मल्ल प्रेमयुद्ध - भाग 38 Bhagyashali Raut द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 38

मल्ल प्रेमयुद्ध

क्रांती आवरून खाली आली. वीरने बाईक आणली होती. एकतर त्याला एवढा भारी बघून तिच्या काळजात धड धड होत होती. ब्लॅक टीशर्ट, जॅकेट नि ब्लु जीन्स, गॉगल अन बुलेट बापरे क्रांती जरावेळ त्याच्याकडे बघत बसली.
" काय बघताय??? प्रेमात पडाल हा ... अन मग म्हणाल माझं प्रेम न्हाय..." वीर हसत म्हणाला.
क्रांतीने पटकन नजर फिरवली आणि एक साईडला बसली. वीर गाडी स्टार्ट करेना.
"काय झालं???" क्रांती
"बुलेटवर अस बसत्यात व्हय.."
"मग???"
"दोन्हीकडून पाय टाकून बसा... चौदा किलोमीटर जायचंय तुम्हाला अवघडल्यासारखं व्हईल" वीर
"एवढ्या लांब??? कुठं???" क्रांती गाडीवरून खाली उतरली.
"लांब न्हाय मुंबईचा समुद्र दाखवणार हाय तुमास्नी..." वीर म्हणाला. क्रांती दोन पाय दोन्हीकडून टाकून बसली. वीर गाडी चालवत होता. क्रांती मोठ्या आश्चर्याने मुंबई बघत होती. याआधी स्पर्धेसाठी आली होती. पण एवढी कधी फिरली नव्हती.

"कोणाची गाडी???" क्रांती
"अरे फिरायचं म्हंटल्यावर गाडी पाहिजेच ना..."
"हो पण कोणाची???"
"घरमालकाच्या मुलाची..." वीर
"काय???" क्रांती
"भेटायला आला परवा... म्हणजे रूम कशी ठेवली बघायला... अन गप्पा मारल्या मग काय दोन दिवस रोज येतोय... त्याला सुद्धा आवडलो मी, त्याला फोन करून म्हंटल...आज नको येऊस मी भायर जाणारे तुझ्या वहिनीला घेऊन मग काय गडी गाडी देऊन गेला लगीच, एक दोन बिल्डींग सोडून जवळच राहतो."
"वा लगीच एवढी मैत्री..."
"मग माणूसच हाय तसा पण काय करणार काय लोकांना अजून तरी समजलो न्हाय..." वीर म्हणाला तस क्रांतीने त्याच्या पाठीवर एक फटका मारला. वीर हसला.
गप्पा मारत जुहू बीच आला. तिथला समुद्र बघून क्रांतीने आ वासला. वीरने गाडी पार्किंग मध्ये लावली. तिच्या मागे येऊन उभा राहिला. आजूबाजूला बघून ती जरा लाजली.

"इथं कुणाकडं सुद्धा बघायचं नाय...कुणाला येळ नसतो या मुंबईत कोणाकड डोकावून बघण्याएव्हढा..." वीरने क्रांतीचा हात पकडला आणि एका छोट्या खडकावर बसला. तीही त्याच्या शेजारी बसली.
"वीर आपण एकत्र फिरतोय हे तुमच्या घरच्यांना समजलं तर?"
"क्रांती मी येताना आबांना सांगून आलोय लग्न होईल तर तुमच्याबर न्हायतर न्हाय... मी त्यांचा शब्द न्हाय मोडणार अन तुमच्यापासन लांब न्हाय जाणार, आव कधी हट्टासुद्धा केला न्हाय मी कुठल्या गोष्टीचा आई अन आबांना म्हाइत हाय. मग माझ्या आयुष्याचा जोडीदार निवडायचा हक्क मी न्हाय का मागू शकत ? अन मला तो हक्क पाहिजे हा हट्ट मी करणार त्यांच्याजवळ... लहानपणी कधी केला न्हाय आता मी मागणार ही गोष्ट..."
"इतकं प्रेम करता की...?"
"अजून विश्वास न्हाय की तुमाला अजून वाटतय की मी बदला घ्यायला लग्न करतोय..."
"न्हाई... इतकं प्रेम करता की हट्ट करायचंय म्हणून... " क्रांतीने त्याची फिरकी घेतली अन हसायला लागली.
"अच्छा तर मजा घेताय आमची..."
"नाय वो गम्मत केली...बर मला सांगा कस वाटतय आर्या सतत बघती तेंव्हा...?"
"कोण आर्या???" वीरचा भाबडा प्रश्न.
"काय??? आर्या म्हाइत नाय... खर सांगा की मला उगीच म्हणताय???"
" क्रांती मला तुम्ही अन रत्ना शिवाय कुठल्याच पोरीचं नाव म्हाइत न्हाय..."
"हो काय...फक्त तुमच्याकडं एकटक बघती. अस वाटत तिला सांगून टाकावं बाई माझा होणार नवरा हाय. पण काय करणार बिचारी नाराज व्हईल म्हणून सांगत न्हाय न्हायतर अस वाटत...."
"काय वाटत इतर पोरींन माझ्याकड बघितल्यावर.."
"केस उपटावेत.." क्रांती रागात बोलून गेली.
"एवढं प्रेम हाय का माझ्यावर..."
"व्हय लय..." क्रांतीने वीरच्या दाट केसांमध्ये हात घातला.
"वीर आता मी न्हाय राहू शकत तुमच्याशिवाय..." वीरने तिचा हात हातात घेतला आणि अलगत तिच्या हाताचे चुंबन घेतले.
"क्रांती आपल लग्न ठरलेल्या दिवशी व्हणार मग त्यात कुणी बी आडवं आलं तरी चाललं. मी खंबीर हाय." तेवढ्यात वीरचं मोबाईल वाजला. नाईलाजाने त्याने फोन खिशातून काढला तर स्वप्ना होती. त्याने क्रांतिकडे बघितले तिने त्याला उचला म्हणून खुणावले.
"हॅलो..."
"हॅलो कसे आहात?"
"मी मजेत.. आता क्रांतीबर हाय, भायर आलोय."
"वा..छान..." स्वप्ना
"का फोन केला व्हता घराचे बरे हयात ना सगळे?"
"हो सगळे बरे आहेत , तुमची आठवण आली म्हणून मी फोन केला आणि..."
"आणि काय???" वीर
" आम्ही भूषणच्या शेतात गेलो होतो. तुमचा मित्र फारच हुशार आणि लाघवी आहेत."
"भूषण्या???"
"हम्मम मी आणि ऋषि गेलो होतो. छान वाटले. लगेच सांगणार होते पण मला वाटले की तुमचा मित्र बोलला असेल. म्हणून मग मी तुम्हाला गावाला आल्यावर सांगावं म्हंटल... मी आणि ऋषि पुढच्या आठवड्यात पुन्हा जाणार आहे गावाला" स्वप्ना
"का पण???"
"भूषणने बोलावलंय..." स्वप्ना
"बर.... जाऊन या.. आम्हाला लगीच येत येणार न्हाय... अन भूषण मला तुमच्याविषयी काही बोलला न्हाय... चाललं ठेवतो मी" वीरने फोन ठेवला आणि तो विचारात पडला.
"क्रांती... काय तरी नक्की होतंय जे भूषणन मला सांगितलं न्हाय पण स्वप्ना मला सांगायचा प्रयत्न करतायत."
"म्हणजे स्वप्ना अन भूषण?"
"अस वाटतंय...मी पण पठ्ठ्याला आता ईचारणार न्हाय..."
"वा लई भारी..." क्रांती हसून म्हणाली.
"अन आम्ही न्हाय का?"
"तुम्हीपण..."क्रांती त्याच्या जवळ गेली.



दादा गुरांच्या धारा काढून आत आले व्हते तेवढ्यात दारासमोर गाडी येऊन थांबली. आबांना बघताच दादा बाहेर गेले आणि त्यांना आदराने आत घेऊन आले.
"या या आबासाहेब..." दादा म्हणल्यावर अब भारावून गेले. आबांना संग्राम घेऊन आला व्हता.
"माफ करा दादा आम्ही एवढं कठोर वागूनसुद्धा तुम्ही आमचं प्रेमानं स्वागत केलं." आबा खाटेवर बसत म्हणाले. आशा पाणी घेऊन बाहेर आली.
"अस काय म्हणता आबासाहेब दारात आलेल्या पाहुण्यांचे आदरातिथ्य करायच हे संस्कार आपले... अस न्हाय हा, तुम्ही काय आमची थोडी उठबस केली का??? ह्या आताच्या पोरांच्या निर्णयाने व्हत्यात गढूळ मन.. चालायचं आमी राग धरून न्हाय बसलो." दादा आणखी प्रेमाने बोलले.
"दादा आणखीन एक गोष्टीसाठी माफ करा... हे लग्न आम्ही मोडायला नव्हतं पाहिजे तुमच्या बापलेकीच स्वप्न आम्ही मोडायला निघालो व्हतो.पण आमचं आम्हाला समजलं आणि आमच्या पोराच्या प्रेमपुढं आम्ही माघार घेतली. दादासाहेब कुस्ती पाहिल्यापासन पोरींचा खेळ न्हाय अशी समजूत व्हती आमची... बायकांनी घर आणि पोर सांभाळायची अस संस्कार आपल्यावर आपल्या आधीच्या पिढ्यानी करू ठेवल्यात.. त्या बाहेर आम्ही कधी इचार केला न्हाय, पोरांना जशी स्वप्न असत्यात तशी पोरीची पण स्वप्न पुर्ण व्हायला पाहिजेत हे उशिरा समजलं अमास्नी. काय करणार हट्ट करायला लेक न्हाय ना आमाला म्हण सुनेन केलेला हट्ट पचनी पडायला येळ लागला. दादासाहेब आमच्या सुलोचनाबाई आणि तेजश्री ह्यांनी लग्न झाल्यास डोक्यावरून असलेला पदर पडून न्हाय दिला. त्या कधी म्हणाल्या पण न्हाय की आम्हाला हे करायचंय कारण आमचा दारारच तेवढा की आमच्या ह्या अन तेजश्री घाबरायच्या आमाला. कदाचित लग्न झाल्यावर आम्ही आमचा मत मांडल असत तर... तुमची लेक पण तशी मन मारून घरात बसली असती एकवेळ पण आमच्या वीरन ते होऊ दिला नसत. कारण क्रांतीची पारख करूनच तो आयुष्यात क्रांतीसारख्या जोडीदारण निवडली. त्यानं अमास्नी पटवून दिलं की ती संसार उत्तम करल अन तिची आवड पण जपलं अन आम्ही त्याच्यावर विश्वास ठिवून तुमची माफी मागायला आलो. हे लग्न व्हायला पाहिजे दादा आपली दोन्ही पोर आपलं नाव देशात गाजवत अशी खात्री हाय आमाला.
आबा बोलताना त्यांचे डोळे पाण्याने भरून आले होते. दादा त्यांच्याजवळ बसले आणि आबांचा हात त्यांच्या हातात घेतला.
"माफी आपल्या माणसांची मागत न्हाईत आबा... अहो तुम्ही मोठं हाय आमच्यापेक्षा लहानाची माफी मागायची असती व्हय अन जरी मागितली तरी लहान माफ करत न्हाईत तर गळाभेट घेत्यात अन त्यातच सगळं आलं." दादा उठले आणि दोन्ही हात पसरले.
आबांनी उठून त्यांना मिठी मारली. संग्राम त्यांच्या वडिलांना हळवं होताना पहिल्यांदा बघत होता.

"आशा दही साखर आना..." अशाने लगबगीने दहीसाखर आणली. आबा आणि दादांनी एकमेकांना भरवली. सगळं नीट झालं. पण संग्रामचा आतून जळफळाट होत होता. "माझ्या बाबतीत न्हाय कधी चांगला इचार केला आबांनी वीर बाबतीत का???आम्ही काय पाप केलंय. आता आम्हाला आमचं हक्क मिळायला पाहिजेत आता शेतात आम्ही लक्ष घालणार. वीर त्याच जे काय हाय ते बघाल बस ह्याच्या पुढं हात पसरून भीक मागणं...कंटाळलो आता आम्ही. बस एकदा ह्यांच लग्न झालं की सगळी शेती मी गोड बोलून करायला घेणार."
सगळं चांगलं झालं होतं. आबा आणि संग्राम जेवायला बसलो. दादांनी आग्रहाने दोघांना जेवू घातलं.

आबा गेल्यानंतर दादांनी क्रांतीला फोन करून सगळं सांगितलं. क्रांती आणि वीर एकत्र होते. दोघंही एकूण खुश झाले होते.

इकडे आर्याला वीरचे वेध लागले होते. तिने वीरची सगळी माहिती तिच्या डॅडच्या पीएला काढायला सांगितली होती. अन आज रात्री सगळ्या डिटेल्स तिला मिळणार होत्या. वीरच्या प्रेमात ती वेडी झाली होती. त्याचे हसणे, पिळदार शरीर, बोलतानाही होणारी हालचाल, त्याचे उभं राहणं, त्याचे गेम मधले एफर्ड्स, पळताना उडणारे कुरुळे केस, व्यायाम करताना निघणाऱ्या घामाच्या धारा... सगळं आठवून ती बेचेन झाली होती. ती कधी एकदा त्याच्याशी बोलती अस तिला झालं होतं. पण हा बघायला तयार सुद्धा नव्हता तिच्याकडे.....


क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत.