Abhalpakhru books and stories free download online pdf in Marathi

आभाळपाखरू

 

                                                                                                 आभाळपाखरू

  दार उघडलं की गार वाऱ्याच्या सुखद लहरींनी त्यांच्या साम्राज्यात स्वागत केलं. त्या गोड शिरशिरीनी संपूर्ण निसर्ग थरथरत होता. कुठल्यातरी आनंदाचा उपभोग घेत घेत रमत गमत चालावे तसा पाऊस हलक्या तुषारांनी भुरभुरत होता. झाडांच्या पानापानातून पावसाचे थेंब चमकत होते. मधूनच एकमेकांना मिळून घरंगळून जात होते. आभाळात एक छोटसं पाखरू घिरट्या घालत होतं. काळं कुळकुळीत रंग असलेलं ते आभाळपाखरू आपल्याच मस्तीत फिरत होतं. आपलं अस्तित्व रंगीबिरंगी, जगाला मोहून टाकणारं नाही याचं त्याला दुखं नव्हतं की आपल्या विमानपंखी स्वच्छंद आयुष्याचा हेवा करणाऱ्या जगाची त्याला पर्वा नव्हती. रंग, रूप आवाज या कुठल्याही अस्त्र शस्त्राचा त्याच्याजवळ साठा नव्हता. अश्यांना मुक्त आयुष्याचं वरदान असतं. आंब्याच्या झाडावरून साद घालण्याची सक्ती नव्हती की पेरू खाण्याचं बंधन नव्हतं. जोपर्यंत कुणाचं लक्ष आपल्याकडे जात नाही तोपर्यंतच आपल्यात रमण्याचं सामर्थ्य रहातं. ते खरं सुखं. ती निरागसता, एक प्रकारचा अखंड आत्मविश्वास नसानसातून ओसंडत असतो. अश्यांचं विश्व भलेही छोटं असु दे, पण ते विश्वाचे राजे असतात. जगाचं लक्ष जर का वळलं तर जगण्यावर निर्बंध येतात. दुसऱ्यांच्या आयुष्याची पानं मग ते जग खुशाल वाचतं. वाचता वाचता त्याच्या आयुष्याच्या उलटणाऱ्या पानांप्रमाणे जग कधी हसतं, कधी रडतं,कधी उपहास, अपमान, अन्याय या सगळ्यात सहभागी होतं. इतकं उघडं पडावं ? आपल्या आयुष्याचं पुस्तक जगानी वाचवं ? बक्षिस मिळालं की आनंद झालाच पाहिजे. पडलं की रडलच पाहिजे हे जगानी ठरवावं ? जगानी ठरवल्याप्रमाणे वागलं नाही की ते नजरेच्या पिंजऱ्यात कैद करून ठेवतं. एक बंडखोर कैद केल्याच्या आनंदात जग विजयाने आभाळाकडे बघतं. तिथे फिरत असतं आभाळपाखरू. काळं कुळकुळीत. चिमुकल्या पंखानी, चिमुकली झेप घेत ते फिरत असतं. जग भारावून बघत रहातं. त्याला हेवा वाटतो त्याच्या स्वातंत्र्याचा. कारण दुसऱ्यांना नजरेत कैद करणारं जग स्वतःच प्रचंड तुरुंगात रहात असतं. पण आभाळपाखरा विषयी त्याचं मन स्वच्छ असतं. कौतुकाचं असतं, कारण त्याला आवाज, रूप, रंग नसतो. त्यामुळे तो कितीही स्वच्छंद भटकला तरी त्याला विशिष्ट नावाचं भय रहात नाही. विशिष्ट नाव आलं की त्याच्या पुढच्या मर्यादाही लगेच समोर येऊन उभ्या रहातात. ते आभाळपाखरू आपल्याच मस्तीत क्षणभर झाडावर टेकतं. ते ज्या फांदीवर बसेल ती फांदी त्याच्या आनंदात सहभागी होऊन आपल्यावरच्या पावसाच्या थेंबांचा टपटप खाली सडा पाडते. पाखरू, ते बघून अजूनच आनंदतं. मग ते दुसऱ्या फांदीवर बसतं. असं करत करत पुर्ण झाडं आनंदानी नाहून निघतं. सुखाचं देणं देऊन ते पाखरू भुरकन आकाशात भरारी घेतं आणि परत एक केंद्रबिंदू ठरवून त्याभोवती गिरक्या घेऊ लागतं. संपूर्ण आकाश त्याचं आपलं असतं. माझं आकाश हा अहंभाव नसून आकाशाचे आपण. हा आपलेपणा त्याच्या छोट्या विश्वात समावलेला असतो. आकाशावर राज्य करायची इच्छा न ठेवता, आकाशाचे आपण म्हटलं की आपोआपच दाही दिशा खुल्या होतात. आभाळ कवेत घेऊ पहाणाऱ्याना त्यांच्या हातांचेच बंध आड येतात. अचानक आभाळपाखरू ठिपक्या पलिकडे जातं. रिकाम्या मोकळ्या आभाळातून पाखराच्या ओढीने मोठे मोठे पावसाचे थेंब पडू लागतात. झाडांच्या फांद्यांवर पानं पाणी अडवून ठेवतात आणि वाट बघतात आनंदाचं झाडं होण्यासाठी. आभाळ आपले विशाल नेत्र चहूअंगानी न्याहाळू लागतं. त्या पाखरानी कुठे केंद्रबिंदू केला आहे ते शोधू लागतं. ते न दिसल्याने जग कावरं बावरं होतं. तेव्हढ्यात एक शीळ कानावर येते आणि ठिपक्यातून परत ते पाखरू साकार होतं. बरोबर इंद्रधनुष्य घेऊन. जगाला कळतं त्याला आवाजही आहे, रूप रंगही आहे. निसर्ग आपल्याला आतून जाणवून घ्यावा लागतो. आनंदाचं झाड त्या पाखरानी जिवंत केलेलं असतं. आभाळात इंद्रधनुष्य फुलवलेलं असतं. आपण केवळ पहात रहातो या लाजेने जग तुरुंग तोडतो. नजरेने कैदी मुक्त करतो, आणि आनंदाच्या झाडाखाली पावसाच्या थेंबांचं आचमन घेत उभं रहातो. सीमारेषांची चौकट मोडून पडते, आणि जगाला सामोरं येतं मुक्त आभाळ.त्या आभाळात उमटलेलं इंद्रधनुष्य आणि त्या सप्तरंगाखाली भिरभिरणारं काळं कुळकुळीत आभाळपाखरू.

                  

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED