मल्ल प्रेमयुद्ध
वीरने क्रांतीचा प्रत्येक साडीतला भूषणला त्याच्या मोबाईलमध्ये फोटो काढायला सांगितला होता. वीर फोटो बघत होता. नऊवारी साडीतली क्रांती झाशीची राणी दिसत होती. प्रत्येक फोटोमध्ये वीर क्रांतीकडे बघत होता पण क्रांतीने एकदाही वीरकडे पाहिलेले नव्हते.
"अजून ही रागावली वाटत आपल्यावर? कायतरी करायला पाहिजे. खूप कमी दिवस हायत आपल्याकड. या दोन महिन्यात मी माझं प्रेम सिध्द करू शकलो न्हाय तर...? नाय अस न्हाय व्हणार..." तेवढ्यात दारावर टकटक आवाज आला.
"वहिनी या की." तेजश्री आत आली.
" मग स्वप्न पडायला लागली वाटतं?" वीर हसला
" न्हाय वहिनी, जरा विचारात व्हतो." वीर
" काय झालंय का?" तेजश्री
"वहिनी मी कोणाला बोललो न्हाय पण...?" वीर
"पण...?" तेजश्री
"मी क्रांतीला एक वचन दिलय." वीर
"कोणतं?"
"जर दोन महिन्यात ती माझ्या प्रेमात पडली न्हाय तर मी स्वतः लग्न मोडणार हाय" वीर
"म्हणजे क्रांतीला तुम्ही आवडत न्हाय." तेजश्री
"वहिनी तिला वाटतय मी तिच्यावर सूड घ्यायला तिच्याशी लग्न करतोय. पण अस न्हाय वहिनी मी पहिल्यांदा क्रांतीला बघितलं तेंव्हापासूनच मी तिच्या प्रेमात पडलो. तिच्या मर्जीविरुद्ध हे लग्न जमलंय." वीर
" भाऊजी अशी जबरदस्ती होणं योग्य न्हाय व... पण माझा तुमच्यावर विश्वास हाय क्रांती दोन महिन्यात न्हाय तर एका महिन्यात माझ्या या गोड दिराच्या प्रेमात पडल. पण त्यासाठी तुम्ही एकमेकांना भेटायला पाहिजे, बोलायला पाहिजे."
"माझ्याकडं अजून नंबर न्हाय तिचा?"
" माझ्याकडं हाय ना.." तेजश्री
"नको... मला अशी न्हाय सुरवात करायची. नंबर स्वतःहून दिला तर बरं.." वीर
" भाऊजी अस कस ती नंबर दिल...? मला न्हाय वाटत." तेजश्री
"बघू सुचल काहीतरी..." वीर
"वहिनी तुम्ही का आला व्हता?" वीर
" भाऊजी रिपोर्ट आले का ह्यांचे?" तेजश्री
"अरे बापरे! उद्या सकाळी जाऊन घेऊन येतो." वीर
"तेच आठवण करावी म्हंटल..." तेजश्री निघायला लागली.
"वहिनी.. दादा अजून बोलत नाही तुमच्याशी???" तेजश्री जाताजाता थांबली. तिचे डोळे पाण्याने भरले.
"नाही..." तेजश्री
"वहिनी नका काळजी करू. व्हईल सगळं नीट." तेजश्रीला दिलासा देत वीर बोलला. तेजश्री कसनुस हसून बाहेर गेली.
क्रांती मैदानात उतरली सगळीकडे जल्लोषाचे वातावरण असते.
तिच्या नावाचा जयघोष सुरू होता. आज क्रांती दुसऱ्या तालुक्यातील पैलवान शुभांगी पारेख बरोबर लढत होती. शुभांगीला क्रांती आणि वीरच्या लग्नाची बातमी समजली होती. शुभांगीला वीर खूप आधीपासून आवडत होता. शुभांगीला अचानक वीर आणि क्रांतीच्या लग्नाची बातमी एकून ती अस्वस्थ झाली होती. क्रांती मॅटवर आल्यानंतर क्रांतीला हातमिळवणी सुद्धा केली नाही. आज शुभांगी सगळा राग क्रांतीवर काढणार होती. क्रांतीला समजत नव्हते की शुभांगी अशी का वागत आहे? वीर आज मॅच बघत प्रेक्षकांमध्ये बसला होता. क्रांतीने संतू आणि रत्नासोबत वीरला बघतील होत. क्रांतीला पूर्ण लक्ष मॅचमध्ये द्यायचे होते.
मॅच सुरू झाली. शुभांगीने पहिल्याच लढतीत क्रांतीला खाली पाडले. आज क्रांतीची शक्ती कमी पडते अस वाटत होतं. पहिल्याच वेळी तिला थकल्यासारख वाटत होतं. तिने उठताना वीरकडे पाहिले. वीर क्रांतीला प्रोत्साहन देत होता. भूषण वीरला हळूच काहीतरी म्हणत होता.
"पोरगी चिडली लेका. भाव दिला न्हाईस म्हणून का?" भूषण
"गळ्यात पडत होती. मागमाग करावं पण किती??? आता याचा राग क्रांतीवर काढणार पण मी क्रांतीला ओळखतो काहीही झालं तरी ती जिंकणार." वीर
"वा र माझा पट्ट्या... एक दिवसात इशवास..." भूषण
"एक दिवसात न्हाय... कुस्तीत क्रांती हरणार न्हाय हे मी आधीपासून ओळखलय." वीर
क्रांती दुसऱ्यांदासुद्धा खाली पडली. तीच तिलाच कळत नव्हतं आज काय होतंय.
" संतू काय र काय झालंय आज हिला? अस चाललं का?" रत्नाला वाईट वाटत होतं.
"मलाच कळना साखरपुडा झाल्यापासन लय शांत हाय कोणाशी बोलत न्हाय की हसत न्हाय." संतू
"मी सांगितलं व्हत पण तुम्ही काय माझं एकल न्हाय." रत्ना
"आता झालं आता आपण कोणी काय करू शकत न्हाय..." संतू
"म्हणूनच मी आधी सांगत व्हते... झाला ना खेळावर परिणाम." रत्ना चिडून बोलत होती.
आता मात्र क्रांती स्वतःवर चिडली होती. तिला खचून चालणार नव्हतं. डोकं गरम करूनपण फायदा नव्हता. आता क्रांतीने शुभांगीला अस पकडल की शुभांगीला हलतासुद्धा येत नव्हतं.
शेवटी काय शुभांगी थकली तेच हेरून क्रांतीने तिला खाली पाडले आणि पाय पकडला.
"1, 2, 3" अस म्हंटले आणि क्रांती विजयी झाली. पुन्हा एक कल्लोळ...
"क्रांती...क्रांती...क्रांती..."
इकडे वीरचा उर भरून आलं होता. त्याला काय करावं सुचत नव्हते. संतू आणि रत्ना आनंदाने उड्या मारत होते.
क्रांती बाहेर आली. सगळे तिची वाट बघत आनंदाने उभे राहिले होते. रत्ना गळ्यात पडली. संतुन पेढा भरवला.
"वहिनी अभिनंदन..."💐 भूषण म्हणाला
"Thank you" क्रांती स्मितहास्य करत म्हणाली. संतू आणि रत्ना तिथून कधीच सटकले होते. हळूहळू भूषणनेसुद्धा कलटी मारली. आता वीर आणि क्रांती दोघेच राहिले होते.तेवढ्यात शुभांगी आली.
" अभिनंदन क्रांती." शुभांगी
"Thank you" क्रांती.
"हे गावंढळ मुलगी बरी आवडली वीर तुला? वेड्यासारखं प्रेम करणारी मी नाही. काय बघितलं हिच्या मध्ये जे माझ्यात दिसलं नाही." शुभांगी रंगत बोलली.
"आज आणि याआधी बघितलं असशील क्रांतीत काय बघितलं मी आणि राहता राहिला तिचा प्रश्न ज्याच्यावर प्रेम नाय त्याच्यामाग पळून काय उपयोग.." वीर
"याचा अर्थ मंजी तुझं क्रांतीवर नाय तिच्या कामगिरीवर प्रेम हाय..." शुभांगी
"तुला जे समजायचं ते समज..."वीर
" हो तुला काय वाटलं मला माहित नाही. अरे ही पोरगी तुझ्यावर प्रेम करत नाही तिच्यावर जबरदस्ती केली हे माहीत नाही मला? सहज सोडून निघून जाईल तुला" शुभांगी
"तीच तिला ठाऊक आणि माझं मला माझं खूप प्रेम हाय त्यांच्यावर..." वीर क्रांतीच्या डोळ्यात बघत बोलत होता.
"हो का??? बघू दिसेल मला पण तुमचं प्रेम..."शुभांगी रागाने निघून गेली.
"अभिनंदन" वीर क्रांतीला म्हणाला.
"Thank you..." क्रांती चालायला लागली आणि वीर तिच्यासोबत
" लईच भारी खेळला तुम्ही... सुरुवातीला मी सुद्धा घाबरलो की अस काय करताय पण नंतर जिवंत जीव आला." क्रांतीने फक्त एकदा बघितलं आणि बाहेर येऊन इकडे तिकडे बघायला लागली. हातात फोन घेतला आणि संतुला फोन लावला.
" बापरे असे काय हे? मला सोडून गेले." क्रांती.
"मी नाय सोडून जाणार पण..." वीर शांतपणे प्रेमाने म्हणाला.
वीरने बुलेटला चावी लावली.
"बसाल सोडतो मी.." वीर
"मंजी हा सगळा तुमचा डाव हाय तर... मला न्हाय आवडत तुम्ही का अस वागताय?" क्रांतीचे डोळे पाण्याने भरले. तिला अस बघून वीरने गाडी स्टँडवर लावली. तिच्या जवळ आला.
"कसला डाव क्रांती? अहो तुम्ही आमच्या व्हनारे काही दिवसांनी मग होणाऱ्या बायकोसोबत जर वेळ घालवावा वाटला तर यात काय चुकलं? आणि तुम्हाला आवडत नसल तर आम्ही नाही येणार तुमच्या नजरेसमोर. आज कोणी नाही थांबलं आमचं कर्तव्य करू द्या आम्हाला. गाडीवर बसा" वीरला क्रांती आज बोललेलं नाही आवडलं. त्याने गाडी स्टार्ट केली. दुपारची वेळ होती. क्रांती गप्प गाडीवर बसली. गाडी क्रांतीच्या घराच्या दिशेन पळत होती. आरश्यात तिला वीरचा चेहरा दिसत होता. त्याने एकदासुद्धा क्रांतीला पाहिलं नाही. यावेळी मात्र क्रांतीला समजले की वीर खूप चिडलेला हाय. त्याने गाडी दरवाजासमोर थांबवली. तेवढयात दादा आले.
"पावण या जेवून जा आता." वीर गाडीवरून खाली उतरला दादांच्या पाय पडला.
"न्हाय दादा निघतो. काम हाय." वीर
"जावईबापू अस नका जाऊ दारातन.. या घरात..." संतू भायर आला.
"नको संतू आता निघतो. मला हॉस्पिटलमधी जायचंय थोडं महत्त्वाच काम हाय." वीर
"काय काळजीच नाय नव्ह?" दादा
"न्हाय न्हाय... दादा वाहिनीचा रिपोर्ट घ्यायचेत." वीर म्हणाला आणि चिनू धावत बाहेर आली.
"दाजी... " चीनू अगदी ही बहिणीसारखी त्यांना चिकटली.
"बोला मेव्हणीबाई... काय लाड पुरवायचे..." वीर हसत म्हणाला.
"दाजी... मी शिरा केलाय पहिल्यांदा तायडी जिंकली म्हणून खाऊन जा प्लिज..." चिनू लाडाने म्हणाली.
"बर आन थोडा मला लगीच निघायचं..." वीर बाहेर खाटेवर बसला.
"पाहुणे कोणाचं एकल न्हाय पण चिनूच कस एकता.."आई शिरा आणत म्हणाली.
"मेव्हणी असली तरी छोटी बहीण हाय आमची तिचा शब्द आम्ही कधी मोडणार न्हाय." क्रांती आतून फक्त ऐकत होती.
"आज ह्यांना कारण नसताना आपण जास्त दुखावलं का?" अस तिला वाटून गेलं.
रिपोर्ट घेऊन वीर घरी आला. आणि शांत बसला
"वीर काय झालं?" आबा बाहेर आले.
"आबा रिपोर्ट आलेत. दादामध्ये प्रॉब्लेम सांगितला हाय डॉक्टरांनी." आबा शांत झाले.
"तुमच्या दादाला हे सांगितलं तर..."आबा
"तर काय आबा...? अहो वहिनीला आत्तापर्यंत दोष देत आला तो... काही चेकिंग करायला लावल्यात अजून." वीर
"आता ते तयार व्हत अस वाटत न्हाय.." आबा म्हणाले तेवढ्यात संग्राम आले.
"काय काय झालं वीर??? तुमच्या वाहिनीत दोष निघाला ना... अमास्नी माहिती हाय पट्टया पाटलाची औलाद हाय..." संग्राम
"न्हाय दादा दोष तुमच्यात हाय..." संग्राम गप्प झाला. आवाज ऐकून तेजश्री बाहेर आली.
"हिला हिला एकूण आनंदाच्या उकळ्या फुटत असतील." संग्राम आता पिसाळलेला होता.
"का वहिनींना काही माहितीसुद्धा नाय मग त्यांना का आनंद होईल." वीर चिडला होता. सुलोचनाबाई गोंधळ एकूण बाहेर आल्या.
"संग्राम तुम्ही वर जा... कोणी तुम्हाला काही बोलल नाही. अजून टेस्ट व्हायच्या हायत..." आबा
"मला कोणती टेस्ट करायची न्हाय आता." संग्राम रागाने वर गेला.
तेजश्री शांत बसली. तिला काहीच सुचत नव्हते.
" तेजु जा वर अराम कर... आणि आत्ता संग्रामशी काहीच बोलू नकोस...." सुलोचनाबाई म्हणाल्या सगळ्यांना धक्का बसला होता पण कोणी काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. तेजश्री वर गेली.
"अहो आता यावर बोलायला नको. वन्सचा फोन आला होता त्यांना वीरच्या साखरपुड्याला येत आलं न्हाय पण त्यांनी हट्ट धरलाय गावाला परवा बोलवलंय वीर, क्रांती आणि संग्राम तेजश्रीला..." सुलोचनाबाई
"अहो अस लग्नाआधी कोण पाठवलं त्यांच्या पोरीला आपल्या नातेवाईकांच्या घरी." आबा
"अहो आपल्या पोरांवर आपला इशवास हाय अन उगाच नसलं वन्सन बोलावलं... तुमी बोललं क्रांतीच्या वडिलांशी तर ते न्हाय नाय म्हणणार." सुलोचनाबाई
" आई त्यांना विचारा पण आग्रह नका करू एकदाच विचारा..." एवढं बोलून वीर रूममध्ये गेला.
सुलोचनाबाईच्या लक्षातआले की याच काहीतरी बिनसलंय.
क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत
( संग्राम काय करेल आता? तेजश्रीला बायकोसारखी वागणूक मिळेल? क्रांती जाईल वीर सोबत त्यांच्या आत्याच्या गावाला? दादा पाठवतील?)