देवचार Geeta Gajanan Garud द्वारा क्लासिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

देवचार

#देवचार

ऐंशीच्या दशकातली गोष्ट,जेंव्हा आमच्या खेड्यात वाहतुकीची सोय नव्हती.

तिन्हीसांज होऊन गेली होती. चारी दिशा अंधारुन आल्या होत्या. माजघरात बाईमाणसं रात्रीच्या जेवणाचं बघतं होती. म्हातारी आजी व आजे वळईत गजाली करीत बसलेले. लहान मुलं पुस्तकं पुढ्यात घेऊन बसली होती. मी देवाला दिवाबत्ती केली व खळ्यात आरामखुर्ची टाकून बसलो होतो.

तुळशीसमोरच्या दिव्याची ज्योत निवांत तेवत होती. कोकणात तिन्हीसांज झाली की आजुबाजूची झाडंही स्तब्ध होतात. वारा मंदावतो. पानांची सळसळ थांबते.
मी माजघरात गेलो. पिठीभात व सुका बांगडा मुलांसोबत जेवलो व खळ्यात येरझारा घालीत होतो. तितक्यात राण्यांचा सागर लांबूनच येताना दिसला. हळूहळू तो जवळ आला. मला म्हणाला,
"आजांका बरा वाटत नाय हा तेंका घेऊन जावचा
लागतला."

मी कपडे केले. गाठीला थोडे पैसे घेतले. माझी बायको दारातच उभी होती. तिचा निरोप घेऊन सागरबरोबर निघालो. घराच्या वाटेतून पाणंदीजवळ आलो. सागरच्या आजोबांना डोलीत बसवलं. पुढे सागर व त्याचा मित्र,पाठी मी व सागरचे वडील. सागरच्या हातात विजेरी तर त्याच्या वडलांच्या हातात कंदील होता. तेवढाच काय तो उजेड. पौर्णिमेची रात्र होती तरी गर्द झाडीमुळे अंधार दाटला होता. पाणंदीच्या कडेने वड,पिंपळ,ऐन,सावरीची फार जुनी झाडं उभी होती.
रातकिड्यांची किरकिर रात्रीची भीषण शांतता कापत होती. पाणंदीत पडलेल्या वाळलेल्या पानांवरुन आम्ही चालत होतो. वरनं वटवाघळं घिरट्या घालत होती.

अर्ध्या वाटेवर गेलो असू तर आमच्या समोरून एक काळभिन्न मांजर आलं. त्याचे हिरवे डोळे त्या अंधारात फारच भेदक वाटत होते. ते मांजर काही अंतर आमच्या सोबत चाललं, नंतर ते कुठं गायब झालं. असं कसं गायब झालं म्हणून मी पाठी पाहिलं तर पाठून एक पिवळी साडी नेसलेली बाई येत होती. ती आम्हांला हाका मारत होती व थांबण्यास सांगत होती.

पिवळधम्मक लुगडं,खांद्यावरून घेतलेला हिरवा पदर,ठसठशीत लाल कुंकू. मी सागरच्या वडलांना मागे बघण्यास सांगितलं पण ते म्हणाले,"थय अजिबात बघू नुकोस". आम्ही जरा वेगात डोली न्हेऊ लागलो तशी ती बाई जोरजोरात ओरडू लागली. तुम्हाला एकालाही सोडणार नाही असं म्हणू लागली.आत्ता माझी तरी पाठी वळून पहायची हिंमत नव्हती.

आम्ही चालत होतो तिथंच बाजूला स्मशान होत. त्यात कुणाचीतरी चिता जळत होती. ती बाई जोरजोराने ओरडत गेली व तिने चितेत उडी घेतली. सागरने ते पहाताच डोलीवरचा हात सोडला व तिच्या दिशेने धावू लागला. आम्हाला काहीच कळेना. अचेतन अवस्था झाली होती आमची. सागरला साद घालत होतो जीवाच्या आकांताने पण तोंडातून शब्दच फुटत नव्हता. हातपाय सुन्न झाले होते.

तिला वाचवण्यासाठी तोही त्या चितेत उडी घेणार इतक्यात तिथे भला मोठा धिप्पाड माणूस त्याच्यासमोर उभा राहिला. डोक्याला पगडी,खांद्यावर घोंगडी,पांढरं धोतर,एका हातात मशाल दुसऱ्या हातात काठी,त्या काठीला घुंगरु असा त्याचा वेश होता. तो सागरला आमच्याजवळ घेऊन आला. पुन्हा सागरने डोली खांद्यावर घेतली व गुपचूप चालू लागला. तो माणूसही आमच्या सोबतच चालत होता. पहाटेतागद आम्ही हॉस्पिटलमध्ये पोचलो. डॉक्टरांनी आज्यांवर उपचार सुरु केले. पहाट होता होता तो धिप्पाड माणूस दिसेनासा झाला. आज्यांना फक्त एसिडीटी झाली होती. त्यांना दोनेक तासांत बरं वाटलं पण इकडे रात्रीचा प्रसंग आठवून माझी व सागरची हवा तंग झाली होती.

आम्ही आज्यांना घरी घेऊन आलो. मग आम्ही घरी हा विषय काढला तेंव्हा आजी त्या बाईबद्दल सांगू लागली,"ती बाई गावात नवीनच लगीन होऊन इलली. घोवान कमळा नाव ठेवलला तिचा. कमळा दिसं देखूल कमळासारखी नाजूक. तिचो घो(नवरा)तिका लय जपी.
पन तेका टिबी झालो नी तेच्यात त्यो गेलो. त्यो गेलो तर तेका नाय आऊस नाय बापूस. गावातल्यांनी नी कमळाच्या माहेरच्यांनी तेचा सगळा कार्य केल्यानी. कमळा माह्यराक गेलला पन थयसर भावजयीवांगडा तेचा झाला भांडान. भांडान झाला तशी भावजय फुगली. मगे हिना आयेक (आईला) सांगल्यान मिया(मी) आपली माझ्या घराक जातय. नी घराकडे इली,झाडलोट केल्यान नी रव्हाक लागली. शेती करुक लागली. गावात येक वायरमन होतो त्येची नजार तिच्यार पडली. त्यो तिका कायमाय जिन्नूस(वस्तू) हाडून (आणून)देवूक लागलो. वायरमन दिसाक देखणो हुतो. कमळा भुलला तेच्या रुपार. नवराबायकोसारी रवाक लागली दोघावजना. वायरमनच्या बायलेक कोनाकडसून बातमी समाजली. कमळा तवा दोन मह्यन्यांचा गुरवार हुता. वायरमन कामार गेललो. दोपारची कमळा घरात एकटाच हुता. वायरमनच्या बायलेन कमळाचा घर पेटवून दिल्यान. तवापासून ती बाय रातीची पांदीतसून(पांदणीतून) फिरता नी वायरमन समजून झिलग्यांका साद घालता."

आजे बोलले, "देवचाराचो फेरो ते टायमाक झालो म्हनान तुमी वाचलास. देवजार म्हंजी गावचो राखणदार असता. रातचो गावात फेरी मारता. कोन रातीचा वाट चुकला तर तेका वाट देखवता. पन तेचे फेरीचे वक्ताक तेचे वाटत कोनी जाता कामा नये नी तेचे वाटेर तेका घानघुनव खपत नाय. देवचार आपल्या भल्यासाठीच असता."

संध्याकाळी आज्यांनी भरडार पाच आंब्याची पाना ठेवली. तांब्याची तार,पानाचा विडा नी एक नाणं ठेवलं. वाटेच्या वाटसुराला गाराणं घातलं की कुठच्याव भुतभुताटकीपासून,चाळेगतीपासून,किंवा कुठच्याव आपत्तीपासून आमचा रक्षण कर. सगळी पाठसून होय महाराजा बोलली. देवचाराच्या नावाने कोंबड्याची मान कापली व त्याला तसाच सोडला. थोड्याच वेळात कोंबडा गतप्राण झाला. मग घरापासून थोड्या अंतरावर चूल पेटवली. कोंबडा नीट करुन मटण बनवलं.भाकऱ्या केल्या.भात केला नी सगळीजणा मिळून तिथे जेवलो. आजी आम्हाला म्हणाली,"ही प्रथा दरवर्षी अशीच पुढेव चालू ठेवा."

©®गीता गरुड.