सहासी जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे २
. आजोबांच्या पायावर पाल्याचा लेप दिल्यावर जानकी व शाम दोन घोडे घेवून वाड्यातून बाहेर पडले. वेळ पडली तर प्रतापराव स्वतःच रक्षण करतील या विषयी त्यांच्या मनात कोणतीही शंका नव्हती.सार बेट अंधारल होत.आकाशात पश्चिमेला शुक्राची चांदणी उगवली होती.जानकी हातात दिवटी पकडून घोडा हाकत होती .त्या पाठोपाठ शाम कमरेला तलवार व खांद्यावर धनुष्य बाण लटकवून चालला होता.दोघेही सावध होती पण तेवढीच घाई पण करत होती.आजोबांच्या अंगात बाणाला लावलेले विष पसरु नये हिच प्रार्थना दोघ करत होती. दोघांचेही डोळे व कान सावधतेने परिसरातील बदल टिपत होते.
रातकिडे किर्र- किर्र करत होते.मध्येच घुबड घुमल्यासारखा आवाज येत होता. दूर कुठेतरी कोल्हेकुई सुरू होती. खरं म्हणजे ती दोघ आपल्याच बेटावर होती. इथला कोपरान- कोपरा त्यांच्या परीचयाचा होता.तरीही आजोबांवर झालेल्या हल्ल्यामुळे ती दोघ सावधानतेने वागत होती.
" ताई, आपल्याला घाई करायला हवी. देव करो दयाळ काका कुठे बाहेर गेलेले नसू दे." शाम म्हणाला.
" अशुभ बोलू नकोस. लवकरच आपण किनार्यावर पोहचू."
अचानक जानकीने घोड्याचा लगाम खेचला. कमरेचा खंजीर तिने झटकन बाहेर काढला व डाव्या बाजूला फेकला.शामवर झेप घेण्याच्या तयारीत असलेला एक गलेलठ्ठ लांडगा आवाज न करता झटकन गवतात कोसळला.खंजीर बरोबर त्याच्या कंठात घुसला होता.
" त्याची विल्हेवाट उद्या लावूया. चल." घोड्याला टाच मारत ती म्हणाली.
बघता- बघता ती दोघ किनार्यावर पोहचली होती. पूर्वेकडून येणार्या चंद्रकिरणांमुळे पाणी चमचम करत होतं.भरती असल्यामुळे पाण्याची पातळी वाढली होती.पलीकडे टेकडीवर टिमटिमणारे दिवे दिसत होते.शामने झाडाला बांधून ठेवलेली होडी सोडवली. होडी पाण्यात लोटली.उड्या मारत दोघंही होडीत चढली. शाम होडी वल्हवू लागला. झपाझप तो वल्ही मारत होता.लवकरात लवकर पलिकडचा किनारा गाठायचा होता. जानकी हातात धनुष्यबाण घेऊनच होडीत बसली होती. पेटणारी दिवटी होडीला तोंडावर रोवली होती.त्या प्रकाशाकडे आकर्षित होवून अनेक मासे झुंडीने येत होते .
" होडी थोडी डाविकडे घे.उजवीकडून एक मगर इकडेच येत येतेय." शामने झटकन वल्ही मारत होडी कौशल्याने डावीकडे वळवली.काही वेळातच दोघ किनार्यावर पोहचले.
होडी वाळूतन आणून दोर झाडाला गुंडाळून दोघ धावतच ओलसर निसरड्या पायवाटेवरून टेकडी चढून लागली.थोडा वेळ चालल्यावर अचानक ती दोघ थबकली.
" आहात तिथेच थांबा.हललात तर तीर छातीत घुसेल!"
दोघेही जाग्यावर स्तब्ध उभी राहिली.
दोन भिल्ल झाडीतून बाहेर आले. समोर एक मुलगी व एक मिसरुडही न फुटलेला मुलगा बघून ते भिल्ल निश्चिंत झाले.
" कोन तुम्ही?"
" आम्ही नक्र बेटावरुन आलोय.प्रतापरावांनी पाठवलंय." जानकी म्हणाली.प्रतापरावांच नाव ऐकताच भिल्ल दचकले.
" ताई साब आणि धाकले धनी ..हो ना?" भिल्ल अदिबीने बोलले.
" दयाळ काका आहेत घरी. त्यांना घेवून तातडीने आजोबांकडे न्यायचे आहे.प्रसंग बाका आहे.आजोबांचा प्राण धोक्यात आहेत." जानकी म्हणाली.भिल्ल दोघांना घेवून जलद गतीने दयाळांकडे गेले.
दयाळ नुकतेच जेवून एका रूग्णासाठी औषध तयार करत होते.एवड्यातच जानकी व राम तिथे पोचले.
" काका, लवकर चला. आजोबांना लवकरच औषधोपचार होणे गरजेचे आहे."
" पोरांनु , नेमकं काय झालं ते सांगा."
जानकीने थोडक्यात काय घडलं ते सांगितले.प्रसंगाच गांभीर्य ओळखून दयाळांनी आपली झोळी उचलली. काही आवश्यक साहित्य घाईघाईने झोळीत टाकलं.मघाचच्या भिल्लांना काही सूचना देत ते जानकी व शाम सोबत लगबगीने किनार्यावर आले.
होडी पाण्यात लोटत तिघेही होडीत चढले .शामने होडी चे सुकाणू हाती घेतले.दयाळ मध्ये बसले तर जानकी
हाती तीर कमान घेऊन उभी राहिली.आता पाणी शांत होत.होडी वेगाने नक्र बेटाकडें सरकू लागली.समोर नक्र बेट दिसत होते. एवढ्यात डाव्या बाजूला काही अंतरावर एक छोटा गुराबा ( छोटी लढाऊ नौका)वेगाने त्यांच्या दिशेने सरकताना जानकीला दिसला.त्यावर चारी बाजूला मशाली पेटत होत्या.
" धोका ! " जानकी ओरडली.
त्यावर कर्ली बेटाचा म्हणजे खडगसिंगाचा झेंडा फडकत होता.ज्याच्या नावानेच भल्याभल्यांच्या ह्रदयात धडधड
निर्माण होत होती.
" ती, खडगसिंगाची माणसं आहेत. लवकर किनारा गाठावा लागेल. तसं घाबरु नका . " दयाळ म्हणाले.
स्वतः दयाळ उत्तम लढवय्या होते.जानकी कमानीवर तीर चढवून सज्ज होती. तिच्या चेहर्यावर जराही भिती दिसत नव्हती.तिने कर्ली बेटावरच्या चाच्यांबद्दल थोडंफार ऐकलं होतं.दयाळही तीर कमान घेवून सज्ज होते.शाम, होडी किनार्यावर लवकर नेण्यासाठी प्रयत्नांनाची पराकाष्ठा करत होता.पण गुराब्यावरून पेटत्या तिरांचा वर्षाव सुरु झाला. शाम होडीला वळसे देत हुशारीने तीर चुकवत होता.किनारा काही हातांवर होता. गुराबा आणखी जवळ पोहचला होता. प्रसंग बाका होता. अचानक जानकी व दयाळांनी एकाचवेळी तीर सोडले. गुर्याबाच्या पुढच्या बाजूला असलेल्या दोन चाच्यांच्या छातीत तीर घुसले.दोघेही खाली कोसळले.गुराब्यावर धावपळ सुरू झाली. तेवढ्यात डाव्याबाजूला आरडाओरडा सुरू झाला.आणखी एक होडी वेगाने येत होती.
" चिंता करू नका , ती माझी माणसे आहेत." दयाळ म्हणाले. या तिघांच्या मदतीला नवी कुमक आलेली पाहून
समुद्रीचाचे विचारात पडले व त्यांनी होडी मागे वळवली.
तोपर्यंत शामने होडी किनार्यावर लावली.
" शाम,तू काकांना घेवून वाड्यावर जा. मी इथे थांबते.
चाचेलोक पुन्हा बेटावर शिरण्याचा प्रयत्न करतील." जानकी म्हणाली.
" त्याची गरज नाही. माझी माणसं रात्रभर किनार्यावर टेहळणी करतील.मी बाहेर पडताना या शक्यतेचा विचार करूनच तश्या सुचना दिल्यात."
पुन्हा दोन घोड्यांवर स्वार होत.तिघेही देसाईंच्या वाड्यावर पोहचले.
-------*-------*------*------*-------*-----*-------*------
वाड्यात पोहचल्यावर जानकीने दरवाज्याचा भक्कम अडसर लावला. तोपर्यंत दयाळ प्रतापरावांच्या खोलीत पोहचले होते.प्रतापराव विषाच्या प्रभावाने ग्लानीत पोहचले होते.ते चंद्रसेन... चंद्रसेन असं बरळत होते.
दयाळांनी प्रतापरावांना हात लावून पाहिला. प्रतापरावांना ताप चढला होता. दयाळ यांनी आपल्या झोळीतूंन कसलातरी तेल काढलं व ते प्रतापरावांच्या डोक्याला चोळले. त्यांनी काचेच्या दोन नलीका काढल्या .एका नलीकेच सूईसारख बारीक टोक मांडीच्या शीरेत रिघवले.
दुसरी नलीका त्यांनी पहिल्या नलीकेत घुसवली व तिचा दट्ट्या बाहेर ओढला.त्याबरोबर काळ निळ रक्त नलिकेत जमा झालं. त्यांनी असं बरंच दुषित रक्त ओढून काढले.
प्रतापरावांनी पापण्या उघडल्या.
" दयाळ तू...तू आलास?" प्रतापरावांनी कसंबसं विचारलं.
" होय, मालक. आता काळजी करू नका.तुम्ही लवकरच बरे होणार.पण दहा- बारा दिवस विश्रांती घ्यावी लागेल.
पण तुम्ही चंद्रसेनाच नाव का घेत होता?" दयाळ यांनी विचारले.
तेवढ्यात जानकी दरवाज्याजवळ पोहचली.चंद्रसेनांच नाव ऐकून ती तिथंच थबकली.
" दयाळ, गेली दोन वर्षे एक गुपीत ह्रदयात जपून ठेवलीय..आज ग्लानीत ते ओठांवर आले."
"म्हणजे ?" दयाळ यांनी विचारले.
एवढ्यात प्रतापरावांच लक्ष जानकी कडे गेले.प्रतापराव त्यामुळे गप्प झाले.
*****------****-------*****-------*****-------***---
भाग २ समाप्त.