कैरीचे दिवस Madhavi Marathe द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कैरीचे दिवस

                                                                                               कैरीचे दिवस

        लहानपण म्हणजे कैऱ्या, चिंचा, बोरे, करवंद, जांभळं  अश्या गोष्टींची मेजवानी असल्याचा काळ.   आमच्या घराशेजारी, अंगणात एक मोठे खोबऱ्या कैरीचे झाडं होते. बाल जीवनातले अविभाज्य अंग असलेले ते ठिकाण. खेळ, गप्पा सगळं काही त्याच्या अंगावर खेळत बागडत चालू असायचे. झाडाला कैऱ्या कधी लागतात यावर आमचा कायम डोळा असायचा. आंब्याचा सीझन संपून परत दुसरा कधी येतो याची आम्ही वाट पहात असायचो.  मधल्या सहा महिन्यांची तयारी पुर्ण करून डिसेंबर पासूनच त्या झाडाचे सौंदर्य निखरायला सुरवात व्हायची. मोहरानी निखरलेले ते आंब्याचे झाड म्हणजे आमची एक आवडती गोष्ट होती  मग पायऱ्यांवर कितीतरी वेळ बसून त्या झाडाकडे पहात राहायचो. मैत्रिणीं बरोबर कुठे कुठे कैऱ्या लागतील याची गणितं चालायची. टोकदार पोपटी मोहराची लवलव अचानक पानापानांमधून जाणवायला लागायची. हळुहळू पानाला बाजू सारून ते मोहर तुरेदार कणसासारखे वर दिसायला सुरवात व्हायची. मग आमच्या लक्षात येई, लवकरच त्यातून दरवळ बाहेर पडणार. त्या आंबेमोहराच्या वासाने आसपासचा परिसर धुंद होऊन जायचा. कधी कधी तो वास उग्रही वाटायचा. पण त्यातही एक प्रकारची नशा होती. माधुर्य होते. जसा हा दरवळ सुटायचा तसाच अचानक संपूनही जायचा. जीवनाच्या सत्यासारखा. मग दिसायला लागायचे छोटे छोटे चेंडू. त्यांच्याकडे पाहून आमची मने उड्या मारायला लागायची. लवकरच परीक्षा येणार, संपणार. मग कैऱ्या, आंबे आणि सुट्ट्या. तीनचार महिन्यांचा काळ आम्ही एका क्षणात मोजायचो. पण, त्या झाडाला तर आपली बाळं घडवायची असायची. त्या कैऱ्या हळूहळू मोठ्या होत आकार घेत होत्या. मग त्या झाडाकडे बघायचा कंटाळा येऊ लागायचा. कधी त्या मोठ्या होणार ? कधी आम्ही तोडणार ? कधी खाणार ? जाऊ दे. त्यापेक्षा बघणच नको. तरीही मन त्या कैरीच्या आकारावर लक्ष ठेवून असायचं. बघता बघता दिवस जायचे, आणि झाडे खरोखरच मोठमोठ्या कैरींनी लगडलेले दिसू लागायचे. मग तर अजूनच धमाल सुरू व्हायची. शेजारच्यांचा पहारा चुकवून कसं जायचं यावर आम्हा मुलांची चर्चा सुरू व्हायची. आमच्या गच्चीतून त्यांच्या गच्चीत उडी मारता यायची. पण खाली धपकन आवाज जायचा. मग खालून आवाज यायचा, कोण आहे रे तिकडे ? शेवटी मांजर पावलांनी उडी मारून, गच्चीच्या कठडयावर चढून लांब काठीने प्रयत्नपूर्वक एखाद दुसरी कैरी मिळवायचोच. त्या कैरीची चव अजूनही जीभेवर रेंगाळत आहे. कधी कधी शेजारचे कैऱ्या आणून द्यायचे. पण आम्ही तोडलेल्या कैरीची चव त्याला नसायची.

        घरात कितीतरी प्रकारचे कैऱ्यांचे खाद्यप्रकार सुरू व्हायचे. सुरवातीला त्या महाग मिळायच्या त्यामुळे आई थोड्या कैऱ्या आमच्यासाठी घेऊन यायची. उभ्या फोडींचे काप तिखट मीठ लावून खाताना आंबट झालेल्या चवी बरोबर चेहेऱ्यावरचा आनंद आई निरखत असायची. आता तिला एव्हढे आंबट खाणे जमायचे नाही. पण तिच्या बालपणाच्या या आठवणी आमच्यात शोधून ते क्षण परत मनाने जगायची. हळूहळू कैऱ्या, आंबे सुरू व्हायचे. मग पन्ह, कैरीची डाळ, आंब्याचा रस, छुंदा, मुरांबे, त्याचे परत प्रकार गुळाचा साखरेचा, किसून केलेला, फोडींचा. घरातल्यांच्या प्रत्येकाच्या आवडीचे काहीतरी त्यात असे. आम्हा मुलांना तर सगळच आवडायचं. आमची तर चंगळच. खरी मजा यायची ती लोणच घालायच्या दिवशी. दादा सकाळीच उठून भाजी मंडईतून फोडलेल्या कैऱ्या घेऊन यायचे. आई, आजी लोणच्याचा मसाला एकीकडे तयार करत आणि दुसरीकडे आम्हा मुलांकडून त्या कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून घ्यायची. गॅसवर मोठ्या कढईत तेल तापायला ठेवून, मोठ्या परातीत मोहरीची डाळ, तिखट, मीठ, हिंग, एकत्र करायची. त्यात कैरीच्या फोडी घुसळणे झाल्यावर तापून थंड झालेले तेल ओतले की इतका खमंग वास सुटायचा की बस. कसं झालय लोणचं, मीठ पाहिजे का अजुन ? या नावाखाली त्यातल्या फोडी चाखणे सुरू होई. तो कार्यक्रम थोडक्यात आटोपता घेत आई ,आजी बरण्यांमधे लोणचं भरायला लागत. शेवटी परत तेल ओतून त्या बरणीचे तोंड गच्च बांधले जाई. एका छोट्या बरणीत नवीन लोणचं ठेवलेलं असायचं. रंग गंध सोहळा संपला की त्यावर्षीचे हे समापन असे.

       कैऱ्या जश्या दिसायला लागायच्या तशा संपूनही जायच्या. मन खट्टू व्हायचं. पायरीवर येऊन झाड न्याहाळावं, तर ते मात्र आनंदीच असायचं. मग आपले हिरवे हात आमच्यावर गोंजारून म्हणायचं “ वेडयांनो, आत्ता तर तुम्हाला दिसणाऱ्या कैऱ्या संपल्या आहेत. पुढच्या वर्षी परत कैऱ्या हव्या ना तुम्हाला ? मग त्यासाठी तर मला आत्तापासून तयारी करायला हवी.” परत ते हिरवं जग डोलायला लागायचे. आम्ही त्या वाढणाऱ्या अदृश्य  कैऱ्यांकडे पहात राहायचो.

                                                                            .................................................