सहाही जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे - 6 Balkrishna Rane द्वारा बाल कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सहाही जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे - 6

साहसी जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे ६
पहाटेला जानकी व शाम किनार्यावरच्या वाळूत तलवारबाजी व तीरंदाजीचा सराव करत होती .चरण टाळ्या पिटत दोघांचा उत्साह वाढवत होता.तलवारींचा खणखणाट व लाटांचा धीर गंभीर आवाज वातावरणातील चैतन्य वाढवत होता. तलवारबाजी झाल्यावर तीरंदाजीचा सराव सुरू झाला. चरणनेने वाळूत एक खांब रोवला व त्यावर धातूचे गोल भांडे ठेवले .भांड्यावर चरणशने एक चेहरा काढला.
" हा.. खड्गसिंग आहे. याच्या दोन डोळ्यांच्या मध्ये बाण लागला पाहिजे.चला..सुरु करा.
जानकी ने धनुष्याला बाण चढवला व नेम धरत बाण सोडला खड्गसिंगा बद्दलचा राग तिच्या डोळ्यात उतरला
होता बाण अचूक दोन डोळ्यांच्या मध्ये बसला होता.शाम व चरणने टाळ्या मारत जानकीचे कौतुक केले.



. जानकी व शाम सराव

करताना.

" ताई आपल्याला लवकरच कर्लीद्विपावर जावे लागणार.सोनपिंगळ्याने तसे संकेत दिले आहेत."
" होय, बाबांची लवकरच सुटका करावी लागेल.
आज सायंकाळी काळोख पडला की आपण दोघं बाहेर पडू त्या बेटाच निरीक्षण करू...आत शिरायला कुठन सोपं पडेल त्याचा शोध घेऊ."
" ताई सोनपिंगळा म्हणत होता... दक्षिणेकडून कुठेतरी भुयारी मार्ग आहे."
" तसं असेल तर बरं होईल."
जानकी,शाम व चरण हे तिघांनी सायंकाळी कर्लीद्विपावर जायचे ठरवले. सगळी माहिती काढल्यावर कोणत्या दिवशी अंतिम चढाई करायची ते ठरवणे शक्य होणार होते.
तिघांनी पाण्यात थोडा वेळ पोहण्यात घालवला. शामने पाण्यात जाळ फेकले. दहा बांगडे सापडले.सोबत पंज्याच्या आकाराचे दोन तारा मासे सापडले.चांदण्यासारख्या आकाराचे ते तारा मासे बघून शाम खूष झाला.त्याने त्यांना वाळूत सोडले.आपल्या पाच पायांच्या मदतीने ते हळूहळू सरकत पुन्हा पाण्याकडे जाऊ लागले. ते बघताना शामला खूप गंमत वाटली.



. वाळूतले तारा मासे

" चला घरी जाऊ, बांगड्यांची छान कालवण करु."
जानकी म्हणाली.
ती तिघ वाड्यावर परतली.तिथे अंगणात प्रतापराव काठीचा आधार घेत फिरत होते.
" आजोबा, तुम्ही बाहेर कसे आलात.? काही झालं असतं तर!"
"अगं, आता मी पूर्ण बरा आहे. लवकरच मी कोणत्याही प्रसंगाला तोंड द्यायला सज्ज होईन."
" आम्ही आज कर्लीद्विपावर टेहळणी करण्यासाठी जाणार आहोत."
" हा आततायीपणा होईल."
" आम्ही पूर्ण खबरदारी घेऊ शिवाय चरणकाका सोबत आहेत त्यांना बेटाची पूर्ण माहिती आहे.
" ठिक आहे. पण बेटावर जाऊ नका."
दुपारी शाम आपल्या झाडावरच्या झोपडीत गेला. त्याने गेले चार पाच दिवस काम करून एकाच वेळी पाच बाण सोडता येतील असा धनुष्यबाण तयार केला होता.त्या लवचिक धनुष्याला त्याने स्वतः विणलेली काथ्याची मजबूत दोरी प्रत्यंचा म्हणून बांधली.बारीक वेळू तासून त्याने बरेच तीर बनवले होते. आज टेहळणी करण्यासाठी जाताना त्यांचा उपयोग होईल असा विचार करून ते त्याने सोबत घेतले.
-------*-------*------*------*-----*-------*----
आकाशाचे रंग गहिरे होत चालले होते.पश्चिम दिशा विविध रंगांच्या छटांनी खुलली होती.सूर्यबिंबाचा पिवळसर रंग हळूहळू नारिंगी होत चालला होता.अस्ताला चाललेला सूर्य गडद नारिंगी होत पाण्याला टेकल्यासारखा दिसत होता.ते एक विलक्षण दृश्य होतं. हळूहळू अंधार होऊ लागला.पाखरांचे थवे किनाऱ्यावरील झाडांकडे परतू लागले.काळोख्या पार्श्व भूमीवर करड्या रंगाची पाखरे छान दिसत होती.अश्या वेळी तीन आकृत्या नक्र बेटाच्या किनाऱ्यावर पोहचल्या. किनाऱ्यावरील होडीत त्यांनी सोबत आणलेले सामान ठेवायला सुरुवात केली. तेलात भिजवले पलिते , धनुष्य,तीर, पहार,पाण्याचा बुधला, तलवारी अस सामान होत.
"जानकीताई, तयारी तर झाली आता होडी पाण्यात लोटुया." चरण म्हणाला.
"होय, शाम तू होडी सांभाळ, आम्ही लक्ष ठेवतो."
तिघांनी काळसर रंगाचे कपडे घातले होते.होडी हळूहळू वेग पकडू लागली.अमावस्येची रात्र असल्याने सारा समुद्र काळोखात बुडाला होता.वर चमचमणारे तारे... समुद्री पक्ष्यांचा आवाज व चपचप असा वल्ह्यांचा आवाज समुद्राची शांतता भंग करत होते.हळूहळू खाडीचे तोंड रुंदावले...पाण्याच्या प्रवाह जोरदार वाटू लागला.आकाशातला ध्रुव तारा लक्षात घेवून शामने होडी हळूहळू दक्षिणेकडे वळवली.
" बेटावर जायला खरंच छुपा मार्ग आहे?" चरणने शंका प्रकट केली.
" काका, पिंगळ्याने सांगितले म्हणजे असणारच."
शाम म्हणाला. अर्ध्या प्रहरात होडी कर्ली बेटाच्या दक्षिणेकडे पोहचली. त्यांनी अत्यंत सावधपणे अलिकडच छोट टेहळणी बेट ओलांडल होते.
होडी किनार्यावर कुठे लावायची याचा ते शोध घेत होते.
दलदल कुठपर्यंत आहे हे त्यांना माहीत नव्हते. धोका पत्करून खाली उतरून शोध घ्यावा लागणार होता. अंधाराला सरसावलेल्या डोळ्यांना समोर झाडांची गर्दी दिसत होती.तिघही गोंधळली होती.एवड्यात शामच्या खांद्यावर कशाचा तरी स्पर्श झाला.
" पिंगळ्या!" शाम हलकेच म्हणाला.
जानकी ने पाहिलं तर शामच्या खांद्यावर सोनपिंगळ्या बसला होता.त्याच्या येण्याची जराही चाहूल लागली नव्हती.
पिंगळा शामच्या कानाजवळ कुजबुजला.
" तो म्हणतोय थोडं उजवीकडे जे भलेमोठे खडक दिसतंय तिथे भुयार आहे."
शामने झपाझप होडी उजवीकडे घेतली.खडकाला वळसा घालून आतल्या खोलगट भागात शिरल्यावर जानकी व चरण पाण्यात उतरून चालत एका छोट्या खडकावर उतरले.आपली शस्त्रे व पलीते त्यांनी सोबत घेतली होते.छोट्या-मोठ्या खडकांच्या गर्दीततून वाट काढत पुढे सरकू लागले.त्यांच्या डोक्यावरून उडत पिंगळ्या त्यांना वाट दाखवत होता.अचानक पिंगळा डावीकडे वळला.एक उभं खडक व त्याला टेकून एक तिरक खडक दिसत होतं .त्या दोन खडकांवर एक आडव खडक होत.मध्ये एक माणूस कसाबसा सरकत जाईल एवढी पोकळ जागा दिसत होती.पिंगळ्या त्या पोकळीत घुसला.


भुयाराच तोंड
" शाम खरोखरच इथून बेटावर जायला वाट असेल?"
चरणने पुन्हा विचारले.
" आपल्याला प्रयत्न करावा लागेल.दुसरा पर्याय नाही."
जानकी म्हणाली.
पहिल्यांदा शाम त्या अरुंद पोकळीत शिरला.त्यापाठोपाठ जानकी आत गेली व त्यानंतर चरण आत शिरला तिघेही किरकोळ शरीरयष्टीचे असल्याने सहजपणे आत शिरले.आत जाताच शामने कनवटीला बांधलेले चकमकीचे दगड काढले.सोबत आणलेल्या कापसावर ठिणग्या पाडून त्याने अग्नी निर्माण केला व त्यावर पलीता पेटविला. आता गुहेत स्वच्छ दिसू लागले.एक-एक माणूस ओणव्याने पुढे सरकू शकेल अशी ती जागा होती. एवढ्यात शामच्या कानी पिंगळ्याचा आवाज पडला.
"चला, पिंगळ्या बोलवतोय."
तिघेही ओणव्याने पुढे सरकू लागली.बाजूचे टोकदार दगड अंगाला लागू नयेत म्हणून खूप जपून जावं लागत होत.शाम सर्वात पुढे हातात धरुन चालला होता...मध्ये चरण तर मागे जानकी होती. तिघांच्याही हातात नंग्या तलवारी होत्या. ते काही घटिका असेच चालत होते.बाहेरच्या लाटांचा आवाजही आता यायचा बंद झाला होता.गारठा जाणवत होता.अचानक शाम धडपडत बाजूला झाला हातातला पलीता जमिनीवर पडला.त्या पाठोपाठ चरण व जानकी पडता पडता वाचली.तिघांच्याही अंगावर काटा उभा राहिला.विचित्र कर्कश आवाज घुमला व त्यानंतर सात -आठ वटवाघळे चित्कारत ..फडफडत.. त्यांच्या अंगावरून गुहेच्या तोंडाच्या दिशेने निघून गेली.
" अरे,देवा... वटवाघूळ होय.उगाचच घाबरलो आपण.."
चरण वैतागून म्हणाला.
शामने हसत पलीता उचलला.आणखी थोडा वेळ चालल्यावर सर्वांचेच डोळे विस्फारले.समोर चार ते पाच माणसे झोपू शकतील एवढ्या लांबी रूंदीची व माणसांच्या उंची एवढी खोली होती. भिंतीवर मशाल अडकविण्यासाठी खोलगट छिद्र होते.तर बाजूलाच एक कोनाडा होता त्यात सोनपिंगळा ऐटीत बसला होता.
त्या कोनाड्याच्या खाली एक बैठक होती.त्यावर जीर्ण असं हरणाचे कातडे होते.
" हे कुणा साधूच्या साधनेची जागा आहे." जानकी म्हणाली.



कर्ली बेट व सभोवतालची टेहळणी बेट

तेवढ्यात पिंगळ्या उडाला व त्यावर एका ठिकाणी चोच मारू लागला.
" तिथे एक खाच दिसतेय. " चरण म्हणाला.
चरणने छोटी पहार त्या खाडीत घातली व ताकद लावून ढकलली...खाच रुंदावत गेली व तिथला चौकोनी दगड आत सरकत गेला व हातभर लांब चौकोनी मोकळी जागा दिसू लागली.या पोकळीतून वरच आकाश व तारे दिसू लागले.पिंगळ्या त्या पोकळीतून वर गेला.
" इथूनच बेटावर जायला मार्ग आहे." जानकी आनंदाने म्हणाली. जानकी बैठकीवर उभी राहिली.
तिचे डोकं सहजपणे पोकळीच्या वर गेला.समोरच दृश्य पाहून ती चकीत झाली.
समोर हाकेच्या अंतरावर वर्तुळाकार जागेवर काही मशाली लाकडी खांबांना बांधलेल्या होत्या. सभोवार असंख्य डाकू
उभे राहिले होते.वर्तुळाच्या मध्यभागी एक धुनी पेटवली होती.धुनीसमोर एक गलेलठ्ठ माणूस विचित्र हातवारे करत काहीतरी पुटपुटत होता व समोरच्या धुनीत काहीतरी फेकत होता. ... निळ्या -नारींगी ज्वाळा भडकत होत्या.त्या माणसाने कमरेभोवती छोटे वस्त्र परिधान केले होते ..या व्यतिरिक्त तो उघडाबंब होता. जानकी सरपटत वर चढली व जमीनीवर पालथी पडून पाहू लागली. त्यापाठोपाठ शाम व चरण वर चढले.
" तो चंडोल ,एक अघोरी आहे.दर अमावस्येला खड्ग सिंग अधोरी कडून कसलीतरी साधना करून घेतो." चरण पुटपुटला.
चंडोलच्या समोर एक आडदांड माणूस एका लाकडी बाकड्यावर बसला होता. काळा कभिन्न ... रूंद खांदे... उन्नत छाती...भलेमोठे पंजे...काळे कुरळे केस असा त्यांचा अवतार होता.
" जानकीताई तो खड्गसिंग आहे." चरणने बोट दाखवून सांगितले.
झटकन शामचा हात घनुष्याकडे गेला.जानकीने त्याला थांबवले.
" मूर्खपणा करू नकोस. आपण त्यांच्या बेटावर आहोत.आपले बाबा त्यांच्या ताब्यात आहेत हे लक्षात ठेव." तिने शामला समजावले.
सगळ्या डाकूंच्या हातात मध्याने भरलेले मातीचे मग होते. अचानक वाद्ये वाजायला लागली.बेधुंद झालेले चहाचे नाचू लागले.खड्गसिंग खदाखदा हसू लागला.तो अधोरीही घुमू लागला.त्याच थुलथुलीत पोट गदागदा हलू लागले. त्यांचे बटबटीत डोळे गरागरा फिरत होते.धुनीभोवती फेर्यात मारत तो मंत्र म्हणत नाचत होता.मशालींच्या प्रकाशात शंभरावर माणसे नाचत होती.सगळी धुरळा उडाला होता.ते दृश्यं अत्यंत भयावह व ह्रदयात धडधड वाढवणार होत.
काही वेळ असाच गेला.चंडोलने हात वर केला.कळ दाबावी त्याप्रमाणे सारे जाग्यावर थांबले.
" कैद्याला घेऊन या.' तो तार स्वरात ओरडला.
" आणा रे त्या चंद्रसेनाला.." खड्गसिंगाने दोघा डाकूंना आज्ञा केली.
चंद्रसेनच नाव ऐकताच जानकी व शाम त्या अंगावर काटा उभा राहिला. दोघांचे डोळे त्वेषाने लालबुंद झाले.
" स्वतः वर ताबा ठेवा." चरणने सुचना केली.
दोन डाकूंनी एका व्यक्तीला ओढतच आणले.
" बाबा..." शाम रडवेल्या स्वरात कुजबुजला.जानकीच्या डोळ्यातून मी अश्रू वाहत होते.दोन वर्षांनीं ते आपल्या जन्मदात्याला बघत होते....तेही असाह्य व हतबल अवस्थेत! त्यांचे शरीर कृश झाले होते... विस्कटलेल्या केसांच्या लांब बटा खांद्यावर रुळत होत्या.
चंद्रसेनाला धुनी समोर उभं केलं गेलं. अघोरी चंडोलने हातात एक कवठी व वितभर लांबीचे हाड होते.
कवठीवर हाड आपटून तो ते चंद्रसेनाच्या शरीराभोवती फिरवत होता.अस काही वेळ गेल्यावर तो ओरडला...
" खड्गसिंगां आजपासून बरोबर सात दिवसांनी उत्तम मूहूर्त आहे.या मूहूर्तावर याचा बळी दिला तर तूला काही सिध्दी प्राप्त होतील....धनाचा तूझ्या वर वर्षाव होईल."
हे ऐकून खड्गसिंग गडगडाट करत हसू लागला.
" ह्या साठीच याला जीवंत ठेवला होता.."
" पण एक लक्षात ठेव पाच वर्षांनंतर हा योग आलाय...व हा मूहूर्त चुकला तर पुढच्या सात वर्षांत असा चांगला मूहूर्त नाही."
" तुम्ही काळजी करू नका, याच बळी देवीला द्यायचाच....घेवून जा याला...भरपूर खाऊ पिऊ घाला या बळीच्या बकर्याला..." खड्गसिंग म्हणाला.
" पिंगळ्या , बाबांना कुठे ठेवतात ते बघून ठेव जा."
शाम पिंगळ्याला म्हणाला.


पिंगळा हवेत झेपावला.. आवाज न करता तो झपाट्याने चंद्रसेनाला नेत होते तिथे पोहचला.
" चला, आपल्याला त्वरा केली पाहिजे.सात दिवस आपल्या जवळ आहेत." जानकी त्वेषाने म्हणाली.
------*****-----------*****----------***

बाळकृष्ण सखाराम राणे
पुढील भागात ' नवा रहस्यभेद '