मॅनेजरशीप - भाग ८ Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मॅनेजरशीप - भाग ८

मॅनेजरशीप   भाग  ८

भाग ७  वरून  पुढे वाचा.....

 

“साहेब,” मधुकरने बोलायला सुरवात केली. “आपल्या कंपनीची गेली तीन चार वर्षापासून जी प्रगती खुंटली आहे आणि नुकसानच सहन करावं लागतय त्याचं कारण आज समजलय. आणि मी त्यावर corrective action घ्यायला सुरवात पण केली आहे.”

“मधुकर साहेब, जरा डीटेल मध्ये सांगाल का ?” – किरीटने काही न समजून म्हंटलं.

“हो साहेब, सांगतो. सविस्तर सांगतो.” – मधुकर. 

“चक्रवर्ती, तुम्हाला माहितीच आहे की हा माणूस सर्वच डिपार्टमेंट मध्ये लुडबूड करतो. तसंच तो स्टोअर मध्ये सुद्धा करायचा. Tungsten steel सारखी स्पेशल स्टील च्या हिट्स असायच्या त्या वेळेला हा माणूस स्टोअर च्या काट्या  मध्ये गडबड करायचा त्या मुळे कागदो पत्री जरी ठीक असल्या तरी अॅक्चुअल मध्ये बऱ्याच जास्त प्रमाणात अॅडिशन व्हायचे. आणि परिणामत:, हीट ऑफ जायची. अश्या सगळ्या हीट आपण रिसायक्लिंग न करता स्क्रॅप च्या भावात विकायचो. स्क्रॅप डीलर आणि लक्ष्मी मेटलच  कनेक्शन आहे. तो सगळा  माल जसा च्या तसा लक्ष्मी मेटल मध्ये जातो. लक्ष्मी मेटल कडे आपण माल जॉबवर्क साठी  पाठवतो आणि तेथूनच पार्टी कडे रवाना करतो. या प्रोसेस मध्ये लक्ष्मी मेटल मध्ये स्क्रॅप चा माल चांगल्या मालात मिसळून पार्टी ला जातो, आणि रीजेक्ट होऊन वापस येतो. तो माल पुन्हा आपण स्क्रॅप म्हणून काढून टाकतो. हे सायकल ऑटोमॅटिक सतत चालू आहे. यात चक्रवर्ती बरोबरच विक्रमसिंग आणि बर्डे पण सामील आहेत.”

 

“मधुकर साहेब, हे जे काही तुम्ही सांगता आहात, ते फार भयंकरच आहे. पण हा सगळा अंदाज आहे की काही पुरावे पण गोळा  केले आहेत. ? कारण त्याशिवाय आपल्याला काहीच अॅक्शन घेता येणार नाही.” किरीट साहेब म्हणाले.

“आम्ही जे मटेरियल स्क्रॅप केलं त्याचं आणि वापस आलेल्या मालाचं chemical composition चेक केलं आणि ते तंतोतंत जुळलं आहे.” मधुकरनी सविस्तर सांगायला सुरवात केली. “आधी संशय होता पण आता तो पक्का झालाय. दुसरं स्टोअर चा कर्मचारी, भानाजी, याने कबुली दिली आहे की चक्रवर्ती नेहमीच स्पेशल स्टील च्या वेळेस काट्या मध्ये गडबड करायचा आणि नंतर पूर्ववत करून ठेवायचा. म्हणजे कोणाला काही पत्ता लागण्याचा प्रश्नच नव्हता. दुसरं म्हणजे, काटा हा उघडता येत नाही. कायद्याने तो गुन्हा आहे. उघडलाच  तर तो पुन्हा प्रमाणित करून घ्यावा  लागतो. आणि हे बर्डेनी कधीच केलं नाही.”

 

“मधुकर साहेब, ही सगळी छोटी माणसे आहेत. बोलविता धनी कोणी वेगळाच असला पाहिजे. ते कळलं का ?” – जयंत साहेब.

“साहेब, ही सगळी सुशील बाबूंची माणसे आहेत.” – मधुकर.

मग मधुकरनी त्यांना मशीन च्या दुरुस्तीच्या वेळेचा प्रसंग सांगितला, स्क्रॅप

च्या ट्रक लोडिंग  च्या वेळी काय झालं ते सांगितलं. मग म्हणाला की “आज मी लक्ष्मी मेटल मधून सर्व माल वापस बोलावला. त्या वेळी लक्ष्मी मेटल चे धवन म्हणाले की सुशील बाबूंशी बोलणं झालं आहे आणि त्यांनी माल पाठवण्याची गरज नाही असं सांगितलं आहे. त्या वेळी सुशील बाबू तिथे हजर होते. सचिन चा त्या प्रमाणे फोन आला, तेंव्हा मी त्याला सांगितलं की जे काही म्हणण असेल ते लिखित मध्ये घेऊन ये.”

“मग ?” – किरीट साहेब.

“मग काही नाही. तासाभरात चारी गाड्या लोड झाल्या आणि आपल्या फॅक्टरीत पोचल्या. क्रॉस चेक करून आम्ही खात्री पण करून घेतली आहे.” – मधुकर.

“ते सर्व ठीकच आहे पण स्क्रॅप लक्ष्मी मेटल मध्ये पोचतं आणि तेच पार्टीला पाठवल्या जातं याचं काय प्रूफ आहे ?” – किरीट साहेब.

“ते पण प्रूफ मिळेल,” मधुकर म्हणाला. “तशी व्यवस्था मी केलीय पण त्या साठी थोड थांबाव लागेल.”

“म्हणजे नेमक काय केलं आहे तुम्ही ?” – किरीट साहेब.

“स्क्रॅप डीलर कडून, लक्ष्मी मेटल ला जे स्क्रॅप पाठवल्या गेलं, त्यांचे कच्चे, पक्के जसे असतील तसे challan च्या कॉपी मागवल्या आहेत. त्या साठी मी एका प्रायवेट डिटेकटीव एजन्सी ची मदत घेतली आहे. हे साहित्य मिळालं की मग आपल्याला अॅक्शन घेता येईल.” मधुकर म्हणाला.

“आणखी एक गोष्ट.” मधुकर पुढे म्हणाला. “आपल्याकडे ब्रेक ड्रम ची ऑर्डर आहे आणि त्याचं अत्यंत कमी किमतीत रेट फिक्स झाला आहे आणि हे सर्व सुशील बाबूंनी त्यांच्या स्वत:च्या अधिकारात केलं आहे. अॅक्चुअली  हे ड्रम नाहीत तर windmill चे हब आहेत आणि ते एक्सपोर्ट होतात ही बाबूंच्या भाच्याची कंपनी आहे. याच्या साठी स्पेशल कास्टिंगस लागतात. आपल्याला साफ गंडवलं आहे त्यांनी.”

“बापरे.” किरीटसाहेब आता चिडले होते. “जयंता हे पैसे सुशील बाबूंकडून वसूल करायलाच पाहिजेत. पण मधुकर साहेब, एक गोष्ट लक्षात ये नाही की आपलं

खराब मटेरियल ते पार्टीला पाठवत होते तर चांगल्या  मालाच काय करत होते ?”

“ते बहुधा दुसऱ्या पार्टीला विकत असावेत. या बद्दल सुद्धा मी एजन्सी ला पत्ता आणि प्रूफ काढायला सांगितलं आहे.” – मधुकर.

“अजून काही आहे ?” – किरीट साहेब.

“आहे ना साहेब, आमच्या म्हणजे मी, सातपुते, फिरके आणि स्वामी यांच्या ज्या मिटिंग्स करत होतो त्यांचे सर्व डिटेल्स देण्या बद्दल सुशील बाबूंनी या तिघांना धमकावलं होतं. अर्थात कोणी त्यांना काहीच सांगितलं नाही हे वेगळं सांगायला नकोच.” मधुकर म्हणाला. 

“म्हणजे या एजन्सी कडून पुरावे येई पर्यन्त  आपल्याला गप्प बसायचं आहे. पुरावे हातात आल्यावर मग यांना मी सोडणार नाही.” किरीट साहेब खूपच संतापले होते.

“माझा असा अंदाज आहे की आपल्या कंपनी ची आर्थिक स्थिति खूपच खालावली  की कंपनी ताब्यात घ्यायचा त्यांचा प्लान असावा.” - मधुकर.

जयंत आणि किरीट दोघांचेही चेहरे गंभीर झाले होते.

“साहेब, एक विनंती आहे.” – मधुकर. 

“काय ?” – किरीट साहेब.

“आज सगळं मटेरियल वापस बोलावलं आहे. पण आपल्याकडे फिनिशिंग ची व्यवस्था नाहीये. मला अस वाटत की दुसरीकडे देण्या पेक्षा आपणच फिनिशिंग डिपार्टमेंट सुरू करावं म्हणजे कसलाच गोंधळ होणार नाही.” – मधुकर. 

“तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण इतक्या लवकर ते कार्यान्वित होईल का ? आणि किती खर्च येईल ?” – जयंत साहेब.

“कार्यान्वित करण्याची जबाबदारी माझी. फक्त खर्चाच तेवढ तुम्हालाच बघाव लागेल.” मधुकर म्हणाला.

 

“मधुकर साहेब, तुम्ही कामाला लागा, पैशांची कमी तुम्हाला पडणार नाही यांची मी हमी देतो.” जयंत साहेब बोलले.

पंधराच दिवसांत एजन्सी ने सगळे पुरावे आणून दिले. ते हातात आल्यावर सुशील बाबूंची हकालपट्टी कारायला जयंत आणि किरीट ला वेळ लागला नाही. त्यांनी सुशील बाबूंना बोलावून घेतलं. त्यांच्या समोर गोळा केलेले सर्व पुरावे ठेवले.  सुशील बाबूंच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला साफ दिसत होता. त्यांनी काही तरी बोलण्यासाठी तोंड उघडलं पण त्यांना बोलू न देता जयंत साहेबच म्हणाले की

“सुशील अंकल, हे असं सगळं तुम्ही का केलं ते आम्हाला माहीत नाही. पण हा सगळा प्रकार भयंकर आहे आणि आम्ही आता तुमच्या विरुद्ध फौजदारी केस करायची पूर्ण तयारी केली आहे. कदाचित ही केस बरीच वर्ष चालेल पण शेवटी तुम्हाला शिक्षा होणारच. तुमची जी माणसं आहेत ,ज्यांना तुम्ही 1000 रुपयांत आपल्याकडे वळवल त्यांना आम्ही दहा हजार देऊन आमच्याकडे वळवू मग काय होईल त्याचा विचार करा. मधल्या काळात इंडस्ट्री मध्ये  जी बदनामी होईल ती वेगळीच. तुमचा स्वत:चा बिझनेस पण ठप्प होऊ शकतो. आम्ही तुम्हाला एक मार्ग सुचवतो, बघा तुम्हाला पटतो का  नाही तर फौजदारी ला सामोरं जा.”

“काय करायचं आहे मी ?” – सुशील बाबू.

“तुमचे सगळे शेअर आम्हाला वापस विका. आम्ही त्यांची योग्य किंमत देऊ. आणि पुन्हा आमच्या आसपास पण फिरकू नका.” – जयंत साहेब.

“पण हे केल्यावर तुम्ही केस करणार नाही यांची काय गॅरंटी ?” – सुशील बाबू.

“तेवढा विश्वास तर तुम्हाला ठेवावाच लागेल. आम्ही दिलेला शब्द पाळतो. हे तुम्हालाही माहीत आहे. We are not crooks. And you also know that.” – जयंत साहेबांनी सरळ शब्दांत सांगितलं.

सुशील जवळ दूसरा ऑप्शन नव्हता. त्यांनी होकार दिला.

सर्व शेअर जयंत चे सासरे डॉक्टर अरुण मोघे यांना सुशील ने विकून टाकले. आणि तो चालता झाला. त्यांच्या जवळ दूसरा option नव्हता.

 

क्रमश:....

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com