अंकिलेश - एक प्रेमकथा - 19 Nitin More द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अंकिलेश - एक प्रेमकथा - 19

१९

@ अखिलेश

सेकंड इयरचा रिझल्ट!

अपेक्षेप्रमाणे अंकिताला चारही विषयात डिस्टिंक्शन. मला तिची तयारी नि हुशारी जवळून ठाऊक होती. पण परीक्षेचा खरा अजून एक फायदा होता, आम्हा दोघांनाही एकच सेंटर आलेले, विल्सन काॅलेज, चौपाटीवरले. त्यामुळे चार दिवस लागोपाठ एक्झाम सेंटरवर ती भेटत होती. काही नाही तर ती दिसली, निघताना जुजबी बोलणे झाले की बरे वाटायचे. शेवटच्या दिवशी समुद्रावरचा गार वारा खात गिरगाव चौपाटीवर भटकणे झाले. तिची तयारी पाहून तिला चारही विषयांत डिस्टिंक्शन मिळणार हे मला तेव्हाच लक्षात आलेलं. अख्ख्या मुंबई युनिव्हर्सिटीत असे एकूण चार पाचच जण. त्यामुळे हिच्या डिस्टिंक्शन्सचे बिल 'बडे बाप की इकलौती बेटी' वर फाडले जाणार हे माहितीच होते. पण अंकिता याच्या पलिकडे पोहोचलेली. उगाच वाद घालण्यात अर्थ तो काय? एकदा आधी निष्कर्ष नि मग त्याला सपोर्टिंग पुरावे गोळा करायला लागले ना की त्यावर उपाय नसतो. कितीही अतार्किक असले तरी हे निष्कर्ष कधीच बदलता येत नाहीत.

ते एक राहू देत!

तर सेकंड इयरचा रिझल्ट लागला नि मी खुशीत दिसलो तर कैलासला जणू माझी टांग खेचायचा परवानाच मिळाला. म्हणाला, "नशीब फेल नाही झालायस स्वत: नाहीतर तरीही आला खुशीत समिंदर म्हणत नाचला असतास!

रिझल्ट क्या आया उनका यह हो गए पागल

मत पूछ लेकिन दोस्त! मार्कशीट में मेरे क्या है!"

"काय हे?"

"प्यार में पागल हुवा आवारा दीवाना

जस्ट वेट! होगा जल्द ठाणे मेंटल में रवाना!"

"बोल बेटा बोल. तुम्हारे दिन हैं.. ऐकून तर घ्यावेच लागेल. आणि मध्ये मध्ये मदत बिदत लागली तर मला पामराला दुसरं कुणी आहे तरी कोण? तुम बिन जाए कहां? तेव्हा ऐकून घेतो.."

"ओ के आजोबा.. तुमचे काय? पिकले पान कधी गळेल सांगता यायचे नाही. आहात तोवर घेतो काळजी.."

रिझल्ट नंतरच्या रविवार सकाळच्या सायकल फेरीत अंकिता भेटली तेव्हा ती अगदी खुशीत होती.

"काँग्रॅटस्. यू डिझर्व्ह इट! ग्रेट!"

"तुला पण काँग्रॅटस्. तुझ्या न आवडत्या फार्म्याकमध्ये डिस्टिंक्शन इजन्ट अ स्माॅल थिंग!"

"असं म्हणतेस. मग ठीक आहे! फार्म्याक तर फार्म्याक! काॅल्स फाॅर अ पार्टी! मग व्हाॅट्स द प्लॅन टू सेलिब्रेट?"

"सांगू? पुढच्या रविवारी..!"

"विचार करणार पुढच्या रविवारी.. प्लॅन पुढच्या रविवारी बनवणार की प्लॅन सांगणार पुढच्या रविवारी?" खरेतर मी म्हणणार होतो, हरकत नाही, असे ही हल्ली लाइफ इज संडे के संडेच सुरू आहे!

"नो. संडेला इम्प्लिमेंट करणार!"

"म्हणजे?"

"दिल्ली दरबार.. नेक्स्ट संडे."

"तू काय मुघल घराण्यातली बेगम वगैरे बनणार आहेस की काय? अंकिता बेगम? मग डायरेक्ट दिल्ली दरबार?"

"नाही रे. दिल्ली दरबार हाॅटेलात लंच. पुढचा रविवार! माझे ममी पपा पण नाहीएत.. दे आर गोईंग टू अस्थानाज प्लेस. सो बिनधास्त जाता येईल.."

शेवटची तीन वाक्यं ती मनाशीच बोलल्यासारखी बोलत होती. आता मला तिची ती मनातली वाक्ये ही ऐकण्याची सवय झाली होती!

"आणि द ट्रीट विल बी फ्राॅम मी! तू फक्त इकडे येऊन उभा रहा. दुपारी बारा वाजता. डबल डेकरच्या वरच्या मजल्यावरून जाऊयात.."

"नेहमीप्रमाणे.." हे शेवटचं मी.. मनातल्या मनात म्हणालो! आजकाल मुंबईत डबल डेक्कर बंद होताहेत. पण बिचाऱ्या आमच्यासारख्यांची पंचाईत कोणी बघायला तयार नाही! अर्थात त्यावरही आजकालच्या पोरांनी सोल्यूशन शोधून काढलंच असणार! कारण शेवटी दिल है कि मानता नहीं हेच खरं!

त्या दिवशी दिल्ली दरबारात आम्ही जणू सरदार नि सरदारणी सारखे गेलो! तिचे मित्रमंडळी अजून कोणी नव्हते. फक्त मी आणि ती! शेवटी काय तिचे प्लॅनिंग! ते परफेक्टच असायचे. इतके महिने आम्ही दरवेळी भेटल्यावर कशाबद्दल बोलत असू? आज आठवत नाही. पुढे प्रपोझल वगैरे स्टेज पार पडल्यावर बोलायला प्रेमसंवादांची कमी नव्हती, ते अर्थातच तसे सगळेच सांगणार नाही मी, मागे कुठेतरी वाचल्याचे आठवतेय,प्रेमपत्राचे जाहीर वाचन हे फक्त हशा पिकवते. तसंच हे प्रेमसंवादांचे.. त्या दोन प्रेमी जिवांना सोडून इतरांना हास्यास्पदही वाटू शकते ते. प्रेमी जिवांचे जग निराळे, हिशेब निराळे नि त्यामुळे संवाद ही निराळेच असायचे! तेव्हा ते सारे सांगायची गरज नाही, पण त्या आधी? आम्ही आॅलमोस्ट अ पेअर झालेलो. आमच्या काॅलेजात तशा चर्चा होत्या. ती आली की मित्रमंडळी, युवर जी एफ हॅज कम म्हणायची! तशी ती गर्ल होतीच नि फ्रेंड ही होती. पण गर्लफ्रेंडचा दर्जा तिला खरेतर मिळायचा बाकी होता! मराठीत प्रेयसी म्हणतात तो शब्द या गर्लफ्रेंड पेक्षा किती जास्त रोमँटिक वाटतो नाही? तर या 'प्रकरणा'स गोईंग स्टेडी म्हणतात हे इंग्रजी ज्ञान मला त्यातून मिळालं असलं तरी दिल्ली दरबाराच्या भोजनसमयी असे काही नव्हते, म्हणजे आमची कमिटमेंट वगैरे झाली नव्हती. आणि इथे भानगड किंवा प्रकरण यापेक्षा हा इंग्रजी गोइंग स्टेडी रोमँटिक नसला तरी जरा बरा शब्द आहे! इतके नक्की आठवायला कारण म्हणजे तिच्या आईवडलांच्या त्या अस्थाना व्हिजिटनंतरच एक बाँब फुटणार होता. नि त्यामुळेच तर आमचे 'प्रपोझल' घडणार होतं! ती नंतरची म्हणजे अगदी पुढील दोन चार दिवसात होणारी गोष्ट. पण त्याची कल्पना आम्हाला दिल्ली दरबारी रूजू होताना नव्हती हे खरं! होनी को कोई नहीं जानता आणि होनी को कौन टाल सकता है? दोन्ही गोष्टी खऱ्याच! बाकी एक 'ती सायकल माझी नाही' इतकी गोष्ट सोडली तर अंकिताला माझ्या बाकी परिस्थितीची पूर्ण कल्पना आली होती. तिला अंधारात ठेवून पुढे जाणे म्हणजे कच्च्या पायावर मोठी इमारत बांधणे. तो डोलारा कधी न कधी कोसळणारच! माझ्या प्लस मायनस सकट तिने मला स्वीकारले तरच ते आयुष्यभर टिकणार!

दिल्ली दरबार तसे महागडे हाॅटेल आहे. एअर कंडिशण्ड, गुबगुबीत सोफ्यासारख्या खुर्च्या. शाही कारभार सारा. तिथे जाण्याची मी फक्त स्वप्नेच पाहू शकत होतो. पण खरे सांगतो, मला असली स्वप्ने कधी तेव्हाही पडली नाहीत नि आज ही नाहीत. आजही अंकिताचा आग्रह नसतो असल्या कुठे जाण्याचा. आता परवडणारच नाही असे नाही अगदीच पण दोन जणांच्या सरकारी पगारावर घर चालवायचे तर थोडी ओढाताण व्हायचीच.

पण त्या दिवशी अंकिता दिल्ली दरबारमध्ये सराईतासारखी आॅर्डर करत होती.. माझ्यासाठी. तिचे स्वत:चे खाणे ते काय? चिमणीसारखे! बिल ती भरणार होती म्हणून ठीक होते नाहीतर मेन्यू कार्ड उजवीकडून डावीकडे वाचताना मला कदाचित फक्त तेथील लिंबूपाणी परवडले असते! आणि ते मी दर रविवारी कर्टसी अंकिता पीत होतोच ग्राउंडवर. त्यासाठी हा दिल्ली दरबारच कशाला हवा?

थोडक्यात परिक्षेच्या निकालाचे सेलिब्रशन मस्त झाले. परत बसने आम्ही निघालो. गंमत सांगतो, आज बस लवकर आली नाही तर इरिटेट व्हायला होते, तेव्हा बस पटकन न मिळाली तर बरे असेच वाटायचे! काळाचा महिमा म्हणावा आणि काय!

त्या दिवशी बसने परत येताना अंकिताला म्हटले, "हल्ली तुझी गाडी आणत नाहीस ते?"

मी सायकलीचा विषय टाळायचो तसा तिने गाडीचा विषय टाळण्याचा प्रयत्न केला.. मग म्हणाली,"तू म्हणालास तसेच, डेस्टीनेशन इज इंपाॅर्टंट अँड नाॅट द व्हेईकल!"

"आणि जर्नी?"

ती हळूच पुटपुटली,"दॅट डिपेंडस अपाॅन द कंपनी!"

मी ही मनात म्हणालो, कंपनी म्हणजे कंपॅनियन!

पुढे तिनेच मला ते गाडी न वापरण्याबद्दल सांगितलेले. सवय व्हावी म्हणून बसने जाणे येणे! पुढे कित्येक वर्ष आम्ही गाडी घेऊ शकलो नाही तेव्हाही तिची तक्रार नव्हती. गाडीसाठी कर्जे स्वस्त झाली तेव्हा हल्लीच नवीन गाडी दारी उभी राहिलीय. तिला ड्रायव्हिंग आधीच येत असल्याने ड्रायव्हर सकट गाडी म्हणावे! शेवटी काय इट्स जस्ट अ व्हेईकल! डेस्टिनेशन, प्रवास नि प्रवासातले सोबती महत्वाचे. मग गाडी कोणती का असेना!