Nilya Aakashanch Swapn - 4 books and stories free download online pdf in Marathi

निळ्या आकाशाचं स्वप्नं - भाग ४

निळ्या आकाशाचं स्वप्नं भाग ४


मागच्या भागात आपण बघीतलं की पंकज माधवीला दत्तक मुलीबद्दल सांगतो.आता पंकजचे बाबा माधवीला काय सांगतात बघू.



पंकज आणि माधवी पंकजच्या आईबाबांकडे गेले. पंकजचे आईबाबा आणि मोठा भाऊ प्रसाद, अंजली त्याची बायको आणि दोन मुलं नेहा आणि रिया असे सगळे एकत्र रहात. पंकजचं लग्न झाल्यावर आहे ते घर सगळ्यांसाठी अपुरे पडू लागल्याने पंकजच्या बाबांनीच पंकजला वेगळं रहावं असं सुचवलं.


माधवीला खरतरं इथं राह्यला आवडायचं पण अंजली वहिनींनी माधवीला समजावून सांगितले.

वहिनी म्हणाली,


" माधवी तात्पुरते तुम्ही दुसरीकडे भाड्याने रहा. हे घर लहान पडतं. तुमचं नवीनच लग्न झालंय तेव्हा जरा मोकळे रहा. माझं लग्न झाल्यावर हे घर पुरायचं आता रिया आणि नेहा दोघी मोठ्या झाल्या आहेत. तुला पंकजने सांगीतलं असेल नं?"


" काय?" माधवीने विचारलं.


" अगं आपण नवीन फ्लॅट घेतला आहे त्याबद्दल."


" हो .बोलला मला पंकज."


" तो फ्लॅट या सहा आठमहिन्यांनी जास्तीत जास्त वर्षभरात मिळेलच पझेशन. तोवरच दुसरीकडे रहा. तुमच्या लग्नाच्या आधीच बाबांनी मोठं घर घेण्याचा विषय काढला."


" होका!"


" हो. आईबाबांना आपलं सगळं कुटुंब एकत्र रहावं असंच वाटतंय. पण एवढ्या छोट्या घरात न राहता पुढे रिया आणि नेहा च्या दृष्टीने विचार करून जरा मोठा फ्लॅट घ्यायचं ते बोलले तेव्हा आम्हाला सगळ्यांनाच ते पटलं म्हणून यांनी आणि पंकजने चांगल्या बिल्डरची चवकशी करून हा आताचा बिल्डर आणि फ्लॅट निवडला."


" वहिनी मला इथेच सगळ्यांमध्ये राह्यला आवडतं."

माधवी म्हणाली.


"अगं तुलाच काय आम्हाला पण आवडतं तुम्ही इथे असलेलं पण थोडे दिवस आपण राहूया लांब."


वहिनींच्या या बोलण्यावर माधवीने फक्त हुंकार भरला.


हे सगळं माधवीच्या डोळ्यासमोर काल घडल्या सारखं आलं. ती नेहमीच या घरी येताना आनंदाने मोहरून जायची. आजही मोहरली पण त्यात आज जरा बावरली पण.


" माधवी ऊतरतेस ना घर आलं."


पकंजने गाडी थांबवून माधवीला हाक मारली.


" हो.ऊतरते." माधवी तंद्रीतून भानावर आली.


***


सगळ्यांची जेवणं झाली नंतर पंकज त्यांचे बाबा आणि माधवी समोरच्या खोलीत आले.ठरल्याप्रमाणे प्रसाद, अंजली वहिनी रिया आणि नेहा बाहेर फिरायला पडले. माधवीला नवल वाटलं.


" वहिनी आत्ता कुठे चालला?"


" अगं जरा पाय मोकळे करून येतो.या मुलींनाही चालायची सवय होईल.येतोच आम्ही पंधरा मिनिटांत."


एवढं बोलून अंजली वहिनी पायात चप्पल घालून घराबाहेर पडल्या. रिया आणि नेहा कधीच प्रसादच्या मागे धावत बाहेर गेल्या होत्या. प्रसाद आणि त्यांच्या कुटूंबाने बाहेर जायचं हे आधीच ठरलं होतं. कारण पंकजचे बाबा माधवीशी महत्वाच्या विषयावर बोलणार होते. तेव्हा तिथे रिया आणि नेहा नको असं बाबांनी निक्षून सांगितलं.


बराच वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर अचानक बाबांनी दत्तक या विषयाला हात घातला.


" माधवी पंकजने तुला सांगीतलं आहे नं त्याच्या कलीगच्या भावाने मुलगी दत्तक घेतली हे."


उत्तराच्या अपेक्षेने बाबांनी माधवीकडे बघीतलं.अचानक बाबांनी प्रश्न केल्याने माधवी गडबडली.


" हो." माधवीने चाचरतच उत्तर दिलं.


" तुझा याबाबत काय विचार आहे?"

माधवी काहीच बोलली नाही.तेव्हा बाबांचं म्हणाले,


" माधवी आपल्याला मुलं असावं असं प्रत्येकाला वाटतं. तुम्ही पण म्हणूनच डाॅक्टरांकडे उपचारासाठी जाता. पण हे उपचार किती दिवस करायचे याचा पैशाबरोबरच विचार करायला हवा. पैसा जसा अमाप खर्च होतो तसंच मानसिक धैर्य पण खूप खर्च होतं. दोन्हीगोष्टी संपवून चालणार नाही. या दोन्ही गोष्टी संपल्या तर नंतरचं जीवन हे वैराण वाळवंट होईल. तसं होऊ नये म्हणून दत्तक या गोष्टी बद्दल विचार करायला हरकत नाही असं माझं मत आहे. तुझं काय मत आहे?"


बाबांनी विचारलं तेव्हा माधवीला एकदम शब्द सापडत नव्हते. कारण आपल्या सास-यांबरोबर हा विषय बोलायला माधवी ज्या बिचकत होती.

माधवीची ही अवस्था बाबांनी ओळखली.ते म्हणाले,


" माधवी तू माझ्याशी या विषयावर बोलायला बिचकते आहे हे मला कळतंय. तू तुझ्या बाबां समोर मत कसं मांडलं असतं? तसं मत मांड. असं समज तुझ्या समोर सासरे नाही तर तुझे बाबा बसले आहेत. वेळ घे आणि बोल."


माधवी हातांची अस्वस्थ हालचाल करत म्हणाली,


" बाबा मला माझं आणि पंकजचं मूल वाढवायचं आहे. मी दुस-या कोणाचं मूल माझं बाळ म्हणून कसं वाढवू शकेन? त्याच्या बद्दल तेवढं ममत्व माझ्या मनात जागलं पाहिजे."


"माधवी मातृत्व हे प्रत्येक स्त्री मध्ये असतंच. ते स्वतःचं मूल असेल तरच निर्माण होतं असं नाही. दुसरं आपण आपल्या कृतीतून आणि त्याच्याशी होणा-या संवादातून त्या बाळावर कसे संस्कार करतो हे महत्वाचं आहे. लहान मुलं ही अनुकरणशील असतात. लहानपणी जर चांगल्या संस्कारांचा खतपाणी दिलं तर त्याच्या रक्तातील दोष बरेच निवळतात. याची बरीच उदाहरणं सापडतील.


माझा एक डाॅक्टर मित्र म्हणाला की पंच्याऐंशी टक्के स्त्रिया तणावाखाली वावरत असतात म्हणून मुलबाळ होऊ शकत नाही. त्यांच्यातील वात्सल्य जर सहजपणे कोणावर उधळतात आलं तर त्या स्त्रिया आई होऊ शकतात. ज्या स्रिया किंवा पुरुषांमध्ये मेजर काही प्राॅब्लेम आहे त्याबद्दल मी नाही बोलत पण अशा जोडप्यांनी तर दत्तक हा प्रकार आपल्या जुनाट विचारांना झटकून देऊन निवडावा. असं त्याने मला स्पष्ट सांगितलं होतं.


आयव्हीएफ वगैरे सारख्या तंत्रज्ञानाने तू आई होशील पण त्यावर तू जेवढा पैसा आणि वेळ खर्च करशील तोच वेळ आणि पैसा एका दत्तक बाळावर खर्च केलास तर तुला लवकर आई होऊन आपलं ममत्व त्या बाळावर लुटता येईल.


काहीजण पैसा नाही म्हणून उपचार अर्धवट सोडतात आणि दत्तक घेणं म्हणजे दुस-याचं मूलं तेही घ्यायला तयार होत नाही मग काय होतं त्यांच्या आयुष्यात नकारात्मक भावनाच दिसते.


डाॅक्टरांच्या डोक्यावर एवढा पैसा घालवण्यापेक्षा एका निरागस निराधार जीवाला आधार दे. बघ ते बाळ तुझ्या आयुष्यात नंदनवन फुलवले. तरी निर्णय सर्वस्वी तुझा आहे. आमच्यापैकी कुणालाही हा निर्णय तुझ्यावर लादण्याचा अधिकार नाही. कारण तू आईची भुमिका करणार आहे ती मनापासून करण्यासाठी तुझी या निर्णयाला पूर्ण पणे तयारी हवी. त्या बाळाला वाढवताना आम्ही सगळे तुला जी लागेल ती मदत करू पण आई म्हणून तुलाच या निर्णयाबरोबर खंबीरपणे उभं राह्यचं आहे."


बाबा एवढं बोलून थांबले.पंकज, पंकजचे आई आणि बाबा सगळ्यांचं माधवी काय बोलेल याकडे लक्ष होते.


" बाबा तुम्ही सांगीतलं ते पटतंय मला. पण मी गोंधळले आहे. मी चटकन निर्णय नाही घेऊ शकणार."

माधवी म्हणाली.


" माधवी बेटा आई होण्याचा निर्णय असा चटकन घ्यायचाय नसतो. तू विचार कर. तुला हवा तेवढा वेळ घे. नंतर तुझ्या आईबाबांशी बोल. हा निर्णय घेताना चौफेर विचार करून घ्यायला हवा."


पंकजची आई माधवीच्या पाठीवर थोपटत तिला म्हणाली.


" माधवी आपलं बाळ तेच आपलं अशा जुनाट विचारांचा पाठपुरावा करणा-यांच़ ऐकू नको. अग श्रीकृष्णाला जन्म दिला देवकीने पण वाढवलं यशोदेनं म्हणजे श्री कृष्ण हा यशोदेच्या दत्तक पुत्रच होता. जिथे भगवंत दत्तक पुत्र म्हणून घ्यायला कचरले नाही तिथे आपण एखाद्या जीवाला दत्तक घ्यायला हरकत आहे? तरी हा पूर्ण पणे तुमच्या दोघांचा निर्णय असेल. हा निर्णय घेताना दोघांची संमती हवी तसं असेल तरच हा निर्णय घ्या."


बाबा पंकज आणि माधवी दोघांकडे बघत म्हणाले.

माधवी विचारात हरवली.


बाबांनी पंकजला खुणेने सांगीतलं की तिला तिचं ठरवू दे.पंकजने होकारार्थी मान डोलावली.


तेवढ्यात प्रसाद आणि कुटूंब घरी आले. प्रसाद ने खुणेनेच विचारलं विषय झाला का आम्ही येऊ का? बाबांनी नजरेनेच हो सांगीतलं. तोपर्यत रिया आणि नेहा वादळासारख्य धावत घरात शिरल्या.

माधवी अजूनही आपल्याच विचारात गुरफटले होती.

________________________________

माधवी आता काय निर्णय घेईल.बघू पुढील भागात.


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED