निळ्या आकाशाचं स्वप्नं - भाग ३ Meenakshi Vaidya द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

निळ्या आकाशाचं स्वप्नं - भाग ३

निळ्या आकाशाचं स्वप्नं भाग ३


मागच्या भागात आपण बघीतलं की संध्याकाळी पंकज माधवीला रोज फिरायला जायचं असं म्हणाला.जातात का रोज ते बघू या भागात.



त्या दिवसापासून पंकज ऑफीसमधून आल्यावर न कंटाळता आणि न चुकता माधवीला बाहेर फिरायला नेऊ लागला.


ज्या रस्त्यावर फारशी गर्दी नसेल अशा ठिकाणी पंकज आणि माधवी फिरायचे आणि जुने काॅलेजचे दिवस आठवायचे. खूप हसायचे. माधवीचं हसणं कानावर पडायचं तेव्हा प्रत्येक वेळी पंकज आनंदाने मोहरायचा. त्याला अशी हसरी माधवी आवडायची.


मधल्या काळात ती फार आपल्या कोषात गेली होती.पंकजला मनातून बरं वाटलं की आपण वेळेवर माधवीची अवस्था ओळखली.


मनसोक्त फिरणं झालं की ते दोघंही त्या ठरलेल्या बागेत जायचे. तिथे बालगोपाळांचा मेळावा भरलेला असायचा. संध्याकाळ झाल्याने आई मुलांना घरी चला म्हणून मागे लागायची आणि मुलं अजून खेळायचं म्हणून हट्ट धरून बसायची. काहीजण तर आई पकडायला आल्यावर इकडे तिकडे पळत पुन्हा घसरगुंडीपाशी,झोपाळ्यापाशी यायची.


आई आणि मुलांचा हा दंगा माधवी आधाशीपणाने डोळ्यात साठवून घेत असे. पंकज माधवीनकडे प्रेमाने बघत राही.


" पंकज आपलं बाळ येईल नं तेव्हा त्याला असंच बगीच्यात खेळायला आणत जाऊ. अगदी रोज."

माधवी आपल्या तंद्रीतच म्हणाली.


" हो नक्की. अगदी रोज आपल्या बाळाला बगीच्यात घेऊन येत जाऊ."


हे बोलताना पंकज खूप प्रेमळ नजरेने माधवीकडे बघत बसला. त्याला माधवीच्या आत दडलेली प्रेमळ आई बघायला खूप आवडलं.


बराच वेळ माधवी त्या मुलांकडे आणि त्यांच्या आईच्या लडीवाळ भांडणामध्ये गुंतून गेली .पंकजला तिला मध्येच टोकायला नको वाटलं. रोज ही दोघं याच बागेत यायचे. या मुलांना बघितल्यावर माधवी ज्या आनंदी चेह-याने घरी परतायची तो आनंद पंकजसाठी खूप महत्वाचा होता. आत्ताही तो माधवीचा आनंदी चेहरा निरखत होता.


हळूहळू सगळी मुलं आपापल्या आईबरोबर बरोबर बागेतून बाहेर पडली तसं पंकज माधवीला म्हणाला,


" माधवी निघायचं? सगळी बाल गोपाळ घरी गेले."


" हं" माधवी तृप्त मनाने हुंकारली.


" जाऊ या. किती आनंद मिळतो मला या क्षणांतून तुला कल्पना नाही येणार पंकज"


" मला कल्पना आहे. तुझा आनंदी चेहरा बघून मी खूप आनंदी होतो म्हणूनच आपण तुझ्यासाठी रोज येतो इथे."


" हो.पण असं चित्र आपल्या घरी कधी दिसेल? ते बाळ माझ्या अवतीभोवती कधी फिरेल? मी खूप वाट बघतेय त्या क्षणाची."


माधवी व्याकूळ नजरेने पंकजकडे बघायला लागली. पंकजने हळूच तिचा हात थोपटून म्हटलं.


"लवकरच दिसेल असं चित्र तुला आपल्या घरी.तू अशीच आनंदात रहा. चल अंधार झाला."

दोघंही उठले आणि बागेबाहेर आले.


***


गाडी सुरू करण्यापूर्वी पंकज कसल्यातरी विचारात आहे हे बघून माधवीने विचारलं,


" पंकज कशाचा विचार करतोय?"


" अं ! तुला काही तरी सांगायचे आहे."

पंकज स्थीर नजरेने माधवीकडे बघत म्हणाला.


" काय?"


पंकजच्या नजरेचा अर्थ माधवीला कळला नाही पण तो काही तरी गंभीर विचार करतोय एवढं कळलं.


" पंकज खूप ताणून नकोस. काय विचार करतोय सांग."


" मी जे सांगेन त्याचा तू कसा विचार करशील माहिती नाही."


" ते तू सांगीतल्यावर कळेल नं.आधी सांग"


माधवी घायकुतीला आली.पंकजला मात्र धीर होत नव्हता. माधवीला आपल्याला जे सांगायचं आहे ते कोणत्या शब्दात सांगावं ते कळत नव्हतं.


" पंकज अरे नको माझा अंत बघू. लवकर सांग."


माधवी कडे स्थीर नजरेने बघत पंकज म्हणाला,


" माझा कलीग आहे राहूल कदम ." आणि बोलायचा थांबला.


" अरे पंकज हा राहूल कदम कोण आहे? त्यांचा आपल्याशी काय संबंध? तू कोड्यात बोलू नकोस.स्पष्ट सांग"


आता मात्र माधवी चिडली.


" राहूल कदम हा माझा कलीग आहे.त्याच्या सख्ख्या चुलत भावाने मागच्या आठवड्यात एक मुलगी दत्तक घेतली."


" काय? आणि का?" माधवीने विचारलं.


" ते दोघं पण आपल्या सारखेच उपचार घेत होते. काहीच होत नव्हतं म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला."


बोलत असताना पंकज पूर्ण वेळ माधवीच्या चेहे-यावरचे बदलणारे भाव बघत होता.


" अरे त्यांनी नीट उपचार घेतले नसतील. किंवा ऊपचाराने बरा न होणारा दोष त्यांच्यात असेल. मी नाही असं कोणाचं बाळं दत्तक घेऊ शकणार. मला आपलं बाळ हवं."


माधवीचा चेहरा अस्वस्थतेमुळे लालबुंद झाला होता.


" तुला हे कितपत पटेल यांची मला खात्री नव्हती म्हणून मी तुला सांगावं की नाही हा विचार करत होतो."


"म्हणजे तुला पटतंय?"


" राहूल ने हे जेव्हा मला सांगीतलं तेव्हा मी गप्प होतो पण मी असा विचार करावा असं जेव्हा तो म्हणाला तेव्हा सुरवातीला मलापण ते पटलं नाही.पण.."


" म्हणजे आता पटलं. तू तुझ्या मित्राच्या डोक्याने चालणार आहे?"


" नाही माधवी. मी नंतर यावर विचार केला. याबद्दलची माहिती गोळा केली वाचली. नंतर मी याबाबत बाबांशी पण बोललो."


" काय ? हे तू बाबांशीपण बोलला. माझं मत आधी विचारात न घेता?"


" तसं नाही माधवी. खूप महत्वाच्या प्रश्नावर जेव्हा मी अडतो तेव्हा मी बाबांशी खूप मोकळेपणाने बोलतो.या चर्चेतून मी खूप फोकस होतो नेहमीच."


" तरी तू माझ्याशी आधी बोलायला हवं होतं.मी बायको आहे तुझी."

माधवी फणका-याने म्हणाली.


" माधवी मी तुझ्या आधी बाबांशी बोललो यांचा राग नको धरू. एवढ्या मोठ्या गोष्टीवर कसा चौफेर विचार करायला हवा हे कळण्यासाठी ज्यांच्याशी आपले संबंध चांगले आहेत. वैचारीक संबंध म्हणतोय. त्यांच्याशी बोललं की आपण फोकस होतो. म्हणून मी बाबांशी बोललो."


" बाबा काय म्हणाले?"


" बाबा म्हणाले की हा निर्णय घ्यायला काहीच हरकत नाही."


" काय ? बाबा असं म्हणाले? मग माझ्या मनाचं काय?"


" माधवी शांत हो. आपण बाबांशीच बोलू. तेच तुला छान समजावून सांगतील."


" अरे या विषयावर मी माझ्या सास-यांशी बोलू? कसं वाटतं?"


" बाबांकडे सासरे म्हणून बघू नकोस. ज्या प्रनावर होय की नाही काय निर्णय घ्यावा हे कळत नाही तेव्हा जसं आपल्या गुरूपुढे आपली समस्या आपण ठेवतो आणि त्यावर चर्चा करतो त्याच दृष्टीने बाबांकडे बघ."


" तुझे बाबा आहेत म्हणून तुला असं वाटतंय."


" माझ्यावर विश्वास आहे नं? या गोष्टी साठी पण माझ्या वर विश्वास ठेवून बघ.त्यानंतर जो निर्णय तू घेशील तो मी मान्य करीन. "


बराच वेळाने माधवी या विषयावर पंकजच्या बाबांबरोबर बोलायला तयार झाली.


" थॅंक्यू. बस आईकडेच जाऊ."


" हे पण ठरलंय का?"


" हो."


" ठीक आहे चल."

माधवी ज्या नाखुशीने पंकजच्या गाडी वर बसली.

_________________________________

पंकजचे बाबा काय सांगतील माधवीला बघू पुढील भागात.