गणपती बाप्पा Madhavi Marathe द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

गणपती बाप्पा

                                                                                              गणपती बाप्पा

 

 

वेगवेगळ्या गावात, राज्यात राहिल्यामूळे आम्हाला खूप तऱ्हेच्या रितीभाती, पारंपरिक सण समारंभ, प्रथा, रूढी, विचार ऐकायला आणि पहायला मिळाले. त्यामधून ठिकठिकाणचे पारंपारिक सण पहाताना फार छान वाटले. त्यातून एक लक्षात आले की जेव्हढे तुम्ही  परंपरा सांभाळून कराल तेव्हढे तुम्हाला कष्ट तर होतात पण आनंदही फार मोठा मिळतो. पण आजच्या शहरी, घाईगर्दीच्या आणि विभक्त कुटुंब पध्दतीच्या जमान्यात जेव्हढी परंपरा सांभाळून करता येईल तेव्हढे करून आनंद घेतला जातो. ते योग्यच आहे. पण खेडेगावात तुम्ही जाल तर त्या सणांच स्वरूप फार वेगळे आणि सांघिक असते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यन्त प्रत्येकाला आपले एक स्थान, महत्व तिथे दिसून येतं. हे सगळे बघताना लक्षात आलं, आपण बाकी सगळं बघितलं पण आपलाच पारंपरिक पध्दतीचा गणपती बघितला नाहीये.

      गोव्याला असताना तो योग जुळून आला. एकदा सहज माझ्या मैत्रिणीला हा मानस बोलून दाखवला, तेव्हा ती लगेच म्हणाली “ अगं आमच्याकडे चल ना. कवळ्याला आमचा वाडा आहे आणि गणपतीला आम्ही सगळे तिथे एकत्र येतो. अगदी कुणाकुणाचे मित्रमैत्रिणीसुद्धा येतात. जवळपास आम्ही ५०/६० जणं असतो. खूप मजा येते. तर तू यावेळेस माझ्याबरोबर गणपतीसाठी कवळ्याला येणार हे पक्क. फक्त तुला जमत असेल तर थोडं आधी चल. म्हणजे नुसता बसवलेला गणपती आणि स्वैपाक पहाण्यापेक्षा तुला आधीची तयारी, ती करतानाची गडबड, उत्साह, गप्पा या सगळ्याची मजा घेता येईल.” वा! आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे. अशी माझी अवस्था झाली. त्यांचा गणपती दीड दिवसाचाच होता. त्यामुळे तीन एक दिवसांचा प्रश्न सोडवता येण्यासारखा होता.

     श्रावणसरी ओघळून लवकरच गणपतीचे दिवस आले. ठरल्याप्रमाणे दोन दिवस आधी मेघनाबरोबर कवळ्याला गेले. श्रावणातली सोनसळी उन्ह पिऊन गोव्यातला निसर्ग आपला ठेवणीतला हिरवागार शालू लेऊन सणासाठी जणू काही तयार झाला होता. पेरणीची कामं संपून, तरारून अर्धीकच्ची रोपं वर येऊन आतुरतेने बाप्पाची वाट बघत होती. नाना रंगांची फुलं, वाऱ्याबरोबर डुलणारी शेतं वातावरणात आनंद पसरवत होती.

      मेघनाच्या घरी आम्ही पोहोचलो. अगदी परंपरागत असा तो चौसोपी वाडा कौलारू होता. एका बाजूला भातशेती डुलत होती. तर वाडयाभोवतीची जागा नारळ, पोफळी, आंबा, चिक्कू, पपई, सोनचाफा, नाना प्रकारची फुलझाडे यांनी व्यापली होती. कुत्र्याने, मेघना कुटुंबियाना पहाताच शेपूट हलवत ओळखीची साद घातली. माझ्याकडे साशंकतेने बघत त्याचे कान टवकारले आणि शेपूट सरळ झाले. मला हुंगण्यासाठी नाक वर गेले हे बदल मी टिपले. आम्हाला पाहून आतली मंडळी बाहेर आली. सणांचा रंग आता सगळ्यांच्याच मनात ओसंडून वहात होता. त्यांच्या गाठीभेटी झाल्यावर माझीही सगळ्यांशी ओळख करून दिली. तिच्या सासुबाईंनी अगदी लेकीसारखी रहा असं म्हणत लगेच आपलसं केलं. मग बाकी नाती तयार व्हायला कितीसा वेळ लागणार. घरातल्या आजी आजोबांना मी कशासाठी आले हे कळाल्यावर तर फारच आनंद झाला. आपल्या जमान्यातल्या गोष्टी ऐकणारा कुणी श्रोता मिळाल्यावर वृध्दांच्या चेहेऱ्यावरचे भाव फारच प्रेक्षणीय असतात.

     सगळं घर दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या चवथसाठी तयारी करत होतं. गणपतीसाठी घरात रंगरंगोटी झाली होती. मातीच्या भिंतीना लाल मातीचा मुलामा चढवला जातो. तो वाळल्यावर गणपतीच्या खोलीच्या भिंती देखाव्याने आणि नक्षीदार वेलबुट्टीने सजवल्या जातात. सगळेजण आपापल्या परीने सणाच्या तयारीत भाग घेत होते. बाळगोपाळ माटवीला सजवण्यासाठी रानफुलं, वेली, नारळ, सुपाऱ्या, तुरिंग कांगला, कुडळा, नागुचे फुडे, घागऱ्या पोफळीचे कातर अशा सगळ्या वनस्पती गोळा करून एका जागेवर ठेवून देत होते. तरुण मुले शमेळ, घुमट, तबला पेटी, मृदुंग, यांची जुळवाजुळव आरतीसाठी करत होते. म्हाताऱ्या बायका सुनांवर देखरेख करत वाती, एकारती वळणं, वाडगे पडगे साफ करणं ही कामे करत होत्या. मुलींचे रांगोळ्यांचे रंग, डिझाईन, मेंदी, सणाला घालायचे कपडे, दागिने ठरवणं, आईच्या हाताखालीची कामे असे चालू होते. नात्यांचे सगळे विखुरलेले बंध सणानिमित्त एकत्र आल्यामुळे एक नाळ जुळली गेली होती. गप्पांना ऊत आला होता. कामाच्या सोबतीला, वेगवेगळ्या गावाहून आलेल्यांनी आणलेल्या वैशिष्टपूर्ण मिठाया व बाकी गोष्टीचा फराळही चालू होता. मी आपली सगळ्यांच्या मधे लुडबूड करत होते व त्या त्या वयाचा उत्साह अनुभवत होते. इथे गणपतीचा सण सगळ्यांच्या अंगात भिनला होता.

       गणपतीला म्हणजे गणपती बसतात त्या दिवशी नेवऱ्यांना (करंज्याना) खूप मान असतो. या विविध प्रकारांनी बनवलेल्या असतात. ओल्या नारळाच्या, पुरणाच्या, सुक्या किसलेल्या खोबऱ्याच्या, पंचखाजेच्या, रव्याच्या, पिठाच्या, तिखट पिठीच्या, अश्या विविध प्रकारांनी नेवऱ्या करतात. तसेच पूरण घातलेले चित्रविचित्र आकाराचे पदार्थही बनवले जातात. मुगाचे लाडू, चुन घातलेली मुठळी, पातोळया, गोडपोहे, गुळाच्या पाकातले पीठ घेऊन काही पदार्थ केले जातात. नेवऱ्यांची तयारी दुपारी सुरू झाली. रवामैदयाच्या पांढऱ्याशुभ्र गोळ्याची पाठ तिंबून आजीनी त्याला छान मऊसुत केले. नेवरीमध्ये घालायचे सुकेमेवे, नारळगुळाचे मिश्रण परतून थंड करायला ठेवले. चार हात पडल्यावर नावेच्या आकाराच्या पांढऱ्याशुभ्र नेवऱ्या लाटून, बाजूला ठेवलेल्या स्वछ साडीवर लाईनीत ठेवल्या गेल्या. आजींची शिस्त. सगळं कसं रेखीव. दोन तीनजणी तळायला बसल्या. एक एक नेवरी तेलात तृप्तपणे अंग शेकून बदामी झाली की उचलली जात होती व पसरलेल्या पेपरवर तेलकट अंग पुसून, टिपून घेत होती. थंड झाल्यावर त्या आपल्या डब्यातल्या तात्पुरत्या घरात पोहोचणार होत्या. दुसरीकडे पिवलधम्म मुगाच्या डाळीचं भरड पीठ साजुक तुपात परतलं जात होतं. सगळा वाडा नेवरीच्या व लाडूच्या खमंग वासानी दरवळून गेला होता. त्या वासानी सगळ्यांची मनं भरून गेली. सणासुदीला खालेल्या या गोष्टींची मजा, नंतर कितीही खाल्लं तरी त्याला येत नाही. चकल्या चिवड्यांचे घाणे झाले. आजचा दिवस यातच संपला.

   दुसऱ्या दिवशी हरतालिका होती. गणपतीच्या खोलीत एका चौरंगावर देवी, सखी मांडल्या गेल्या. इथे मुर्तींची पूजा करायची पद्धत होती. देवीच्या समोर समईवाती उजळून धुप उदबत्यांचा घमघमाट केलं गेला. एका ताटात सौभाग्यवाण, विडा सुपारी, पंचफळं, सुकेमेवे, मिठाया ठेवून दुधाचा नैवेद्य दाखवला गेला. इथे हरतालिकेला उपास करत नाहीत. माता तर घरात विराजमान झाली आणि आपल्या मुलाची वाट पाहू लागली. आज स्वैपाक खूप वेगळा असा नव्हता. आता गणपती बसणार ती जागा सजवण्याची तयारी सुरू झाली. मुलं, मुली, तरणे,हरणे, सगळेच आपापल्या पद्धतीनी काम करू लागले. एका टेबलावर चौफुली चौरंग, मखमलचे कापड घालून तयार केला. त्याच्या बाजूने खेळणी, फ्लॉवरपॉट ठेऊन लाइटिंगच्या माळा सोडल्या. मखराची आरास झाली. गणपती बसल्यावर समोर बश्यांमध्ये नेवऱ्या, मुगाचे लाडू ठेवले जातात.

      इथे माटोळी नावाचा वेगळा प्रकार पहायला मिळतो. ही माटोळी मखराच्या पुढे छताला टांगून बांधली जाते. बांबूच्या काडयांपासून सर्वसाधारणपणे चौकोनी आकाराचा सांगाडा आधी तयार केला जातो. तो छताला बांधला की या माटोळीला सर्वप्रथम मध्यभागी बांधले जाते. त्यात ५-७-९ अश्या विषम संखेत नारळाची पेंड, मोठ्या आकाराचा न सोललेला नारळ बांधला जातो. त्यानंतर माटोळीच्या चारही कडांना आम्रपर्णाच्या डहाळ्या बांधल्या जातात. जंगलात किंवा डोंगरावर सापडणारी कांगला, कुडला, नगुचे कुडे, घागऱ्या पोफळीचे कातर, तुरिंग अश्या अनेक वस्तु माटोळीला बांधल्या जातात. त्या बांधण्यासाठी दोरी किंवा सुंभ वापरला जात नाही तर त्याएवजी केवणीचे दोर वापरले जातात. दुधीभोपळा, द्राक्ष, घोसाळी, तेवशी केळ्यांचा घड, उंबर, काकडी, रातंबा, मक्याचे कणीस, सफरचंद, डाळिंब यासारखी निसर्गाची देणगी माटोळीला  बांधतात. अश्या सुंदर सजवलेल्या हिरव्यागार माटोळीत लाल सफरचंदे आणि हिरव्या द्राक्षांचा घोस रंगसंगती व कलाकुसर साधत होते.

       आता बाप्पांच्या स्वागताची तयारी जवळपास पुर्ण झाली होती. संध्याकाळी मूर्ती घरी आणायचा कार्यक्रम होता. चार वाजता अंगणात सडा रांगोळी घातली गेली. मोठी मंडळी व बाल मंडळी तयार होऊन परंपरागत मूर्तिकाराकडे मूर्ती आणायला गेले. त्यांना नारळ व पैसे देऊन एका ताटात गणपती बसले. बाप्पांच्या डोक्यावर वस्त्र पांघरून वाजत गाजत घरी यायला निघाले. दुतर्फा हिरवळीच्या निसरड्या बांधावरून वरात जात होती. घरी आल्यावर बाहेरच्या अंगणात फटाके वाजवून देवरायाचे स्वागत केले गेले. पार्वतीच्या मळापासून झालेला पुत्र गणपती या दंतकथेचा अन्वयार्थ आजोबांनी असा सांगितला की पर्वत धातुवरून आलेले नाव पार्वती. अर्थात विशाल हिमालयाच्या पायथ्याशी पसरलेली धरती. पार्वती आंघोळीला जाते म्हणजेच धरित्री पाऊस अंगावर घेते. या पर्जन्य स्नानात तिच्या अंगावरील मळ म्हणजेच माती पाण्याबरोबर वाहून शेतात साचते व त्याचा चिखल होतो. कालांतराने त्याची चिकणमती बनते व त्यापासून गणपती तयार केले जातात.

     चवथच्या दिवशी सगळ्यांचीच धांदल उडाली. मुली सडा रांगोळी रेखू लागल्या. घरातल्या बायका न्हाऊमाखुन भरजरी साड्या आणि सोन्याच्या कितीतरी दगिन्यांनी मढल्या. काहीजणी मुकटं नेसून सोवळ्यानी स्वैपाकाला लागल्या. काहीनी त्यांच्या हाताखाली चटण्या, कोशिंबीरी, भाज्या चिरण्याची तयारी सुरू केली. मुलांनी फुले तोडून मोठा हार तयार केला. आजोबा पूजा सांगायला सोवळं नेसून पाटावर येऊन बसले. आज ज्याचा गणपती पूजेचा मान होता तो, पितांबर नेसून अंगावर सोन्याचे दागिने घालून पूजेला आला. आपली ऐपत असेल त्या समृद्धतेनी देवाची पूजा करावी असे आजोबांचे मत होते. देवाचा चांदीचा मुकुट, सोन्याचे जानवे, गळ्यातले दागिने सगळे खऱ्या सोन्याचे होते. पूजेचा सरंजाम चांदीचा होता. दोन मोठ्या पितळी कलाकुसर असलेल्या समया चहू अंगानी तेवत होत्या. धुप, उदबत्तीनी आपल्या अस्तित्वाने पवित्रता पसरवली होती. गणपतीबाप्पांच्या समोर असलेल्या रांगोळीतून मांगल्य जाणवत होते.   

    पूजा सुरू झाली. मंत्रघोषात, फटक्याच्या आवाजात बाप्पा स्थानापन्न झाले. आपल्या लोकांना भेटण्याचा आनंद बाप्पांच्या चेहेऱ्यावरही ओसंडून वहात होता. आशिर्वादाचा हात सर्वांवर ठेऊन ते पूजा स्विकारू लागले. गंध, अक्षता, गुलाल, कुंकुम, अक्षतगंध, विविध पत्री, फुलं, गळ्यातला हार, सोन्या मोत्याचे दागिने, रेशमी वस्त्र लेऊन बाप्पा प्रसन्नपणे सगळ्यांच्या मनातले भाव निरखत आहेत असे वाटू लागले. बाप्पांच्या पूजेनंतर उजव्या बाजूला गौरी शंकराची पूजा केली जाते. हळद व हरणीची पिवळ्या फुलांची रोपे, चिड्याचे इवलेसे रोप, पत्री आळवाच्या भल्यामोठ्या पानाला एकत्र बांधले जातात. या पानाला कासाळे म्हणतात. त्या पानाची जुडी करून त्याला गौरीचे चित्र गुंडाळतात व ती पूजेला लावतात. या गौरीला काळ्या मण्यांचे मंगळसूत्र घातले जाते. गणपती विसर्जन करताना गौरीचे विसर्जन घरच्या तुळशी वृंदवनात करण्यात येते. न सोललेल्या नारळाच्या रूपात शंकराची प्रतिकात्मक पूजा केली जाते.

     इकडे स्वैपाकघरात वेगळीच धांदल उडलेली होती. वरणभात, अंबाड्याचा रोस, खतखते, चण्याचा तोंडाक, तेंदल्याची भाजी, तेरे किवा अळू, तायखिळो किंवा म्हसक्याच्या पानांची भाजी, मूठळया, पातोळया, तळण असे अनेक प्रकार तिथे शिजत होते. विविधरंगी पदार्थ व वासांची लयलूट झाली होती. उकडीच्या मोदकांचा तर समारंभ चालू होता. दोनजणी आजींनी, तांदूळाची उकड काढून दिलेल्या गोळ्याच्या पाऱ्या बनवत होत्या व दुसऱ्या सुगरणी सोळा पाकळ्यांचा एक, असे मोदक तयार करत होत्या. गॅसवर मोदकपात्रात पाणी उकळत होते. आतमधले साचे लवकरच मोदकांनी भरून गेले व शिजू लागले. दोघी तिघीजणींनी मीठ, चटण्या, कोशिंबीरी, भाज्या, तळण, मिठाया, पातोळया एका जागी ठेऊन केळीची पानं, चौफुले पाट, पाण्याचे जग, ग्लास, वाट्या, अशी सगळ्याची तयारी करून ठेवली. मुलींनी विडे तयार केले होते.

    सगळी गडबड आटोपत आली. पूजा संपत आली. महानैवेद्याची भली मोठी चांदीची ताटं, वाट्या वाढली गेली. एक देवाला, एक गणपतीला अशी ताटं वाढून झाल्यावर नैवेद्य मग आरती. महाआरतीचा थाट तर काही औरच होता. शमेळ, घंटा घुमट, कासाळे किवा पेटी, पखवाज, झांज घेऊन आरत्या सुरू झाल्या. शमेळ घुमटावरच्या आरत्यांना व्हडले वाजप म्हणतात. सगळे वेगवेगळ्या आवाजात एकसूर पकडून भक्तिपूर्ण आरत्या म्हणत होते. वर्षानुवर्ष या आरत्यांना सरावलेले, सगळेजणं आपल्या भारदस्त आवाजात गात होते. नवखे सुर पकडत होते. कुणी आरत्यांच्या शब्दांना घोळवल्यासारखे म्हणत होते. कुणी वाद्यांच्या आवाजात आपला आवाज लपवत होते. घरचे आजीआजोबा मंडळी पुढचा उत्सव पाहू शकू किंवा नाही या विचारात श्रद्धेने आरती करत होते. आरत्यांच्या गजरानंतर मंत्रपुष्पांजली सुरू झाली. सगळ्यांचीच मन भक्तीभावाने ओथंबून आली होती. बाप्पांना भेटण्यासाठी सगळ्यांनीच किती कष्ट केले होते. त्याचं सार्थक झालं. सगळ्यांना आरती फिरवली गेली. मंत्राक्षता वाहून बाप्पांच्या पायावर डोकं ठेऊन संसारगाणे मनातूनच त्यांना सांगितली गेली.

    मग सुरू झाल्या जेवणावळी. स्वैपाकघराला लागून एक मोठी खोली होती. तिथे पंगती मांडायचे काम सुरू झाले. नक्षीदार पत्र्याच्या डबीने रांगोळ्या ओढल्या गेल्या. चौफुली पाट मांडले गेले. परसातल्या हिरव्यागार केळींची पानं मांडली गेली. उदबत्या दरवळल्या. तांब्याभांडी ठेवले गेले. ही कामं पोरीनी चटाचट उरकली. त्यांच्यापेक्षा मोठ्या पोरींनी चटण्या कोशिंबीरी वाढायला घेतल्या. मग बाकीचे पदार्थ फिरू लागले. आजोबांनी  पंगतीला तीर्थ देऊन, मंत्रजल शिंपडून ते ही बसले. यजमान यजमानीण आले. सगळ्यांच्या पाया पडून सवाष्ण ब्राम्हणांना दक्षिणा दिली. मग जेवण सुरू झाले.पांढऱ्याशुभ्र भाताच्या मुदीवर पिवळ्या वरणात तुपाची धार ओतली गेली आणि सगळ्यांच्याच भुका उफाळून आल्या. आतमध्ये गरम मोदकांचे साचे उलगडू लागले. पानात येऊन तुपाच्या धारेत भिजून सगळ्यांच्या तोंडात विरघळू लागले. आजोबांच्या शिस्तीनुसार अधून मधून श्लोकांच्या फेरी सुरू झाल्या. आवडलेल्या पदार्थांचे परत मागून घेऊन खाणे सुरू होते. आग्रहाची वाढणीही झाली. लवकरच पुरुष आणि मुलांची पंगत संपली. खरकटी पानं उचलून गाई गुरांच्या गोठ्यातल्या घमेल्यात टाकली गेली. जागा स्वच्छ करून पुढची पंगत बसली. सगळ्या बायका बसल्या व पोरी वाढायला लागल्या. मोठ्या आजींनी पडवीत सगळ्या नोकरवर्गाला वाढून दिले आणि मगच त्या जेवायला बसल्या. आपण केलेले पदार्थ कसे झाले ही उत्सुकता बायकांच्या मनात कधीची ठाण मांडून होती त्यामुळे प्रत्येक पदार्थ चवीने खात, एकमेकांना वाखाणत हसत गप्पा मारत जेवणं झाली. एक गोष्ट प्रकर्षानी जाणवली ती म्हणजे कुणातही कुणाविषयी कडवटपणा दिसला नाही. यावर मेघनाला विचारले, कारण माणूस म्हटला की त्याचे सर्व पदर आले. मेघनाने सांगितले “ ही पण आमच्या आजोबांची शिस्त. तुम्हा सर्वाना एकमेकांविषयी काही चांगल्या, काही वाईट भावना असणारच. पण त्या दिवशी बाप्पा समोर बाहेर नाही आल्या पाहिजे. तुम्हाला सुखात पाहून त्यालाही आनंद होईल आणि तो तुम्हाला भरभरून आशिर्वाद देईल. खरं तर देवापासून काही लपले आहे का? पण त्यामुळे तुमचा सण आनंदात जाईल. वर्षभर बाहेरच्या जगात जगायचं बळ तुम्हाला या एकत्रित धाग्यांमुळे मिळेल.” सुंदर विचार. आजोबांसारखा कर्ता माणुस. ज्याने एकछत्री अंमलाने पुर्ण घर बांधून ठेवलं. मनाच्या धाग्यांनी जोडून ठेवलं. असे आजोबा सगळ्यांना लाभावे अशी देवाला मनोमन प्रार्थना केली. पंगती आटोपल्या. सगळ्यांनी मिळून पटापट स्वैपाकघर, माजघर साफ केलं. हॉलमध्ये पुरुषवर्ग आडवा झाला होता. एका खोलीत बायकांनी पथाऱ्या लावल्या. सगळ्या घरावर तृप्ततेची शांती पसरली.

      चार वाजताचा चहा पुरुषांनी केला. पुरुषांचा हात स्वैपाकघरात स्वैर असतो. वेलदोडे, गवतीचहा, आलं,असं सगळं टाकलेला मलईदार वाफाळता चहा समोर आला. इतका सुंदर चहा की, अजून एक कप पिण्याचा मोह मला टाळता आला नाही.

     संध्याकाळ झाल्यावर गणपती समोर फुगड्या घालण्याचा कार्यक्रम होता. नटलेल्या लेकी, सुना, शेजारणी मिळून फुगड्या घालायला लागल्या. किती प्रकार. पाच पाच मिनिटांची एक फुगडी. मला तर ते पाहूनच गरगरायला लागलं. नंतर गाणी सुरू झाली. गणपती देवा करीन तूझी सेवा, नवस फेडीन रे पहाटेच्या पारी, शंख वाजवला शिरगावा, सडयावर बाई फुलला नागुळकुडा अशी विविध गाणी गाईली गेली. प्रत्येक घरात पारंपरिक भजने, मेळे, फुगड्या, संगीतबारी, एकमेकांच्या घरी जाणे चालूच होते.

    रात्री भजनाचा कार्यक्रम होता. रात्रीची जेवणं आवरून दहा वाजता भजनाला सुरुवात झाली. सगळ्या वाद्यांचा मेळ आणि खडे पहाडी आवाज यांनी परिसर दुमदुमून गेला. वैखरी भक्तीने बाप्पा प्रसन्नतेने डोलत होते. अंगणातून जाई, जुई, रातराणी, परिजाताचे परिमळ दरवळत होते. अक्षरश: स्वर्गीय वातावरण निर्मिती होती ती. इंटेरव्हलमधे सगळ्यांना उसळ आणि जायफळ लावलेली कॉफी दिली गेली. भजनाचा रंग उतरोत्तर चढत कधीतरी सांगता झाली. भावनेचा पूर ओसरून क्षणभर अगम्य शांतता पसरली. त्या शांततेतच बाप्पांनी सर्वांना आशिर्वाद दिला. तो लाभून कृतार्थतेने सगळे आपापल्या घरी गेले.

   चवथीचा दूसरा दिवस नव्याची पूजा करण्याचा असतो. शेतातील नव्या कणसांची पूजा करतात. घरातले कर्ते लोकं या दिवशी शेतावर जाऊन कणसांच्या लोंब्या आणतात. त्या आंब्याच्या पानात गुंडाळून एका पाटावर ठेवतात. त्याची गंधअक्षता वाहून पूजा केली जाते. हा दिवस ऋषिपंचमीचा असतो. अनेक ब्राम्हण कुटुंबे आजही या दिवशी डोंगरावरून शोधून आणलेली कंदमुळं भक्षण करतात. आजोबा सकाळीच डोंगरावर जाऊन कंदमुळं घेऊन आले होते. घरातल्या पुरुषांनी लोंब्या आणल्या होत्या. पंचमीचे अजून एक वैशिष्ट दिसलं ते म्हणजे कोळे मांजर आणि उंदीर. आदल्या रात्री केळीच्या पानावऱ, पिठाचा उंदिर व मांजर बनवून ठेवले जाते. पंचमीच्या दिवशी पहाटे त्याचे विसर्जन घरातले छोटे मुलं करतात. विसर्जन करताना कोळे उंदरा, धर मांजरा, धर शेपडे मार बोकडा हे वाक्य रिकाम्या डब्यांच्या तालावर वाजवून म्हणतात.

     पंचमीच्या दिवशी दुपारच्या जेवणात खीर मणगजे, सोजी गोडशे हे खास पदार्थ असतात व सोबत तळलेल्या पुऱ्या किंवा वडे. भाज्यांमध्ये घोसाळ्याची, भेंडी, केळी, सुरण, कोबी, शेवग्याच्या, किंवा दुधीच्या फुलांची भाजी असते. पंचमीच्या दिवशी जेवण पुर्ण अळणी करतात. पूर्वी २१ प्रकारच्या भाज्या केल्या जायच्या. अशी माहिती आजी सांगत होत्या. त्या दिवशी आणलेल्या कणसांमध्ये किमान ५ गोटे टाकून पायस केला जातो. त्याची चवही छानच होती. तसेच खतखते, मुगागठी, उसळ तर होतीच.

    अश्या उत्साहात दीड दिवसाच्या गणपतीची निरोप घ्यायची वेळ येते. विसर्जनपूर्वीची शेवटची आरती झाली की गाऱ्हाणे घालून झाल्यावर यजमान माटोळी हलवतो. एखाद्या दाम्पत्याला मूल होत नसेल तर बाप्पाला सांगणे करण्यात येते. व त्यावर्षी अपत्य झाल्यास पुढच्या वर्षीच्या चवथीला मुलाला कपड्यात गुंडाळून काही क्षण माटोळीला बांधून ठेवतात. गणपती पुत्र पार्वतेचा जातो गंगे पाणियला यासारखी व्याकुळ गाणी गाऊन, जड मनाने गणरायला फटाक्यांच्या, ढोल ताशांच्या गजरात निरोप दिला जातो. गावातल्या तळ्यावर किवा विहिरीत विधिपूर्वक विसर्जन केले जाते.

   गणपतीच्या दिवसात गोंयंकार शिवराक बनलेला असतो. या मंडळीना ते ही फार जड जाते. गणपती बाहेर गेले की मागच्या पडवीत शेवट्यांची गांथन येऊन पडली आणि बायकांची कामं सुरू झाली. ते करता करता आजींनी अजून एका प्रथेबद्दल माहिती सांगितली.

   घरात जर सूतक आले तर भाद्रपदेतल्या संकष्टी चतुर्थीला म्हणजेच साखर चौथीला गणपतीची स्थापना करतात. यात सगळे विधी गणेश चतुर्थी सारखेच केले जातात. फक्त गणपतीचे आवडीचे मोदक साखरेच्या पुरणाचे करतात. उंदीर मामांच्या मोदकांची कावड, साखर भरून केली जाते. गणेश चतुर्थीला चंद्र पाहिला जात नाही पण साखर चौथीला मात्र गणपतीने चंद्राला जो उःशाप दिला होता तो पाळवा लागतो. त्यामुळे चंद्रोदय झाल्याशिवाय बाप्पाला नैवेद्य दाखवला जात नाही. आधी चंद्राची पूजा केली जाते. आरती करताना मोठ्या परातीत २१ साखरेचे मोदक, पाच दिवे, काकड्यांच्या जाड गोल चकत्या करून अख्ख केळं, एक काकडीची चकती असे ठेऊन काकडी व केळ्यात झेंडूची देठासकट फुले लावतात. केळ्यावरच उदबत्ती लावली जाते. या ताटाने चंद्राची ओवाळणी करून मग गणपतीची आरती केली जाते. जे भक्त ११, २१ संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात त्यांच्या व्रताची सांगता साखर चौथीला केली जाते.

    या चार दिवसात माझ्याजवळ प्रथा परंपरेने माणूस जोडून ठेवणाऱ्या सणाची खुपच माहिती गोळा झाली. खूप आनंद घेतला. आता सगळ्यांनाच आपापल्या घरी जायचे वेध लागले. आजोबांनी गंभीरपणे सगळ्यांना निरोप दिला. जड मनाने कुणी आज कुणी उद्या असे निरोप घेऊन निघाले. आम्हीपण इतक्या सुंदर चवथीचा अनुभव गाठीशी बांधून रस्त्याला लागलो.

                                                                          ...................................................

व्हॉटस अप नंबर  : +260 763413443 

  Zambia