सहाही जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे - 3 Balkrishna Rane द्वारा बाल कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सहाही जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे - 3

दुसर्या दिवशी सकाळी प्रतापराव बर्यापैकी सावध झाले होते.घाव भरायला अजून दहाबारा दिवस लागणार होते.दयाळांनी आठवडाभराची औषध दिली होती.त्यात लेप,चाटण व काढे होते. आपण दोन दिवसांत पून्हा फेरी मारु असं ते म्हणाले.त्यांना किनार्यावर सोडण्यासाठी शाम चांद घोडा घेऊन गेला.ते गेल्यावर जानकी आजोबांसाठी शिरा व दूध घेऊन त्यांच्या खोलीत गेली.
" आजोबा, थोडं टेकून बसा मी दूध भरवते."
" मी आता अगदी ठिक आहे.मी खाऊ शकतो." प्रतापराव हसत म्हणाले. प्रतापरावांनी नाष्टा केल्यावर जानकीने विचारले....
" आजोबा चंद्रसेन म्हणजेच माझ्या बाबां बद्दल कसलं गुपीत तुम्ही ह्रदयात जपून ठेवलंय? नेमकं काय घडलं होतं बाबांच्या बाबतीत? तुम्ही मध्ये -मध्ये नौका घेऊन कुठे जात असता?"
प्रतापराव काही क्षण गप्प राहिले.
" सांगा ना आजोबा ,काय घडलं होतं.दोन वर्षांपूर्वी माझे बाबा व आई दोघंही एका दुर्घटनेत होडी फुटल्याने बुडून मृत्यू पावले होते ना?"
" पोरी, ते खरं नाही." उसासा सोडून प्रतापराव म्हणाले.
" मग खरं काय आहे."
" तूला आठवत असेल... त्यावेळी सतत दोन दिवस शोध घेऊनही चंद्रसेनचा व चंद्रावतीचा मृतदेह सापडला नव्हता. कदाचित समुद्रातील प्राण्यांनी भक्ष्य म्हणून त्यांना खाऊन टाकल असेल असं समजून आम्ही त्यांचे दिवसकार्यही केलं.पण...चंद्रसेन जीवंत ..."
" काय? बाब...बाबा जीवंत आहेत? कुठे आहेत?" जानकीने आश्चर्यचकित होवून विचारले.तिचे सारे शरीर आवेगाने थरथरत होते.डोळे विस्फारले होते. एवढ्यात दयाळांना किनार्यावर सोडून शाम तिथे आला.त्याने जानकीचे शेवटचे वाक्य ऐकलं.
" बाबा...जीवंत आहेत?" शाम आनंदाने थरथरत होता.
" होय.जीवंत आहेत पण कोणत्या स्थितीत आहेत ते ठाऊक नाही."
"म्हणजे !" जानकीने विचारले.
" सगळं सांगतो ऐका...
खड्गसिंगाचा उपद्रव ह्या परीसरात खूपच वाढला होता.या खाडीतून होणारी वाहतूक जवळपास बंद झाली होती.त्यामुळे त्याला धडा शिकविणे गरजेचे होते.खड्गसिंगाचा बंदोबस्त करा असा सांगावा मी आपले सम्राट रविवर्मा यांना धाडला.पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु एका दिवशी खड्गसिंगाने कहर केला. मासेमारीसाठी गेलेल्या कोळ्यांची होडी वादळामुळे भरकटल्याने समुद्रात खोलवर पोहचली.कसेबसे ते कोळी
वादळ वार्याशी झगडत परतत होते .पण खड्गसिंगाच्या
माणसांनी अचानक हल्ला करत सार्या कोळ्यांचा खात्मा केला व त्यांची डोकी किनार्यावर काठ्यांना लटकवली.त्यामुळे चंद्रसेन क्रोधित झाला.मी व चंद्रसेनांने भिल्ल व कोळ्यांना घेवून चाच्यांची दोन गलबत बुडवली.त्यामुळे खड्गसिंग थोडा वरमला.पण तो बदला घेण्यासाठी संधी शोधत होता.
या घटनेनंतर चंद्रसेन व त्याची पत्नी चंद्रावती रत्नपूरला त्यांच्या मित्राकडे एका समारंभासाठी गेली होती.रत्नपूरला समुद्रमार्गे जाताना कर्ली द्विपाला वळसा घालून जावे लागते. चंद्रसेन या मार्गावरुन रत्नपूरला गेलाय ही बातमी आपल्या नोकरांपैकी कुणीतरी खडगसिंगापर्यंत पोहचवली. चंद्रसेन परतीच्या मार्गावर असताना दबा धरुन बसलेल्या खड्गसिंगाने चारही बाजूंनी त्याला घेरले. चंद्रसेन व चंद्रावतीने त्यांना चकवा देण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही .आपली विटंबना होणार हे लक्षात येताच चंद्रावतीने स्वतःच्या पोटात खंजीर खुपसून पाण्यात उडी घेतली. घनुष्य बाणाच्या साहाय्याने लढणारा चंद्रसेन हे पाहून हतबल झाला व डोकं पकडून नौकेत बेभान अवस्थेत बसून राहिला.खडगसिंगाने त्याला कैद करून कर्ली द्विपावर ठेवलं. तिथे त्यांचे प्रचंड हाल केले जात आहेत.हीन कामे त्याच्याकडून करून घेतात. चाच्यांना अन्न व वस्तू पुरवणार्या गलबतावरील एका खलाशाकढून मला ही माहिती पाच महिन्यांनंतर कळाली. शोध घेताना फुटलेली होडी पाहून ती दोघ दुर्घटनेत बुडाली असा समज आम्ही करून घेतला होता.
मी मध्ये -मध्ये होडी घेऊन जातो ते चंद्रसेनाची माहिती काढायला.पण कर्ली द्विप हे सभोवतालच्या चार छोट्या बेटांनी वेढलेले असल्याने व त्यावर चाचे टेहळणी करत असल्याने कर्लीद्विपा नजीक जाता येत नाही. कालही मी गेलो होतो तेव्हा माझ्यावरही हल्ला झाला पण मी तिथून सुटका करून घेण्यात यशस्वी झालो."
जानकी व शाम ढसाढसा रडत होते.त्यांच्या हातांच्या मुठी वळलेल्या होत्या. चेहरा क्रोधाने आक्रसला होता.
आपल्या बाबांना चाचे कैद्यासारख वागवत आहेत हे ऐकून ती दोघ मुले संतापली होती.
" आम्ही प्रतिज्ञा करतो की आम्ही आमच्या बाबांना सुखरूप आणू व खडगसिंगाचा बदला घेवू" दोघंही एकाच वेळी त्वेषाने ओरडले.
" मुलांनो, ते एवढं सोपं नाहीय. मी हे या साठीच तुमच्या पासून लपवलं होत. पण काहीतरी केलंच पाहिजे पण ते हुशारीने. मी आधीच माझा मुलगा व सून गमावून बसलोय.आता तुम्हाला काही झालं तर ...!"
" आजोबा,खंत करत जगण्यापेक्षा लढून मरणे चांगले नाही का? आम्ही निश्चय केलाय त्यात कोणताही बदल होणार नाही.खड्गसिंगाचा निःपात होणारच हे नक्की." जानकी दात ओठ चावत म्हणाली.
"ठिक आहे. मी पण तुमच्यासोबत आहे. पण जे करायचे ते योजना आखून.साधारण शंभरावर चाचे त्या बेटावर आहेत."
" तुम्ही आधी पूर्ण बरे व्हा.तोपर्यंत आम्ही तयारीला लागतो." शाम म्हणाला.
" कोणताही आततायीपणा करु नका.मला सुचना दिल्याशिवाय पुढे पाऊल टाकू नका."
----*-----*------*----*--------*-----*-----
आजोबांच्या खोलीतून बाहेर पडल्यावर शाम व जानकी यांनी थोडी खलबतं केली.दोघही साहसी व जिद्दी होती. शाम चांद घोड्यावर बसून त्यांच्या आवडत्या ठिकाणी म्हणजे शिशमच्या झाडाजवळ आला. या झाडाच्या फांदीवर त्याने एक छानदार झोपडी बांधली होती. या झाडाच्या ढोलीत त्याने एक ‍‌सोनेरी घुबड पाळले होते.
भेदक डोळे असलेले ....डोक्यावर छोटे उभे कान असलेले.. सोनेरी पाठीवर...काळे व पांढरे पट्टे असलेले टोकदार पंख व साधारण हातभर उंचीच ते घुबड होत.
सहा महीन्यांपूर्वी त्याला हे घुबड जखमी अवस्थेत ह्या झाडाखाली पडलेल सापडलं होते.त्याच्यावर उपचार करून त्याने घुबडाला झाडावरच्या ढोलीत सोडलं होतं.घुबड पूर्ण बरे होईपर्यंत तो रोज त्याची देखभाल करायचा. हळूहळू त्याची व त्या घुबडाची मैत्री झाली. त्याची भाषाही शामला कळू लागली.दिवसभर झोप काढणारे हे घुबड सायंकाळी जाग व्हायचं व रात्रभर
बेटा भोवतालच्या किनार्यावर घिरट्या घालायच. मासे, उंदीर व सरपटणारे प्राणी,उडणारे किटक हे त्याच भक्ष्य होत.शामला आजोबांनी सांगतल होत की घुबडं भूतकाळ व भविष्यकाळ जाणतात.त्यांना पुढे घडणाऱ्या घटनांची चाहूल लागते. त्यांची दृष्टी व कान अत्याधिक तिष्ण असतात.
या घुबडामुळेच शामने शिशमच्या झाडावर झोपडी उभारली होती. या घुबडाला तो 'सोनपिंगळा ' किंवा' सोनू' म्हणायचा.आताही तो तयार केलेल्या दोरीच्या शिडीवरून वर चढला.सोनपिंगळा गाढ झोपला होता. त्याच्यासाठी पाण्याची करव़ंटी पाण्याने भरली. शाम झोपडीच्या गच्चीच्या खांबाला टेकून उभा राहिला.याच दिशेने दूरवर कुठेतरी कर्ली बेट होते.त्या बेटावर त्याचे बाबा कष्टमय अश्या कैदत होते.हे आठवताच पुन्हा एकदा त्यांच्या हातांच्या मुठी आवळल्या गेल्या.दूर समुद्रावर एक
लढाऊ गुराबा लाटांवर स्वार होत पुढे सरकत होता. कदाचित तो समुद्री चाच्यांचा होता.
लवकरच आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. नवी शस्त्रे बनवावी लागतील.दूरवरून व जवळून लढता येईल अशी
हत्यारे मिळवावी लागतील.अचानक सोनपिंगळा विचित्र आवाजात दोनवेळा घुमला.. त्याचा अर्थ होता..."होय
अशी वेळ लवकरच येईल."
शाम चमकला ताईला हे लवकरच सांगितले पाहिजे हे त्याच्या लक्षात आले.
-----*-------*------*--------*-------*-------
भाग तीन समाप्त
बाळकृष्ण सखाराम राणे.