प्रकरण दोन.
ओजस,पाणिनी पटवर्धन च्या ऑफिस मधे आला.आज जरा निवांत वाटत होता.अशीलांसाठी ठेवलेल्या गुबगुबीत खुर्चीवर , पाणिनी पटवर्धन समोर , खास त्याच्या पद्धतीने बसला. आपले दोन्ही पाय गुढग्यापाशी खुर्चीच्या उजव्या बाजूच्या हातावर ठेऊन आणि पाठ खुर्चीच्या डाव्या बाजूच्या हातावर टेकवून.
“ पाणिनी अचानक तुला कुक्कुटपाल कंपनी मधे कसा काय रस निर्माण झाला ?”
“ मला चिकन खायचा मोह झाला त्यामुळे असेल बहुतेक.” पाणिनी ने गुगली टाकला.त्या दोघात कायमच असे वाक् युद्ध चालायचे.
“ ती कुक्कुटपाल कंपनी म्हणजे जादूचीच कंपनी वाटते मला.मधेच ती जिवंत होते,मधेच गायब होते.”
“ म्हणजे? ” पाणिनी ने गोंधळून विचारले
“ म्हणजे कित्येक दिवस ती प्रसिद्धीच्या झोतात नसते , कधीतरी काहीतरी प्रसंगात ती एकदम चर्चेत येते. आत्ताच त्यांनी टेकडी उतरला एक मोठी जागा घेतली.”
“ कशासाठी?” पाणिनी ने विचारले.
“ कुक्कुट पालन म्हणून. एक कुरणच घेतलय.”
“ पण त्याच ठिकाणी का? ”
“कंपनीच्या एका विक्रेत्याच्या मतानुसार त्या ठिकाणी पावसाचे प्रमाण आणि सूर्य प्रकाश अगदी बरोबर कुक्कुट पालनाच्या दृष्टीने योग्य आहे. ” ओजस म्हणाला.
“ या विक्रेत्याचा साहेब कोण आहे? म्हणजे मुख्य ?” पाणिनी ने विचारले.
“ पद्मनाभ पुंड नावाचा माणूस आहे.२२९१ चापोली गोवा इथे राहतो. लग्न झालंय, बायकोचे नाव दिव्व्या.”
“ आणखी कोणी विक्रेता आहे? ” पाणिनी ने विचारले.
सम्यक गर्ग नावाचा आहे, कोनशिला नावाच्या होटेल च्या खोली नंबर ६१८ मधे राहतो असे कळलं पण माझ्या माणसाना अजून तो सापडला नाहीये.”
“पद्मनाभ पुंड चे काय? ” पाणिनी ने विचारले
“ त्याला थेट भेटलो नाही पण माहिती मिळाली आहे त्यानुसार तो साधारण पंचेचाळीस वयाचा, ढेर पोट्या , गृहस्थ आहे., केस तपकिरी आहेत, डोळ्या वरून आणि चेहेऱ्या वरून मनमोकळा वाटतो.”
“ हे सगळे लोक ज्याच्या हाताखाली काम करतात तो मला हवाय. ” पाणिनी म्हणाला.
“ तो सापडणे अवघड आहे.”
“ कशावरून वाटतं तुला असं ?”
“ बारीक सारीक बऱ्याच गोष्टी वरून. पद्मनाभ पुंड ने एक व्यवहार जमवला त्यात मोठी रक्कम रोख स्वरुपात द्यायची होती.ज्याच्याशी व्यवहार जमावला त्याला घेऊन पद्मनाभ पुंड बँकेत गेला, सही केलेला एक कोरा चेक त्याने बाहेर काढला आणि कॅशियर कडे दिला.त्याने सही बघितली आणि तो मॅनेजर कडे गेला.त्याने कोणाला तरी फोन लावला. जो माणूस पद्मनाभ पुंड बरोबर आला होता तो म्हणाला की चेक वर सही करणाऱ्या माणसाचे आडनाव प्रजापति होते.” ओजस म्हणाला. “ पाणिनी, तुला या नावावरून तुला काही आठवतंय?”
“ काहीही नाही.पण मला हवा असलेला माणूस हाच असावा ” पाणिनी म्हणाला.
“ त्याच्याकडे काय काम आहे तुझे पाणिनी ? ”
“ त्याला ऐशी एकर जागा विकायची आहे , कुक्कुट पालनासाठी ची जागा.”
“ काय हेतू आहे यात तुझा ते मला नाही समजलं.”
“ तुला तपास करताना काही जाणवलं नाही का? ” पाणिनी ने विचारले.
“ खास काही नाही. तुला काय जाणवलं ? ” ओजस म्हणाला.
“ धरण क्षेत्रातील जमीन .” पाणिनी म्हणाला. “’ मला त्या राजे बाईला न्याय मिळवून द्यायचाय.मला हा प्रजापति हवाय.हाच माणूस आहे जो बरोबर दहा वाजता त्याच्या ऑफिस ला आल्यावर कंपनीच्या ट्रक च्या अपघाताची माहिती कळल्यावर त्याने आपल्या वकिलांना फोन केला असेल आणि भानू चे प्रकरण कोणत्याही किंमतीत मिटवा असे सांगितले असेल.”
“ ट्रक च्या नंबर वरून तुला नाही का मिळवता येणार? ” ओजस ने विचारले.
“ त्या ट्रक ड्रायव्हर ने माझ्या अशिलाने ज्या वहीत नंबर टिपून घेतला होता, ती वही हिसकावून घेतली. भानू ला त्याने वाही परत दिली पण ज्यावर ट्रकचा नंबर लिहिला होता ते पान फाडून घेतले होते. ” पाणिनी म्हणाला.
“ मला अजून काम सुरु करून चौवीस तास पण झाले नाहीत. म्होरक्या कोण आहे ते शोधायला वेळ लागणारच. सोमवार पर्यंत वेळ दे .” ओजस म्हणाला.
“ सोमवार फार उशीर होईल. मी , तू दिलेल्या पत्त्यावर दिव्व्या पुंड ला भेटून येतो. ” पाणिनी म्हणाला. “ सौम्या , तू तासभर इथेच थांब. मी ही एक संधी साधून बघतो .”
( प्रकरण दोन समाप्त)