मदत.......मदतीचे उपकार कोणी कोणाचे विसरु नये
आपण कुणाला मदत करीत असतो. कशासाठी तर आपण कोणाचे तरी देणे लागतो. म्हणूनच आपण कुणाला मदत करीत असतो उपकाराची भाषा करीत असतो.
काही लोकं मात्र स्वार्थी असतात. ते कोणाकडून मदत तर घेतात. परंतु इतरांना मदत करतांना ते कोणत्याच स्वरुपाची मदत करीत नाहीत. ज्यांनी त्यांना मदत केली, त्यांनाही मदत करीत नाहीत.
मदतीबाबत सांगायचं झाल्यास आपल्याला ज्या विधात्यानं जन्म दिलाय ना. त्या विधात्यानंच आपल्याला इतरांना मदत करण्यासाठी पाठवले आहे. आपला जन्म जेव्हा होतो, तेव्हा आपण आपल्या मुठ्ठी बांधून येतो. ते मुठ्ठी बांधून आपला जन्म होण्याचं कारण काय? असा विचार कोणी केल्यास त्याचं कारण आहे की मी सर्वकाही या मुठ्ठीत जगाला वा सृष्टीला काही देण्यासाठी आलोय हे जगाला सांगणं आणि जेव्हा आपला मृत्यू होतो, तेव्हा आपण बंद मुठ्ठी करुन जात नाही. तेव्हा आपले हात हे पसरत असतात. याचाच अर्थ असा की मी जे काही जन्म घेतांना आणले होते. ते मी सर्व जगाला दिले आहे. आता माझ्याजवळच काही नाही.
जन्म..........माणसाचा जेव्हा जन्म होतो, तो काहीतरी उद्देश घेवूनच. त्या माणसानं जन्म घेतल्यानंतर काहीतरी जन्माचं सार्थक करावं असं विधात्याचं म्हणणं. प्रत्येक जन्मावर त्याचं तेच भाकीत. परंतु जेव्हा एखाद्या व्यक्तीचा जन्म होतो आणि त्याचेवर जेव्हा संस्कार होतात वा त्या परीसरातील जे वातावरण असतं. घरातील वातावरण जसं असतं. त्यानुसार त्या व्यक्तीचा स्वभाव घडत असतो. यानुसार काही लोकं हे एवढे मदतशील घडतात की विचारता सोय नाही. परंतु कालांतरानं त्यांच्याही स्वभावात परीवर्तन घडून येवू शकते. ते परीवर्तन म्हणजे मदत न करणे वा तसा विचार बदलविणे. त्याचं कारण असते त्यानं इतरांना केलेली मदत व त्या मदतीवर त्याला आवश्यकता असतांना इतरांनी त्याला न केलेली मदत.
आजची परिस्थिती पाहता काहीशी अशीच आहे. एखादा व्यक्ती आपला स्वार्थ न पाहता एखाद्या व्यक्तीला मदत करीत असतो. कोणी पैशानं मदत करतो तर कोणी अंगानं. परंतु वेळ अशी येते की जेव्हा त्याला मदत हवी असते. तेव्हा कोणीच त्याला तशी मदत करीत नाहीत. उलट काही लोकं तर मदत देवूनही उपकार न मानता बेईमानीसारखी वागतात. तेव्हा विचार येतो की आपण कोणालाच मदत करु नये. आपला स्वार्थ पाहावा.
मदत.......मदतीबाबत थोरांचं म्हणणं आहे की आपण दहा लोकांना मदत केली आणि त्यातील आठ लोकं जरी बेईमान झाले तरी ते जावू द्या. आपल्या मदतीचे उपकार जर उरलेले दोन लोकं मानत असतील तर ते आपल्यासाठी महत्वाचे आहेत. त्याच दोन लोकांना आपल्या डोळ्यासमोर उभं ठेवून इतरांनाही आपण मदत करावी. तीच मदत आपल्यासाठी फलदायी ठरते.
आपल्याला माहीत आहे की क्रिष्णासारख्या विद्वान व्यक्तीमत्वानं पांडवांना मदत केली म्हणून पांडव जिंकले. दुसरी मदत कर्णानंही केली अप्रत्यक्षरित्या पांडवांना. त्याला माहीत होते की मी कवचकुंडल दिले तर मी मरणार. तरीही ते इंद्राला दानात देवून त्यानं मरण पत्करलं. बदल्यात काय झालं तर त्याला मरण पत्करावं लागलं. त्यानं अर्जुनाला अप्रत्यक्षरित्या मदत करुनही अर्जुनानं त्याला मृत्यूपासून अभय दिलं का? तर त्याचं उत्तर नाही असंच आहे. ती मदतीबाबत बेईमानी झाली. परंतु ते युद्ध असल्यानं त्यात सर्व जायज आहे. दुसरं उदाहरण म्हणजे धृपद राजा व द्रोणाचार्य एकाच गुरुचे शिष्य. द्रोणाचार्य व धृपदला द्रोणाचार्यच्या वडीलानं शिकवलं अर्थात एकप्रकारे मदतच केली. परंतु जेव्हा द्रोणाचार्यला मदतीची गरज होती. तेव्हा धृपदनं तशी मदत केली नाही. ही मदतीची बेईमानी झाली. यामुळंच पुढं बदल्याच्या भावनेनं द्रोणाचार्यनं त्याला अर्जूनाकडून जायबंदी बनवलं गेलं. पुन्हा बदल्याच्या भावनेनं धृपदकडून द्रोणाचार्यचा मृत्यू झाला.
मदत क्रिष्णासारखी असावी की ज्याच्या घायल करंगळीला द्रोपदीनं साडी बांधली व वेदना दूर केल्या. बदल्यात तिचं वस्रहरण होतांना श्रीकृष्णानं तिला वस्र पुरवलं व तशी मदत करुन तिची अब्रू वाचवली. त्यानं आपल्या प्रिय असलेल्या सुदामासारख्या मित्राला मदत केली कोणतीही अपेक्षा न ठेवता. तशीच त्यानं पांडवांनाही मदत केली.
महत्वाचं सांगायचं झाल्यास मदत करु नये असं नाही. मदत करावी सर्वांना. लाचार, अनाथ, अपंग, वयोवृद्ध आणि गरीबांनाही मदत करावी. आपण मदत दिली नाही तर काही लोकं मरुन जातील. कारण जगात असे असे अपघात होतात की त्यावेळेस आपल्याला कोणी मदत केली नाही तर आपला जीवही जावू शकतो. म्हाताऱ्या माणसांना आपण मदत दिली नाही तर ते जगू शकणार नाही. अनाथांना आपण मदत दिली नाही तर तेही जगू शकणार नाहीत. खुद्द आपल्या आईवडीलांना आपण मदत केली नाही तर तेही जगणार नाही. म्हणूनच मदत आवश्यक बाब आहे. परंतु आजचा काळ असा आहे की लोकं इतरांकडून मदतीची अपेक्षा करतात. परंतु मदतीचं काम संपलं की ते विसरुन जातात व जेव्हा इतरांना मदतीची आवश्यकता असते. तेव्हा ते मदत करीत नाहीत. त्यामुळंच भ्रमनिराश होतं मन व वाटतं की आजपासून आपण कोणालाच मदत करु नये. मग आपला स्वभाव बदलतो नमस्कार त्यानंतर कोणी मरत जरी असेल तरी आपण थांबत नाही व मरत्या माणसांनाही आपण पाणी पाजत नाही.
विशेष सांगायचं म्हणजे माणसानं मदत घेवू नये असं नाही. ती घ्यावी. कारण मदतीशिवाय जगता येणं शक्य नाही. परंतु बदल्यात आपण तसे उपकार न विसरता आपणही ज्यांनी मदत केली त्यांना मदत करावी. जेणेकरुन प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाला मदत करेल. अन् जर आपण आपल्याला मदत करणाऱ्यांना, त्याला आवश्यकता असतांना मदत केली नाही व आपण बेईमान झालोच तर तोच संदेश जगात पसरेल व मग अशानं कोणी कोणाला मदत करणारच नाही व विना मदतीनं सर्वजण तडफडून मरतील. म्हणूनच असं होवू नये म्हणून सर्वांनी सर्वांना मदत करावी. मदतीचे उपकार कोणी कोणाचेही विसरु नये हे तेवढंच खरं आहे. कारण मदतीवर देशच नाही तर जग आणि ही सृष्टीही अवलंबून आहे यात शंका नाही.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०