मी टिंग्या बोलतोय! Geeta Gajanan Garud द्वारा हास्य कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मी टिंग्या बोलतोय!#मी_टिंग्या_बोलतोय!!
©® गीता गरुड.


हाय,ए हेलो,असे काय इकडे तिकडे बघताय.जरा इकडे बघा की.मी मी टिंग्या बोलतोय.

मला ना आताच मावशीने आंघोळ घातली.ती मला टावेलात लपेटणार इतक्यात मी सुळक्कन पळून इथे दाराआड येऊन लपलो.


माझी मम्मा आणि बाबा दोघेही सकाळीच उठून हाफिसात जातात.मम्मा जाताना मला दुधू देऊन जाते.मम्मालाना मला सोडून जाववत नाही. मलापण तिला सोडवत नाही मग मी मम्मा पायजे मम्मा पायजे करुन हातपाय जोरात हलवून रडतो.तेवढ्यात मावशी मला गेलरीत घेऊन जातात. गेलरीत मम्माने खूप छान छान रंगीत फुलं लावलैत, ती दाखवतात.मम्मा हळूच खालून माझ्याकडे बघत असते.मला कळतं ते.पण मी थोडा नमतेपणा घेतो अन् तिला जायला देतो.


मावशी मग दुधात कसलीतरी रेडीमेड पावडर मिसळते व मला मांडीत घेऊन भरवते पण मला ती चव अजिबात आवडत नाही..मी ते भरवलेले गरगर् करुन फेकून देतो.मला फक्त मम्मादुधू आवडतं.ते मम्मा मला सकाळी देते आणि संध्याकाळी आल्यावर, रात्री झोपताना देते.मावशी कसली कसली सुपं करुन भरवते.ती मात्र मी पितो.


माझ्या नाश्त्यानंतर मावशी मला शंभोला न्हेते.मस्त टपात घालून,डोक्यावरुन पाणी ओतते. मावशी माझ्या अंगाला साबण लावते,तो माझ्या डोळ्यात गेलाकी,मी जाम रडतो,भोकाड पसरतो.मग बाजूचे आजोबा धावत येतात.कायतरी बोबड्या गप्पा मारुन मला गप्प करतात.


कधीतरी सुट्टीला मम्माना मला डिमार्टमध्ये नेते.तिथे चाकवाली गाडी घेते. व मला पुढच्या डबड्यात बसवते.

मग तीना एकेक वस्तू त्या मोठ्या डबड्यात टाकत जाते.माझ्या अंगाचं माप घेऊन टिशर्ट,चड्ड्या घेते.खरतर ना खूपसार्या चड्डयाच चड्ड्या घ्यायला पायजेत.


गेले कितीतरी चार,पाच,आठ,नऊ,अकरा,बारा,तेरा दिवस नुसता पाऊस पडतोय.मग मला खूप म्हणजे सारखी सारखी शूशू होते। मम्माना मोठं डायपरचं पाकीट डिमार्टमधून आणते.स्वस्त मिळतं वाटतं.मग मावशी त्यांना त्रास नको म्हणून सकाळीच मला डायपर लावून ठेवतात.शूशू झाली की ते डायपर जड होतं.मग ते ओढत ओढत मी बिचारा ढोपराने घरभर रांगत असतो.त्या डायपरने मला खाजपण येते.पण मला अजून माझ्या मम्माला हे सगळं सगळं सांगता येत नाही.मम्मापण रात्रीची मला डायपर घालून ठेवते. निजतानापण डायपर माझी पाठ सोडत नाही.असं वाटतं ती डायपरची बेग उचलावी नी लांब कुठेतरी फेकून द्यावी भर्रकन.मग सगळे करतील,अरे आमच्या टिंग्याचं डायपर कुठे गेलं,कुठे गेलं?


माझी मोठी ताईपण आहे.तिना शाळेत जाते भुर्र.तिच्या दप्तर,वह्या,पुस्तकं मला खूप आवडतात.पण मी खाली खेळत असलो तर ती पलंगावर बसून अभ्यास करते.एकदा मी तिच्या वहीचं पान चुकून फाडलेलं.ती जाम रडत होती.मग मम्माने तिला गप्प केलं.एकदा तर मी तिच्या पुस्तकाच्या पानावर छान रेघोट्या मारलेल्या पेन्सिलने. असं काय केलं तर मम्मा मला ओरडते.

माझ्या ताईला मग माझा राग येतो.मम्माला सांगते,आपण याला परत डाँक्टरकाकांना देऊया.पण थोड्याच वेळात परत माझे लाड करायला येते.


मावशी मला ताईच्या स्कुलबसजवळ तिला सोडताना व आणताना घेऊन जातात.तेंव्हाना गाडीतले सगळे दादा,ताई मला ये टिंग्या,ये टिंगू करुन हाका मारतात.

मावशी मला संध्याकाळी खालच्या बागेत घेऊन जातात.तिथे सगळे आजोबा बसलेले असतात.ते मावशीकडून मला घेतात व माझ्याशी बाँलबाँल खेळतात.सगळे आजोबा माझ्याशी गप्पा मारतात.मला हसवतात.ते मला टिंगुशेठ म्हणतात.आज्या बागेत दुर्वा काढत असतात.तिथली मुलंपण माझ्याशी खेळतात.


बागेत मला मावशी कधीकधी फुगा घेऊन देते.मलाना फुग्याबरोबर खेळायला खूप आवडतं.पण त्याला जरा मिठी मारली तर तो गपकन फुटतो.मग मोठ्ठा आवाज येतो.मग मी खूप रडतो.


माझा बाबापण माझे लाड करतो.रात्री मी बर्याचदा बाबाच्या पोटावर झोपतो.मग बाबा उचलून मला आईच्या कुशीत ठेवतो.हल्लीना हे आईबाबा मला काही लागलंबिगलंतर रडूच देत नाहीत.सरळ तो मोबाईल माझ्या हातात देतात.त्याच्यावरच्या कारटूनमुळे मला रडताच येत नाही.पण माझ्यासाठी हसण्याइतकच रडणंही गरजेचं असतं यार.हे यांना कोणीतरी समजवाना.माझी ताईपण हल्ली अभ्यास झाला की मोबाईलवर गेम खेळत बसते.त्यात माझ्याशी खेळायचं विसरते ती.


मीना हल्ली घरभर रांगत असतो.खाली काय दिसेल ते उचलतो,चप्पलपण..पण म्हणून मी तिथपर्यंत जायच्या आधीच मावशी,मम्मा सगळ्या वस्तू वर उचलून ठेवतात.मी ब्रेव्ह आहे.एकदा तर मी बारीक झुरळाला हाताच्या चापटीने मारलेलं.उचलून खाणार इतक्यात मावशी कुठुनशी धावत आली.ते झुरळ तिने फेकून दिलं.मी माशीपण मारलेय.मी फर्निचर,कपडे सगळ्यांच्या चवी घेतो.भिंतीचीपण चव घेतो.सध्या माझं टेस्टींग चालू आहे.त्यामुळे मम्मा,बाबा,मावशी सगळ्या वस्तू सारख्या पुसून ठेवत असतात.


एकदा मावशी खाली बसून भेंडी कापत होत्या.मी झोपेतून उठलो अन् रांगत रांगत तिथे गेलो.त्याआधी मावशी भेंडीचं ताट घेऊन उठलेल्या पण सुरी तिथचं राहिलेली.झालं अस्मादिकांनी त्या सुरीवर झेप घातली.घट्ट हातात पकडली.खूप मोठ्ठा बाऊ झाला.रक्त यायला लागलं,लाल,लाल.मावशीपण खूप घाबरल्या होत्या.बाजूच्या आजीने तेलात हळद कालवून जखमेत भरली व मला साखर भरवली.मग थोपटत थोपटत गप्प झोपवलं.जखम तशी लहानच होती तरी मम्माने संध्याकाळी डाँक्टर काकांकडे नेऊन आणलं. मावशींना उगीचच कानकोंड झालं माझ्यामुळे.


एकदा बाबा इस्त्री करत होता.मी नेमका त्या इस्त्रीला थोपटायला गेलो,ती इस्त्री जास्त गरम नव्हती म्हणून नशीब.नायतर माझा इल्लूसा हात चांगलाच पोळला असता.सगळीजणं आपापले कपडे आत्ता इस्त्रीवाल्याला नेऊन देतात.आमची ती इस्त्री मम्माने कपाटात ठेवलेय.ती अशीच पडून रहाणार,त्यापेक्षा मला तरी द्यायची ना खेळायला.तर सांगायच तात्पर्य म्हणजे

माझ्या करामतींमुळे सगळे मम्मापासून ताईपर्यंत सगळेच आत्ता अलर्ट झाले आहेत. मला पाय फुटले आहेत असं सगळ्यांना सांगतात. बरीच खेळणीपण आणलेत माझ्यासाठी मामाने..म्हणजे बघा डंपर,गोल गोल फिरणारी झुक झुकगाडी,ती झुकझुकगाडीना अंधार करुन ट्रेकवर फिरवायची.तिच्यातून धुरपण निघतो.अजून टाळी वाजवणारं माकड आहे.ब्लाँक्स आहेत.कार,रिक्षा,टेम्पो..पुरं गेरेजच आहे माझ्याकडे.मी सगळ्या गाड्यांची चव घेतो.


मला बारीक बारीक दात येतायत.मगना हिरडी जाम शिवशिवते. मग मी दिसेल त्याला चावतो.जरा बरं वाटतं,चावलंकी.त्या दातांमुळे हल्ली मी जरा चीडचीड करतो.मम्माने औषध आणलंय माझ्यासाठी. शिवाय एक टीथ बँड घेऊन आलीय.


ही मोठी लोकं शीशी करायला टोयलेटमध्ये जातात तसं मला कधी बरं जायला मिळेल?लवकर जायला मिळालं पाहिजे.


मावशीना आताशा मला खालीच झोपवते.त्याचं काय झालं,तीनं मला वर पलंगावर निजवलेलं.तिचाही दमून डोळा लागला.तिने माझ्या कडेला उशा लावलेल्या पण मी झोपेत त्या उशांसकट खाली पडलो.नशीब माझं खाली मावशी निजलेली,तिच्या गुबगुबीत पोटावर पडलो.मावशीचं पोट छान मऊ आहे.खाली पडलो असतो तर माझं श्रीफळ नक्कीच फुटलं असतं.


तेंव्हापासून मावशी मला खाली गोधडी अंथरुन त्यावर निजवते.मलाही बिछान्यापेक्षा गोधडीच अंथू आणि पांघू म्हणून आवडते.मी त्या गोधडीचीपण चव घेतलीय.छानच लागते.मोठी माणसं चहा पितात.मलापण एकदा कपबशीतून चहा प्यायचा आहे.ताईसारखं मोठ्या आवाजात कविता म्हणायच्या आहेत.

ताईने माझ्यासाठी एक कविता पाठ केलेय.शाळेतून आली,की मला मांडीवर घेऊन ती , कविता म्हणते.काय बरं ती🤔

हां..छोटेसे बहीणभाऊ

उद्याला मोठाले होऊ

उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला

नवीन आकार देऊ

छोटेसे बहीणभाऊ उद्याला मोठाले होऊ.


आताशा तीलापण पावसामुळे बाहेर जास्त खेळता येत नाही म्हणून पावसाला कंटाळलेय.मग ती गाते,

रेन रेन गो अवे

लिटील टोमी वाँन्टस टू प्ले

रेन रेन गो अवे.

पण तो रेन काय ताईचं ऐकत नाही.

सगळीजणं छत्री घेऊन बाहेर जातात.मलापण छत्री घेऊन बाहेर पावसात जायचंय.


आम्हीना झुकझुकगाडीने आजीआजोबांकडे गावी गेलेलो.तिथे गंपतीबाप्पा होता.आजोबांनी मला शेतात फिरवलं.हिरवंगार वार्यावर डोलणारं शेत खूप भारी दिसत होतं.मग माझ्या ताईने ओहोळात भाकरीचे तुकडे टाकले तसे बरेच मासे वर आले.त्यांनी ते तुकडे गट्टम केले.मला खूप गंमत वाटली.गावीना तो मोबाईल चालतच नाही.त्यामुळे सगळेजण एकमेकांशी बोलतात,गप्पा मारतात.


आजी माझ्या खूप पाप्या घेते.तिथे आमच्या दोन तीन मनीमाऊ आहेत.मी त्यांना घाबरत नाही.पकडतो,माझ्या मांडीवर घेतो.मऊमऊ मनीमाऊ मला खूपच आवडते.त्या माझ्या कुशीतपण येऊन झोपायच्या.गोठ्यातना आमची चंद्री गाय व गाईचं वासरु आहे.मी त्याच्या पोटावर निजतो पण ते मला अजिबात मारत नाही .तिथे आमचा मोतीसुद्धा आहे.त्यालापण मी चांगलाच थोपटतो.तो माझा दोस्त झालाय.गीता गरुड.


तुम्हाला एक सांगतो,आत्ता शेतीची कामं झाली,की आजीआजोबा आमच्याकडे येणार आहेत.मग थोडे दिवस मला डायपर फ्री रहायला मिळणार कारण माझ्या आजीला ते डायपर अजिबात पसंद नाहीत.मला आजीच्या हातची खीर,मेतकुट भात,दुधभात,शिरा,उपीठ सगळंसगळं खूप आवडतं.त्यामुळे आजीआजोबा आले की माझी खूप मजा आहे.😊


मलाना हाताचा अंगठा चोखायला आवडतो.पायाचापण.पण ते अंगठा चोखणं मम्माला आवडतं नाही.बोलत काय बसलोय.मला ताईची पेन्सिल मिळालेय कोपच्यात होती.मी आत्ता भिंतीवर भरपूर चित्र काढणार आहे.🤗🤗