देऊ की चिंचोके?"

"एनिथिंग! अरे मागच्याच आठवड्यात एका दाताला गोल्डन कव्हर लावलंय. एक अजून आयडिया आहे.."

"प्रॅक्टिकल असेल तर सांगा. उद्या म्हणशील सायकलींच्या दुकानावर नोकरीला लाग.."

"नाॅट अ बॅड आयडिया! पण मी तुला ॲक्च्युअली डायरेक्ट सायकल फॅक्टरीत काम शोधायला सांगणार होतो!"

खूप विचार करूनही मार्ग सापडेना. रस्त्यात जाता येता कित्येक लोक सायकलीने जाताना दिसत होते. मी म्हटले, या जगात किती नाइन्साफी आहे.. जो जे वांछिल तो ते लाहो.. प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितले.. पण मला मी वांछिलेली साधी सायकल मिळू नये?

साडेसात झालेले. आठपर्यंत अंकिताला फोन करून सांगता येईल.. काही अपरिहार्य कारणामुळे उद्याचा कार्यक्रम पुढे ढकलावा लागत आहे. गैरसोयीबद्दल क्षमस्व.. पण होणारी गोष्ट होणारच असते! होनी विल बी होनी!

म्हणजे आम्ही असेच परळच्या गल्ल्या तुडवत निघालेलो. इतक्यात आमचा एक काॅमन मित्र सायकल घेऊन निघालेला.. रस्त्यात भेटला.

"अरविंदा, काय कुठे?"

"कुठे काय? मी इथेच! माझ्याच गल्लीत मलाच विचारताय? मीच तुम्हाला विचारतोय, तुम्ही इकडे कुठे?"

"अरे याचं काम आहे.. सायकलीसाठी जगदीशा.. वणवण फिरविशी, देशी क्लेशा.."

"म्हणजे?"

"म्हणजे काय?"

मग त्या अरविंदाला माझी अजून पर्यंत कच्चा ढांचा असलेली प्रेमकथा सांगून झाली.. आता पुढची सारी भिस्त सायकलीवर.. ऐकून अरविंद म्हणाला,

"दिली.. दर रविवार सकाळी सहा ते साडेआठ.. पण साडेआठाला परत हवी.. कारण.."

"कारण काय?"

"तुमच्यापासून काय लपवावे? अशाच कारणासाठी हवीय..!" तो सांगताना चक्क लाजला! बापरे! आजकाल सायकलीवरून प्रेमं जमवायची साथ आलीय की काय?

"ॲग्रीड. इतकी तू मदत केलीयस. आठ एकोणतीसाला सायकल विल्बी बॅक.."

"आणि हा माझा मित्र शब्दाचा पक्का आहे.. फक्त त्याच्या गर्लफ्रेंडला शब्द देता येईल का ते पाहतोय!"

हे बोलून होईतो आठ वाजायला पाच मिनिटे बाकी होती. म्हणजे आता रूकावट के लिए खेद है म्हणत फोन करायची गरज नव्हती. सायकलीचा शोध लावण्याहून सायकल शोधणे कठीण झाले म्हणायचे! सकाळी पावणेसहाला बाहेर.. सहा वाजता सायकल घेऊन बाँबे सेंट्रलास कूच.. सहा वीस ग्राउंड टच.. साडे सहा.. अंकिता दर्शन.. ते साडेसात पर्यंत. आठाला सायकल बॅक टू अरविंद! मी मनातल्या मनात टाइमटेबल बनवले.. ते पुढे सहा एक महिने चालले, मेरी जान, मेर्री जान आना संडे के संडे म्हणत!

ती सायकल घेऊन त्या ग्राउंडवर पोहोचलो मी. अंकिता माझ्या मागोमाग तिच्या सायकलीवर आलीच. सकाळची छान हवा, मंद वारा त्यात अंकिताबरोबर पहिल्यांदाच असे फिरणे. मनात खूप काही होते पण बोलायला सुचत नव्हते. एक क्षण वाटले हा क्षण असाचा गोठवून ठेवावा. पण क्षणाक्षणाने तो एक तास संपला. एक तास अखंड गप्पा झाल्या. त्यामुळे झाले ते एकच, अंकिताबद्दलची ओढ अजून अनावर झाली. बडे घरकी बिगडी औलाद हा सिनेमावाल्यांचा आवडता शब्दप्रयोग असेल पण अंकिता बडे घरकी असूनही डाऊन टू अर्थ म्हणावीशी. आता डाऊन टू अर्थला मराठीत काय म्हणावे? पृथ्वीलगत? की जमिन संलग्न? पण अंकिताबद्दल बोलायचे तर इंग्रजी शब्दच वापरायला हवा!