सहाही जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे - 4 Balkrishna Rane द्वारा बाल कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सहाही जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे - 4

शाम झाडावरच्या झोपडीवर सोनपिंगळ्या सोबत होता तेव्हा जानकी होडी घेवून कोळ्यांच्या प्रमुखाला भेटायला गेली होती. सखाराम किंवा दादू कोळी हा कोळ्यांच्या प्रमुख होता. जानकीला पाहून तो अदीबीने उभा राहिला.
" ताईसाब,आपण एवढ्या सकाळी?"
" होय, काका आम्हाला यावं लागलं. आजोबांवर काल हल्ला झाला..."
" काय ? प्रत्यक्ष रावांवर हल्ला ! कोणी हे धाडस केलं?"
" खड्गसिंगाने... म्हणूनच मी आलेय.काका कधी तुमची मदत लागली तर मी तुम्हाला वाड्याच्या गच्चीवरून इशारा देईन."
" एक हाक मारा, आम्ही लागलीच धावत येऊ. खड्ग सिंगांच्या कारवाया वाढल्यात त्याला धडा शिकविणे गरजेचे आहे."
" आजोबांनी, आपल्या राजाला कळविले होते. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल."
" तुम्ही दोघं कोवळी पोर..कसं होईल आता."
" काका आम्ही प्रयत्न करणार... लहान असलो तरी
भित्रे नाही आहोत." जानकी निर्धाराने म्हणाली.
" आम्ही आहोत तुमच्यासोबत ... आम्हालाही बदला घ्यायचाय.." दादू कोळी म्हणाला.
जानकी पुन्हा होडीतून नक्र बेटाकडे येत होती. ऊन आता बऱ्यापैकी वर आल होत.आकाशात समुद्री घारी घिरट्या घालत होत्या.पाणी संथ होते. जाताना मगरीना मासे टाकले पाहिजेत म्हणून जानकीने जाळे पाण्यात फेकले. काही वेळानंतर तिने सफाईने जाळे वर ओढले.
फूटभर लांबीचे सात ते आठ हलवे जाळ्यात तडफडत होत. तीन वेळा जाळे टाकल्यावर बऱ्यापैकी मासे मिळाले. जानकी होडी घेऊन मगरीच्या डोहाकडे गेली. होडी किनाऱ्यावर लावून ती चालत डोहकडे गेली. या परिसरात बऱ्यापैकी दलदल होती.पण तिला वाट परिचित होती.हातातली माश्याची टोपली तिने किनाऱ्यावर ओतली व एक शीळ घातली त्या क्षणी पाण्यातून चार मोठ्या मगरी व दोन छोट्या मगरी बाहेर आल्या.
" दोन दिवस घाईत होते.तुमचा खुराक राहिला.घ्या आता." ती हसून म्हणाली.
मगरी सरसरून वर आल्या त्यानी माश्यांचा फडशा पाडला. त्यांनी शेपटी हलवत आभार मानले. जानकी जाण्यासाठी वळली एवढ्यात तिच्या कानावर कोणी कण्हत असल्याच्या आवाज पडला .पलीकडे किनाऱ्यावर कुणीतरी पालथ पडलं होत.जानकी धावतच तिथे पोहचली.साधारण वीस एक वर्षांचा तरुण तिथे चिखलात पडला होता.जानकीने त्याला सरळ केले.कमरेला खोचलेला पदर मोकळा करत तिने त्याचा चिखलाने माखलेला चेहरा पुसला. नाक मोकळे झाल्याने त्याचा श्वास नियमित होवू लागला.त्या तरुणाच्या चेहेऱ्यावर तेज व त्याचे कपडे बघून तो कुणी चांगल्या कुळातला असावा असा तिने अंदाज बांधला.नशीब मगरींचे त्याच्याकडे लक्ष गेले नव्हते.नाहीतर त्यांनी कधीच त्याच भक्षण केले असते. त्याच्या अंगावर फारश्या जखमा दिसत नव्हत्या.
फक्त हाता पायांना खरचटल होत. अती श्रमान त्याला ग्लानी आली होती. जानकी पुन्हा होडीकडे आली पाण्याच्या बुधल्यातल् पाणी घेऊन ती पुन्हा त्या तरुणाकडे आली.त्याच डोकं मांडीवर घेत तिने पाणी त्याच्या तोंडावर मारलं.त्याने डोळे किलकीले केले.जानकीने थोड पाणी त्याच्या तोंडाला लावलं.तो थोडा सावध झाला.
" या झाडाला टेकून बसणे जमेल?" जानकीने विचारले.त्याने हुळूच मान हलवली. जानकीने त्याला सरळ करत झाडाला टेकून बसविले. आणखी पाणी पिल्यानंतर तो बऱ्यापैकी तरतरीत झाला होता.
" तुम्हाला विश्रांतीची व उपचाराची गरज आहे.या बेटावर आमचा वाडा आहे.मी घोड्याला बोलावते चला."
जानकीने चांदला हांक मारली. काही वेळातच चांद तिथे आला. त्याला आधार देत तिने घोड्यावर बसविले पण त्या युवकाने स्वतः ला घोड्यावर झोकून दिले व आपण लगाम हाताने धरत ती चालत वाड्यावर घेऊन आली. शाम त्यांना बघून बाहेर आला.
" कोण आहेत हे? काय झालंय त्यांना?" त्याने विचारले.
" मला काहीच माहिती नाही. ते सध्या बोलू शकत नाहीत."
एवढ्यात प्रतापरावांना बघण्यासाठी दयाळ आले.दयाळ व शामने त्या तरुणाला धरून स्नानगृहात
नेले.आंघोळ घालून नवी वस्त्रे घालून त्याला विश्रांतीसाठी खोलीत झोपवले.दयाळांनी जखमांवर लेप लावला.थोड खाऊन तो तरुण झोपला. प्रतापरावांची विचारपूस केल्यावर त्यांच्यां जखमेवरही लेप लावला.
" मला आता खूप बरं वाटतंय." प्रतापराव म्हणाले.
" पण अजून जखम भरली पाहिजे.थोडे दिवस विश्रांती घ्या."
एवढ्यात जानकी तिथे आली.तिने आजोबांना त्या तरूणाबद्धल माहिती दिली.
" बरं केलंस पोरी.कुणाचातरी जीव वाचवणे महत्वाचे आहे.तो झोपून उठल्यावर आपली माहिती सांगेल."
" काका, आम्हाला तुमची पण मदत लागेल.बाबांना त्या बेटावरून सोडवण्यासाठी." जानकी म्हणाली.
" म्हणजे तुम्ही या मुलांना...?"प्रतापरावांकडे बघत ते म्हणाले.
" होय, त्यांना कळणे गरजेचे होते."
" पोरी, सांगण्याची गरजच नाही.आम्ही नेहमी तयार असतो." दयाळ म्हणाले.
****------*****----*****-----****----
सुमारे दोन प्रहर उलटून गेल्यावर तो अनाहुत तरूण जागा झाला. त्याने क्षीण आवाजात हाक दिली.
" कुणी आहे का तिथे?"
दोन तीन वेळा हाक दिल्यानंतर शाम तिथे आला.
" काय पाहिजे?"
" थोडं पाणी मिळेल? आणि मला इथे घेऊन येणारी मुलगी कुठे आहे?"
" मी पाणी घेऊन येतो व ताईला सांगतो ती येईल."शाम म्हणाला.
थोड्या वेळाने शाम व जानकी त्या तरूणाला दिलेल्या खोलीत आली.
" तुम्हाला बरं वाटतंय का? तुम्ही कोण कुठून आलात?
जमलंच तर सांगा.बर वाटत असेल तर तुम्ही जावू शकता." जानकी म्हणाली. आताच्या परिस्थितीत कुण्या नवख्या तरूणाला आपल्या वाड्यावर थारा देणे तिला धोक्याचे वाटले.
" हे बघा ,मी पण इथं राहायला आलो नाही.मला पण त्वरीत इथून जायचे आहे.मला त्या सुंदरपूरच्या किनार्यावर सोडण्याची व्यवस्था करा." तो तरुण कसाबसा बोलला.
' आत्ता आणि या अवस्थेत? नको .उद्या मी तुमची सुंदर पूरला जाण्याची सोय करते." जानकी म्हणाली.
काही क्षण दोघंही गप्पच राहिली.
" तुमचे आभार कसे मानू तुम्ही योग्य वेळी मदत केली नसती तर ..." तो तरूण म्हणाला.
" हे बघा ते माझं कर्तव्य होत. माझं नाव जानकी आहे.बर वाटत असेल तर आज शाम सोबत आमचं बेट पाहा... आजोबांना भेटा.त्यांना तुमच्या बद्दल उस्कुकता आहे."
ती बोलत असताना तो एकटक तिच्याकडे बघत होता.सुंदर निरागस गोल चेहरा...चपळ व काटक देहयष्टी...गोड आवाज व करारी बोलणं. तो आपल्याकडे बघतोय हे बघून जानकीने मान वळवली.त्यालाही थोडं ओशाळ्यागत झालं.
" मी अभय ,आनंदपूरातून आलोय.मला साहसाची आवड आहे.एका छोट्या नौकेतून मी स्त्रीसाठी बाहेर पडलो होतो.सोबत दोन व्यापारी होते.सुंदरवाडी बंदराच्या दिशेने येत असताना एका प्रचंड लाटेने नौका फुटली. एका बळीचा आधार घेत... लाटांनी झुंजत मी या बेटाच्या किनार्यावर पोहचलो."
जानकीला वाटलं तो काहीतरी लपवत आहे.
त्या दिवशी शामने अभयला बेटावरून फिरवून आणले.
अभयला हे हिरवेगार फळा फुलांनी बहरलेले बेट फारच आवडले.शाम व पिंगळ्याची मैत्री त्याला आश्चर्यचकित करुन गेली. सायंकाळी तो प्रतापरावांना भेटला.एका पराक्रमी योध्दा आपल्यासमोर आहे हे लक्षात येताच आदराने त्याने त्यांना अभिवादन केले.




सायंकाळी शाम झाडावरच्या झोपडीत गेला.आज रात्री
सोनपिंगळ्याला कर्ली बेटावर टेहळणीसाठी पाठवायचे अस त्याने ठरवले. पिंगळा निद्रेतून जागा झाला होता.
त्यांच्या पाठिवर थोपटत म्हणाला....
" पिंगळ्या ,तूला आज रात्री मोठा प्रवास करायचा आहे. पश्चिमेला दोन कोसांवर एक बेट आहे.त्याच्या चारही दिशांना छोटी बेट आहेत. सभोवताली मुंडकी लटकवलेल्या बेटाची माहिती तूला काढायची आहे."
मान वेळावत पिंगळा घुमला.
-----*****----****----***-----***----