गुणवत्ता Ankush Shingade द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गुणवत्ता

गुणवत्ता विकत मिळते काहो?


गुणवत्ता विकत मिळते काहो? असा कोणी प्रश्न विचारल्यास व त्याला हो म्हणून उत्तर दिल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण देशात अलिकडे तशीच स्थिती निर्माण झाली आहे. खाजगीकरण वाढत चाललेले आहे आणि सरकारी क्षेत्र संपुष्टात येत चाललेले आहे.
खाजगीकरण.......सरकार आता खाजगीकरणाकडे जास्त वळलेलं आहे. तशी चिन्हंही दिसत आहेत. वीज विभाग खाजगी झालाय. रेल्वेही तशी पाहता खाजगी झालीय आणि आता शाळाही. नुकतीच एक बातमी व्हाट्सअपवर उजेडात आली. जिल्ह्यातील एका खाजगी शाळेत एका खड्ड्यात पडून एक मुलगा मरण पावला. तशी पालकांनी त्या शाळेत चौकशी केली असता त्यांना त्या शाळेत दारुच्या बाटलाही आढळल्या. सापासारखा विषारी प्राणीही आढळला व त्यावरुन भाकीत करता येवू लागलं आहे की खाजगी शाळा या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहेत.
खाजगी क्षेत्र........तसं पाहता ते जोखमीचं क्षेत्र नाही. फक्त ते पैसा कमविण्याचं क्षेत्र आहे व नाहीही असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. ते क्षेत्र कोणाला बांधील नाही आणि तेवढंच जबाबदारही नाही. लोकांना सहकार्य करण्याच्या दृष्टीकोनातून ते क्षेत्र पाहिजे त्या प्रमाणात योग्य नाही. तरीही त्या क्षेत्राचं महत्व लोकांना अतिशय वाटायला लागलं आहे. त्याचं कारण म्हणजे खाजगी क्षेत्र सध्या करीत असलेलं काम.
सध्याच्या काळात खाजगी क्षेत्र अतिशय योग्य प्रमाणात काम करीत असून त्या क्षेत्राचा जो प्रमुख असतो. तो सांगतो की आपली जर प्रत टिकवायची असेल तर चांगलं काम करा. चांगलं काम करणाऱ्यांचे वेतन वाढविण्यात येईल. कामाच्या योग्यतेनुसार आपलं वेतन ठरविण्यात येईल. याच प्रमुख व्यक्तीच्या म्हणण्यानुसार सध्याच्या काळात खाजगी क्षेत्रातील मंडळी जास्तीत जास्त विकास करीत आहेत.
आज खाजगी क्षेत्राचा विचार केला तर असे आढळून येते की आजच्या काळात अशा खाजगी क्षेत्रात सर्वात जास्त भरणा नातेवाईकांचा आहे हे नाकारता येत नाही. जिथं गुणानुसार व योग्यतेनुसार भरती व्हायला हवी. तिथं काम करायला नात्यातील मंडळी आहेत व ही नात्यातील मंडळी उच्च पदावर आरुढ झालेली आहेत आणि ज्यांना उच्च पद मिळालेलं नाही. त्यां नातेवाईकांना लिहिण्याचं वा जास्त श्रम नसलेलं काम देण्यात आलं आहे. तसंच या खाजगी क्षेत्रात हमालीचं काम त्या लोकांना देण्यात आलेलं आहे. जे नातेवाईक नाहीत वा कोणी जवळचे सगेसंबंधीही नाहीत. परंतु अशी बाहेरची मंडळी ही ना द्वेषभावना ठेवतात ना मालकांबद्दल कोणता मनात राग. याच लोकांच्या भरवशावर अशा खाजगी क्षेत्रातील विकास संभव आहे. कारण सर्वात जास्त द्वेष नात्यातील लोकं करीत असतात.
खाजगी क्षेत्र म्हणजे रिश्तेदारी नाही की जिथं रिश्त्यातील लोकं भरती व्हावेत. तसेच त्या रिश्त्यातील लोकांनी संपुर्ण खाजगी सेक्टरच बुडवावं. अलिकडं असंच चित्र दिसत आहे. खाजगी क्षेत्रात नातेवाईकांची संख्या वाढत चाललेली असून खरं मुल्य दिसत नाही. तसंच कायम स्वरुपातील मुल्य दिसत नाही. फक्त तात्पुरत्या स्वरुपाचं मुल्य दिसून येत आहे.
खाजगी क्षेत्राचा एक घटक असलेल्या शाळेचा विचार केल्यास ज्या शाळेतून सक्षम ज्ञानवंत विद्यार्थी घडतात. त्या शाळा आज अगदी नदीच्या काठावर बांधलेल्या आहेत व अशा शाळांची संख्या काही कमी नाही. त्यातच अशा शाळा ज्या नदी वा ओढ्याच्या तटावर आहेत. त्या ओढ्यांना सुरक्षीत अशा भिंती नाहीत. हा एक चिंतेचा विषय आहे. त्याचबरोबर अशा ओढ्यातून साप वा इतर विषारी जीव शाळेत येणार नाहीत याची शाश्वती देता येणे शक्य नाही. तसेच ते विषारी जीव शाळेत शिकणाऱ्या लहान लहान बालकांना इजा पोहोचविणार नाहीत. असंही म्हणता येत नाही. त्या शाळा सरकारच्या नसल्यानं पालकवर्गही त्या शाळेतील मालक वा प्रमुखाला अक्कल शिकवू शकत नाही वा कोणत्याही स्वरुपाची जबरदस्ती करु शकत नाही. तो पालकवर्ग घाबरतो. कारण त्यांना दर्जा दिसतो. त्या दर्ज्यानुसार या शाळेतील मुलं ही सतत गुणवत्ता यादीत दिसतात. जे पालकवर्गाला हवं असतं.
दर्जा वा गुणवत्ता यादी. कशी ठरते ही गुणवत्ता यादी? तेही एक कोडच आहे. पुर्वीची मुलं शिकवणी लावायची. कशासाठी? ती हुशार बनावीत यासाठी. आताची मुलं शिकवणी लावतात. कशासाठी? ती हुशार व्हावी म्हणून. नाही. ती हुशारच असतात. मग कशासाठी लावतात शिकवणी? मेरीट यावीत म्हणून आणि हे सत्य आहे. आजच्या काळात मुलांना विशेषकरुन शाळा वा महाविद्यालयात जायचीच गरज नाही. शिकवण्या लावा व गुणवत्ता मिळवा. असाच आजचा काळ आहे. आता कोणी म्हणतील की शिकवण्या लावा व गुणवत्ता मिळवा. ही गोष्ट समजली नाही. हा प्रश्न संभ्रम निर्माण करणारा आहे. तर त्याचं उत्तर आहे साटेलोटपणा. सगळ्या गोष्टीची साटगाठ असते. अलिकडच्या काळात शाळा, शिकवणी वर्ग व बोर्ड की जे परीक्षा घेतात. त्यांची साठगाठ असते आणि ही साठगाठ शिकवणी वर्गच करीत असतो. शिकवणी वर्ग पालकांशी संपर्क साधतो व एक करार करतो. अमूक अमूक एवढी रक्कम द्या. आम्ही तुमच्या मुलाला मेरीट लिस्टमध्ये आणणार. जर पालक त्याबाबतीत तयार झाला आणि त्यानं पैसे दिलेच तर मग काहीच समस्या नाही. तो मुलगा मेरीट येणार म्हणजे येणारच. मग त्या मुलाला शाळेत जायचीही गरज नाही. फक्त शिकवणी वर्गाला जा आणि पेपर लिह. कारण कोणी तपासलाच तर तो कोरा दिसायला नको. कमीतकमी अंशी प्रतिशत मुलानं कमवायचं बाकीच्या दहा पंधरा प्रतिशत गुणांची परिपुर्ती पैशानं होणार. चिंता करायची गरज नाही. ही साठगाठ मुलाला आणि मुलाच्या आईलाही माहीत नसते.
असंच घडत असतं नेहमी शिकवणी वर्गात. शाळाही त्या मुलाच्या बाबतीत वावगं बोलत नाही. तो येवो अगर न येवो शाळेत. त्या शाळेला काही घेणंदेणं नाही. कारण त्या मुलांचे काही पैसे शाळेला मिळालेले असतात व अशा खाजगी शाळेचा मालक स्वतःच शाळा प्रशासनाला सांगतो की संबंधीत विद्यार्थ्यांबाबत काही बोलू नये. ते आम्ही पाहणार. संबंधीत प्रशासनही काहीच म्हणत नाही. कारण ते खाजगी क्षेत्र असल्यानं त्यांना भीती असते की आपण जर विरोधात गेलोच तर, शाळा प्रशासन हे खाजगी असल्यानं आम्हाला शाळेतून काढून टाकेल. मग आमच्या पोटावर मार बसेल.
पोट.......पोट अतिशय महत्वाची गोष्ट. ज्याचं पोट चांगलं. त्याच्या सर्वच गोष्टी चांगल्या. शाळा प्रशासन चूप बसतं. कारण त्यांचं त्यावेळेस पोट मधात येतं. तसं त्या शाळा प्रशासनालाही वाटत असतं की संबंधीत मुलगा शाळेत येवो की न येवो. परंतुतो मेरीट आल्यास आपल्याच शाळेचं नाव वाढेल.
सर्व नावासाठीच. नावासाठी अनैतिक कामंही. ती कामं शिक्षकांना शोभत नाहीत. तरीही मुकाट्यानं बिचाऱ्याला सहन कराव्या लागतात. कारण रोजीरोटीआड येणारं पोट. बऱ्याचशा शाळा या शिक्षकांच्या नसतात. शाळा असतात मालकांच्या. जो मालक कमी शिकलेला असला तरी त्याचेजवळ पैसा भरपूर असतो. त्याच पैशाच्या जोरावर तो शाळा उघडतो. मग अशा शाळा चालविण्यासाठी वा त्या शाळेचा दर्जा वाढविण्यासाठी तो कोणत्याही स्तरावर जातो. त्यातच शाळेत लावणीचे कार्यक्रम घ्यावे लागले तरी चालेल वा शाळेत काही भेटीला येणाऱ्या पाहुण्यांना दारु पाजावी लागली तरी चालेल. कारण अलिकडील काळ असाच आला आहे की गुणवत्ता अशा शिक्षणरुपी मंदिरात विकत मिळत आहे. जी शाश्वत जरी नसली तरी उपयोगाची आहे. कारण अशा ठिकाणावरुन जो विद्यार्थी तयार होतो. तो विद्यार्थी पुढं जावून त्याच्यामध्ये मुल्य जरी नसली तरी त्याच्या नातेवाईकाचा वा बापदादाचा व्यापार असल्यानं त्याच व्यापारात ती गणवत्ता कामात येत असते. उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी पैशानं गुणवत्ता यादीत येवून तो डॉक्टर झालाच आणि त्याला जरी डॉक्टरकी येत नसली तरी त्याच्यात डॉक्टरकीची पदवी असल्यानं पुढं जावून पैशाच्या भरवशावर तो एखादा दवाखाना उघडू शकतो आणि त्या दवाखान्यात चांगली होतकरु मेहनतीनं शिकून डॉक्टरकी शिकलेल्या तरुणांना लावून तो आपलं रुग्णालय चांगलं चालवू शकतो.
महत्वाचं सांगायचं झाल्यास अलिकडील काळात गुणवत्तेला वाव नाही. ती बाजारात विकत मिळत नाही. परंतु शिकवणी वर्गात नक्कीच विकत मिळते. त्यासाठी शाळेत जायची गरज नाही. अलिकडे शाळा व शिकवणी वर्ग हे शिक्षणाचा व्यापार करण्याचे केंद्र बनलेले आहे. पैसा फेक व तमाशा देख या वृत्तीनुसार जो जास्त पैसा फेकेल, त्याचाच माल या बाजारपेठेत विकला जातो अर्थात ज्या शिकवणी वर्गाचं शुल्क जास्त असतं व जे शुल्क विद्यार्थी भरु शकतात. त्याच शिकवणी वर्गाचे विद्यार्थी चमकतात असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. अलिकडे तर अशा शिकवणी वर्गाचे फॅड निर्माण झाले असून आपले सेलिब्रेटीही अशा शिकवणी वर्गाची जाहीरात करीत असतात. सरकार अशा शिकवणी वर्गाबाबत बोलू शकत नाहीत. कारण त्यांनाही निवडणुकीच्या माध्यमातून पैसा मिळत असतो. तसेच ते अशा खाजगी शाळेबाबतही बोलू शकत नाहीत. कारण त्या चालवायला सरकार काही पैसे देत नाहीत. मग त्यांनी शाळेत दारु प्राशन केली तरी चालेल. कारण त्या शाळा मालीकमौजाच्या असतात. मग त्यात विद्यार्थ्यांचं नुकसान झालं तरी चालेल. सरकारला काही घेणंदेणं नसतं. सरकारचंही काही जात नाही. शाळेचं काय जातं? शाळेचंही काही जात नाही. मग विद्यार्थी नाल्यात पडून मरण पावला, साप चावून मरण पावला. एखादा किडा चावून मरण पावला तरी चालेल. बिचाऱ्या मायबापाचा एकुलता एक जीव जातो. काळजाचा तुकडा हिरावला जातो हे तेवढंच खरं आहे.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०