मॅनेजरशीप - भाग १२ Dilip Bhide द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मॅनेजरशीप - भाग १२

मॅनेजरशीप

भाग  १२

भाग ११    वरून पुढे वाचा.....

 

मेघना त्याच्याच कडे बघत होती. त्याच्या चेहऱ्यावरचे फेरफार तिला कळले आणि ती अवघडून गेली. सुखावली पण. तसंही मधुकरच्या सान्निध्यात जास्तीत जास्त कसं राहता येईल याच साठी तिचे प्रयत्न असायचे. सुरवातीला तिच्या बाबांनी तिला मधुकरला अटेंड  करायला सांगितलं तेंव्हा तिला जरा रागच  आला होता. ती म्हणाली सुद्धा तिच्या बाबांना की मला तर तुम्ही नर्सच बनवून टाकलं आहे. पण हळू हळू परिस्थिती वळण घेत होती आणि तिला ते वळण हवं हवस वाटत होतं. पण मधुकरकडून काहीच प्रतिसाद नव्हता. आता जेंव्हा मधुकरची अवस्था तिने पाहिली तेंव्हा ती एकदम सुखावून गेली. पण तेंव्हाच तिला कळलं की आता निघायची वेळ झाली आहे.

 

“बरं येते मी आता. बराच उशीर झाला आहे. पेशंट ने जागरण करायचं नसतं.” मेघना पुन्हा हसली आणि गुड नाइट म्हणून निघून गेली.

 

मधुकर वेडाच झाला. त्याच्या डोळ्या समोरून तिचा  हसरा चेहरा काही जाईना. बराच वेळ तो जागा होता. तिचाच विचार करत होता. शेवटी नर्स म्हणाली सुद्धा की आज झोप येत नाही का ? त्याने मान हलवली मग तीने त्याला झोपेची गोळी  दिली तेंव्हा त्याला झोप लागली. 

रात्री मेघना पण बराच वेळ जागीच होती. केंव्हा तरी डोळा लागला त्यामुळे उठायला उशीरच झाला. हॉस्पिटलला पोचली तेंव्हा अकरा वाजले होते. मधुकरच्या रूम च्या बाहेरच तिला नर्स भेटली.

“कसा आहे पेशंट ?” मेघनाने विचारले.

“काल रात्री झोपेची गोळी द्यावी लागली. साहेबांना झोपच येत नव्हती. कारण माहीत नाही. पण आज सकाळ पासून तुमच्या नावाचा घोषा लावला आहे. आता पर्यन्त 10 वेळा तरी विचारून झालं असेल डॉक्टर मेघना केंव्हा येणार ते. काय झालं मॅडम ? काही complications आहेत का ?” नर्सने  अपडेट दिलं.

“नाही नाही, तू जा. तुझी ड्यूटि  संपली असेल न ? जा लवकर, मी बघते काय झालय  ते.” – मेघना.

“ठीक आहे मॅडम.” – नर्स. 

 

“काय म्हणताहेत मॅनेजरसाहेब ? कसं वाटतंय आता ? अरे वा चेहरा बराच टवटवीत दिसतो आहे. घरी जायचं का आज ?” – मेघना.

घरी जायचं ? आज ? म्हणजे, मेघना पासून दूर जायचं. मधुकरचा चेहरा पडला.

“काल पर्यन्त तर सारखं म्हणत होता की घरी जायचं, घरी जायचं म्हणून. मग आता काय झालं ? दवाखान्यातच बरं वाटतंय का ?” – मेघनानी खिजवलं.

“अहो डॉक्टर मेघना, तुम्हीच तर म्हणत होता की थकवा पूर्ण गेल्याशिवाय सोडणार नाही म्हणून.” – मधुकर. 

“पण आज fit and fine दिसत आहात. काय म्हणता मग ?” – मेघना.

“आता तुम्हीच म्हणता आहात तर ठीकच असेल.” मधुकरचा स्वर जड झाला होता.

 

“पण एक गोष्ट आहे. ती ही की तुम्हाला अजून 15 -20 दिवस तरी फॅक्टरीत जाता येणार नाही, आणि घरी पण फॅक्टरीच काम करता येणार नाही. बाहेरचा डबा नाही. तुमची जेवणाची व्यवस्था इथूनच केल्या जाईल. डाएटिशयन जे लिहून देईल तेच इथून डब्यात दिलं जाईल. सकाळी 12 वाजता आणि संध्याकाळी आठ वाजता डबा तुम्हाला मिळेल. पूर्ण आराम करायचा, याच अटीवर घरी सोडतो आहोत. एंजॉय.” – मेघना. 

 

“घरी राहूनही फॅक्टरीच काम करायचं नाही हा कसला जुलूम ? तुम्ही संगळ्यांचीच अशी काळजी घेता का ?” – मधुकर.

“नाही. बाकी पेशंट च्या घरी लोक असतात. त्यामुळे ते काळजी घेतात. तुमच्या कडे कोण आहे ?” – मेघना.

“पण आता मी माझी काळजी घेउच शकतो. तुम्हीच आता म्हणालात ना की fit  and fine आहे म्हणून. आणि आता काय घरी पण सुद्धा 24 तास नर्स ठेवणार आहात की काय ?” – मधुकरनी वैतागून विचारलं.

“इलाज नाही.” – मेघना. 

“अहो नको नको, मला जरूर नाही. आणि वरतून हॉस्पिटल च बिल किती येईल ?

माझ्या जवळ एवढे पैसे पण नसतील. उसने घ्यावे लागतील ताई कडून.” मधुकरनी आपली अडचण सांगितली.

 

“बिलाची काळजी तुम्ही कशाला करताय ? ते जयंत देसाई बघून घेतील. त्यांनीच सांगितलं आहे की कुठलीही कसर राहता कामा नये म्हणून.” – मेघना.

 

“अरे देवा, आता जयंत साहेबांशीच बोलावं लागेल. तुम्ही इतकं काही करू नका मी साहेबांशी बोलेन या बाबतीत.” – मधुकर. 

 

“ठीक आहे तुम्ही बोला. त्यांनी जर सांगितलं तर आम्ही सर्व व्यवस्था काढून घेऊ. मग तर झालं. ?” – मेघना.

मधुकरला संमती दर्शक मान हलवण्या खेरीज गत्यंतरच नव्हतं. डिस्चार्ज पेपर तयार करण्यात आले आणि मधुकरची घरी पाठवणी करण्यात आली. तो घरी पोचला तेंव्हा घर स्वच्छ करून झालं होतं. अंथरूण व्यवस्थित घालून ठेवलं होतं. पाण्याचा जग भरून ठेवला होता. बेड च्या जवळ काही मासिक, पुस्तकं पण ठेवली होती. मधुकर खुर्चीवर बसला आणि मग त्याला सोडायला जी मंडळी आली होती ती निघाली. आता मधुकर एकटाच. काय करायचं हा प्रश्नच होता. मग बेड वर झोपून थोडावेळ मासिकं चाळली आणि त्याला डुलकी लागली.

 

खोलीतला दिवा लागल्यामुळे त्याला जाग आली. समोरच घडयाळ होतं आठ वाजले होते. क्षणभर त्याला आपण कुठे आहोत तेच कळेना. मग आठवलं की दुपारी पांच वाजता आपण घरी आलो आहोत. डावी कडे वळून बघितलं तर मेघना दिसली. पण आत्ता तिच्या अंगावर पांढरा कोट नव्हता. लेमन कलर ची सिल्क ची साडी नेसून आली होती.

क्षणभर त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. मेघना इथे कशी आली, का आपण अजून हॉस्पिटल मध्येच आहोत ? त्याला प्रश्न पडला.

त्याला गोंधळलेलं पाहून मेघनाच म्हणाली

“मॅनेजर साहेब, तुमच्यासाठी डबा आणला आहे. जेवायचं आहे ना.”

हे ऐकल्यावर तो स्प्रिंग सारखा उठून बसला. म्हणजे मेघना खरंच आली आहे तर.

 

“डॉक्टर मेघना मला चिमटा काढा.” – मधुकर.

“मी इथे डॉक्टर म्हणून आलेले नाहीये. मेघना म्हणून आली आहे. आणि चिमटा कशाला काढायचा ?”

“अहो तुम्ही खरंच आल्या आहात हे मला कळू तर द्या.” – मधुकर. 

“ओके कुठे काढू ?” आणि तिने खरंच, मधुकरचा कान पकडून जोरदार चिमटा काढला.

 

“ओय, ओय” मधुकर किंचाळला, मेघना नी चिमटा जरा जोरातच काढला होता.

“अहो हे काय ? किती जोरात ! चिमटा काढा म्हंटल्यांवर सर्व जोर एकवटून काढला की तुम्ही . जरा हळू काढायचा.” – मधुकर कळवळला.

मधुकर अजून कान चोळत होता. आणि हे बघून मेघना  ला प्रचंड हसू कोसळलं.

तिला खळखळून हसतांना बघून मधुकर पूर्ण विरघळला कानाचं दुख: कुठल्या कुठे पळून गेलं आणि तो ही तिच्या बरोबर हसण्यात सामील झाला. पांच मिनिटं झाल्यावर, हसणं ओसरल्यावर मेघना म्हणाली

“मोकळं वाटतंय ना आता.”

मधुकरनी मान डोलावली. “छान वाटतंय.”

“याच्या आधी कधी असं हसला  होता  तुम्ही ?” – मेघनानी विचारलं.

“असं ? इतक खळखळून ?” – मधुकर.

“हो” – मेघना.

मधुकरनी थोडा विचार केला. “नाही आठवत.”

“म्हणजे, हसणं विसरून गेला होता की काय ?” – मेघना.

“मी हसणं विसरूनच गेलो होतो. किती तरी दिवसांनंतर अस मोकळं हसतोय.” मधुकरनी कबुली दिली.

“म्हणूनच एवढे रुक्ष झाला आहात. कायम आपला गंभीर चेहरा. एखादी गोष्ट आवडली की नाही हे ही समोरच्याला कळत नाही.” आणि मग चित्रात जसं दाखवतात की परमेश्वर भक्ताला हात समोर करून भक्ताला वर देतात त्या प्रमाणे पोज घेऊन म्हणाली की “मॅनेजर साहेब, हसत रहा, जीवन सुखाचं होईल.” आणि पुन्हा हसायला लागली. अर्थात मधुकर ला पण हसू आवरलं नाही. थोड्या वेळाने मेघना भानावर आली आणि म्हणाली

“अरे आपण हसत काय बसलो आहोत, मी ज्या कामासाठी आली, ते राहूनच गेलं. तुमचं जेवण व्हायचं आहे. चला तुमचं पान घेते.” आणि ती किचन मध्ये ताट  आणायला गेली.

क्रमश: .............

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com