निळ्या आकाशाचं स्वप्नं - अंतिम भाग Meenakshi Vaidya द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
शेयर करा

निळ्या आकाशाचं स्वप्नं - अंतिम भाग

निळ्या आकाशाचं स्वप्नं भाग ९ ( अंतिम भाग)


मागील भागात आपण बघीतलं की पंकजने काराच्या साईटवर आपलं नाव रजीस्टर केलंय. पुढे काय घडलं बघू.


काराच्या साईटवर नाव रजीस्टर करून आता जवळपास दीड वर्ष झालं होतं. पंकज आणि माधवीचा रोजचा दिवस हा काराकडून येणाऱ्या फोनची वाट बघण्यात जायचा. माधवी आता पूर्वीसारखी निराश होत नसे कारण तिला कळलं होतं की आज नाही तर ऊद्या आपल्या घरी बाळ येईल.


पंकजला ही आता माधवीची पूर्वी सारखी काळजी वाटत नसे. पूर्वी पंकज घरी आला की माधवी खूप वेगळ्या मूडमध्ये दिसत असे त्यामुळे ऑफीसमध्येही पंकजच्या मनात माधवीचाच विचार चालू असे.


***

पंकज आणि माधवीची प्रतिक्षा एके दिवशी संपली त्यांना 'सुखदा ' या दत्तक केंद्राकडून फोन आला. दोघही आनंदसागरात बुडून गेले.


" माधवी बघ आपण आता लवकरच आईबाबा होणार."


" होरे.मला तर अजून विश्वास बसत नाही की सुखदा संस्थेतून फोन आला होता."


" मला पण.बरं परवा सकाळीच निघू. सगळी कागदपत्रं त्या फोल्डर मध्ये आहेत की नाही हे बघून घे आणि जी बॅग नेणार आहोत त्यात ती ठेवून दे."


" बॅग कशासाठी? इथून अवघा दोन तासांचा रस्ता आहे."


" अगं समजा रहावं लागलं तर! म्हणून कपड्यांचे दोन जोड घेऊन जाऊ."


"ठीक आहे ".


पंकजला खूप आनंद झाला होता. तो माधवीचं निरीक्षण करत होता. माधवी तर केव्हाच बाळाच्या कोडकौतुकामध्ये रममाण झाली होती. पंकज आज खूप दिवसांनी समाधानाने ऑफीसमध्ये गेला.


माधवी सगळी कामं यंत्रवत करत होती. तिला इतर गोष्टींचं भान नव्हतं.


***


आज सकाळीच पंकज आणि माधवी सुखदा दत्तक केंद्रात जाण्यासाठी निघाले. साधारण दोन तासांनी ते सुखदा दत्तक केंद्रात पोचले.


" मॅडम नमस्कार." पंकजने नमस्कार केला.


" या. तुम्ही पंंकज?"


" हो. तुम्ही आज बोलावलं आहे."


" बसा.सगळी ओरिजनल कागदपत्रं आणलीत."


"हो." पंकज म्हणाला.


" द्या ती." मॅडम म्हणाल्या.


"माधवी" पंकजने माधवीकडे बघत हाक मारली.


माधवीचं सगळं लक्षणं बाळाच्या रडण्याचे होतं. तिच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद दिसत होता. पंकजने माधवीला हरवलं तशी ती तंद्रीतून जागी झाली.


"ती बॅग दे.त्यात कागदपत्रं आहेत नं?"


माधवीच्या चेहे-यावरून पंकज काय म्हणाला ते कळलेलं नाही हे दिसत होतं. पंकजने हळूच तिच्या हातातील बॅग घेतली. ती उघडून त्यातील कागदपत्रं काढून मॅडमना दिली.


मॅडमनी ती ओरिजनल कागदपत्रं आणि पंकजने कारा कडे दिलेली कागदपत्रं जुळवून बघीतली. सगळी बरोबर आहे असं दिसल्यावर ती कागदपत्रं पंकजला परत केली.


" सविता मॅडम नी हाक मारली.


"काय मॅडम.?"


"हर्षदाला घेऊन ये." मॅडम म्हणाल्या.


"हो.आणते."

सविता बाळाला आणण्यासाठी आत गेली.


थोड्यावेळाने सविताने एका छोट्याश्या बाळाला आणलं. ती मुलगी होती. ते बाळ सविताने माधवीकडे देत म्हटलं


"मॅडम मी बघा तुमची परी."


माधवी विस्फारलेल्या डोळ्यांनी त्या छोट्याश्या बाळाकडे बघत होती.


"घ्या मॅडम हिला."


"मी ? मी हात लावू शकते."

माधवीने विचारलं.


"मॅडम आता ही परी तुमच्याच घरी येणार आहे."


".. पण मला मुलबाळ होत नाही म्हणजे मी वांझ आहे नं! तरी मी हात लावू?"


माधवीच्या बोलण्याने पंकजचं मन गलबललं. त्याने हळूच माधवीच्या खांद्यावर थोपटत म्हटलं,


"माधवी घे बाळाला आता हे बाळ नेहमीसाठी आपल्या घरी येणार आहे. तुला आई म्हणणार आहे आणि मला बाबा."

हे बोलून पंकज हसला. तेव्हा कुठे माधवीने बाळाला म्हणजे हर्षदाला हातात घेतलं.


हर्षदाला हातात घेतल्यावर माधवी एकटक तिच्याकडेच बघत होती. हर्षदा टुकूर टुकूर नजरेने माधवीकडे बघत होती. हर्षदाच्या बघण्याने माधवीच्या अंगावर रोमांच उठले.


" मिस्टर पंकज आपल्याला या महिन्याच्या सव्वीस तारखेला कोर्टात जावं लागेल.सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली की मग तुम्हाला हर्षदाला ताबा मिळेल."

मॅडम म्हणाल्या.


"ठीक आहे. मॅडम तुम्हाला अंदाज येणार नाही किती मोठा आनंद तुम्ही आमच्या आयुष्यात आणला आहे. खूप छान काम करता तुम्ही."


"पंकज मी समजू शकते तुमच्या भावना. थोडावेळ तुम्ही दोघंही बाळाशी खेळा. मग आपण एकदम सव्वीस तारखेला भेटू. इथे आम्ही तिचं नाव हर्षदा ठेवलं आहे. तुम्हाला बदलायचा असेल तर बदलू शकता. आमच्या इथून बाळ आम्ही ज्यांना दत्तक देतो त्यांच्या घरात खूप आनंद येतो पण आम्हाला विशेषतः आमच्या आयांना ज्या या मुलांचा सांभाळ करतात त्यांना खूप आठवण येते. कारण त्यांनी आईसारखीच काळजी घेतलेली असते."


बोलताना मॅडम चा आवाज गदगदला.


" हो बरोबर आहे तुमचं. मला आत्ताच हर्षदाला सोडून जाऊ नये वाटतय. काही क्षण तर झाले आम्ही हिला भेटलो पण या काही क्षणातच तिच्या विषयी आपुलकी निर्माण झाली.तुम्ही तर खरंच आई होऊनच करता या बाळांचं तेव्हा तुम्हाला आठवण येणं सहाजिकच आहे. हर्षदा नाव खूप छान आहे. तिने आमच्या आयुष्यात हर्ष आणला आहे. आम्ही हेच नाव राहू देऊ.

उत्तरादाखल मॅडम हसल्या.


थोड्यावेळाने सविता हर्षदाला घ्यायला आली तेव्हा माधवीचा जीव होत नव्हता.पंकजने तिला समजावलं तेव्हा तिने हर्षदाला सविताजवळ सोपवलं.


दोघंही जड अंतःकरणाने सुखदा दत्तक केंद्रातून बाहेर पडले.


****


आज पंकज आणि माधवीच्या आयुष्यात आनंदलहरींची सुरावट निर्माण झाली. दोघांनी बाळाला म्हणजेच हर्षदाला घरी आणलं होतं. पंकजच्या आईने,वहिनीने माधवीच्या आईने आणि बहिणीने हर्षदाचं औक्षवण केलं. कुंकवाच्या पाण्यात हर्षदाची पावलं बुडवून त्या पावलांनी हर्षदाचं गृहप्रवेश झाला.


सगळे हर्षदाच्या येण्याने आनंदीत झाले. हर्षदाचं बारसं कधी करायचं? यावर चर्चा होऊ लागली.


एकूण काय पंकज आणि माधवीच्या आयुष्यातील रखरखीतपणा आता नाहीसा होऊन आनंदाचे तुषार त्यांचं आयुष्य चिंब भिजवू लागलं.


हर्षदाचं येणं हे पंकज आणि माधवीच्या आयुष्यातील एक सुवर्ण टप्पा आहे. त्या दोघांच्या आनंदात आपणही सामील होऊ या.


पंकज माधवी तुम्ही आईबाबा झाला म्हणून तुमचं खूप अभिनंदन.

_________________________________

निळ्या आकाशाचं स्वप्नं ही कथा मालिका समाप्त झाली.

'कारा' ही बाळ दत्तक हवं असेल तर नोंदणी करण्यासाठी साईट आहे.


दत्तक केंद्राची नावं मात्र काल्पनिक आहे.


यापुढील पर्व वाचायला आवडणार असेल तर वाचकांनी कमेंट मध्ये सांगावं. तुमची इच्छा असेल तर पुढील पर्व मी लिहीन.

धन्यवाद.

©® मीनाक्षी वैद्य.