Mall Premyuddh - 37 books and stories free download online pdf in Marathi

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 37

मल्ल प्रेमयुद्ध





गाडी थांबल्यावर स्वप्नाली आणि ऋषि थबकले. त्याची शेती बघून...
"ताई हे बघितलंस का?" स्ट्रॉबेरीच्या रोपांना लालचुटुक स्ट्रॉबेरी बघून ऋषि खुश झाला.
"बापरे... किती मस्त! आणि हे कसं शक्य आहे. शेती एवढी स्वछ???" स्वप्नालीने एकवेळ सगळ्या शेतीवर नजर फिरवली.

"ऋषि पायीजे तेवढी स्ट्रॉबेरी खा... सिझनला मी स्ट्रॉबेरीच लावतो." भूषण म्हणाला.
"हे तू वीरदादाला का नाही सांगितलंस? ऊस लागवडीत काही अडचण नाही पण...." त्याचा शब्द मध्येच थांबवत भूषण म्हणाला.
"आर तुझ्या आबा मामांना पटायला पाहिजे ना... आधुनिक शेतीच किती खूळ वीर आणि संग्रामदादान त्यांच्या डोक्यात घालायचा प्रयत्न केला पण ते ऐकतील तवा न... ते जुन्या ईचाराच पोरांच्या मताला ते जुमानत न्हाईत. संग्रामदादा ऐकतो त्यांचं पण वीर न्हाय... जे बरोबर हाय तिथं त्यांचा शब्द मोडत न्हाय जिथं चूक तिथं चूक... त्याला शेताकड बघायला तेवढा येळ असता ना तर त्यानं नक्की माझं मत घेतलं असत. मी म्हणालो एकदा संग्रामदादाला की तू पण स्ट्रॉबेरी लाव, तशी त्यांची बागायती हाय....पण दादा आबांच्या पुढं बोलायला सुद्धा घाबरतो, त्याच मत कधी मांडणार..."

भूषण बोलत होता. स्वप्ना त्या लालबुंद स्ट्रॉबेरी बघण्यात गुंग व्हती. ऋषीला भूषणच म्हणणं पटत होत.

"आव बघताय काय नुसतं? खा की.." भूषणने पटापट स्ट्रॉबेरी तोडून स्वप्नाच्या हातात दिली. स्वप्ना आधाशासारखी स्ट्रॉबेरी खात होती.
"ताई आग हळू खा... किती आहे बघ तरी..." ऋषि तिच्यावर हसायला लागला.
"सुख आहे रे हे शेतात बसून स्ट्रॉबेरी खायची म्हणजे... घेन बघ कसल्या गोड आहेत." ऋषि आणि स्वप्नाने पोटभरून स्ट्रॉबेरी खाल्ली.

त्याने जरा वेळाने संपूर्ण शेत त्या दोघांना फिरून दाखवलं.
कोथंबीर, मेथी, वांगी, भेंडी, मिरच्या, टोमॅटो... स्वप्नाने डोळे विस्फारले होते आणि हे सगळं बघून आनंद जात होता.

" हे सगळं एकटे बघता?" स्वप्नाने विचारले.
" न्हाय काका आणि काकू हायत... त्याने त्यांची लांब असलेली खोली दाखवली आणि आई येते. बायका येत्यात गरज असल तवा..." भूषणने सगळी माहिती दिली.

एक मोठ्या आंब्याच्या झाडाखाली तिघे बसले. स्वप्ना आणि ऋषि डोळे भरून सगळी शेती न्याहाळत होते. जवळजवळ दोन तास झाले होते येऊन... मस्त हवा सुटली होती.
"दादा एक सांगू...आम्हाला मामाची शेती माहीत होती. गावातल्या श्रीमंत माणसाची शेती... आजूबाजूला आंम्ही कधी बघितलं नाही." ऋषि
"मग हायतच आबासाहेब श्रीमंत त्यांची बरोबरी कोण करल व्हय." भूषणच मन मोठं आहे हे कळायला त्या दोघांनाही वेळ लागला नाही.
" दादा तुला बघून वाटलं नाही रे... म्हणजे तुझं चित्र जस माझ्या डोळ्यासमोर तयार केले होते तसेच होते. गरीब, सतत दादाच्या माग फिरणारा म्हणजे आम्हाला अस वाटायचं की तू त्याच्या मागे फिरतोस..." ऋषि बोलताबोलता थांबला त्याला स्वप्नाने डोळे दाखवले होते..
" अरे बोल का थांबलास.... कारण माझा त्यात स्वार्थ हाय... असच ना..." ऋषीने मान खाली घातली.
"आर तुलाच काय सगळ्या गावाला अस वाटत होतं पण आमची दोस्ती तुटली न्हाय... वीरला मी सोडावं अस कधी तो वागला न्हाय की मी वागलो न्हाय. घरी आला ना की आईला म्हणायचा, 'काकी मला तुझ्या हातच्या काळ्या घेवड्याच्या डाळीच्या आमटीचा वास आला म्हणून आलो... वाढ जेवायला भूक लागली.' आत्तापर्यंत घरी आला की जेवल्याशिवाय जायचा नाय.

"काय भारी मैत्री र तुमची.... पण तु सिद्ध केलं ना की तुमच्या मैत्रीत काही स्वार्थ नाही." ऋषि
"हो म्हणूनच आत्तापर्यंत एकत्र आहेत ना..." खूप वेळानंतर स्वप्ना बोलली. त्यांच्या शेतात काम करणाऱ्या राधक्का आल्या.
"घ्या भूषणदादा जेवण आणलय..."
"भूषणदादा आम्ही निघतो..." ऋषि
"आव तुम्ही कुठं निघाताय, म्या मगाशीच बघितलं तुमाला आलेल तुमचं जेवण बनवलय आता न्हाय म्हणायचं न्हाय जेवून जायचं. राधाआक्काने डब्बा ठेवला पाण्याची घागर, तांब्या ठेवला आणि तरतर निघूनसुद्धा गेली.

"भूषण अहो मामीने घरी जेवण बनवलं असेल."
"दादा अरे खरंच आम्ही जातो घरी अशी लांब नाही.."
"अजिबात नाय... आता एवढं राधक्कानी जेवण बनवलय आवडीनं खाऊन ज नायतर तिला वाईट वाटलं." भूषणने ताटात सांडग्याची भाजी, गरमगरम भाकरी अन मिरचीचा ठेचा, चुलीत भाजलेल्या भातवड्या वाढल्या. स्वप्नालीने त्याला मदत केली. ते जेवण बघून आधीच ऋषीच्या तोंडाला पाणी सुटलं.
"सांडग्याची भाजी...वा... मला तर खूप आवडते, अब तेरा क्या होगा कालिया..." उगाचच स्वप्नाकडे बघून ऋषि दात दाखवत डायलॉग बोलला. स्वप्नाने ऋषीला जोरात चिमटा काढला. तसा तो जोरात कळवळला.
"आर काय चाललंय तुमच्या बहीण भावाचं?"
"दादा अरे हिला ना सांडग्याची भाजी आवडत नाही." ऋषि पटकन बोलून बसला.
"गप रे... हे काहीही सांगतोय... खाईन मी..."
"मग तर स्वप्नाली तुमाला सांडगा खावाच लागणार हाय, आव तुमी एकदा खाल्ली ना आमच्या राधक्काच्या हातचा सांडगा तर यानंतर त्याकडं बघून तोंड वाकड करणार न्हाय." स्वप्नाने एक घास खाल्ल्या डोळे झाकून ती भाजीची चव घेत होती.

"एवढी भारी लागती ही सांडग्याची भाजी... मग मला का नाही कधी आवडली...?" स्वप्ना खात म्हणाली.
"तायडे तू कधी मनापासून खाल्लीच नाहीस तर कशी आवडणार...दादा ही एकटी हाय आमच्या घरात जिला सांडग्याचे नाव काढले तरी आवडायचे नाही आणि आता बघा."

"बापरे ठेचा खाऊन बघ... दादा काय चव आहे राधक्काच्या हाताला..."
"अरे रानात बसून जेवण करण्यात गंमतच हाय...सगळ्या अन्नाची चवच गोड लागती." तेवढ्यात ऋषीचा फोन वाजला.
"ताई आईचा फोन जेवायला वाट बघत असत्यात आपण या जेवणात एवढं हरवलो की घरी फोन करून कळवायच राहिलंच...हॅलो हा आई आम्हाला उशीर होईल तुम्ही जेवून घ्या आम्ही इकडेच जेवून येतो." ऋषीने फोन ठेवला. स्वप्नाने त्याला काय म्हणून खुणावले ऋषि मानेनेच काही नाही म्हणाला दोघे पोटभर जेवले. राधक्का परत ताकाचा तांब्या घेऊन आली.
जेवण एवढं झालं होत की ताक पिणं आता अशक्य होतं.
"राधक्का जेवण मस्त झालं होतं." स्वप्ना
"बघा म्हणाली व्हती ना तुमास्नी आवडलं...घ्या ताक.." राधक्कानी मोठाले ग्लास भरून त्यांच्या समोर धरले. ऋषीने मोठा ठेकर दिला.
"राधक्का आता शक्यच नाही..." ऋषि
"जेवण चांगलं पचल अन ताज ताक हाय अजिबात तरास व्हणारे न्हाय." जवळजवळ राधक्कानी त्यांच्या तोंडाला ग्लास लावायचे बाकी होते. आग्रहाखातर खटले आणि पिले सुद्धा... भूषणने सगळं झाल्यावर त्यांना घरी सोडले. जाताजाता स्वप्ना त्याला " थँक यु" म्हणाली.
भूषण हसला आणि गेला.



आज आठ दिवस झाले होते मुंबईत येऊन...तिघेही चांगले रुळले होते. आर्या क्रांती आणि रत्नाला त्रास द्यायची एक संधी सोडत नव्हती. आज रविवार होता. सुट्टी नसायची शक्यतो पण आज सकाळचे ट्रेनिंग झाल्यानंतर दिवसभर सुट्टी होती. त्यामुळे सगळेच परमिशन घेऊन बाहेर गेले होते. रत्नाला संतुचा मेसेज आला तशी ती ओरडली.
"काय झालं ग?" क्रांती
"तुला दादा आलाय खाली... बघ सांगितलं का तरी? एकदम धक्का दिला.खाली बोलावतोय. चल..." रत्ना
"त्यो तुझ्यासाठी आलाय, रत्ने साधं एवढं कळत न्हाय का तुला?" क्रांती तिला चिडवायला लागली.
"आग पण तू न्हाय आलीस तर मला वरडल." रत्ना
"तू सांग त्याला तीच डोकं दुखतंय ती झोपली हाय. आग तुमची वेळ तुमी एकत्र घालवा. मी अशीन तर तुला पण धड नीट बोलत येणार न्हाय अन मला पण..."
"क्रांते मला न्हाय बाई खोत बोलता यणार..."
"जा ग तू तुमाला एकांत नको असल तर येते मी..." क्रांती उठली आणि बॅग मधून कपडे घेतले. रत्ना नाही म्हंटली तरी नजर झाली होती हे तिने बघितले.

"गंमत केली ग जा बिनधास्त अन सांग त्याला माझं डोकं दुखतंय... तसा आमचा भाऊराया काय ईचारल अस वाटत न्हाय करण त्याला म्हाइत हाय त्याची बहीण समंजस हाय." रत्ना हसली आणि तोंड वाकड करून निघून गेली. क्रांतीने रत्ना गेल्यावर अंग बेडवर झोकून दिले.तिच्या एवढेही लक्षात नाही आले की वीरला फोन करावा.
तेवढ्यात वीरचा मेसेज आला.
"काय चालू?" मेसेज टोन वाजली की तिने लगबगीने बघितलं.
वीरचा मेसेज बघून तिच्या चेहऱ्यावर हलकस हसू आलं.
"एकटीच लोळती..."
"रत्ना कुठं गेली."
"दादा आलाय ते फिरायला गेलेत..."
"बरं..." जरावेळ काहीच मेसेज नाही. फोन आला.
"मी खाली आलोय. या आवरून लगीच."
"काय.." क्रांती जोरात बोलली.



क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत.


इतर रसदार पर्याय