सहाही जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे - 7 Balkrishna Rane द्वारा बाल कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सहाही जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे - 7

साहसी जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे ७
साहसी जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे ७
अघोरीची पूजा बंद होताच जानकी व इतर झटकन पुन्हा गुहेतल्या खोलीत उतरले. आत येताच जानकीने पहार खडकाच्या खाचीत घालून मागे ओढलं व पुन्हा जाग्यावर बसवलं.अचानक शाम खाली बसून ढसाढसा रडू लागला.जानकीलाही रडू येत होतं.तिने स्वतःला सावरले.
" शाम,आपण बाबांना निश्चितच सोडवू, त्यासाठी व्यवस्थित नियोजन करावं लागेल. एक जरी चूक झाली तरी बाबांचा जीव धोक्यात येईल. आता हातपाय गाळून उपयोग नाही."
जानकीने शामला समजावले.
" जानकीताई, मला कसलातरी आवाज येतोय."
चरण म्हणाला.
"आवाज! मला तर काहीच ऐकू येत नाहीय." जानकी कानोसा घेत म्हणाली.चरणने खडकांच्या भिंतीला कान लावला.काहीवेळ तिघेही श्वास रोखून उभे होते.त्यांच्या चेहर्यांवर तणाव दिसत होता.त्यांना कोणी सापळ्यात अडकवल तर नाही ना? अशी शंका जानकीला आली.
काहीही होवो येणार्या प्रसंगाला तोंड देत लढून बाहेर पडू
अशी जिद्द तिच्यात होती.तिने तलवार सज्ज ठेवली.चरण व शाम ही तयारीत होते.
" पलिकडून कोणीतरी कण्हत असल्यासारखा आवाज येतोय."
चरण म्हणाला.
" पलिकडे खोली असली पाहिजे." शाम हळू आवाजात म्हणाला.
"पण दरवाजा तर कुठे दिसत नाही." जानकी सभोवताली बारकाईने बघत म्हणाली.
जानकी व चरण बारकाईने भिंतीचे निरीक्षण करत होते.
डाव्या कोपऱ्यात त्यांना एक गोल उंचवटा दिसला.खर म्हणजे तो लक्षात येत नव्हता.पण त्याला फिरवण्यासाठी वेगळी व्यवस्था दिसत नव्हती.
" ही दरवाजा उघडण्याची कळ असेल असं वाटत नाही."
चरण निराश होऊन म्हणाला.
जानकी ने सहज म्हणून तलवारीच्या मुठीने त्या गोल ठिकाणी ठोकले.
सर..सर.....कर्र..कर्र असा आवाज आला .तिघेही बाजूला सरकले.एक माणूस कसाबसा जाईल एवढा भिंतीचा भाग
आत सरकला.पलीकडे अतिशय मंद प्रकाश होता. कदाचित पणती तेवत असावी.आता तो आवाज अधिक स्पष्ट ऐकू येत होता. कोण असावा आत.एखाद भयानक जनावर की कुणी दबा धरून बसलेला शत्रू? जनावर तर नक्की नसावं कारण आता प्रकाश दिसत होता.कुणा दरोडेखोरांची ही लपून बसण्याची जागा तर नसावी ना?
आत जावं की नको अश्या अर्थाने तिघे एकमेकांच्या चेहर्याकडे पाहत राहिले.
अखेर जानकी तलवार सरसावत सावधपणे आत शिरली.सभोवार एवढी शांतता होती की फक्त स्वतःच्या श्वासाचाच आवाज ऐकू येत होता व तो सुध्दा भयावह वाटत होता.बाहेरच्या खोली पेक्षा आतली खोली थोडी छोटी होती.जानकी आत गेल्यावर थोडी डावीकडे सरकली.त्यामुळे शाम व चरणला आत यायला जागा मिळाली.मंद प्रकाशात समोरच दृश्य बघून तिचे जागीच स्तब्ध उभे राहिले. एका दगडी चौथऱ्यावर कुणी तरी झोपलेले होत.कुशीवर झोपलेले असल्याने तोंड दिसत नव्हते.अचानक ती व्यक्ती धडपडून उठली.तिचा चेहरा काळ्याभोर लांब केसांनी झाकला गेला होता.किंचाळत व हातवारे करत ती व्यक्ती झोके खात तिघांच्या दिशेने सरकू लागली.
तो प्रसंग खूपच भितीदायक होता .अर्धवट प्रकाशात ती व्यक्ती नेमकी कोण ते कळत नव्हतं.तिघांच्याही अंगावर काटा उभा राहिला.जानकीने तलवार सज्ज ठेवली.
"खड्गसिंग, तुझ्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही."
तो...तो.. आवाज एका स्त्रीचा होता.त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याही स्त्रीचा शत्रू खड्गसिंगच होता.
कोण आहे ही स्त्री? ती अशा भयावह अंधाऱ्या गुहेत का व कधीपासून राहते?
अचानक ती स्त्री कोलमडली.जानकीने झेप घेत तिला आधार दिला.त्या स्रीचे शरीर खूपच गरम होत.तिला ज्वराच संसर्ग झाला होता. सर्वात महत्तवाचे म्हणजे ती अनामिक स्त्री खड्गसिंगांची शत्रू होती. जानकी ने तिला अलगद दगडी चौथऱ्यावर झोपवले.खाली झोपताना तिचे केस चेहर्यावरून बाजूला झाले.त्या स्त्रीचा चेहरा दिसताच जानकी चे डोळे विस्फारले. ...हातपाय थरथरायला लागले. आनंद व विषाद याने तिचा चेहेरा भरून गेला.
" आई...!...आई...!" जानकी आश्चर्यचकित होत बोलली.
" आई?" शाम व चरण एकाच वेळी ओरडले.
" होय. आईच..! जिच्या अंगाखांद्यावर मी खेळले तिचा चेहरा मी कसा विसरेन?"
" पण...पण हे कसं शक्य आहे?" शामने विचारले.
" ती तुमच्या आईसारखीच दिसणारी कोणी दुसरी असेल ." चरणने शंका काढली.
" नाही काका , एवढं साम्य दोन व्यक्तींमध्ये असू शकत नाही.शिवाय आईच्या उजव्या गालावर असलेला छोटा तीळ व हातावर गोंदलेले पिंपळपान हे बघा इथे आहे."
जानकी उत्तेजीत होत म्हणाली.
"पण खड्गसिंगांचा हल्ला... पोटात खंजीर खुपसून..
पाण्यात मारलेली उडी?" शामने विचारले.
" ते आता आईच सांगू शकेल. पण आपल्याला घाई केली पाहिजे.लवकरात लवकर आईला आपल्या वाड्यावर नेले पाहिजे."
"जरा थांबा." असं म्हणत चरणने कमरेला बांधलेल्या कातडी पिशवीतून कसलीतरी सुकलेली पाने काढली.हातावर चूरगळून ती चंद्रावतीच्या नाकाजवळ धरली.त्या पानांना छान वास येत होता.त्या छोट्या भूयारी
खोलीत तो वास जाणवत होता.नंतर त्याने ती पानांची पूड
कपाळावर चोळली.
" काही वेळाने ज्वर कमी होईल. काळजी करू नका.चला." चरण म्हणाला.
जानकी व शामने चंद्रावतीला अलगद उचलले . बाहेरच्या खोलीत आल्यावर चरणने भिंतीवर खोवलेला पलीता उचलला.एका हातात पलिता व दुसर्या हातात तलवार घेऊन तो पुढे सरकू लागला.एक माणूस चालू शकेल अश्या निसरड्या वाटेवरून चंद्रिवतीला घेऊन जाताना जानकी व शामला खूपच कसरत करावी लागत होती.अर्धा मार्ग पार केल्यावर जानकी म्हणाली...
" आईचा ज्वर कमी झालाय.. काका तुम्ही कमाल केलीत."
" आई ..!कोण आई.? " ती स्त्री डोळे उघडत म्हणाली.
" आई..मी...मी.. जानकी आणि...हा शाम तूझी मुलं..."
" शाम?... जानकी?...माझी लेकरं....हे देवा...खरच माझ्या डोळ्यासमोर आहेत का?"
" होय. हे आश्चर्यकारक व सुखदायक आहे." जानकी म्हणाली.
" मला आता खूप बरं वाटतंय.तुम्हाला बघून मला बळ मिळाले आहे.मी...मी .चालू शकेन असं वाटतं."
चंद्रावती खडकांच्या आधाराने थोडा वेळ उभी राहिली.तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले होते.जवळपास दोन वर्षांनंतर ती आपल्या मुलांना समोर पाहत होती.तिने दोधांना आपल्या कवेत घेतलं तिघेही रडत होती.त्यांना रडतांना बघून चर्चच्या डोळ्यातही अश्रू आले.काही क्षण हा आनंदसोहळा सुरू राहिला. भानावर आल्यानंतर सर्वांनी पुन्हा: चालायला सुरुवात केली.
काही वेळातच त्यांनी भुयार पार केल. शामने होडी पाण्याच्या प्रवाहात आणली.सर्वजण होडीत बसले.रात्रीचा एक प्रहर उलटला होता. पूर्वेला चंद्र उगवला होता.हलत्या पाण्यावर चंद्रकिरण चकाकत होती.
गार वारा सुटला होता.
" जानकी, तुझे आजोबा. बरे आहेत ना? आणि तूझे बाबा ...ते ..!"चंद्रावतीने एका अनामिक भितीने बोलणे अर्धवट सोडले.
" आजोबा व बाबा सुखरूप आहेत. आपण घरी गेल्यावर बोलूया." जानकी म्हणाली. तिने आजोबांवरील हल्ला व चंद्रसेनाच कष्टमय जीवन याबद्दल बोलणं टाळलं.आताच त्याबद्दल तिला कळायला नको असं तिने ठरवलं.
" पण आई, आम्ही तर समजत होतो...." शाम चटकन बोलून गेला.
" की मी मरण पावले...! मलाही स्वतःला खरं वाटलं नव्हतं... जेव्हा मी पाच सहा महिन्यानंतर जाणीवेत आले होते तेव्हा....! पण सारी देवाची व ऋषी सोमकांताची कृपा..."
" ऋषी सोमकांत ..कोण आहेत ते ? आम्हाला ते का दिसले नाहीत."
" तो एक चमत्कार होता...घरी गेल्यावर सारं सांगेन."
" ताई, ते बघ समोर... किनार्यावर एक भलामोठा किल्ला दिसतोय.पण...पण..मघाशी येताना तर तिथं काहिच नव्हते."
" खरच..इथल्या परीसरात तर असा किल्ला नाही. हा कुठला भुलभुलय्या आहे.'
सगळेच त्या विलक्षण दृश्याने पाहू लागले.चक्क पाण्यावर एक किल्ला उभा असल्यासारखा दिसत होता. आतून डोकावणारे नारळी पोफळीच्या झाडांसहित तो दिसत होता.

" कुण्या जादूगराच तर हे काम नाही ना?" जानकी म्हणाली.
" शाम, होडी वळवून दुसर्या बाजूने घे. हे सागरावरचे मृगजळ आहे. दिवसा व चांदण्या रात्री वेगवेगळी दृश्यं दिसतात व त्याने भ्रमित होऊन अनेक नाविकांनी आपला जीव गमावलाय."चरण म्हणाला.
" होय, मी पण त्याबद्दल ऐकलं होतं." चंद्रावतीने दुजोरा दिला.
" पण मृगजळ कसं दिसतं?" शामने उत्सुकतेने विचारले.
" जमीन व समुद्राच पाणी यातील उष्णतेच्या फरकामुळे हे घडत असावं.काही वेळा तर भर समुद्रात किनारा दिसतो.थकलेले नाविक.. व प्रवासी आनंदाने पाण्यात उड्या मारतात...व तिकडे पोहत जाण्याचा प्रयत्न करतात.पण तिथे तर काहिच नसते व ते बुडून मरतात.खर म्हणजे ते दूरचे कुठलेतरी ठिकाण असतं." चरण समजावत म्हणाला.
" अरे..देवा समुद्रात अश्या कितीतरी गोष्टी दडलेल्या असतील नाही." जानकी म्हणाली.
मृगजळाकडे पाठ फिरवून ते नक्र बेटाच्या दिशेने मार्गस्थ झाले.
------********-------******----
पुढील भागात चंद्रावतीची गोष्ट