शिकवणं एक कसरत Ankush Shingade द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

शिकवणं एक कसरत

शिकवणं एक कसरतच आहे?

एका वर्गात एका विद्यार्थ्यांची आई आली. म्हणायला लागली की सर माझा मुलगा घरी ऐकत नाही. अभ्यास करीत नाही. त्याला वळण लावा. त्यावर शिक्षकानं म्हटलं की थोडसं मारलं तर चालेल काय? तशी ती स्री म्हणाली, 'होय' त्यावर शिक्षक म्हणाले, 'आणि समजा एखाद्या वेळेस दुखापत झालीच मारण्यातून तर. तसा मी काही तुमच्या बाळाचा शत्रू नाही. परंतु कधीकधी मारतांना किरकोळ स्वरुपात लागतंच. दुखापतही होतेच. तर ते तुम्ही सहन करु शकाल काय?' त्यावर ती स्री त्यावर गप्प झाली.
अलिकडील काळात शिकविण्यात तशी कसरतच आहे. कारण पटसंख्याच तुटत चाललीय. कसं शिकवावं ते कळत नाही. आता कितीही चांगलं शिकवलं तरी शिकविण्याला नावबोटं ठेवणारे काही कमी नाहीत. त्या लोकांकडे पाहिलं तर शिकविणं एक कसरतच वाटत असते.
शिकविणं ही एक कसरतच आहे. शिक्षक हा एक विदुषकच आहे. जो खऱ्या अर्थानं शिकवतो. त्यालाच कळत असते की शिकवायचं कसं? परंतु जो शिकवीत नाही. त्याला काही त्या स्वरुपाचं कळत नाही. त्यातच जो शिकवीत नाही. त्याच्यासमोर काहीच समस्या उभ्या राहात नाहीत. परंतु जो शिकवतो. त्याच्यासमोर खऱ्या अर्थानं समस्या उत्पन्न होत असतात.
म्हटलं जातं की शिक्षकानं प्रेमानं शिकवावं, विद्यार्थ्यांना मारु नये व विद्यार्थ्यांचा अपमानही करु नये. तसं पाहिल्यास लोकांचं म्हणणं बरोबरच आहे. विद्यार्थी वयानं लहान असतात. त्यांना मारणे बरोबर नाही. कारण सांगीतलं जातं की ते परमेश्वराचे अंश असतात. त्यांना खोटं बोलता येत नाही. त्यांच्या मनात पाप नसतं. राग, द्वेष अजिबात नसतो. प्रेमानं सांगीतल्यास ऐकतात. त्यांचं मन मातीच्या गोळ्यासारखं असतं. जसं वाकवता येईल, तसं वाकतं. अर्थात संस्कार फुलवता येतात. तसेच जर मारहाण केली तर वा त्यांना अपशब्द बोलल्यास त्यांचा अपमान होतो व आपल्याला त्यांच्यावर संस्कार फुलवताच येत नाही. असं बहुतेकांचं म्हणणं.
लोकांचं म्हणणं बरोबर आहे. कारण त्यांना वास्तविक परिस्थिती माहीत नाही. मुलं कशी वागतात याचीही कल्पना नाही. ती खोटं बोलतात हेही ते मानत नाहीत. ती दंगामस्ती करीत नाहीत. असं ते मानतात. त्यांना राग येत नाही असंही ते मानतात आणि शिक्षकांचं वेळोवेळी ऐकतात. अभ्यास करतात. असंही ते मानतात. परंतु वास्तविकता वेगळीच असते. विद्यार्थ्यांचा अपमान होतो. त्याला अपशब्द बोलू नये. तसेच मारु नये या सरकारच्या धोरणामुळे शिक्षकानं विद्यार्थ्यांना मारणं सोडल्यानं व नापास करणं सोडल्यानं लहान मुलं जास्त मस्ती करतात. ते एवढी मस्ती करतात की त्यांना नियंत्रीत करणं सहज शक्य होत नाही. त्यांना कितीही वेळा 'लिहा' असे जरी म्हटले तरी ते लिहित नाही. ते अभ्यास करीत नाही. काही मुलं तर शाळेत येत नाही. वारंवार गैरहजर राहतात. आदरयुक्त भीती अजिबात उरलेली नाही.
अलिकडे नापास करण्याचीही सोयच नाही. त्यामुळंच शिक्षक हा कळसुत्री बाहुलाच ठरला आहे आणि शिकवणं ही तारेवरची कसरतच ठरली आहे. कोणीही येतो व शिक्षकाला धमक्या देवून जातो. असं करीन, तसं करीन म्हणतात. याचं उदाहरण द्यायचं झाल्यास घरचंच उदाहरण देता येईल. आपण आपल्या मुलाचे आईवडील असतांनाही घरी आपली दोन मुलं आपल्याला ऐकत नाहीत वा त्यांच्यावर आपल्याला नियंत्रण करता येत नाही. ते आपल्या बोलण्यावर प्रतिउत्तर देतात अर्थात तोंडाला तोंड देतात. शब्द खाली पडू देत नाहीत. त्यांना प्रेमानं जरी हाताळलं. मारलं आणि कोणत्याही स्वरुपाचे आपण प्रयोग केले तरी...... जिथं दोन मुलं आपली असूनही आपल्याला ऐकत नाहीत. पालक शाळेत येतात, तेव्हा शिक्षकांना सांगतात की सर याला चांगलं समजावून सांगा की यानं घरी मायबापाचं ऐकावं. कारण हा घरी अजिबात ऐकत नाही. याला सुधरवा. याचाच अर्थ असा की मुलांवर संस्कार करणं, त्याला सुधरवणं आणि त्याला शिकवणंही शिक्षकांचं काम आहे आणि तो त्या मुलांना शिकवतोही. अगदी तो दोन वर्षाचा असल्यापासून. अगदी तो शेंबडा असल्यापासून. आता मायबापाचं काम फक्त जन्म देणं एवढंच उरलं आहे की काय? असंच वाटायला लागलंय. कारण मुलं दोन वर्षाची असतात. तेव्हापासूनच शाळेत जातात. त्यांना ती लहान असतांना त्यांच्या वाढीसाठी सरकारच त्यांना अन्न पुरवतं. वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी पुरवते. ती थोडी मोठी झाली की खिचडी पुरवते व तिही त्यांच्या आईवडीलांना बनवावी लागत नाही. शाळेतच बनते. असं सारं असतांना जो शिक्षक मुलांच्या दोन वर्षापासून त्याची काळजी घेत घेत त्याला वाढवीत असतो. त्याला सांभाळत असतो. कधी त्यानं शौचही केली तरी तिही कोणत्याही प्रकारचा किंतू परंतु न बाळगता स्वच्छ करुन देतो. त्याला कपडे परीधान करण्यापासून तर त्याला आंतरीक सवयी लावण्यापर्यंत त्याला शिकवीत असतो. एवढंच नाही तर त्याला सर्व प्रकारच्या शिस्ती लावत असतो. याचाच अर्थ असा की शिक्षक हा घटक विद्यार्थ्यांच्या जडणघडणीतील महत्वाचा घटक आहे. असे असतांना कधी काही त्यांच्यावर संस्कार फुलवीत असतांना तो जर ऐकत नसेल, वारंवार एकच चूक करीत असेल वा संस्कार आणि शिस्तीला प्रतिसाद देत नसेल किंवा कधीकाळी प्रतिउत्तर देत असेल तर त्याला कधीकधी रागवावंही लागतं. हा त्याचा अपमान नसतो. कधी त्याला मारावंही लागतं. हे शिक्षकांचे मारणे जाणूनबुजून नसते तर तो एक संस्काराचा भाग असतो. यात कधी एखाद्या वेळेस विद्यार्थ्यांवर संस्कार करीत असतांना वा शिस्त लावत असतांना विद्यार्थी जर प्रतिसाद देत नसेल, प्रतिउत्तर देत असेल तर शिक्षक तसं करतो. परंतु तसं करीत असतांना वा मारत असतांना त्या विद्यार्थ्याला लागतं. कधी वळं येतात. कारण विद्यार्थ्यांना मारत असतांना ते प्रतिउत्तर म्हणून ते मारणे अडवीत असतात. त्यातच त्या विद्यार्थ्याला कोणत्याही ठिकाणी लागतं. कधी रक्तही निघतं. मग त्याचा बाऊ होतो. बाऊ एवढा होतो की म्हटलं जातं अमूक अमूक शिक्षकाला काढून टाका नोकरीवरुन. म्हटलं जातं की असं मारावं लागतं का? म्हटलं जातं की अमूक शिक्षक आमच्या मुलांचा रागच करतो. म्हटलं जातं की त्या शिक्षकानं माझ्या मुलांना जाणूनबुजून मारलं आणि बाकी पालकवर्ग त्याच पालकांच्या वक्तव्याला दुजोरा देत हो ला हो मिरवीत असतात. ही शोकांतिकाच आहे.
महत्वाचं सांगायचं झाल्यास वर्गात तर एवढी मुलं असतात. ती मुलं वेगवेगळ्या वातावरणातून येत असतात. कधी त्यांच्या घरी त्यांच्या मायबापाची भांडणं होत असतात. त्याचे पडसाद विद्यार्थी मनावर उमटत असतात. अशावेळेस मुले खोटंही बोलतात. त्यांना रागही येतो. त्यांच्यात वाईटही गोष्टी बळावतात. अशा या मुलांवर संस्कार कसे करता येतील? वर्गात त्यांना नियंत्रीत कसे करता येईल? हा प्रश्न यक्षप्रश्न शिक्षकांसमोर उभा असतो. अशी मुलं ऐकत नाहीत व खरा शिक्षक अशाही मुलांवर संस्कार घडविण्यासाठी मारतोच. जसं दगडाला देवपण आणत असतांना शिल्पकार त्याला घणानं ठोकतात तसं वा हिऱ्याला पैलू पाडत असतांना त्यांच्यावर घाव घालतात तसं. मग लागतं मुलांना. दुखापत होते. कधी किरकोळच दुखापत तर कधी गंभीर स्वरुपाची. शिक्षकांचा काहीही दोष नसतांनाही......
विशेष सांगायचं म्हणजे विद्यार्थ्यांवर संस्कार करतांना ते विद्यार्थी जर वात्रट वागत असतील तर त्यावर शिक्षकानं काय करावं? शिक्षक त्यांचे शत्रू असतात काय? याचं उत्तर शिक्षक शत्रू नसतात विद्यार्थ्यांचे. असं निश्चीतच सांगता येईल. मग त्यांना मारु नये काय? ती प्रेमानं ऐकत नसतील तर काय करावं? इत्यादी प्रश्न खऱ्या शिक्षकांना नेहमीच पडतात की जो चांगलं शिकवतो वा चांगलं शिकविण्याचा प्रयत्न करतो. जो चांगलं शिकवीत नाही वा तसा प्रयत्न करीत नाही. त्या शिक्षकांना तसे प्रश्न कसे पडतील? पडतच नाहीत तसे प्रश्न.
विशेष म्हणजे विद्यार्थी शिकवणं आजच्या काळात तारेवरची कसरतच आहे. जो शिकवतो त्यालाच कळतं. जो शिकवीत नाही त्याला कळत नाही. वरवर बोलायला काय जातं? एखाद्या वेळेस एखाद्या शिक्षकानं विद्यार्थ्यांना मारल्यास व दुखापत झाल्यास अमूक शिक्षकानं जाणूनबुजून मारलं असं म्हणायला काय जातं? तेव्हा यात खरं सांगायचं म्हणजे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे अशी शिक्षकांची अवस्था आहे. कारण गोष्टी कोणीही सांगू शकतो. गोष्टी सांगायला काही लागत नाही. जो प्रत्यक्ष काम करतो. त्यालाच समजतं हे तेवढंच खरं.
महत्वपुर्ण गोष्ट ही की ज्याला आपली मुलं शिकवायची नसेल, त्यानं बाऊ करावा आणि आपल्या मुलांना घरीच ठेवून शिकवावं. मुलांना शाळेत विनाकारण पाठवू नये व संस्कारांची अपेक्षा करु नये. कारण मुलं प्रेमानं ऐकतच नाही. एका वर्गात अनेक विद्यार्थी असतात. जी वेगवेगळ्या वातावरणातून आलेली असतात. त्यांच्यावर रागविण्याशिवाय व थोडेफार मारल्याशिवाय संस्कारही करता येत नाही. अन् शिक्षकानंही विद्यार्थ्यांना जास्त मारु नये. जेणेकरुन विद्यार्थ्यांना गंभीर स्वरुपाची दुखापत होईल व त्याला अतिशय वेदना होतील. कारण ते आहेत. म्हणून शिक्षक आहेत. ते जर नसतील तर शिक्षकांचाही काही उपयोग नसेल. हेही तेवढंच खरं आहे यात शंका नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०