It is lovely though books and stories free download online pdf in Marathi

आहे मनोहर तरी

आहे मनोहर तरी पुस्तकाविषयी




©®गीता गरुड.


सुनिता देशपांडे यांचं 'आहे मनोहर तरी' हे पुस्तक वाचायला घेतलं.

पुर्वाश्रमीची सुनिता ठाकूर ही रत्नागिरीतल्या एका प्रख्यात वकीलांची मुलगी. ती एकूण सात भावंड. सुनिताताई व त्यांची भावंड वडिलांसोबत कोर्टात जात तेथील खटले पहात असत. छोट्या सुनिताला वडलांनी एकदा रंगीत छत्री आणून दिली होती. ती छत्री घेऊन ती तहसिलदारांच्या मुलांसोबत समुद्राकडे गेली. छत्री वाऱ्याच्या दिशेने झेपावली व सुनी छत्री पकडण्यासाठी समुद्रात जात राहिली. बुडणाऱ्या तिला मच्छीमाराने वाचवलं व घरी न्हेऊन सोडलं पण त्या प्रसंगानंतर ती भेदरली व रात्री विशिष्ट स्वप्न पडून किंचाळत उठू लागली म्हणून मग सुनीच्या आईने तिला धामापुरच्या आजीकडे पाठवलं. धामापूरची आजी ही सुनीच्या वडलांची, आप्पांची सावत्र आई. धामापूरचं घर म्हणजे चौसोपी वाडा. मधल्या चौकात दगडी विहीर. विहिरीच्या कठड्यावर फुलांच्या कुंड्या होत्या. धामापूरच्या घराजवळच लक्ष्मीनारायणाचं मंदिर होतं. सुनी आजीसोबत तिथे जायची. आजीने पैसै साठवून लक्ष्मीसाठी भरपूर दागिने घडवून घेतले होते पण एकदा कुणी लक्ष्मीचा हातच दागिन्यांसकट न्हेला. आजी अन्नाला शिवली नाही. शेवटी आठवडाभराने ते दागिने व हात पोटलीत बांधून आजीशेजारी ठेवून कुणीतरी पोबारा केला. मग आजीने तो हात पुर्ववत लावून घेतला त्यानंतर सणासमारंभालाच देवीला दागिने घातले जाऊ लागला. आजीला फुलांची फार आवड. आजीच्या परसवात तर्हेतर्हेच्या गुलाबांची रोपे, जाई, जुई, सोनटक्का, तगर, अनंता सगळी फुलझाडं होती. आजीची ही फुलाची आवड सुनीत रुजली. आजीला वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांच्या वेण्या करता यायच्या. मग आजीने वेण्या केल्या की सुनी चारपाच वेण्या केसांत माळून मिरवी. आजीला मात्र दागिन्यांची, फुलांची आवड असुनही ती हौस बाळगता येत नव्हती. दोनेक महिन्याने न्हावी येऊन एका अंधाऱ्या खोलीत आजीचं डोकं करायचा. आजी नेहमी आलवणात असायची. निरक्षर होती तरी तिने तिची लिपी बनवली होती. दगडी पाटीवर ती कुळांकडून आलेल्या उत्पन्नाचा, बाकीचा हिशोब लिहून ठेवत असे. धामापूरला असेस्तोवर सुनी आस्तिक होती. पुढे जसजशी मोठी होत गेली तशी ती नास्तिकपणाकडे झुकू लागली. त्यावरूनच तिचे व आईचे खटके उडत. सुनिताताईंनी स्वातंत्र्यलढ्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. हातबाँबही स्वतः तयार करून पाठवले होते. याकरता खोली घेऊन स्वतंत्र राहिली होती. पु. लं.चे व तिचे प्रेम जुळले. तिला खरं तर लग्नाच्या बंधनात अडकायचं नव्हतं पण शेवटी पु. लं.च्या आग्रहाची सरशी झाली नि दोघांनी कोर्टमेरेज केलं तेंव्हा धामापूरची आजी नातीच्या लग्नासाठी उत्साहाने आली होती. सुनिताताई व पुलं. उर्फ भाई यांना मुल झालं नाही किंवा त्यांनी होऊ दिलं नाही काही असो पण सुनिताताईंनी भाईंना मुलाप्रमाणे सांभाळलं. या पुस्तकात भाईंचे सारे गुण व दोष सुनिताताईंनी परखडपणे मांडले आहेत. भाईंना व्यवहार कधी जमला नाही. बऱ्याच निर्मात्यांनी त्यांना फसवलं मग सुनिताताईंनी भाईंच्या आर्थिक व्यवहारांवर जातीने लक्ष ठेवलं. भाईंच्या नाटकांचे कॉपीराईट्सही सुनिताताईंच्या नावावर होते ते का हे पुस्तक वाचताना उलगडत जातं. स्वार्थी निर्माते भाईंना कसेही गुंडाळायचे. कुणी परवानगी न घेता भाईंचं नाटक प्रयोगासाठी घेतलं तर सुनिताताई निर्माता, दिग्दर्शक व नाटकातील पात्रांनाही कायदेशीर नोटीसा पाठवे. एका स्नेह्याने तर सुनिताताईना पु.लं. च्या दारातलं कुत्र म्हंटलं होतं. सुनिताताई उत्तम भूमिका करायच्या.. पण त्यांना पती नाटककार असुनही भावलेल्या भूमिका मागून घेणे कधी जमले नाही. शेवटपर्यंत त्या पु. लं. ची सावली बनून राहिल्या. पु. लं. साठी त्यांनी स्वतःच्या प्रगतीच्या कक्षा सिमित ठेवल्या.भाईंची तब्येत, खाणंपिणं इतकंच काय तर त्यांच्या गाडीचा सारथीही त्याच होत्या. स्पष्टवक्तेपणामुळे त्यांना बऱ्याच जणांनी नावेही ठेवली पण त्यांनी आपल्या तत्वांना मुरड घातली नाही. कोणत्याही गोष्टीचा अपव्यय होऊ न देणे, काळजीपूर्वक पाणी वापरणे, वायफळ खर्च न करणे, जमेल तशी बचत करणे, वाचणे, स्वतःच्या विश्वात रमणे अशा त्यांच्या स्वभावामुळे त्या प्रसिद्धीपासून दूर रहात गेल्या. कवितांवर मात्र त्यांनी जीवापाड प्रेम केलं. बऱ्याच कविता त्यांना मुखोद्गत होत्या. आईविषयी लिहिताना त्या काही ठिकाणी हळव्या होतात सासूचा वाढदिवस लक्षात ठेवून त्यांना त्यांच्या वयाएवढे बेसनाचे लाडू, साडी देणारी मी, मला कित्येक वर्षे आईचा वाढदिवस कधी असतो हे ठाऊकच नव्हते, सासूशी बोलताना विनयाने बोलणारी मी आईशी तडकाफडकी बोलून मोकळे व्हायचे ही अशी वाक्य त्या लिहितात ती बऱ्याचदा आपल्याशी रिलेट होतात. नवऱ्याने बऱ्याचदा मला ग्रुहित धरलेलं असतं हे वाक्यही त्यातलंच एक म्हणून कदाचित पुस्तक शेवटपर्यंत आपल्याला खिळवून ठेवतं. लेखनशैलीतील खुसखुशीतपणा वाचताना आपल्याला मनमुराद आनंद देतो.


सुनिताताई लिहितात, माझ्या एखाद्या साहित्याबद्दल भाईंनी कौतुकाने माझी पाठ थोपटली नाही याचा रागच यायचा पण भाईंचा तो पुरुषी अहंकार नव्हता तर भाईंच्या मनातल्या मुलाचा आत्मकेंद्रिपणा होता. बायकोचं कौतुक वगैरे करावसं त्यांना कधी वाटलं नाही मात्र भाईंच्या बाळबोध स्वभावामुळे त्या बऱ्याचदा तोंडघशी पडल्या. बरेच स्नेही त्यांना माणूसघाणी म्हणू लागले व टाळूही लागले पण तेही सुनिताताईंनी भाईंसाठी स्वीकारले.


स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी होणाऱ्या सुनिताताई फाळणी झाल्यावर कमालीच्या व्यथित झाल्या. त्यांच्या माहेरी रत्नागिरीत हिंदुमुस्लीम भेद नव्हताच, फाळणीने त्या बंधुभावाला तडा गेला. त्यानंतरची

म्हणजे स्वातंत्र्योत्तर देशाची होत चाललेली अधोगती पाहून त्या अधिकाधिक व्यथित झाल्या.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED