सहाही जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे - 8 Balkrishna Rane द्वारा बाल कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सहाही जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे - 8

शामने होडी नक्र बेटाच्या किनार्यावर लावली. त्या वेळी किनार्यावर त्यांची वाट बघत असलेला चांद घोडा आनंदाने खिंकाळला. तो आनंदाने जमीनीवर टापा आपटत आवाज काढू लागला. त्याने चंद्रावतीला ओळखले होते. असंख्य वेळा त्याने तिला आपल्या पाठिवर बसवून रपेट मारली होती.मुकी जनावर आपल्या मालकांवर किती प्रेम करतात नाही,,,,!
" चांद बेटा, किती दिवसांनी बघतेय तूला.." चंद्रावती त्याच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली.तिच्या डोळ्यात आसवे आली होती.
सारेजण पुन्हा वाड्यावर परतले.प्रतापराव चंद्रावतीला पाहून आनंदित झाले.जी मृत झाली असं समजून सारे संस्कार केले ती समोर बघून त्यांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना.त्यांचे सारे शरीर आनंदाने थरथरत होते.
आधारासाठी हाती पकडलेली काठी त्यांनी फेकून दिली.
" मला याची आता गरज नाही. आजपासुन या वाड्यावर सगळे मंगलमय कार्यक्रम सुरू होतील जे यांच्या जाण्यामुळे मी बंद केले होते."
" मामंजी तुमच्या पायाला काय झालं होतं? आणि.. आणि...हे. हे ...चंद्रसेन कसे आहेत?"
चंद्रावतीची नजर चंद्रसेनाला शोधत होती.सारे काही क्षण गप्प झाले.
" म्हणजे , ते त्या युध्दात... म....मग माझ्या जगण्याला अर्थ काय आहे."
" आई, तसं काही घडलेलं नाही.बाबा, खड्गसिंगांच्या कैदेत आहेत. त्यांचाच शोध घेण्यासाठी आम्ही त्या गुहेत गेलो होतो." जानकीने सांगितले.
" बाईसाहेब आम्ही लवकरच त्यांना सोडवून आणू."
चरण म्हणाला.
" आई आम्हाला तुझी कहाणी ऐकायची आहे.तू त्या गुहेत कशी पोहचलीस ?" वाहने विचारले.
" हे बघ शाम आईला.. स्नान करू दे थोडं खाऊन घेवू देत. त्यानंतर आपण तिची कहाणी ऐकूया..." जानकी ने सुचवले.
****-----****----****----****----***
चंद्रावतीची कहाणी
मला आज जीवंत बघून तुम्ही सारे आनंदित झालात आणि आश्चर्यचकित झालात.माझ जीवंत असणं हा खरोखरच एक चमत्कार आहे.ती त्या परमदयाळू भगवंताची कृपा आहे. आम्ही दोघं म्हणजे मी व चंद्रसेन
सुंदरवाडी वरून काही वस्तू खरेदी करुन परतत होतो. या संपूर्ण परीसरात खड्गसिंगांच्या चाचेगीरीमुळे जो उच्छाद मांडलाय त्यावर काय करता येईल याचीही आम्ही चाचपणी करत होतो.
आमची होडी कर्ली बेटानजीकच्या छोट्या भूभागाला वळसा घालून येत होतो.अचानक तिथल्या झाडावरून अनेक आरोळ्या ऐकू येवू लागल्या.
धोका लक्षात येताच चंद्रसेनांनी होडी वेगाने तिथून दूर न्यायला सुरूवात केली. मी धनुष्यबाण सरसावून तयार
राहिले.आम्हाला घेरत तीन छोटे गुराबे आमचा पाठलाग करू लागले.त्यांचा इरादा आम्हाला घेरून कैद करण्याचा दिसत होता.
ते गुराबे क्षणाक्षणाला आमच्या जवळ येत होते.आम्ही त्यांना चकवा कसेबसे गुहेच्या ठिकाणी आलो.माझ्या बाणांनी समोरून येणार्या गुराब्यातील तिघे चाचे जायबंदी झाले होते. आम्ही पूर्णपणे बसलो होतो.चंद्रसेनांनी होडी वल्हवणे थांबवून धनुष्यबाण हाती घेतले.आम्ही दोन्ही
बाजूंनी मारा करत होतो.आता सुटकेचा मार्ग दिसत नव्हता.तश्यातच खड्गसिंगांचा गुराबा होडीच्या जवळ आला. सोबत नेलेले बाण संपले होते.चंद्रसेनांनी तलवार हाती घेतली. तिन्ही बाजूंनी आमच्यावर बाण रोखलेले होते. सारे प्रयास संपले होते.
" चंद्रसेना, किती वेळ लढशील? ...आता तूला कैद करून या...या तूझ्या बायकोला माझी पट्टराणी करेन."
खड्गसिंग आपले क्रूर डोळे गरागरा फिरवत वासनांध नजरेने माझ्याकडे बघत म्हणाला.
लाखो इंगळ्या शरीराला डसल्या सारखं वाटलं.आपल्या शरीराची विटंबना अटळ आहे असं वाटून मी आततायी निर्णय घेतला.कमरेचा खंजीर पोटात खुपसून मी पाण्यात उडी मारली.
पाण्यात पडल्या पडल्या माझी शुद्ध हरपली. मला शुध्द आली तेव्हा मध्ये काही दिवस उलटून गेले होते.मी डोळे उघडले तेंव्हा समईच्या मंद उजेडात मला एक कृश.. व्यक्ती दिसली. माझे डोळे अंधाराला सरसावले तेव्हा मला जाणवले की ती व्यक्ती अतिशय वृध्द होती. पांढरे केस खांद्यावर झुलत होते... पांढरी शुभ्र दाढी...छातीवर रुळत होती.मी प्राणपणाने माझा हात वर उचलला.त्यांचे माझ्याकडे लक्ष जावे यासाठी माझा प्रयत्न चालू होते.माझ सर्वांग वेदनेने ठणकत होते.
" मुली...तू शुध्दीवर आलीस? हे परमेश्वरा तुझे आभार आहेत. एक मासाहून अधिक काळ तू अचेतन अवस्थेत होतीस."
त्यांनी वळून माझ्याकडे पाहिले. आता मला त्यांचा चेहेरा स्पष्ट दिसत होता. त्यांचा चेहरा तेजस्वी होता...डोळ्यात करूणा व प्रेम दिसत होतं.मी बोलण्यासाठी ओठ हलवू लागले पण शब्द बाहेर पडेनात.
" काळजी करू नकोस.आणखी काही दिवस तूला पूर्णपणे बरे व्हायला लागतील.तू मृत्यूशी झुंज देऊन परत
आलीस." ते हळुवारपणे म्हणाले.
त्यांनी जवळ येऊन माझ्या मस्तकावर हात फिरवला.
" तू पाण्यात रक्तबंबाळ अवस्थेत मला दिसलीस.पोटात खंजीर खोलवर घुसला होता.मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. मी माझी सारी तपश्चर्या व अनुभव पणाला लावला.पण तूझी इच्छाशक्तीही उपयोगी ठरली."
मी पुढच्या महिन्याभरात हळूहळू उठून बसू लागले.
बोलू लागले.मला त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती मिळाली. त्यांचं नाव ' श्रीधराचार्य ' होत. त्यांचं वय शंभरावर होत.अनेक घटनांचे ते साक्षी होते. वेळ मिळाला की ते मला विविध गोष्टी सांगत.
" बाबा, मला घरी जायचंय " असं मी त्यांना म्हणाले.
" मुली अजून ती वेळ आलेली नाही. तू इथून बाहेर जाण्याएवडी सक्षम नाहीस. बाहेर धोका आहे.खडग् सिंगांची माणसं सतत अवतीभोवती फिरत असतात."
" बाबा, तुम्हाला खड्गसिंगांची माहिती आहे."
" होय, त्याच्या पापाचे घडे आता भरलेत. तूला तूझी माणसं लवकरच भेटतील.सगळ गोड होईल चिंता करू नकोस."
त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवूनच मी आज पर्यंत जगत होते.त्यांना अनेक सिध्दी प्राप्त होत्या पण त्यांचा वापर त्यांनी स्वतः साठी कधी केला नाही. एकदा एक अस्वल त्या गुहेच्या मार्गातून आत शिरले. मी बाबांच्या ध्यानाच्या खोलीत बसले होते. बाबा समोर ध्यान लावून बसले होते. अस्वल जबडा विचकावत माझ्या समोर उभं राहिलं. अचानक घडलेल्या या घटनेने मी भेदरले.
" आहे तिथेच थांब..." डोळे उघडत बाबा म्हणाले.
अस्वल जागीच उभे राहिले.
" मागे फिर.... जिथून आलाच तिथे परत जा.."
अस्वल मवाळ होत गुपचूप मागे फिरल. बाबांच्या अपार सामर्थ्याचा साक्षात्कार मला त्यावेळी झाला.
ते कधीतरी एखाद्या दिवशी बाहेर जायचे येताना काही अन्न घेऊन यायचे...त्यात कंद मुळे... पाला असं असायचं. पण ते बाहेर कुठून जायचे ते मला माहित नव्हते.
" आम्हाला तो मार्ग सापडला... बहुतेक ते गुहेच्या छपरावरील मार्गातून जात असतील." शाम म्हणाला.
" पण ,आता बाबा श्रीधराचार्य कुठे आहेत ?" जानकीने उत्सुकतेने विचारले.
" दोन दिवसांपूर्वी ते म्हणाले की मी बाहेर जातोय..
तूझी इथून बाहेर जाण्याची वेळ आलीय...मी योग्य वेळी
पुन्हा तूझ्या सोबत असेन .माझी काळजी करू नकोस. " चंद्रावती म्हणाली.
गेली दोन वर्षे चंद्रावरील त्या अंधाऱ्या गुहेत फक्त श्रीधराचार्यांमुळेच राहू शकली हे सार्याच्या लक्षात आलं.
" आपल्याला चंद्रसेनाच्या सुटकेसाठी योजना आखायला पाहिजे." प्रतापराव म्हणाले.
" दयाळ व दादू काकांना माहिती दिली पाहिजे." जानकी म्हणाली.
"आपण यावर सायंकाळी विचार करूया." प्रतापराव म्हणाले.
" ठिक आहे, मी आता जरा फेरफटका मारून येतो."
चरण म्हणाला.
सगळ्यांनाच चंद्रसेनाच्या सुटकेची काळजी लागली होती.

-----*------*------*------*-----*------*------*
भाग ८ समाप्त.